नरेंद्र मोदींची चलाख खेळी
सदर - सडेतोड
निखिल वागळे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Thu , 08 February 2018
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress भाजप BJP संघ RSS

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पूर्णपणे ‘इलेक्शन मोड’मध्ये गेलेले दिसतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहात केलेली भाषणं पाहून हाच समज होतो. लोकसभेत त्यांनी १ तास ४० मिनिटं, तर राज्यसभेत १ तास १० मिनिटं भाषण केलं. या दोन्ही भाषणातला मुख्य हल्ला काँग्रेसवरच होता. सर्वसाधारणपणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान असं राजकीय भाषण करत नाहीत. ते आपल्या सरकारची कामगिरी सांगतात आणि विरोधकांच्या आक्षेपांना उत्तरं देतात. पण मोदींचा तोरा काही वेगळाच होता. मैदानी सभा मारण्याच्या उद्देशानं त्यांनी संसदेचा वापर केला. काँग्रेस आणि विरोधकांच्या घोषणाबाजीला भीक न घालता त्यांनी आपला हल्ला चालू ठेवला. हे योग्य की अयोग्य याची चर्चा करण्यात अर्थ नाही, कारण मोदींच्या राजकारणाला सभ्यासभ्यतेचे किंवा परंपरेचे कोणतेही संकेत लागू होत नाहीत. इंदिरा गांधींनीही संसदेचा वापर असाच विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला होता. मोदींपुढे तोच ‘आदर्श’ असावा!

मोदींनी संसदेतील आपली ही दोन भाषणं भावनेच्या भरात केली, अशा गैरसमजातही कुणी राहू नये. ही निवडणूक प्रचारात वाकबगार असलेल्या राजकारण्याची चलाख खेळी आहे. आक्रमण हाच उत्कृष्ट बचाव हा नियम मोदींना चांगलाच ठाऊक आहे. आपल्या सरकारची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही हे मोदी जाणतात. ताज्या बजेटनंतर जनतेकडून मिळालेल्या प्रतिक्रिया फारशा उत्साहवर्धक नाहीत. अशा वेळी लढाई विरोधकांच्या गोटात घेऊन जाण्यातच हुशारी आहे. म्हणूनच मोदी काँग्रेसची खरी-खोटी पापं उकरून काढण्यात धन्यता मानत आहेत. देशातल्या एका मोठ्या वर्गाला काँग्रेसच्या भ्रष्ट राजकारणाविषयी आजही चीड आहे आणि त्या जोरावर आपण आणखी एक निवडणूक जिंकू शकतो असा आत्मविश्वास मोदींना आहे.

आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर बेफाम हल्ला चढवला. त्यात इतिहासाची तोडमोड होती, सत्य-असत्याची बेमालूम सरमिसळ होती. पंडित नेहरूंवरचा संघाचा राग तर जुनाच, मग मोदीजींसारखा अट्टल स्वयंसेवक त्याला कसा अपवाद ठरेल? त्यांनी पहिला हल्ला नेहरूंवरच केला. नेहरूंमुळे या देशात लोकशाही आलेली नाही आणि त्यांच्याऐवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, तर संपूर्ण काश्मीर भारतात आला असता, अशी दोन बिनबुडाची विधानं त्यांनी केली. ती भाषणानंतर तातडीने इतिहासकारांनी खोडून काढली. एक तर आपण लोकशाही आणली असा दावा नेहरूंनीही कधी केला नव्हता. दुसरं म्हणजे, पटेलांना रस जुनागढमध्ये होता, काश्मीरमध्ये नाही हे सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध आहेत. पण मोदी काय म्हणून याची पर्वा करतील? त्यांना काँग्रेसला घायाळ करायचं होतं आणि आपल्या समर्थकांच्या हातात प्रचाराचं कोलीत द्यायचं होतं. त्यांनी काँग्रेसवर घराणशाही, भ्रष्टाचार आणि देश तोडल्याचेही आरोप केले, पण त्यात नवं काहीच नाही.

हेच आरोप मोदी आणि भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणकीत केले होते. किंबहुना अशा भ्रष्ट कारभारामुळेच काँग्रेसला सत्ता गमवावी लागली हा ताजा इतिहास आहे. पण चार वर्षं सत्तेत घालवल्यावरही मोदींना या जुन्या आरोपांचा आधार का घ्यावा लागला हे बघण्यासारखं आहे. २०१४ त्या निवडणुकीत दिलेली बहुसंख्य आश्वासनं मोदी पूर्ण करू शकलेले नाहीत. काळ्या पैशापासून रोजगारापर्यंत याची अनेक उदाहरणं देता येतील. २०१८-१९च्या बजेटमध्ये तर अरुण जेटलींनी शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गापर्यंत सर्वांची फसवणूक केल्याचा आरोप होतो आहे. उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक हमी भाव दिल्याचं जेटलीनी जाहीर केलं, पण प्रत्यक्षात परिस्थिती उलट असल्यानं शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. करात अपेक्षित सवलत न मिळाल्यानं बडे उद्योजक नाराज आहेत. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा शेअर बाजारावर विपरीत परिणाम झाला आहे. आधीच नोटबंदी आणि GST मुळे व्यापारी नाराज आहेत. सामाजिक तणाव वाढताहेत आणि वाढवले जाताहेत. हे कमी म्हणून की काय गुजरात आणि राजस्थान निवडणुकीच्या धक्क्यातून अजून पक्ष सावरलेला नाही. अशा परिस्थितीत मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवणं मोदींना अपरिहार्य आहे. म्हणूनच विकासाच्या अभावी, काँग्रेसचा भ्रष्टाचार + हिंदुत्व हा त्यांचा पुढच्या निवडणुकीचा अजेंडा आहे.

या चलाख खेळीला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष कसा उत्तर देतो यावर पुढच्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून राहील. मोदींच्या भाषणानंतर ताबडतोब राहुलनी प्रतिहल्ला चढवला आहे. रोजगारासारखे मूळ प्रश्न आणि राफेल डीलचं काय हा त्यांचा सवाल नेमका आहे. पण मोदी प्रचार आणि प्रसिद्धीत वस्ताद आहेत. निवडणुका जसजशा जवळ येतील तसे ते अधिकाधिक आक्रमक होतील. खोटं बोला, पण रेटून बोला, हा हिटलरचा संस्कार त्यांच्यावर संघाच्या शाखेपासूनच आहे. राहुल त्याचा प्रतिवाद कसा करतात आणि जनतेशी संवाद कसा साधतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......