अजूनकाही
काही माणसं आयुष्यात आली नसती तर आयुष्य अपूर्ण राहिलं असतं, असं वाटतं. त्या व्यक्तींपैकी एक अनिल रघुनाथ कुलकर्णी. ते बोलताना नेहमी म्हणायचे, ‘वाघ, तुम्ही माझ्या आयुष्यात थोडं लवकर यायला हवं होता.’ मलाही तसंच वाटायचं. वाईतले वास्तव्य सुसह्य झालं, त्याला सर्वांत महत्त्वाचं कारण ‘अर’ होते. गेल्या सात-आठ वर्षांतल्या इतक्या आठवणी आहेत की, त्याचं एक पूर्ण पुस्तक होईल. ‘अरं’ना बघितलं जून महिन्यात, बर्यापैकी पाऊस सुरू होता. ते साधारण बारा वगैरे वाजेला यायचे ऑफिसात. मोठ्ठा रेनकोट आणि डोक्यावर मोठी फेल्ट हॅट. डोळ्यावर काळा गॉगल. एखाद्या डिटेक्टिव्हसारखे. नवीन असल्यानं तो अवतार जरा मजेशीरच वाटला होता. हळूहळू ओळख झाली, मग मैत्री. ते बाळासाहेब ठाकरेंचे जवळचे नातेवाईक होते, पण कधीही त्यांच्या बोलण्यात काहीच यायचं नाही. मराठी विश्वकोशाचे ते अगदी प्रारंभापासूनचे साक्षीदार. संशोधन सहायक या पदासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यांची मुलाखत सेतू माधवराव पगडी यांनी घेतली होती, याचा त्यांना सार्थ अभिमान होता.
अर मूळचे मुंबईकर. सुरुवातीला काही काळ त्यांनी माहीमच्या कुठल्याशा कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली होती. तेव्हा त्यांची मैत्री सदानंद रेगे, केशव मेश्राम यांच्यासोबत झाली होती. वाईत आल्यानंतर ते या वर्तुळातून बाहेर गेले, ते जवळ जवळ कायमचेच.
‘अर’ जितकं लिहू शकत होते, त्यापेक्षा खूप कमी त्यांनी लिहिलं. वर्षाकाठी ते केवळ एक ते दोन कथा लिहीत. ती कथा ‘हंस’च्या दिवाळी अंकात येत असे. एक एक शब्द घोटून घोटून लिहायचे. खूप विचार करून मोजूनमापून वाक्यरचना असायची. मला वाटतं ते किमान पाच ते सहा वेळेस पुनर्लेखन करायचे. फार परफेक्शनिस्ट होते. स्पिनोझावरची नोंद ते जवळपास दोन महिने लिहीत होते, तसंच स्वातंत्र्यावरची नोंद लिहिताना खूप कष्ट घेतले होते. ज्याला आज जादुई वास्तववाद संज्ञा आहे, त्याचं पूर्वरूप अरंच्या कथेत वाचायला मिळतं. अत्यंत गुंगवून टाकणारी वातावरणनिर्मिती त्यांच्या कथांमध्ये असते. भौतिक आणि आधिभौतिकतेच्या सीमारेषेवर त्यांच्या कथेतली पात्रं वावरतात. कोणत्याही प्रकारची फँटसी न वापरता, निर्जीव वस्तूला सजीव न करता, बोलतं न करता व्यक्तिरेखांच्या माध्यमातून, वातावरणनिर्मितीतून ते भारून टाकतात. ते जी. ए. कुलकर्णीच्या जॉनरमध्ये होते तरी ते नियतीवादी नव्हते. त्यांच्या कथेविषयी काय वाटतं ते त्याचा पुनरुच्चार मुद्दाम करतो म्हणजे मराठी साहित्य आणि एकूणच संस्कृतीनं काय गमावलं याचा अंदाज येईल.
कुलकर्णी त्यांना उपलब्ध असलेल्या आशयद्रव्याचं फिक्शनमध्ये रूपांतर करतात. फिक्शन लिहिण्याची कला एकीकडे अस्तंगत होत चाललेली असताना अनिल रघुनाथ कुलकर्णी यांच्यासारखे लेखक त्यात धुगधुगी आणण्याचं काम करतायत ही आशादायक बाब म्हणावी लागेल. कारण लेखन ही एक ‘कला’ आहे याची आठवण काही मोजके लेखक करून देतात. त्यांपैकी एक कुलकर्णी म्हणावे लागतील. माणसाचं आयुष्य आपल्या गतीनं चालत असतं. त्यात नियतीची भूमिका असली तरी तिचा फारसा हस्तक्षेप नसतो, तर माणसाची त्या त्या वेळेची निर्णयक्षमता त्याचं आयुष्य ठरवतं असते, अशी मांडणी अनिल र. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये दिसून येते. त्यांच्या कथांमधली पात्रं नियतीशी, वास्तवाशी कोणताही संघर्ष करताना आढळत नाहीत, कोणत्याही प्रकारच्या बदलासाठी भांडत नाहीत. आहे त्या वास्तवाचा सहज स्वीकार करत, समजदारीची भूमिका घेत, घडणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात. शेवटी एक सत्य परिणामासह आणि त्याच्या अपरिहार्यतेसह समोर येतं. त्याचा स्वीकार करत सर्वच पात्रं पुढे मार्गक्रमण करत राहतात.
जगण्याकडे कुठल्याही अभिनिवेशाशिवाय बघणारी त्यांच्या कथांमधील पात्रांसारखी पात्रं सहजी दुसऱ्या कुठल्याही लेखकांत आढळत नाही. पाण्याप्रमाणे सहज वाहणाऱ्या, आयुष्याला प्रवाही ठेवणाऱ्या पात्रांची निर्मिती हे कुलकर्णी यांच्या कथांचं बलस्थान म्हणावं लागेल. कुलकर्णी यांच्या कथांमधील पात्रं भविष्यात डोकावून पाहताना, त्याचं कुतूहल व्यक्त करतानाही दिसत नाही किंवा परिस्थितीसापेक्ष आरोपही करताना दिसत नाही. ते घटनांची चिकित्सा करतात, पण निर्णय देत नाहीत. त्यामुळे शेवटी वाचकालाच तो निर्णय घ्यावा लागतो. त्यांच्या कथांमधील पात्रं व्यवस्थेशी भांडत नसले, बदलासाठी प्रतिकार करत नसले तरी ते व्यवस्थाशरण नसतात. केवळ दूरस्थपणे स्वत:ला, भवतालाला न्याहाळतात आणि जगण्याची सहजप्रक्रिया म्हणून वास्तवाचा स्वीकार करतात. म्हणूनदेखील त्यांच्या कथा वेगळ्या ठरतात.
कुलकर्णी यांचं एक लेखक म्हणून असणारं वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या पात्रांकडे अत्यंत त्रयस्थपणे तसंच निरपेक्षपणे बघतात आणि कधीही न्यायाधीशाच्या भूमिकेत जात नाही आणि कोणत्याही पात्राला ‘जस्टीफाय’ करण्याचा प्रयत्न करत नाहीत. कोणत्याही पात्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाहीत. ते कोणत्याही कथेत एखाद्या पात्राच्या प्रेमात पडलेले आहेत, असं दिसत नाही. लेखक म्हणून असणाऱ्या या विलक्षण परात्मभावामुळे एक काँक्रीट संयतपणा त्यांच्या कथांमध्ये दिसतो. त्यांच्या कथांमधील व्यक्तिचित्रणं अत्यंत ‘फोटोजेनिक’ असतात. त्यांची पात्रं आपापले स्वभाववैशिष्ट्यं आणि व्यक्तिमत्त्वं घेऊन अवतरतात.
तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, इंग्लिश लिटरेचर यांचा अभ्यास खूपच चांगला होता. इंग्रजीवर जबरदस्त पकड होती. काही काळ ते ‘नवभारत’ मासिकाच्या संपादक मंडळावरही होते. विश्वकोशाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ते साक्षीदार होते. विश्वकोशाचा ते चालता बोलता कोश होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, सदाशिव आठवले, बेडेकर, रा. ग जाधव यांचे इतक्या विविध प्रकारचे किस्से त्यांच्याकडे होते की, एक संपूर्ण ग्रंथ तयार झाला असता. ‘अरं’नी सांगितलेल्या काही आठवणी शशिकांत सावंत यांना सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या आठवणींचा संग्रह पुस्तक रूपात संग्रहित करण्याची कल्पना सुचवली. ‘वाई आणि विश्वकोशातील दिवस’ असं काहीसं स्वरूप घेऊन ते करावं असं ठरलं. ‘अरं’ना सुद्धा कल्पना आवडली. यासंबंधात त्यांच्याशी नोव्हेंबरमध्येच फोनवर सविस्तर बोलणं झालं होतं. त्यांना लिव्हरचा त्रास होता, त्याचा इलाज सुरू होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही रूपरेषा ठरवणार होतो, पण...
‘अरं’चं अक्षर इतकं अप्रतिम होतं की बस! भयानक न्यूनगंड दिला त्यांच्या अक्षरानं मला. इंग्रजी मराठी दोन्ही एकदम क्लास. माझं अक्षर कुरूप आहे असं नाही तरी. त्यांचं इंग्रजीही फारच फर्ड होतं. ते काम्यूवर पुस्तक लिहीत होते. त्यासाठी त्यांना सगळे संदर्भ उपलब्ध करून दिले. तेही त्यांनी अर्ध्यातच सोडलं. ते एक कादंबरीही लिहीत होते, ‘का पुरुष आणि महापुरुष’ नावाची. त्याचं काय स्टेट्स आहे माहीत नाही, पण अनुभवानं सांगू शकतो तेही अर्धवटच राहिलं असेल. त्यांच्या अति परफेक्शननं त्यांचा घात केला असं मला वाटतं.
खूप पूर्वी म्हणजे जवळपास तीसेक वर्षांपूर्वी साहित्य संस्कृती मंडळानं त्यांचं एक अनुवादित पुस्तक प्रकाशनासाठी स्वीकारलं होतं. ते काही पुढे प्रकाशित झालं नाही. त्याचं हस्तलिखित त्यांच्याकडे होतं, त्यांना म्हटलं, त्याचं डिटीपी करून घ्या किंवा मला द्या मी करवून घेतो.’ तर म्हणाले, ‘नाही, मी आधी ते परत लिहून काढतो, मग डिटीपी करू’ झालं. तेही तसंच पडलं. काहीतरी वेगळंच लॉजिक होतं त्यांचं. मराठीतल्या पुणेस्थित मोठ्ठ्या व्यावसायिक प्रकाशकांनी त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध करण्याची तयारी दर्शवली. प्राथमिक बोलणी झाली. सरांनी कथांची फाईल पाठवली. सगळी तयारी झाली तेव्हा, प्रकाशकांनी त्यांना सगळ्या कथा डीटीपी करून द्यायला सांगितलं. झालं. त्यांना शांतपणे कळवलं, बाड परत पाठवा. त्यांचं म्हणणं होतं, हे आधी सांगितलं नव्हतं.
भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, दिलीप पु. चित्रे यांच्याबद्दल ‘अरं’ना खूप कुतूहल होतं. माझं नामदेव ढसाळांसोबत अपरंपार नातं होतं म्हणून अनेक गोष्टी मुद्दाम खोदून खोदून विचारायचे. पण या सगळ्या लोकांत दिलीप पु. चित्रे यांच्याविषयी फारच ममत्व होतं. मला चित्रे आवडत नाहीत हे त्यांना कळल्यावर फारच आश्चर्याचा धक्का बसला होता. मी माझ्या बाजूनं कारणं सांगितल्यावर त्यांनी परत माझ्या नावडीविषयी कधीही विषय काढला नाही, पण चित्रे प्रेम कायम राहिलं.
ढसाळांचा एकच किस्सा त्यांनी किती वेळा सांगितला असेल याची गिनती नाही. सुभाष अवचटांच्या स्टुडिओत एकदा नामदेव ढसाळ गेले. गेल्या गेल्याच अवचटांना म्हणाले, ‘ब्रश फेका आणि शस्त्र धरा.’ त्यावर अवचट म्हणाले, ‘नाम्या, आता गप्प बैस नाही तर मार खाशील.’ हे एव्हढंच सांगून जोर जोरात हसायचे. यात त्यांना काय गंमत दिसायची माहीत नाही.
तसाच राजन खान यांचा एक किस्सा त्यांच्या आवडीचा होता. म्हणजे एक वाक्य, ‘साल्यांना साधं रस्त्यावर मुतायचं नसतं हे कळत नाही. ते काय धर्माच्या गोष्टी करतात.’ त्यांचं टिळकांवर फार प्रेम होतं. तर माझ्यासाठी टिळक म्हणजे फक्त हसण्याचा विषय. मी त्यांना अनेक उदाहरणं देऊन माझे मुद्दे पटवून देत असे. त्यांना त्याचा त्रास व्हायचा, मग मीच एक दिवस ठरवलं की, हा विषयच आपण काढायचा नाही.
‘अरं’नी अद्वैतवादावर नोंद लिहिली होती, ती नोंद शास्त्रीजींनी स्वत:च्या नावावर घेतली होती, नंतर पुस्तकातसुद्धा. त्यांना म्हटलं असू द्या काय होतं, टिळक पण तसेच होते. त्यांना उदाहरणानं पटवून दिलं. खूप अस्वस्थ झाले.
हा शेवटचा प्रसंग टिळकांविषयीचा. बाबासाहेब आंबेडकरांना हवा तसा वेळ देता आला नाही, त्यांचं वाचता आलं नाही याविषयी त्यांना खूप खंत वाटायची. वाईत नाही म्हटलं तरी साचलेपणा आला होता. म्हणून ते म्हणायचे, मी त्यांच्या आयुष्यात लवकर यायला हवं होतं. आम्ही भेटलो तेव्हा ते पंचाहत्तरीत होते. आम्ही खूप पुस्तकांची देवाण-घेवाण केली. जगन फडणीसांच ‘महात्म्याची अखेर’ वाचून त्यांचं बरंच शंका निरसन झालं होतं. अनेकजण मला म्हणाले की, ते संघाशी निगडीत आहेत. मी त्यांना ते थेट विचारले अनेकदा, त्यांनी नकारच दिला. अर्थात आमच्या संबंधात कधीच या गोष्टीनं फरक पडला नाही. गांधीजींच्या खूनानंतर वाईत घडलेल्या घटना ते फार सविस्तर सांगत. जलेब्या वगैरे कशा वाटून खाल्ल्या वगैरे. अर्थात ते नंतर दहाबारा वर्षनी आले होते. तो काळ अनुभवलेली अजून दहा-वीस डोकी वाईत शिल्लक आहेत.
‘अरं’ना मी कधीही संतापलेलं, कुणावर रागावलेलं पाहिलं नाही. सतत हसणं आणि हसवणं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची नक्कल इतकी हुबेहूब करायचे की बस्स! आवाज, हातवारे, बोलण्याची स्टाइल, इतकंच नाही तर शास्त्रीजी त्याक्षणी कोणता संवाद म्हटले असते ते सुद्धा त्यांना जमायचं. इतरांना वाटायचं जर मी शास्त्रीजींच्या किंवा ते माझ्या काळात असते तर आमचं रोज भांडण झालं असतं. तर ‘अर’ म्हणायचे, उलट शास्त्रीजींशी माझी फारच चांगली मैत्री राहिली असती. शास्त्रीजी पाठीवर हात ठेवून म्हणाले असते, ‘चल तू काय म्हणतोय त्याला संदर्भ सापडतायत का ते बघू.’ शास्त्रीजींच एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे, ‘वैदिक संस्कृतीचा विकास’. या पुस्तकात अर तज्ज्ञ होते म्हटले तरी चालेल. सगळ्या संदर्भासहित ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ त्यांना पाठ होतं. अगदी ठरवून त्यांनी या पुस्तकाचा अभ्यास केला होता. त्यांना म्हटलं, एव्हढी मेहनत घेऊन अभ्यास केला आहे तर काही तरी समीक्षात्मक लिहा. त्यांनी बहुतेक शास्त्रीजींच्या पुस्तकावर लिहिलं होतं.
वाईतले त्यांचे सर्वांत जुने आणि घनिष्ठ मित्र म्हणजे कथाकार एस. डी इनामदार. अगदी साध्याशा कारणावरून त्यांच्यात अबोला निर्माण झाला. अरं प्रमाणेच इनामदारांनाही मी पुस्तकं आणून देत होतो. एकदा ‘अरं’ची आणि इनामदारांची पुस्तकं एकत्रितच आणली आणि दोघांना एकत्रितच घरी घेऊन गेलो. त्यांचा अबोला हळूहळू विरघळला. एकमेकांसमोर त्यांचं घर आहे, एकाच रिक्षात बसवून दोघांना घरी पाठवलं.
जर ‘अरं’ वाईसोडून इतर कुठे राहिले असते तर त्यांनी आता आहे त्याहून बराच मोठा पल्ला गाठला असता, असं राहून राहून वाटतं. खूप सांगण्यासारखं आहे त्यांच्याविषयी. ते कधीतरी नक्की सांगेनच. आता ‘अर’ नाहीत. अगदी सकाळी त्यांचा फोन येणार नाही. ते वाईला परत येऊन जा म्हणणार नाहीत. आता तर वाईत परत जाण्याचीही कारणं फारशी उरली नाहीत.
.............................................................................................................................................
अनिल रघुनाथ कुलकर्णी यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4144
.............................................................................................................................................
लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.
nitinbharatwagh@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment