अजूनकाही
साडेतीन वर्षे उलटली...
नोकऱ्यांचे पकोडे झाले, ‘अच्छे दिन’च्या बेकार रात्री झाल्या, धान्यधुन्याच्या भावाचे कांदेबटाटे सडले...
आता बिचाऱ्या संघी-भाजपाईंना रामरथयात्रेच्या खेळाचाच आधार उरलाय. जिथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भगवे फडकावत, नावाला एक तिरंगा ठेवत मोहल्ल्यांतून खोट्या कारणांनी दंगे भडकावले जाऊ शकतात, तिथे रामरथयात्रा हा साक्षात दंगल भडकावण्याचा परवानाच. हिंदू ध्रुवीकरणासाठी मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या, पुरोगाम्यांच्या, निधर्मींच्या आणि झालेच तर कुठल्याही विरोधकाच्या रक्ताचा भोवराच फिरवावा लागतो. रथचक्राच्या आऱ्या त्या भोवऱ्याला गती देतीलच.
जगभरात ‘प्रेम दिन’ म्हणून साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेन्टाइन’ दिनाची निवड टाळून त्याच्या आदल्या दिवशीचा मुहूर्त निघाला आहे, या अयोध्या ते कन्याकुमारी यात्रेसाठी. आज (गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी) बाबरी मशीद-रामजन्मभूमी विवादाच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होत आहे. न्या. दीपक मिश्रा, अशोक भूषण आणि अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठासमोर ही प्रलंबित सुनावणी सुरू होत आहे. यांना अपेक्षेप्रमाणे निकाल लागण्याची खात्री असल्यासारखी- ती सुरू असतानाच ही राम रथयात्रा निघते आहे. ही आगळ्याच दर्जाची खेळी शासकीय आशीर्वादाने होत आहे. महाराष्ट्रातील कुणा श्री रामदास मिशन युनिव्हर्सल सोसायटीने या यात्रेचे आयोजन केले असून त्यांचे कार्य सिद्धीस न्यायला विश्व हिंदू परिषद, रास्वसंघ, भारतीय जनता पक्ष आणि भाजपची राज्य सरकारे समर्थ आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्या राज्यांतून ही यात्रा जाणार त्या- उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना ही यात्रा ‘व्यवस्थित’ पार पडावी म्हणून मार्गावर सहकार्य द्यावे असे लेखी कळवले आहे.
एकूण चाळीस दिवसांच्या या यात्रेची अखेर रामेश्वरमला २३ मार्च रोजी होईल. आणि पुढल्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी माती मळली वा रंगली जाईल. ‘राम मंदिर बनाएंगे’चा पुनरुच्चार कसाकसा वाजवला जाईल ते दिसेलच. (दै. ‘जागरण’ या हिंदुत्व बोंबाबोंब-कटिबद्ध असलेल्या माध्यमाने मात्र ही रथयात्रा २०२०पर्यंत चालणार असल्याचे लिहिले आहे. ‘रामराज्य’ आणण्यासाठी असलेली ही यात्रा ‘भाजपराज्य’ आणण्यासाठी काय वाट्टेल तो उत्पात करू शकेल!)
कारसेवकरपुरम् या विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्येतील मुख्यालयातून ही यात्रा मुख्यमंत्री आदित्यनाथ बिश्त यांच्या हस्ते झेंडा हलवून निघेल. संघाच्या दोन पडछाया संघटना- विश्व हिंदू परिषद आणि मुस्लिम राष्ट्रीय मंच यांनी या यात्रेची सर्व पूर्वतयारी केली आहे. या यात्रेचा रथ मुंबईमध्ये तयार होतो आहे, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे अवध प्रांताचे समन्वयक अनिलकुमार सिंग यांनी सांगितले. हा मंदिराची प्रतिकृती असलेला रथ १० फेब्रुवारीला अयोध्येत पोहोचेल.
आदित्यनाथच्या हस्ते ही रथयात्रा निघते आहे याचा अर्थ तसा स्पष्ट आहे. एका हिंदू मठाधिपतीला घटनात्मक पदी बसवण्याची चाल संघ उगाच खेळलेला नाही. वरवर पाहता ‘हिंदू युवा वाहिनी’ ही संघाशी फटकून असलेली संघटना चालवणारा आदित्यनाथ तेवढासा आमचा नाही असा देखावा करायचा. प्रत्यक्षात त्याची बांधणी हिंदूंचा प्रमुख म्हणून करायची. हिंदू राष्ट्राची तालिबानी घाई लागलेली ही संघटना आता या थराला पोहोचली आहे. आदित्यनाथांच्या विरुद्ध नोंदले गेलेले गुन्हे पाहता, त्यांची अतिरेकी वक्तव्ये पाहता, त्यांनी केलेली पोरकट रामागमनाची नौटंकी पाहता कोणतीही नैतिक शुद्ध असलेली राजकीय संघटना असल्या माणसाला विनाकारण जवळ करणार नाही. त्यांची निवड केली तेव्हाच त्यांचा व्यूह स्पष्ट होता. तुप्पट युक्तीवाद करणारे शाखासंघी हे मान्य करणार नाहीत, कदाचित् त्यांना ते वावगेही वाटत असेल मनातल्या मनात- पण व्यूह आहे तो जहरी हिंदू राजकारण, कसलीही चाड न बाळगता गोध्रापेक्षाही क्रूरकर्म करू शकेल असाच नेता त्यांना भविष्यासाठी पटावर आणायचा आहे.
या यात्रेच्या प्रस्थानानंतर रामेश्वरमपर्यंतच्या मार्गावर मार्गसभा, प्रचारसभा घेण्याची जबाबदारी विहिंप सांभाळणार आहे (यात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी पैसा वाहवला जाईल. रोजगार रोजगार!!!).
अडवाणीजी, अखेर तुम्हाला केरात टाकले तरी तुमच्या मार्गावरच चिखलाची पावले चालत राहतील हो. फक्त तुमचा रथ तेव्हा अडवला होता. आता रथ अडवणारे कारावासात आहेत आणि तुमचे वारसदार मोकळे. आताच्या रथयात्राकारांना कसलीच चाड बाळगण्याचे कारण नाही.
सामर्थ्य आहे नागरी युद्धाचे, आधी रथयात्रा काढलीच पाहिजे.
तिरडी के साथसाथ
राम नाम सत्य है...
.............................................................................................................................................
लेखिका मुग्धा कर्णिक यांची ‘अॅटलास श्रग्ड’, ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ इत्यादी अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
mugdhadkarnik@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 08 February 2018
मुग्धाताई, तुमची एकेक विधानं पाहूया. १. >> हिंदू ध्रुवीकरणासाठी मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या, पुरोगाम्यांच्या, निधर्मींच्या आणि झालेच तर कुठल्याही विरोधकाच्या रक्ताचा भोवराच फिरवावा लागतो. << रामजन्मभूमीत उत्खनन केल्यावर तिथे मंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे न्यायालयात सिद्ध झालेलं आहे. काफिरांच्या पूजास्थळी मशीद बांधणे हा इस्लामचा घोर अवमान आहे. त्यामुळे मुस्लिमांना त काहीच स्वारस्य नसायला पाहिजे. मुस्लिमांचा दावा आपोआप निकालांत निघतो. मग तुम्हाला काय अडचण आहे? हिंदू-मुस्लिम तेढ कशाला वाढवताय? २. >>जगभरात ‘प्रेम दिन’ म्हणून साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेन्टाइन’ दिनाची निवड टाळून त्याच्या आदल्या दिवशीचा मुहूर्त निघाला आहे << सेंट व्ह्यालेंटाईन ख्रिश्चन संत होता. भारत सेक्युलर देश आहे. सबब भारताचा प्रेमपोळ्याशी संबंध नाही. प्रेमपोळा हा बैलपोळ्यासारखा सण आहे. 'सण एक दिन, बाकी वर्षंभर, ओझे मरमर, वाहायचे' ही कवी यशवंत यांची रचना आठवंत असेलंच तुम्हांस. असाच प्रकार प्रेमपोळ्याच्या बाबतीत घडतो. ३. >> हिंदू राष्ट्राची तालिबानी घाई लागलेली ही संघटना आता या थराला पोहोचली आहे. << हिंदूंना तालिबान्यांच्या लायनीत बसवणारे साप समजून भुई धोपटीत आहेत. यामागील खरं कारण आम्हांस माहितीये. हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करून तुम्हाला नक्षलवाद पुढे रेटायचा आहे. ४. >> आदित्यनाथांच्या विरुद्ध नोंदले गेलेले गुन्हे पाहता,... << योगी आदित्यनाथांविरुद्ध नोंदवले गेलेले गुन्हे अत्यंत किरकोळ स्वरुपाचे आणि सांगोवांगीचे आहेत. कुठलंसं आंदोलन आणि पोलिसांचा किरकोळ लाठीमार इत्यादि प्रकरणे आहेत. असल्या फालतू गोष्टींना महत्त्व द्यायची मला आवश्यकता वाटंत नाही. ५. >> गोध्रापेक्षाही क्रूरकर्म करू शकेल असाच नेता त्यांना भविष्यासाठी पटावर आणायचा आहे. << या जावईशोधाबद्दल अभिनंदन! आपला नम्र, -गामा पैलवान