सुनील कर्णिक : आपला ‘बुकमॅन’
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • सुनील कर्णिक आणि त्यांची सहा पुस्तकं
  • Tue , 13 February 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar सुनील कर्णिक Sunil Karnik

सुनील कर्णिक हे नाव तुमच्यापैकी सर्वांनाच माहीत असण्याचं कारण नाही. पण ज्यांना ते माहीत आहे, त्या सर्वांना सुनील कर्णिक म्हणजे त्याच्या क्षेत्रातला चौकस, चौफर व चोषक (हे जरा भाजप स्टाईल झालं!) असा इसम आहे आणि तो खराखुरा अजातशत्रू आहे हे माहीत आहे.

काय करतात हे सुनील कर्णिक? तर उपजिविकेसाठी ते ग्रंथव्यवहारासंबंधीचं कुठलंही काम मोबदला घेऊन, विनामोबदला, प्रसंगी पदरमोड करून, तर काही वेळा जबाबदारी, आस्था म्हणून करतात. हे करताना ते संपादक, मुद्रितशोधक, मुद्रण व्यवस्थापक इथपासून ते पुस्तकाचे गठ्ठे उचलून ते एसटीच्या टपावर, टेम्पोत किंवा गाडीच्या (दुसऱ्याच्या) डिकीत ठेवण्याचं काम करतात. हे वर्णन वाचल्यावर काही लोकांच्या डोळ्यासमोर कुणीतरी अर्धशिक्षित, हरहुन्नरी, हरकाम्या यायचा. तर ती मंडळी सपशेल चुकली असं म्हणावं लागेल. कारण सुनील कर्णिक उच्चशिक्षित, खात्यापित्या घरचे आणि काही सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेत. पण पिढीजात छापाचं काही नाही.

अशा या सुनील कर्णिकांची कालच्या ९ फेब्रुवारीला, डिंपल प्रकाशनानं एकाच वेळी सहा पुस्तकं प्रकाशित केली. या सहापैकी पाच पुस्तकं नवी कोरी तर एका पुस्तकाची दुसरी आवृत्ती. ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ हे कर्णिकांचं पहिलं पुस्तक. साधारण ७०च्या दशकापासून ग्रंथव्यवहार जगताशी संबंधित राहिलेल्या व निमित्तानं लेखन केलेल्या कर्णिकांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं ते २००० साली! त्याचं शीर्षक ‘न छापण्याजोग्या गोष्टी’. पहिल्याच पुस्तकाच्या या शीर्षकावरून, सांगण्यासारखं बरंच असूनही ते छापण्यायोग्य आहे का? या विचारात पुस्तक लांबलं असावं. मात्र कर्णिकांचं लेखन तुम्ही कधी वाचलं असेल तर तुम्हाला या शीर्षकाचा (इतर कुणीही) ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ असाही अर्थ लागेल. आणि तोच अधिक समर्पक आहे. आज सतरा वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत असतानाच ‘मलिक अंबर, माहितीची कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘महानगरचे दिवस’, ‘सोनं आणि माती’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या?’ अशा शीर्षकाची नवी पाच पुस्तकं, असा हा पुस्तकांचा संच प्रसिद्ध झालाय.

या सर्वच सहा पुस्तकांमधलं लेखन पूर्वप्रकाशित आहे. सदरलेखन, दिवाळी अंक, पत्रकारितेचा भाग म्हणून ते विविध वृत्तपत्रं, मासिकं यात प्रसिद्ध झालेलं आहे. एका अर्थानं कर्णिकांच्या जवळपास ४० वर्षांच्या कारकिर्दीतलं हे समग्र (संकलित\संपादित) साहित्य आहे.

कथा\कविता\कादंबरी अशा कुठल्याही मुख्य साहित्य प्रकारातलं लेखन नसून कर्णिकांचं लेखन हे महाराष्ट्राच्या (महाराष्ट्रनिर्मिती नंतर म्हणू) साहित्य-सांस्कृतिक जगाचा एक अस्ताव्यस्त असा दस्ताऐवज आहे. ‘अस्ताव्यस्त’ हा शब्द जाणीवपूर्वक योजला आहे. कारण कुणाला तो विशाल वगैरे पटही वाटू शकतो. पण कर्णिक नोंद घेताना, ठेवताना, कसलाच क्रम अथवा आजच्या भाषेतला लोकप्रिय शब्द, ‘अजेंडा’ ठेवत नाहीत. कर्णिकांच्या आवडत्या तळागाळातल्या वर्गाची एक व्यावसायिक पट्टी त्यांना चिकटवायची झाली तर ग्रंथव्यवहारातले ते ‘कचरावेचक’ आहेत!

त्यांची शोधक नजर जशी सुशोभित बागेवर असते, त्याहून अधिक ती बागेबाहेरच्या कचराकुंडीवर असते. समाजानं टाकून दिलेले, दुर्लक्षिलेले, कमअस्सल मानून भिरकावलेले विषय, लेखन, लेखक, प्रकाशक, विक्रेत, वाचक कर्णिक वेचून घेतात आणि आपल्यासमोर तो बोळा अशा पद्धतीनं उचकून, उलगडून सरळ करून मांडतात की, आपल्याला आपल्यासकट आपल्या तथाकथित समाजाची लाज वाटावी!

कर्णिकांच्या व्यक्तित्वाला (आणि त्यामुळेच त्यांच्या लेखनाला) एकाच एक साच्यात बसवता येत नाही. ज्या साहित्य, सांस्कृतिक जगात ते वावरतात, त्यातही प्रामुख्यानं ग्रंथव्यवहाराच्या जगात, तिथं एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा तर ते अशा ध्यासानं करतात की, वाटावं हेच त्यांचं जिवित कार्य असावं. पण कर्णिक एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या भूमिकेत शिरून केवळ तेच एक उद्दिष्ट्य ठेवत नाहीत. ते टेबलाच्या या आणि त्या अशा दोन्ही बाजूला बसतात व त्या त्या बाजूनं न्याय्य भूमिका पार पाडतात. म्हणजे टेबलाच्या या बाजूला बसून ते एखादं चांगलं लेखन प्रसिद्ध करण्यासाठी पलीकडच्याला महत्त्व पटवून देतील, तर कधी पलीकडे बसून आग्रहानं वेगळं छापून घेतील.

कर्णिकांसाठी टेबलाच्या दोनच नाही, बाजूच्या दोन बाजूंसह प्रसंगी टेबलाखालची बाजूही वर्ज्य नसते. अर्थात टेबलाखालच्या व्यवहाराचे ते साक्षी असतात, कर्ते नसतात. आणि त्या व्यवहारावर कोरडे ओढताना ते आपला, तुपला, पुढचा, मागचा असला कसलाच विचार करत नाहीत.

या अशा भूमिकांमुळे कर्णिक गांधीवादी वगैरे वाटतील. पण ते कुठल्याच विचारधारेशी बांधील नाहीत. पण मानवाला उत्क्रांत करणाऱ्या, मानवी जीवनाचं उन्नयन करणाऱ्या, विषमता, शोषण, दंभ यावर प्रहार करणाऱ्या विवेकी, विद्रोही, परिवर्तनीय व मानवी विचारधारेचे ते पुरस्कर्ते व पाठीराखे आहेत. उजव्या विचारसरणीचे धोके ते ओळखतात. त्यामुळे त्यांच्या समरसता, प्रतिभा संगम किंवा वंचित, वनवासी विकासाच्या मुखवट्याला ते न भूलता थेट त्यांच्या चड्डीला हात घालतात. तरीही त्यांची प्रतिमा पठडीबाज संघ परिवार विरोधी नाही.

कर्णिक असेही नाहीत, तसेही नाहीत, इकडेही नाहीत व तिकडेही नाहीत. मग ते ‘सोयीस्कर’ आहेत का? तर याचंही उत्तर ‘नाही’ असंच आहे. कर्णिक जिथं असतात, तिथं तनमनधनानं व संपूर्ण असतात. पण तिथं विपरित, अन्याय्य, ध्येयापासून दूर जाणारं असं काही घडत असेल, घडलं किंवा घडण्याची शक्यता दिसली की, ते संबंधितांना त्याची स्पष्ट जाणीव देऊन, आपला अधिकार शाबूत ठेवून तिथून बाहेर पडतात. बुडत्या जहाजावरून पळ काढणाऱ्या उंदरांची वृत्ती त्यांच्यात नाही हे त्यांचे ‘मौजेचे दिवस’, ‘महानगरचे दिवस’ किंवा ‘आज दिनांकमधील दिवस’ वाचल्यावर आपल्या लक्षात येईल. निखळ ग्रंथव्यवहार आणि ग्रंथातून ज्ञान व माहितीचा प्रसार आणि त्यातून सुसंस्कृत समाजाची निर्मिती एवढं स्पष्ट, ध्येय, आकांक्षा अपेक्षा कर्णिक ठेवताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या गरजा कमी होऊन, लोभ-प्रलोभनाचा वारा त्यांना लागत नाही. असंही छान, शांत जगता येतं याचा वस्तुपाठ तयार करतात कर्णिक.

ग्रंथव्यवहारात ग्रंथनिर्मिती, अक्षरजुळणीकार, मुद्रितशोधक, मुद्रक, बांधणी करणारे, चित्रकार, वितरक, प्रकाशकांचे प्रतिनिधी, गावोगावचे पुस्तक विक्रेते, ग्रंथालयं, ग्रंथपाल, ग्रंथालय कर्मचारी हे कर्णिकांच्या जिव्हाळ्याचे विषय. पुस्तकाच्या बाळंतपणात कर्णिक अनुभवी सुईणीच्या भूमिकेत शिरतात आणि मग त्यांच्यासाठी पाणी तापवणारीही तेवढीच महत्त्वाची होते.

ग्रंथव्यवहाराच्या निमित्तानं लेखक, प्रकाशकांच्या दुनियेत हिंडताना विविध विषय, माणसं यावर कर्णिकांचं चौफेर लक्ष असतं. एखाद्या नवोदित लेखकाला प्रोत्साहन देतानाच ते प्रस्थापितांच्या नव्या सत्व नसलेल्या साहित्याला ‘रद्दी’, ‘कचरा’ म्हणायला कचरत नाहीत. तसंच एरव्ही मानभावीपणे नैतिकतेचे, आदर्शाचे दाखले देणारे प्रसंगी कसे दाती तृण धरून सत्ताधाऱ्यांचे पाय चाटतात, हे ते सोदाहरण दाखवून देतात. हे करताना त्या त्या व्यक्तीचा लखलखीत भूतकाळ किंवा सुप्रतिष्ठित वर्तमान याची कुठलीही भीड ते बाळगत नाहीत आणि दूध का दूध, पानी का पानी करतात. या संदर्भात गंगाधर गाडगीळ, नारायण सुर्वे, अरुण टिकेकर, विजया राजाध्यक्ष, भालचंद्र नेमाडे अशा कुणालाच ते सोडत नाहीत.

याशिवाय आपण कधीही ज्यांचं साहित्य काय नावदेखील ऐकलेलं नसतं अशा दुर्लक्षित लेखकांना ते त्यांच्या, त्या त्या वेळच्या स्थानाचा उपयोग करून प्रसिद्धी देतात, आठवणींना उजाळा देतात अथवा विस्मृतीत गेलेल्या लिखाणासाठी पुनर्प्रकाशनाची वाट मोकळी करताना दिसतात. अशा वेळी कर्णिकांमधली निष्पक्षता, निरपेक्षता व ज्याचं मोल त्याच्या पदरात घालण्यासाठी केलेली धडपड केवळ ‘मानवी’ राहत नाही तर प्रस्थापित कंपूशाहीला उघडं करत उचित ‘न्याय’ही देते.

कर्णिकांच्या या पुस्तकातील लेखात विषय वैविध्य तर आहेतच, पण त्याचबरोबरीनं अनेक दंभस्फोट, विस्मृतींची स्मृती, दुर्लक्षित वर्गावर प्रकाशझोत, अनेक गमतीजमती, किस्से, नवी-जुनी माहिती, स्थळकाळ महात्म्य, व्यक्तिरेखा सापडतात. जे वाचल्यावर असं वाटतं हे आपल्याला कधी कुठे आणि कसं वाचायला मिळालं असतं!

त्यातही श्रीपु भागवत, मौज, राम पटवर्धन, विजय तेंडुलकर, निखिल वागळे यांच्या संदर्भात लिहिताना कर्णिक सर्व प्रकारच्या भूमिका निभावतात. ते भाट तर होत नाहीतच, पण अकारण हळवे किंवा दुखावून मत्सरी होत नाहीत. गौरी देशांपांडेचं शीर्षक उसनं घेऊन म्हणायचं तर ‘आहे हे असं आहे’ अशी कर्णिकांची शैली व वृत्ती आहे.

पुस्तक या विषयावर अनेक कविता, वाक्यं, अवतरणं प्रसिद्ध आहेत, पण पुस्तक या माध्यमातून एखाद्या समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक उन्नयनासह त्याच्या प्रगत, प्रगल्भ सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहणारा, ते सत्यात उतरू शकतं असा विश्वास देणारा सुनील कर्णिक नावाचा ‘बुकमॅन’ आपल्या समाजात आहे, हे समाजासाठी सुचिन्ह आहे. त्यांची पुस्तके वाचलीत तर प्रचितीही येईल.

.............................................................................................................................................

कर्णिकांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4348

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4349

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4350

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4351

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4352

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4353

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Thu , 15 February 2018

शुभेच्छा.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......