'दस्तंबू' ही मिर्झा गालिबनं घातलेली आर्त साद आहे
पडघम - साहित्यिक
नीतीन वैद्य
  • मिर्झा गालिब
  • Thu , 15 February 2018
  • पडघम साहित्यिक मिर्झा गालिब Mirza Ghalib

आज १५ फेब्रुवारी. मिर्झा गालिबचा १४९ वा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं हा विशेष लेख

.............................................................................................................................................

१८५७ चा उठाव भारतीय इतिहासात अनेकार्थानं लक्षणीय आहे. इंग्रजांच्या अन्याय्य, दडपशाहीच्या धोरणाविरोधात चरबी लावलेल्या काडतुसांचं निमित्त घेऊन मंगल पांडे या सैनिकानं २९ मार्च १८५७ रोजी बंडाचं निशाण फडकावलं. त्यातल्या ठिणगीला ओळखून इंग्रजांनी त्याला पकडून लगेच ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी दिलं. यामुळे आंदोलनाची आग सगळीकडे वणव्यासारखी पसरली. १० मे रोजी मेरठला उडालेला भडका लगेच दिल्लीकडे सरकला. हे एवढं ढोबळपणे आपल्याला माहीत असतं. यापुढची दिल्लीतली सप्टेंबर अखेरपर्यंतची वाताहत  गालिब डोळ्यांनी पाहतो, अनुभवतो, त्याच्या त्रस्त मनानं केलेल्या नोंदींचा हा बुके- ‘दस्तंबू’. ( दस्तंबू -  मिर्झा गालिब की डायरी, १८५७. बेबसी और अंतर्द्वंद की अनोखी अभिव्यक्तियाँ. मूळ फारसीतून हिंदी-उर्दू अनुवाद डॉ. सय्यद ऐनूल हसन. संपादन अब्दुल बिस्मिल्लाह, राजकमल प्रकाशन, दिल्ली. प्रथमावृत्ती २०१२.)

तुम सितारोंके आगे नतमस्तक न होना 
वे अंतिम शक्ती नहीं है, जो संसार की 
समस्याओंका समाधान कर सके 
खुदा सबसे बडा है, उसके प्रकाश ने
अदृश्य को भी स्वयं समाहित कर लिया है

अशी ईश्वरप्रशस्तीनं सुरुवात करत गालिब लगेच  'मी लहानपणापासून इंग्रजांचे मीठ खात आलो आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर दात आले तेव्हापासून आजपर्यंत या विश्वविजेत्यांनीच माझ्या तोंडापर्यंत भाकरी पोचवली आहे ...' असा विषयावर येतो.

या सुरुवातीच्या काही दिवसांत तितक्या तयारीत नसल्यानं इंग्रजांनी बहुतांश दिल्लीवरील नियंत्रण गमावलं. या काळात जुन्या दिल्ली परिसरातल्या काश्मिरी गेट आणि दिल्ली गेटच्या मधील बल्लीमारान मुहल्ल्यात गालिब राहात असे. इथला प्रचंड हिंसाचार त्यानं डोळ्यानं पाहिला. त्याचे बहुतेक दोस्त, नातेवाईक एकतर मारले गेले वा परागंदा झाले. बारा घरांच्या या छोट्याशा गल्लीची दारं दोन्ही बाजूंनी बंद केली असल्यानं त्याला असहाय, भेदरलेल्या एकांतात रहावं लागलं. या काळातल्या न्यायी - बुद्धिमान - सज्जन इंग्रज अधिकारी, सुकोमल - रुपवती - चांदीसारखे शरीर असलेल्या इंग्रज स्त्रिया, अद्याप जग पुरते पाहूही न शकलेली इंग्रज बालकं ' यांच्या हत्यांनी त्याचा शोकसंताप अनावर होतो.

'अंगार उगलनेवाली मौत भी इन महान व्यक्तियोंके शोक में काले कपडे पहने तो गलत न होगा. आसमान टूटकर धरतीपर गिर पडे और बवंडर फैल जाएं तो भी इनका हिसाब चुकता न होगा..

ऐ बहार! कत्ल होनेवालोंके बदन की भाँती
तू भी खून में लतपत हो जा..
समय! तू चंद्रमाविहीन रात की तरह काला हो जा..
सूर्य! तू अपने गालोंपर तबतक थप्पड मारता रह
जबतक वें नीले न पड जाय..
चांद! तू वक्त के दिल में दाग बनकर बैठ जा...
असा काव्यमय तळतळाट येतो.

राजाविना शहर, मालकाविना नोकर, सर्व तऱ्हांनी स्वतंत्र झालेले लुटारू...व्यापाऱ्यांनी कर देणं बंद केलं आहे. रस्त्यांचं जाळं तुटून गेलं आहे. टपाल थांबलं आहे. वस्त्यांचे भग्नावशेष‌ उरले आहेत. बंद घरांना अज्ञात शरणार्थी लुटालूट करण्याची हक्काची जागा समजत आहेत. बंडखोर तळपत्या तलवारींनिशी गल्लीबोळांतून हिंडत आहेत. सुसंस्कृत, सज्जनांना आपली हार स्वीकारून अब्रूचा लिलाव करण्यास भाग पाडलं जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मुली सोडून दिल्लीतल्या सर्व तरुण स्त्रियांच्या अंगावरचे सोन्या-चांदीचे दागिने हृदयशून्य, डरपोक दरोडेखोरांनी काढून घेतले आहेत... वाताहतीच्या या वर्णनात गालिब बंडखोरांना 'भिकमंगोंकी औलाद' असे संबोधतो..

या सगळ्यात राजाचं स्थान ज्याचा प्रकाश संपलेला आहे अशा मावळत्या चंद्रासारखं होतं. यात 'मेरा दुख इतना असीमित है की अगर सितारोंको इसकी आवाज सुनाई जाय, तो वे भी खून के आंसू रोने लगेंगे' असा व्यक्तिगत उद्गारही येतो. 

अशा चार महिने चार दिवस इतक्या काळानंतर शहराच्या बाहेर असलेल्या इंग्रज सेनेनं प्रचंड तयारीनिशी काश्मिरी गेटवर हल्ला करून दिल्लीला पुन्हा आपल्या नियंत्रणात आणलं. गालिबच्या शब्दात अत्याचाराची जागा पुन्हा न्यायानं घेतली. इंग्रज सेनेनंही शहरात पुन्हा घुसताना अपरिमित हिंसाचार केला. पण यावेळी गालिब म्हणतो,

'बहुत सारे बेसहारा कमजोर लोगोंको जान से मार दिया,

उनके घर जला दिये पर विजेताओंके विजय के समय तो ऐसाही होता है,

ऐसेमें मुझे किसीका भय न था..

परंतु 
मेरी खोली खाली है
मेरे आशा तरु के पत्ते झड चुके है
या खुदा! मैं कबतक इस बात से खुश होता रहू 
की मेरी शायरी हिरा है 
और ये हिरे मेरी ही खान के खजाने है...'

अखेर अंधःकार संपला, धुकं विरलं. असह्य उकाड्यानंतर आभाळ भरून आलं, बरसु लागलं… असं म्हणतात की ढग समुद्रातून पाणी उचलतात आणि जमिनीवर त्याचा वर्षाव करतात. यावेळी ढग 'हुमा' (न दिसणारा पक्षी) होऊन अमृत घेऊन आले आहेत... शेवटी तर, 

ऐ गालिब! तुम्हारे दोस्त में कोई बुराई न थी 
वह तो तुमको सेवा प्रदान करने आया था 
जिसे तुम समझ न सके

अशी उपरतीही येते. इथे गालिब थोडा मागे वळून पाहतो.
' ..हे माझं बासष्ठावं वर्ष. गेली पन्नास वर्षं कवितेच्या मैदानात घाम गाळतोय. पाच वर्षांचा होतो तेव्हा वडील अब्दुल्ला बेग खान बहादूर निवर्तले. काका नसरुल्ला बेग यांनी पुढे सांभाळलं. पण लवकरच म्हणजे नऊ वर्षांचा असताना तेही गेले. आमचे (मी आणि छोटा भाऊ) बरे दिवस फार लवकर संपले. काका जनरल लॉर्ड लेकचे निकट सहकारी, त्यांच्याकडे चारशे घोडेस्वारांचे दल, आग्र्याजवळ दोन परगण्यांची जहागिरीही. पण काकांच्या मृत्युनंतर इंग्रज सरकारनं जहागिरी जप्त करून आम्हा दोघा भावंडांना पेन्शन सुरू केली, ज्यावर आमचा उदरनिर्वाह होई. एप्रिल १८५७ पर्यंत ही पेन्शन मी दिल्ली कलेक्टरकडून घेत होतो…'

बंड उद्भवलं आणि सगळं विस्कटलं. अर्थविभाग बंद झाला, पेन्शन बंद झाली...

'…दोन वर्षांपूर्वी मी व्हिक्टोरिया राणीच्या सन्मानार्थ एक प्रशंसाकाव्य (कसीदा) लिहिलं. (त्याचा गद्य भावानुवाद ‘दस्तंबू’मध्ये शेवटी आहे. पूर्वी दरबारी भाट काय प्रकारचं काव्य करत असतील याची कल्पना यावरून येत असे, कुठेही उपरोधाचा सूर न लावता, म्हणता येईल.) ते दिल्लीहून, व्हाया मुंबई, लंडनला पोचले. 'काव्य लंडनदरबारी पोचलं, लवकरच ते राणीसमोर सादर होईल असं यात मला मदत करणारे लॉर्ड इलेन बोरो यांनी कळवलं...'  पुढे प्रशासकीय औपचारिकतेनुसार ते भारतीय प्रशासनामार्फत शिफारसीसह सादर व्हावं असं कळवलं गेलं. गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी (त्याचा उल्लेख गालिब सिकंदर जैसा महान, फरीदून जैसा बहादूर असा करतात) आपल्या स्वाक्षरीसह ते पाठवलं. ज्यात गालिब तीन मागण्या करतात. रोम, इराणमधील राजांनी जशी कवी, शुभचिंतकांची तोंडं मोत्यांनी भरली, त्यांना गळाभर दागिने भेट दिले, तसेच आपल्यालाही देण्यात यावेत. ‘मेहर-खान’ या उपाधीनं सन्मानित करावं. उपजीविकेचं काही साधन, ज्याला इंग्रजीत पेंशन म्हणतात, देण्यात यावं.

...आणि या टप्प्यावर बंड कडमडलं. गालिबने म्हटलंय,

'यदि भारतीय शासन में तात्कालिक इन्कलाब के कारण ये उथलपुथल न होता, न्याय का मार्ग विश्वासघाती सिपाहियों के कारण न बदला होता, तो अब तक इंग्लैंड की ओरसे मुझे सम्मनित किया जा चुका होता...'.

इस समय इस कामना के सिवा कुछ भी नहीं है..
किसी तीर या तलवार ने मुझे हलाक नहीं किया
किसी शेर या चितेने मेरे शरीरपर पंजे नहीं मारे
बल्की मैंने खुद अपने होंठ काट लिये है और
उनसे बहते हुए रक्तको अपनी जीभसे मल रहा हूं
मैं खून पी रहा हूं, अपने जीवन से थक गया हूं....

यावर काही भाष्याची गरज नाही. दरम्यान आणखीही बरंच घडत होतं. गालिबचा दोन वर्षांनी लहान भाऊ (दोघे पोरकेपणी एकत्रच वाढलेले. त्यामुळे त्याच्यावर अतिशय प्रेम होतं) मिर्झा युसूफ गालिबच्या घरापासून जवळच कुटुंबासह रहात असे. तिसाव्या वर्षी त्याला वेडाचे, अपस्माराचे झटके येऊ लागले, जे पुढे कायमच येत राहिले. पत्नी आणि मुली त्याला एका वृद्ध नोकराच्या हवाली करून निघून गेल्या. या काळात घरातल्या सक्तीच्या एकांतात त्याची बातमी कळणंही अवघड होतं. ३१ सप्टेंबरला त्याच्या घरात लुटारू घुसले, होतं नव्हतं ते सर्व घेऊन गेले... याचा घोर असतानाच १९ ऑक्टोबरच्या सकाळी एकाकी अवस्थेत रात्रीच केव्हातरी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी येते.

शिपाई आणि शेजाऱ्यांच्या मदतीनं जवळील मशिदीच्या जमिनीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले, असं गालिब नोंदवतो. (गुलजारांनी लिहिलेल्या गालिब चरित्रात मात्र तणावग्रस्त परिस्थितीत पोलिसांनी भावाच्या अंत्यसंस्काराला गालिबला विनवणीनंतरही जाऊ दिलं नाही, शेवटी घरातल्या जुन्या कापडांचे तुकडे त्याने शेजाऱ्यांकडे कफन म्हणून दिले असा उल्लेख आहे.)

यानंतरही गालिब काहीबाही लिहित राहतो. बंडाच्या आसपासच्या भागातल्या कहाण्या - जनश्रुतीयोंके आधारपर म्हणत - सांगत राहतो. या कठीण काळात मदत करणाऱ्या आसपासच्या लोकांबद्दल कृतज्ञतापूर्वक लिहितो. यासाठीही की जेव्हा मित्रांमध्ये ही कथा वाचली जाईल तेव्हा त्यांना कळावं, शहर मुसलमान मुक्त झालं आहे, त्यांच्या रिकाम्या घरांतून रात्री दिवे उजळत नाहीत,  दिवसा छताच्या धुराड्यातून धूर येत नाही. गालिब असा माणूस होता ज्याचे हजारो मित्र होते, प्रत्त्येक घरात त्याचे मित्र वा ओळखणारे होते, पण आज या एकटेपणात लेखणीशिवाय त्याचा कुणीही सहोदर नाही, आणि सावलीशिवाय कुणी संबंधी…

अब मेरी दशा ऐसी है कि मेरे मुख पर
उस समय तक तेज नहीं आता जब तक
मैं अपने मुखडेको अश्रुओंसे भिगों न लू
मेरे शरीर में दुख एवं पीडा ने
आत्मा एवं ह्रदय का स्थान ग्रहण कर लिया है
मेरे बिस्तर का तानाबाना काटोंसे भर गया है....

पेन्शन मिळणं बंद झालं, त्याला पंधरा महिने लोटले…अंथरुण-पांघरुणं आणि कपडे विकून दिवस ढकलतो आहे, भीती वाटते एक दिवस असा येईल, सारे कपडे विकून झाल्यावर नग्नावस्थेत भूकेनं मरेन... ३१ जुलै १८५८ ला गालिब थांबतो… जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्याचे डोळे पदवी, कपडे-दागिने आणि पेन्शनकडे लागले आहेत, त्यासाठी आता त्याला प्रकाशनाचे वेध लागले आहेत.

(गालिबचा व्यक्तिगत दृष्टिकोन बाजूला ठेवूनही १८५७ च्या उठावाच्या सुरुवातीच्या काळातील तपशीलांकडे पाहता येईल. त्यासह गोडसे गुरुजींनी 'माझा प्रवास'मध्ये लिहिलेले या उठावाचे दिल्लीबाहेरील तपशील सलग वाचले पाहिजेत असेही वाटून गेलं.)

दुसऱ्या भागात ‘दस्तंबू’च्या छपाई संदर्भात मुंशी हरगोपाल 'तफ्त' यांना १७ ऑगस्ट ते १३ नोव्हेंबर १८५८ या काळात गालिबनं लिहिलेली तब्बल सोळा पत्रं आहेत. हस्तलिखित पाठवल्याची पोच मागणं, दुरुस्त्या सुचवणं, छपाईची चौकशी आणि तगादा, प्रती कशा -किती- कुणाला पाठवाव्या याच्या सूचना... अखेर १२ नोव्हेंबरला पहिल्या प्रती आल्या (त्या काळाचा, उपलब्ध छपाई तंत्राचा, दिल्ली आग्रा अंतराचा विचार करता हा वेगही नवलाचा), गालिबनं‌ त्या डोळा भरून पाहिल्या... शेवटचं सोळावं पत्र १३ नोव्हेंबरला त्यानं त्यांची पोच म्हणून (आणि अर्थात पुढच्या सूचना आणि चौकशीसाठीही) लिहिलं. त्यात तो लिहितो, 'कागज, स्याही और खत का हुस्न देखकर मैंने विचार जाना के सुनहरे काम पर ये किताबें स्वर्ग के सिंहासन बहिश्त बन जाएंगी, हुरे इनको देखकर शरमाएंगी...'

या छोट्याशा पुस्तकांत गालिबची मान-मरातब, पैसा (अर्थिक स्थैर्य) यासाठी खाली उतरण्याची तयारी-लाचारी दिसते, तसा आपल्या असामान्य कवित्वाचा पीळही दिसतो. या सगळ्या ऐहिक ऐश्वर्यावर आपल्या प्रतिभेच्या जोरावर आपला अधिकारच आहे असं त्याला वाटतं. जे खरंच आहे.

असामान्य प्रतिभावंत असूनही ऐहिक बाबींसाठी त्याला आयुष्यभर संघर्ष करावा लागला. दिल्लीच्या तख्तावरचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर हा स्वतः शायर, त्याच्या दरबारात गालिबनं राजकवी पदावर असणं हे साहजिक, पण तिथं आधीच इब्राहिम जौक बसले होते. त्यांना हटवून गालिबला हे पद देण्याची हिंमत बहादूरशहा जफरकडे नव्हती.

'मी आठवड्यात दोनदा दरबारात जात असे, इच्छा झाली तर काही वेळ थांबतही असे. बादशहा व्यस्त नसतील तर स्वतः नव्या रचना त्यांच्याकडे देई, अन्यथा बादशहाच्या दूतांकडे देत असे. दरबाराशी माझं नातं एवढंच होतं. हा छोटा सन्मान मानसिक, शारिरीक दृष्टीनं आरामदायक, आणि दरबारी वादविवादांपासून दूर असला तरी आर्थिकदृष्टया सुखकर नव्हता,' असं गालिब नोंदवतो . त्याचा गाडा चालला तो इंग्रजांच्या पेन्शनवर. त्याची राहणीही खर्चिक म्हणावी अशी. विदेशी दारू नसेल तर त्याला झोप येत नसे. त्यामुळे हक्क असूनही मानमरातब, पैसा अधिकारात न मिळता त्याला याचनेनं मागावा, मिळवावा लागला. त्यातून त्याला जुगाराचं व्यसन जडलं. त्यापोटी तुरुंगवासही भोगावा लागला. उधारी-उसनवारी करणं, ती फेडता न येणं, त्यासाठी सबबी सांगणं, तोंड चुकवणं, लाचारी करणं हे सगळं जणू त्याच्या जगण्याचाच भाग होतं. एकेकाळी दिल्लीत असा एकही धनको नव्हता ज्याच्याकडून गालिबनं पैसे घेतले नव्हते, असं गुलज़ार नोंदवतात.

कौटुंबिक पातळीवरही पत्नी उमराववर त्याचं प्रेम होतं. पण ती चारचौघींसारखी साधी आणि गालिब अलौकिक कवित्वशक्ती लाभलेला… अशा वेळी वाढत्या संसारात बायका रमतात. उमरावची सात बाळंतपणं झाली, पण एकही मूल जगलं नाही. संसार दोघांचाच राहिला. शेवटी तिनं माहेरच्या नात्यातील दोन मुलांना दत्तक घेतलं तरी तिचं भावविश्व गालिबभोवतीच घोटाळत राहिलं. (उठावाच्या काळात तिचेही सगळे दागिने गेले, अशी नोंद गुलज़ारकृत गालिबचरित्रात आहे.)

मी गालिबच्या काव्याचा, शायरीचा जाणकार वगैरे सोडाच, किमान अभ्यासकही नाही. पण मध्येच कुठेतरी, कुठल्यातरी संदर्भात त्याची चार-दोन ओळींची रचना क्षणार्धात विजेच्या कल्लोळासारखी चमकून जाते. गुलजारांनी लिहिलेलं गालिबचं चरित्र (मिर्झा गालिब एक स्वानही मंजरनामा, रुपा पब्लि. तृतीयावृत्ती २०१४) वाचलं, पण ते पूर्ण उर्दूत असल्यानं आकलनात बऱ्याच जागा मोकळ्या राहिल्या. मग त्याचा अंबरिश मिश्र यांनी केलेला मराठी अनुवाद वाचला. (ऋतुरंग प्रकाशन, प्रथमावृत्ती ऑगस्ट २०१४) त्याच्या प्रस्तावनेत मिश्र त्याचा असाच एक शेर उदधृत करतात,

या रब जमाना मुझको मिटाता है किसलिये?
लौह-ए-जहां पे हर्फे-एक-मुकर्रर नहीं हूं मैं..

(हे जग मला पुसून टाकण्याची खटपट का करतंय? मी म्हणजे पुन्हा पुन्हा लिहिता येईल असं अक्षर नाही)

गालिबसारख्यांचं काय करायचं हे आम्हाला तेव्हा समजलेलं नव्हतं, आजही समजलेलं नाही. ('आपल्याकडे फक्त करमणूक करणारे कलावंतच फक्त पूर्णवेळ कलावंत आहेत. सर्व चांगले लेखक, कवी, कलावंत, तत्त्वज्ञ नोकऱ्या करूनच निर्मिती करतात, असं श्याम मनोहर यांनी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उदधृत केलेलं आपल्या आगामी कादंबरीतलं वाक्य ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक’मध्ये नुकतंच वाचलं.) 

जगण्यानं गालिबला आयुष्यभर छळलं. (आणि कवितेनं यातून त्याची सुटका केली असं मिश्र  म्हणतात) 'दस्तंबू' म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या पर्वात याला वैतागून त्यानं घातलेली आर्त साद आहे, असं मला वाटतं.

............................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......