‘पद्मावत’ : भन्साळीचा फायदा आणि पोळीभाजू राजकारण्यांचाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सतीश देशपांडे
  • ‘पद्मावत’चं एक पोस्टर
  • Sat , 10 February 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie पद्मावत Padmaavat पद्मावती Padmaavati संजय लीला भन्साली Sanjay Leela Bhansali

खरं तर या सिनेमावर लिहावं असं त्यात नावीन्यपूर्ण काहीच नाही. ‘टायगर जिंदा है’सारखाच हा एक कलाहीन, दर्जाहीन सिनेमा. कारण राणी पद्मावती आणि त्या काळाबद्दल सिनेमापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं ‘भारत एक खोज’ या शाम बेनेगल दिग्दर्शित मालिकेतून या अगोदर मांडणी झाली आहे. वेगवेगळ्या ऐतिहासिक पुस्तकांतून किंवा अगदी युट्यूबवरच्या व्हिडिओ, ऑडिओ क्लिपद्वारेही राणी पद्मावतीची गोष्ट माहिती आहे. त्यामुळे भन्साळींना या विषयावर सिनेमा का काढावा वाटला असेल, हा गहन प्रश्न आहे. अर्थात त्यांनी यात मार्केट इकानॉमी तपासली असणार. या सिनेमातून भन्साळींनी आणखी काही नावीन्यपूर्ण मांडणी केलीय असंही नाही. नवीन तंत्रज्ञान वापरून सिनेमा निर्माण करणं, हा काही उत्तम कलाकृतीचा एकमेव निकष वगैरे असू शकत नाही. त्यामुळे ज्यात नवी गोष्ट नाही, फारशी सर्जनशीलता नाही किंवा भव्यदिव्य अशी कलात्मकताही नाही. त्यामुळे त्यावर लिहायचं तरी काय, हा प्रश्नच. पण ज्या सिनेमानं आपलं एवढं चर्चाविश्व व्यापलं, त्याला नजरेआड कसं करून चालेल. ‘पद्मावत’वर काही लिहिण्यासारखं नाही, हे सत्यच, पण ‘पद्मावत’च्या निमित्ताने जे जे काही घडलं, त्याचा वेध घ्यायलाच हवा.

खरं तर कोणत्या अभिनेत्याचं वा अभिनेत्रीचं काय शूट चालू आहे. सिनेमा कोणता आहे, त्याची स्टोरी कोणती आहे. हे सगळं खूप अगोदरपासून जाहीर होत नसतं. सिनेमा तयार झाल्यावर, त्याचा प्रोमो, जाहिरात आल्यावर आपल्याला त्याबद्दल माहिती होते. पण ‘पद्मावत’ (पूर्वीचे नाव ‘पद्मावती’) या सिनेमाचं शुटिंग चालू झाल्यापासूनच वाद सुरू झाले. राजपुतान्यातल्या करणी सेनेचा सिनेमाला तेव्हापासून विरोध. तिथं शूटिंग बंद पाडलं म्हणून भन्साळी आणि टीम कोल्हापूरला आली. तिथंही त्यांचा सेट जाळण्यात आला. हे सगळं पाहिल्यावर आठवतं की, एरव्ही आपला प्रोजेक्ट गुलदसत्यात ठेवण्यात धन्यता मानणारे दिग्दर्शक-कलाकार स्टोरी लिक करायला इतके का उतावीळ झाले. ही स्टोरी लिक झाली, असे नसून ती लिक केली असेल, असे म्हणायला मोठी जागा आहे. कदाचित भन्साळींना तेव्हापासूनच प्रसिद्धी हवी असेल. बॉक्स ऑफीसवर गर्दी जमा करण्यासाठी, नि कोटींचा गल्ला भरण्यासाठी लोक काय काय करतील, नि कुठल्या थराला जातील, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

दुसरा एक गंभीर प्रकार या सिनेमाच्या निमित्ताने पुढे आला. तो म्हणजे राजकीय प्रतिक्रियेचा. सिनेमा हा फक्त सिनेमा असतो, ती फक्त मौज असते वगैरे काही नाही. त्यात जर अर्थकारण दडलेले असेल तर त्यापासून समाजकारण नि राजकारण दूर कसे राहू शकेल? पण ‘पद्मावत’च्या निमित्ताने जे राजकारण पहायला मिळाले, ते घाणेरडेच आहे. लोकशाहीचा गळा आवळणारे आहे. हा सिनेमा तयार होऊच द्यायचा नाही, इथपासून ते रिलिज झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही जाळपोळ, दगडफेक करण्यापर्यंत मजल गेली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू शकतो, हे न्यायालयाला राज्य सरकारांनी सांगावे, हे लज्जास्पद आहे. राज्यशासनाला जर त्या त्या राज्यातला कायदा सुव्यवस्था टिकवता नसेल, तर त्यांना सत्तेवर राहण्याचा काडीमात्र अधिकार नाही. पण हा कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली चालू ठेवलेला बनाव होता. यातून राजपूतांच्या अस्मितेला खतपाणी घालण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालं. जितकं म्हणून समाजाचं ध्रुवीकरण करता येईल, मूलभूत प्रश्नांपासून बगल देऊन दूर देता येईल, तेवढं राजकीय मंडळींनी या निमित्तानं नेटानं केलं. सिनेमात तर काहीच नव्हतं, ज्यामुळं राजपुतांच्या परंपरेचा अपमान वगैरे होईल. बरं, सिनेमाच्या कितीतरी अगोदर पुस्तकांतून, मालिकांतून ही गोष्ट ठाऊकही होती, मग एका सिनेमामुळं एवढा काय फरक पडणार होता? पण नाही, समाजाच्या भावनेला हात घातला की समाज आपल्या समस्यांचा विचार न करता भावनेच्या आहारी जातो. नि त्याचं एकदा का लक्ष डायवर्ट झालं की मग राजकीय मंडळींचं फावतं. समाज आपल्या मूलभूत गरजांसाठी जर असा रस्त्यावर उतरला, तर सरकारला पळता भूई थोडी होईल. म्हणून असे ‘पद्मावत’सारखे इव्हेंट राजकीय वर्तुळातून उचलले जातात. याचा भन्साळींसारख्यांनाही फायदा नि राजकारणालाही.

मग तोटा कोणाचा? तो सामान्य नागरिकांचा, हातात दगड घेऊन भिरकवणाऱ्या तरुण मुलांचा, या मुलांकडून कष्टाची आशा करत बसणाऱ्या त्यांच्या निराधार पालकांचा. ज्या हातात पुस्तक, लॅपटॉप हवा, त्या हातात दगड देणं म्हणजे त्या पिढीचं वाटोळं करणं होय. हे वाटोळं करणारे प्रांतोप्रांती असतात. राजस्थानात ते राजपुतांचा भावनेला आवाहन करतात, हरियाणात ते अंधभक्तीत डुंबवून टाकतात, महाराष्ट्रात मराठी पोरांच्या हातून जाळपोळ-दंगल घडवून आणतात, तामीळनाडूत पेरूमलची लेखणी बंद पाडतात, कर्नाटकात भाषिक अस्मितेवरून हैदोस घालतात, समुद्रापलीकडे बांगला देशात ब्लॉगरची हत्या करतात... अशी अनंत उदाहरणं आहेत. जी माणूसपणाला काळिमा फासणारी आहेत. पण तत्त्वाविना केलं जाणारं राजकारणं या माणूसपणाचा विचार कसा करणार? 

‘पद्मावत’च्या निमित्तानं समाजामध्ये जे जातीय-धार्मिक अस्मितेचं राजकारण झालं, ते राजकारण्यांसाठी साध्य आहे. असे राजकारणी सत्तेतही आहेत नि विरोधातही. अपवाद कुणाचाच नाही. नव्या पिढीला विचारच करू द्यायचा नाही, अगोदरच त्यांच्या डोक्यात खिळे मारायचे हा यांचा उद्योग. हा उद्योग या निमित्ताने दिसून आला. या उद्योगाला आता बरे दिवस आलेत. बॉक्स ऑफिसवरचा धंदा तेजीत चालला हे भन्साळी सारख्यांसाठी यश आहे. पण समाजमनाला जी जखम झाली, ती लवकर भरून न येणारी आहे. लोकशाहीत आम्ही न्यायालयालाही घाबरत नाही, आमचं काय करायचं ते करा, हा भयंकर मॅसेज समाजात गेला आहे.

या सर्व गोष्टी वरवरच्या नाहीत. संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांचं, कायद्याचं, मूल्यांचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. ‘पद्मावत’च्या निमित्तानं हे सर्व ध्यानात घ्यायला हवं. नाहीतर लोकशाहीचा, कलेचा मणका मोडायला बसलेले शिकारी यशस्वी होतील.

.............................................................................................................................................

लेखक सतीश देशपांडे मुक्त पत्रकार आहेत.

sdeshpande02@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Tribhuvan Kulkarni

Wed , 21 February 2018

सर खर तर कोनाच्याही बांदाला न बांधली जानारी ही कला असते आणि कला सादर करणारे व ती निर्माण करनारे निस्मिम कलाक्रूतीचे सादरकर्त हे आपण जानतोच पण पद्मावतीच्या निमीत्तान आपल्याला कलेचा राजकारणासाठी वापर होताना दिसला ,,, भारतीय राजकारणाची खालावलेली पातळी जानवली मांडणी व आढावा वाचनीय


Nilesh Deshpande

Mon , 12 February 2018

सिनेमा चांगला बनवला आहे, याबद्दल दुमत असू नये. नवीन काही नाही हे खरे पण आहे.. करणी सेना ही जर कायदा सुव्यवस्था मानत नसेल तर बंदी घातली पाहिजे. राजपूत समाजाने एका सेनेच्या ऐकन्यात जाऊ नये. विचार करावा.


Baba Sathe

Sun , 11 February 2018

हास्यास्पद सिनेमा आहे. खिलजी हा दुर्गुणांचा पुतळा तर राजपूत हे अतिमहान दाखवण्याचा किती केविलवाणा प्रयत्न! थोडक्यात काय, खिलजी वगैरे सुलतान जी काही युद्धे जिंकले ते राजपूतांनी नितिनियम पाळल्यामुळेच. धन्य आहे. या राजपूतांनी आपल्या सख्ख्या भावांनाही गादीसाठी जिवंत सोडले नाही. कित्येक मुघल राजांना आपल्या लेकी दिल्या. सिर्फ उसुलोंके लिए..


Ashwini Funde

Sat , 10 February 2018

लेखकाने अत्यंत परखड लिहिले आहे. पद्मावत चित्रपटाच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत समाजमाध्यमांतून चर्चा होत आली आहेच. पण प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर नवी आणखी एक बाब लक्षात आली ती म्हणजे इतिहासातील मुस्लिम राज्यकर्त्यांची अधिक आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न ठराविक धर्मातील ठराविक प्रेक्षकांना समोर ठेवून केला गेला आहे.


Swamiraj Bhise

Sat , 10 February 2018

सतीश सर, आपण केलेली एकूणच मांडणी वास्तवाला धरून आहे, स्वतःचा विचार नसलेली तरुणाई विचारांचे गुलाम होऊन हातात दगड घेती आहे त्या सर्वांना स्वतःचा विचार यावा यासाठी ही वैचारिक जागृती आवश्यक आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......