अजूनकाही
तारीख - २७ मार्च १९७३. स्थळ – डॉरथी चँडलर पॅव्हिलियन, लॉस एंजेलिस. ऑस्कर पुरस्कार सोहळा हळूहळू कळसाध्यायाकडे पोहोचतोय. एकेका पुरस्कार विभागातले पुरस्कार जाहीर होत आहेत. टाळ्यांचा कडकडाट होतोय. कुठे सुस्कारे सोडले जात आहेत, कुठे अपेक्षाभंगाचं दुःख आहे, तर कुठे अनपेक्षित आनंदाचा जॅकपॉट आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागातल्या नामांकनांचा पुकारा होतो. नामांकन पाच जणांना असलं, तरी खरी स्पर्धा तिघांमध्येच आहे - मार्लन ब्रँडो, सर लॉरेन्स ऑलिव्हिए आणि मायकल केन. एक स्वतःचं श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी धडपडणारा, दुसरा स्वतःची खेळी खेळून बरेचसे मानसन्मान मिळवून झालेला आणि तिसरा या दोघांच्या तुलनेत काहीसा नवखा. अखेर तो क्षण येतो, विजेत्याचं नाव घोषित करण्यासाठी लिव उलमन आणि रॉजर मूर रंगमंचावर येतात. अख्खं सभागृह श्वास रोखून बसलंय; टाचणी पडली तरी आवाज होईल, इतकी शांतता. विजेत्याचं नाव असलेला लिफाफा उघडला जातो आणि नावाचा पुकारा होतो - मार्लन ब्रँडो!
मार्लन ब्रँडोचा ‘द गॉडफादर’ आणि सर लॉरेन्स ऑलिव्हिए व मायकल केन यांचा ‘स्ल्यूथ’ एकाच वर्षी यावेत, हे ऑलिव्हिए आणि केन यांच्यासाठी दुर्भाग्याचं ठरलं. ‘द गॉडफादर’मधला ब्रँडोचा व्हिटो कॉर्लिऑनी इतका दणकेबाज होता की, त्यापुढे ऑलिव्हिए व केन यांची खणखणीत जुगलबंदी देखील अपुरी पडली; आणि एवढं सगळं झाल्यावर ब्रँडोने त्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. हे म्हणजे ऑलिव्हिए व केन यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखंच झालं.
‘स्ल्यूथ’ म्हणजे अँड्र्यू वाइक (ऑलिव्हिए) आणि मायलो टिंडल (केन) यांचा परस्परांवर वरचढ ठरण्यासाठीचा संघर्ष, उंदीर-मांजराचा विलक्षण जीवघेणा खेळ. या खेळामागे आहे सुप्त वर्चस्ववाद. दुर्दैवानं ‘स्ल्यूथ’चं आवरण क्राइम थ्रिलरचं असल्यामुळे त्याच्या अंतरंगात असलेला हा वर्चस्ववादाचा, वर्गभेदाचा पैलू दुर्लक्षित राहतो. क्राइम थ्रिलर फारसे गांभीर्याने घ्यायचे नसतात, कारण ते सवंग मनोरंजनासाठी बनवलेले असतात. त्यामुळे क्राइम थ्रिलरचं मूल्यमापन वगैरे करणं हे जागतिक सिनेमांचे दाखले देत स्वतःला अभ्यासक म्हणवणाऱ्या सिनेसमीक्षकांना फारसं मानवत नाही. हे हलक्या दर्जाचं काम ते करत नाहीत.
पण ज्याला क्राइम थ्रिलर म्हणून स्वतःचं दोन घटका मनोरंज करून घ्यायचंय, त्याला ‘स्ल्यूथ’ क्षणभरासाठीही निराश करत नाही आणि ज्याला या क्षणोक्षणीच्या थरारामागे लपलेल्या वर्गभेदाच्या पैलूचा विचार करायचाय, त्याच्यासाठीही यात बरंच खाद्य आहे. प्रश्न ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनाचा आहे. २००७ साली ‘स्ल्यूथ’चा रिमेक प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे, या रिमेकमध्येही मायकल केन होता. मूळ चित्रपटातल्या विक्षिप्त लेखकाची भूमिका रिमेकमध्ये केनने केली आणि गरीब बिचाऱ्या मायलो टिंडलच्या भूमिकेत ज्यूड लॉ होता; पण बात कुछ जमी नहीं. मूळ ‘स्ल्यूथ’ची गंमत या रिमेकमध्ये नव्हती. बॉक्स ऑफिसवरही तो तितकासा चालला नाही. याचं एक कारण म्हणजे, मूळ नाटक आणि चित्रपटापेक्षा या रिमेकमध्ये बरेच बदल करण्यात आले होते आणि ते नैसर्गिक वाटत नव्हते. ते बदल केवळ बदल करण्याच्या अट्टाहासातून केल्यासारखे वाटत होते. चमकदार, धारदार संवाद हेही मूळ ‘स्ल्यूथ’चं एक शक्तिस्थान होतं. सुप्रसिद्ध ब्रिटिश ह्यूमर निर्माण करण्यात या संवादांचा मोलाचा वाटा होता. ती गंमतही रिमेकमध्ये निघून गेली होती. मूळ ‘स्ल्यूथ’च्या पासंगालाही हा रिमेक पुरत नाही.
प्रख्यात रहस्यलेखक अँड्र्यू वाइक (ऑलिव्हिए) स्वतःच्या भव्य प्रासादाच्या बागेत त्यांच्या आगामी कादंबरीचा शेवट पोर्टेबल रेकॉर्डरवर रेकॉर्ड करत बसलेत. तेवढ्यात तिथं एका स्पोर्ट्स कारमधून मायलो टिंडल हा देखणा तरुण येतो. वाइकनेच त्याला बोलावलेलं असतं. वाइकची पत्नी आणि टिंडल यांच्यात अफेअर सुरू आहे आणि टिंडल या बाबतीत कितपत गंभीर आहे, त्यांचा खरोखरच विवाह करण्याचा विचार आहे का आणि मुख्य म्हणजे टिंडल तिला सांभाळू शकणार आहे का, म्हणजे तिचे खर्च त्याला झेपणार आहेत का, हे वाइकला जाणून घ्यायचंय. ‘...कारण तुझ्यासाठी तिला सोडायचं, तर कायमचं सोडीन. नाहीतर पुन्हा दोन आठवड्यांत ती माझ्याकडे यायची; ते मला चालणार नाही’, वाइक टिंडलला स्पष्ट शब्दांमध्ये बजावतो. टिंडलची दोन हेअर कटिंग सलून आहेत. त्यांपैकी एक खुद्द लंडनमध्ये असल्याने त्याचं बरं चाललं असल्याचं तो वाइकला सुचवू बघतो, पण ते पुरेसं नसल्याचं सांगून वाइक त्याला उडवून लावतो आणि त्याच्यासमोर एक प्लॅन ठेवतो. वाइकच्या तिजोरीत किमान अडीच लाख पाउंडाचे दागिने असतात. त्यांचा विमा उतरवलेला असतो. टिंडलने ते चोरावेत आणि वाइकच्याच अॅमस्टरडॅममधल्या एका ओळखीच्या मध्यस्थाला विकावेत. त्यातून टिंडलला किमान १ लाख ७० हजार पाउंड मिळाले असते आणि वाइकला विम्याचे पूर्ण पैसे मिळाले असते. यातून दोघांचंही नुकसान झालं नसतं आणि टिंडलकडे पुरेसे पैसे आल्यामुळे वाइकला स्वतःची पत्नी पुन्हा परतण्याची भीतीही उरली नसती. असा हा उभयपक्षी फायद्याचा मामला ठरला असता. हो-नाही करता करता टिंडल यासाठी तयार होतो आणि वाइकच्या सापळ्यात अडकतो. वाइकच्या योजनेबरहुकूम सगळं झाल्यानंतर तो टिंडलवर गोळी झाडतो आणि टिंडल पायऱ्यांवरून गडगडत खाली कोसळतो.
कट टु... काही दिवसांनंतर वाइक एकटाच जेवणाची तयारी करतोय, मागे मस्त गाणं ऐकू येतंय. वाइकचा मूडही छान आहे. सगळी तयारी करून डायनिंग टेबलवर बसून तो पहिला घास घेणार, इतक्यात दारावरची बेल वाजते आणि इन्स्पेक्टर डॉपलरचं आगमन होतं. मायलो टिंडल नावाचा तरुण काही दिवसांपासून गायब झाल्यामुळे त्याच्या शोधासाठी आल्याचं डॉपलर वाइकला सांगतो. स्वतःच्या घरी येण्यासाठी वाइकने टिंडलला लिहिलेली चिठ्ठी टिंडलच्या घरात डॉपलरला सापडल्यामुळे वाइककडे लपवण्यासारखं काही नसतंच. तो झाला प्रकार विस्तृतपणे डॉपलरला सांगतो; अगदी त्याने टिंडलवर गोळी झाडल्याचंही सांगतो. फक्त ती गोळी खरी गोळी नसून रिकामं काडतूस असल्याचं, टिंडल हा किती भक्कम व्यक्तिमत्त्वाचा माणूस होता, हे वाइकला तपासून बघायचं असल्याचं आणि संपूर्ण मानहानीच्या प्रसंगातच माणसाचं खरं व्यक्तिमत्त्व दृगोच्चर होत असल्याचा वाइकचा विश्वास असल्यामुळे त्याने हा सगळा बनाव रचला असल्याचं वाइक डॉपलरला सांगतो. डॉपलरला ते अर्थातच पटत नाही. तो घराची झडती घेण्याची परवानगी मागतो. वाइक त्याला आनंदानं परवानगी देतो. डॉपलरला जिन्यावर रक्ताचे डाग दिसतात, वाइकच्या कपाटात टिंडलचे कपडे सापडतात, बागेत नव्यानेच उकरून पुन्हा बुजवलेला खड्डा सापडतो. असा सगळा परिस्थितीजन्य पुरावा सापडल्यामुळे डॉपलर वाइकवर टिंडलच्या खुनाचा ठपका ठेवून त्याला अटक करू बघतो, पण वाइक निसटू पाहतो. डॉपलर त्याच्यावर झडप घालून त्याला पकडतो आणि....
दुर्दैवानं इथून पुढचा कथाभाग सांगितला, तर सिनेमातली गंमत कमी होऊन जाईल; पूर्णपणे निघून जाईल, असं नाही, कारण ‘स्ल्यूथ’ केवळ रहस्यभेदापुरता किंवा धक्कातंत्रापुरता मर्यादित नाही. ‘स्ल्यूथ’ प्रदर्शित होऊन आज जवळपास ४४ वर्षं झाली आहेत. इंटरनेटवर शोध घेतला, तर ‘स्ल्यूथ’ची संपूर्ण कथा अगदी रहस्यभेदासकट उपलब्ध आहे, पण ती न वाचता ‘स्ल्यूथ’ पाहिला, तर अधिक चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेता येतो, एवढं नक्की!
सर लॉरेन्स ऑलिव्हिए आणि मायकल केन यांच्या जुगलबंदीने ‘स्ल्यूथ’ अविस्मरणीय करून सोडलाय. ‘स्ल्यूथ’चा घाट घातला जात होता, त्या वेळी सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांच्या कारकिर्दीची संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली होती. दिग्गज अभिनेते म्हणून त्यांना हॉलिवूडमध्ये मान होता. त्यामुळे 'अँड्र्यू वाइक' या विक्षिप्त लेखकाची भूमिका एकदा स्वीकारल्यानंतर मायलो टिंडल या त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या व्यक्तिरेखेत कोण असावं, याच्या निवडीचं स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलं. गंमत म्हणजे, ऑलिव्हिए यांना नाटक फारसं आवडलं नव्हतं; पण चित्रपट स्वीकारल्यानंतर त्यांनी टिंडलच्या भूमिकेसाठी मायकल केनचं नाव सुचवलं आणि तोवर काही ब्रिटिश आणि हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये स्वतःची बऱ्यापैकी ओळख निर्माण केलेल्या केनला मोठी संधी मिळाली. अँथनी शेफर (हिचकॉकच्या ‘फ्रेंझी’चा पटकथालेखक) या नाटककाराच्या या पुरस्कारविजेत्या नाटकाला जोसेफ मँकिविक्झ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने रूपेरी पडद्यावर चितारलं. प्रामुख्याने दोन व्यक्तिरेखांभोवती फिरण्याची आणि शब्दबंबाळ होण्याची भीती असूनही क्षणभरासाठीही प्रेक्षकाला इकडेतिकडे बघण्याची संधी न देण्याची किमया मँकिविक्झने केली आहे. व्यावसायिक पातळीवर यशस्वी ठरूनही दिग्दर्शक म्हणून ‘स्ल्यूथ’ मँकिविक्झचा अखेरचा चित्रपट ठरला. चित्रपट एका भव्य घरात, बंदिस्त जागेत घडूनही मोनोटोनस होत नाही. त्याचं श्रेय लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्याइतकंच कला--दिग्दर्शक केन अॅडमला द्यावं लागेल. वाइकचा विक्षिप्तपणा दाखवण्यासाठी अॅडमने बागेत उभारलेला झुडपांचा भूलभुलय्या, घरात ठिकठिकाणी असलेली खेळणी, बोर्डगेम्स आणि अनेक प्रसंगांमधला त्यांचा यथोचित वापर हे सगळे घटक ‘स्ल्यूथ’च्या परिणामकारकतेत मोलाची भर घालतात. विशेषत: जॉली जॅक टार, द जोव्हिएल सेलर ही खेळणी वाइकच्या व्यक्तिरेखेचं अविभाज्य अंग आहेत. जॉली जॅक टारविषयी बोलताना वाइक म्हणतो, ‘आमच्या दोघांमध्ये घट्ट नातं आहे. मी विनोद करतो आणि तो त्या विनोदावर हसतो.’
‘स्ल्यूथ’मध्ये दोन प्रमुख व्यक्तिरेखांचा संघर्ष आणि दोन तगड्या कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदी असली, तरी कथेच्या केंद्रस्थानी खऱ्या अर्थाने आहे तो वर्गसंघर्ष. अँड्र्यू वाइक हा अभिजन वर्गातला, ब्रिटिश वर्ग-उतरंडीत वरच्या स्थानी असलेला धनिक आहे, तर टिंडलचं कुटुंब हे इटलीहून आलेलं स्थलांतरित कुटुंब आहे. दोन पिढ्या हलाखीत काढल्यानंतर आत्ता कुठे तो मध्यमवर्गात स्थान मिळवू पाहतोय. वाइक आणि टिंडल यांच्यातल्या संघर्षात टिंडलसारख्या बाहेरून आलेल्या, कष्टकरी वर्गाविषयीची वाइकला असलेली तुच्छता सुप्तावस्थेत आहे. त्याच्या बोलण्यातून ती अनेकदा डोकावते. स्वतःची बायको स्वतःला सोडून जाणार असल्याबद्दल किंवा समोरचा देखणा तरुण स्वतःच्या बायकोचा प्रियकर असल्याबद्दल वाइकचा जळफळाट होत नाही, तर हा तरुण खालच्या वर्गातला असूनही तो आपल्या बायकोला आपल्यापासून दूर नेण्यात यशस्वी ठरत असल्याची वाइकला अधिक चीड आहे. म्हणूनच टिंडलमध्ये वाइकच्या पत्नीला पोसण्याची क्षमता आहे की नाही, हे जोखण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात वाइकला टिंडलला स्वतःसमोर गुडघे टेकायला लावायचे आहेत. त्यात तो यशस्वीही होतो, पण 'माझा आजा आणि माझा बाप पराभूताचं जिणं जगले, पण मी तसं जगणार नाही', असं वाइकला सुनावत टिंडल खेळी पलटवण्याचा प्रयत्न करतो.
या दोघांमधलं अंतर चित्रपटाच्या सुरुवातीलाच ठळकपणे जाणवतं. बागेतल्या भूलभुलय्यामुळे टिंडलला वाइकपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडत नाही, वाइकचा नुसता आवाजच त्याच्या कानावर आदळत राहतो. वाइकच्या विक्षिप्तपणाचा नमुना म्हणून या भूलभुलय्याकडे बोट दाखवतानाच त्या दोघांमधलं अंतरदेखील हा प्रसंग अधोरेखित करतो.
हा वर्गसंघर्ष दुर्लक्षित करूनही निव्वळ उत्कंठावर्धक थरारपट म्हणून ‘स्ल्यूथ’ कमालीचा एन्जॉय करता येतोच. तद्दन व्यावसायिक चित्रपटातही अभिजात चित्रपटाच्या खाणाखुणा कशा प्रकारे मिरवता येतात आणि तरीही मनोरंजनाची कास न सोडता सामाजिक भाष्य कसं करता येतं, याचं ‘स्ल्यूथ’ हे उत्तम उदाहरण आहे.
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment