स्पर्धा परीक्षा : समाज वास्तवाची दुसरी (काळी ठिक्कर) बाजू 
पडघम - राज्यकारण
अर्जुन नलवडे
  • उद्या पुण्यात MPSC विद्यार्थी मोर्चा निघत असून त्याचं एक पोस्टर
  • Wed , 07 February 2018
  • पडघम राज्यकारण स्पर्धा परीक्षा Competitive Exam एमपीएससी MPSC महाराष्ट्र नागरी सेवा आयोग Maharashtra Public Service Commission युपीएससी UPSC केंद्रीय नागरी सेवा आयोग Union Public Service Commission

काल औरंगाबादमध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला, तर उद्या पुण्यात एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे. यानिमित्तानं गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षा केंद्रांचा जो पुणे-मुंबईृ-औरंगाबाद यांसारख्या शहरांमध्ये सुळसुळाट झाला आहे, त्यामागचं इंगित सांगणारी ही लेखमालिका आजपासून...

.............................................................................................................................................

साधारण २००७ पासून महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचं वातावरण तयार निर्माण होण्यास सुरुवात झाली. आज ते वातावरण किती मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात पसरलंय आणि त्याचे परिणाम किती भयंकर होत आहेत, याकडे तथाकथित बुद्धिप्रामाण्यवादी सोयीस्करपणे आणि स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. हीच गोष्ट अनेकांच्या उदध्वस्तीकरणाला कारणीभूत ठरत आहे. 

शहरी, निमशहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत आताच्या शिकत असणाऱ्या आणि शिकून झालेल्या विद्यार्थ्यांसमोर स्पर्धा परीक्षा पास झालेल्या, अधिकारी झालेल्यांची भाषणं मोठ्या प्रमाणात घडवून आणली गेली. मुळात अधिकारी पदावरून लोकसेवेच्या कार्याची सुरुवातच शून्य असताना आपल्या जीवनाचा प्रवास (स्पर्धा परीक्षा पास होईपर्यंतचा) किती खडतर होता, हे रंगवून सांगणारी अर्धवट चरित्रं पुस्तकांच्या रूपानं बाजारात पोहचली. त्यातून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, प्रयत्न, सातत्य, कष्ट, सहनशीलता, ध्येय आणि शेवटी यश या सर्व गोष्टी केवळ अधिकारी होण्याकरिताच लागू होतात असा बडेजावपणा आणून विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात फुगवल्या गेल्या की, शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार होणाऱ्या तरुण-तरुणींची लाट स्पर्धा परीक्षांकडे वळू लागली. 

एखादं पुस्तक वाचताना (कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र) त्या पुस्तकातील नायकाच्या जागी वाचक स्वत:ला ठेवतो. आणि मग त्या नायकाच्या जीवनात घडणाऱ्या घटना, त्याचा तो खडतर प्रवास याचा वाचक स्वत:च्या जीवनात घडणाऱ्या घटना... स्वत:चा खडतर प्रवास यांची तुलना करायला लागतो. अशा पुस्तकांत वाचक हा नायक आणि स्वत: यामध्ये जास्तीत-जास्त साम्य शोधण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये बऱ्याच वेळेला वाचक यशस्वी होतो अन् काही वेळेला तो अयशस्वी होतो. ज्या वेळी तो अयशस्वी होतो, त्यावेळी तो जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. इथंच वाचक फसतो. अशी फसवणूक... स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची आणि अधिकाऱ्यांची ‘अर्धवट’ आत्मचरित्रात्मक जी पुस्तकं निघाली, त्यातून सर्रासपणे झालेली दिसेल. मी अशा पुस्तकांना  ‘अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं’ असं म्हणतो. कारण अशा आत्मचरित्रांचे नायक हे आपल्या कार्यकर्तृत्वाची सुरुवात ज्या ठिकाणी होणार असते, त्या ठिकाणापर्यंतचा आपला जीवनप्रवास मांडतात. सामान्य वाचक म्हणून आमची अपेक्षा अशी असते की, जिथं तुमच्या कार्यकर्तृत्वाचा आरंभ झाला तिथून पुढचा प्रवास मांडणं गरजेचं आहे. थोडक्यात अधिकार पद मिळाल्यानंतर त्या अधिकार पदाचा वापर करून समाजाच्या भल्यासाठी तुम्ही किती झगडलात आणि त्यामध्ये किती यश मिळवलंत हे सांगणं तुमच्या चरित्रात अपेक्षित असतं. ही खरी प्रेरणा असू शकते. पण दुर्दैवानं ही उणीव स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अर्धवट चरित्रात आढळते (याला काही अपवाद आहेत.).

दुसरी बाब अशी की, हे लिखाण ‘वाचक’ डोळ्यासमोर ठेवून केलेलं लिखाण आहे. ज्यावेळी असा वाचक डोळ्यासमोर असतो, त्यावेळी आर्थिक गणितं असतात. अशा वेळी एखादी घटना, प्रसंग रंगवून किंवा अतिशयोक्ती करून सांगण्याचा निश्चित प्रयत्न होतो. साहित्याच्या इतर प्रकारामध्ये ते शक्य आहे; परंतु चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये ते शक्य नाही. पण या बोरूबहाद्दरांनी ते शक्य करून दाखवलं. या सर्वांचा परिणाम असा झाला की, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचण्यापेक्षा ही ‘अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं’ जास्त प्रमाणात वाचली जाऊ लागली. खरं तर स्पर्धा परीक्षांच्या मैदानात उतरल्यानंतर दोन महिन्यांतच ‘मी पास होईल की नाही... हा अभ्यासक्रम मला झेपेल की नाही’ अशा प्रश्नांची उत्तरं प्राथमिक पातळीवर अंतर्मनात मिळतात.

थोडक्यात आपली पात्रता आणि मर्यादा प्रत्येकानं ओळखलेली असते. तरीसुद्धा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडतात आणि अशाश्वत ध्येयाच्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू होते. या वाटचालीत शे-पाचशेच्या जागांसाठी लाखो अर्ज येतात. ‘जागा कमी अन् जीवघेणी स्पर्धा जास्त’ अशी स्थिती होते. सतत भासणारी आर्थिक चणचण, वाढते वय, घरची जबाबदारी, सामाजिक तणाव, यशाची अजिबात खात्री नाही, सततच्या अपयशामुळे येणारं नैराश्य, गावाकडची दुष्काळी परिस्थिती, स्वत:ची घुसमट, कमी दर्जाचे काम करण्याची नसलेली मानसिकता, मुलींच्या बाबतीत घरातून लग्नासाठी होत असलेली घाई... त्यातून मुलींचा वाढत जाणारा तणाव या सर्व ‘नकारात्मक बाजू’ स्पर्धा परीक्षेच्या कृत्रिम वातावरणातून जन्म घेतात. विद्यार्थी आणि पालकसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बऱ्याचदा निराशा पदरात पडते. 

मी आठवीत होतो. त्यावेळी कोल्हापूरातून एक विद्यार्थी आयएएसची परीक्षा पास झाला होता. त्याचं उदाहरण आमचे शिक्षक वर्गात देत असत. या घटनेला नऊ वर्षं उलटून गेली असावीत. तरीसुद्धा त्याचा फोटो अॅकॅडमी व क्लासेसच्या रंगीत, गुळगुळीत जाहिरातीवर झळकतो. अशा शेकडो विद्यार्थ्यांचे फोटो या जाहिरातींवर असतात. त्यांच्या त्या जाहिरातीत स्पर्धा परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फोटोंची संख्या इतकी मोठी असते की, जणू काही दरवर्षी क्लासेसमधून इतके विद्यार्थी पास होत आहेत; परंतु वस्तुस्थिती पूर्णतः वेगळी आहे. आपल्या प्रभावी जाहिरातीतून अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना भुरळ घातली जाते. आयएएस व आयपीएएस होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना (फक्त हुशार विद्यार्थ्यांना बरं का) हे लक्षात का येत नाही की, खरंच क्लासेसवाल्यांकडे पैसे भरून अधिकारी होता आलं असतं तर श्रीमंत बापाची पोरं अधिकारी झाली नसती का? पण 'स्पर्धा परीक्षाग्रस्त' झालेल्या विद्यार्थ्यांना कोण समाजावणार? 

पुणे शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी जिथं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी असते, अशा ठिकाणी किंवा पुणे महानगरपालिकेच्या शहरी बसेस आणि बस स्थानकांवर लाखो रुपयांच्या स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती असतात. त्या इतक्या प्रभावी आणि परिणामकारक असतात की, खेड्यातल्या सामान्य कुटुंबातून आलेला एखादा तरुण ‘स्पर्धा परीक्षा पास होणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय’ असं मनोमन ठरवतो आणि स्वप्नांच्या दुनियेत वावरायला सुरुवात करतो. त्या स्वप्नांच्या दुनियेत ध्येयाच्या अनिश्चिततेचा काळाकुट्ट अंधार आहे, हे त्याच्या लक्षातच येत नाही. आणि लक्षात आलंच तर तो जाणीवपूर्वक त्याच्याकडं दुर्लक्ष करतो.

संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसचा भरणा आहे. तरीसुद्धा शहरी व निमशहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांना पुण्यातील क्लासेसविषयी खूप आकर्षण वाटतं. हे क्लासेसवाले सुरूवातीला ‘प्रवेश विनामूल्य’ या बॅनरखाली व्याख्यानं भरवतात. त्यातून स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची गरज कशी आहे, आम्ही मार्गदर्शक म्हणून कशी भूमिका बजावतो, आमच्या अॅकॅडमीमधून आत्तापर्यंत किती आयएएस, आयपीएस आणि आयएफएस झाले यांची रसभरीत वर्णनं सांगितली जातात. अप्रत्यक्षपणे ‘क्लासेस स्पर्धा परीक्षा करण्याकरता किती गरजेची आहेत’ हे विद्यार्थ्यांच्या मनावर पुन्हा-पुन्हा बिंबवलं जातं. अनेक अॅकॅडमी-क्लासेसच्या ऑफिसमध्ये (अतिशय बोलक्या असणाऱ्या) काही व्यक्ती अशा पद्धतीनं क्लासेसची माहिती सांगण्यासाठी बसवलेल्या आहेत की, जणू काही श्रीकृष्ण अर्जुनाला स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात लढायचं कसं याचाच उपदेश करतो आहे!

विशेष म्हणजे त्यांच्या आवारात दहावी-बारावी करणाऱ्या विद्यार्थ्यांचीसुद्धा गर्दी होती. मी जिज्ञासा म्हणून त्यांना विचारलं की, ‘तुम्ही इथं कसे काय?’ त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘‘आम्ही स्पर्धा परीक्षेच्या फाउंडेशन बॅचला प्रवेश घेतो आहोत.’’ तेव्हा तर मी डोक्याला हात मारून घेतला. अरे बाप रे! आता तर दहावी-बारावीच्या मुलांनाही या क्लासेस-अॅकॅडमीवाल्यांनी स्पर्धा परीक्षेच्या चिखलात ओढलं. काहींनी तर जागोजागी महानगरपालिकेच्या बसस्थानकांवर ‘आज आणि उद्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी’ अशी भली मोठी जाहिरात केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभ्यासिकेसह वसतिगृहाच्या मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत. त्याचबरोबर हे अॅकॅडमी-क्लासेसवाले खासगी बसेस, खासगी वसतिगृह, उपहारगृह, खानावळी उभे करून करोडो रुपयांची उलाढाल किंवा व्यवसाय करत आहेत. या प्रत्येक अॅकॅडमी-क्लासेसवाल्यांचे स्वत:चे प्रकाशन, मासिक, साप्ताहिक, अभ्यासिका आहेत.

या क्लासेसवाल्यांच्या जाहिरातीत क्लासेसच्या वैशिष्ट्यांमध्ये एक वैशिष्ट्य ठळकपणे दिलं जातं की, ‘तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन’ पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असते. पूर्वीच्या बॅचमधील एखादा विध्यार्थी, जो स्पर्धापरीक्षा पास झालेला नाही किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय अशा विद्यार्थ्यालाच किमान वेतनावर लेक्चर घ्यायला लावतात. इतकं सगळं करूनसुद्धा विद्यार्थ्यांना सांगतात काय? ‘‘आम्ही फक्त दिशा दाखवण्याचं काम करतोय, यश मिळेलच याची शाश्वती देत नाही’’ हे महत्त्वाचं वाक्य वापरून, पैसे घेऊन जबाबदारी डावल्याचं स्पष्ट दिसून येतं. विद्यार्थ्यांना लाल दिव्याच्या गाडीची स्वप्नं दाखवून, जाहिरातीत त्यांची दिशाभूल करून, पाठांतराचा अस्सल नमुना असणाऱ्या अधिकाऱ्यांची व स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची भाषणं (प्रेरणादायी व्याख्यानं बरं का!) घडवून आणून स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये अॅकॅडमीवाले-क्लासेसवाले कमावत आहेत. याकडे आपलं लक्ष जाणार आहे का? 

जाहिरातीच्या आणि स्मार्टफोनच्या युगात एखाद्या विद्यार्थ्याचा बळी सहज जातो. आज इंटरनेटच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या भाषणबाजीमुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आहे. या भाषणबाजीचा परिणाम असा झाला की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनधिकृतपणे (पॅरासाईट) राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. हेच विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीत असणाऱ्या जिन्याखाली, गॅलरीमध्ये राहू लागले. त्याचा ताण वसतिगृह प्रशासन व्यवस्थेला सहन करावा लागला आणि आजही लागतो आहे.

एक  सुप्रसिद्ध आयपीएस (स्पर्धा परीक्षेतील आयकॉन) आपल्या व्याख्यानातून तरुणांची दिशाभूल करत सुटलेत. त्यांच्या व्याख्यानाचा असा परिणाम होतो की, विद्यार्थी वास्तवतेपासून दूर जात स्वप्नांच्या दुनियेत रममाण व्हायला लागतो. त्या अधिकाऱ्याची लाल दिव्याची गाडी (शासनाची बरं का!) त्यांच्या अंगावरील शासकीय गणवेश, त्यांचा मानसन्मान, त्यांना इतरांकडून मिळणारी आदराची वागणूक या सर्वांत तो विद्यार्थी स्वत:ला ठेवायला लागतो. काही अधिकाऱ्यांनी वक्तृत्वाचं बाळकडूच प्यायलं होतं की काय, अशी शंका त्यांचं भाषण ऐकल्यावर येते. वक्तृत्व म्हणण्यापेक्षा ‘पाठांतराचा’ तो उत्कृष्ट नमुनाच म्हणायला हवा. असे उमेदवार अधिकारी झाल्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षासंबंधीची व्यासपीठंच गाजवत सुटतात! काहींनी  तर आपल्या वक्तृत्वाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर आपल्या 'परिवारा'चा इतका मोठा व्याप वाढवलाय की, आता ते फक्त ‘संस्थानिक’च व्हायचेच बाकी राहिलेत. हे अधिकारी प्रचंड हुशार आहेत; परंतु ते आपल्या बुद्धीचा वापर समाजसेवेसाठी नाही तर व्यवहारासाठी (फायदेशीर व्यवसायासाठी) व स्वत:च्या प्रसिद्धीसाठी करतात. सकारात्मकतेचा अतिरेक झाला की, त्यातूनही नकारात्मक बाजू जन्म घेते, हे या अधिकाऱ्यांच्या आणि क्लासेसवाल्यांच्या उद्योगांतून स्पष्ट होते.

पुण्यात असणाऱ्या विविध अभ्यासिकांमध्ये हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये आपलं नशीब अजमावत आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीमध्ये पुण्यातील प्रशस्त ग्रंथालयं आणि विविध प्रकारची पुस्तकं मिळणारा अप्पा बळवंत चौक (एबीसी) ही महत्त्वाची भूमिका बजावतात; पण आज ही ग्रंथालयं आणि अ.ब. चौक हा फक्त स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातच ओळखला जातोय. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुण्यातील साहित्य विश्व हे नेहमीच आघाडीवर राहिलेलं आहे. आणि दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय आणि अखिल विश्व साहित्य संमेलनामध्ये पुण्याची भूमिका ही महत्त्वाची असते. परंतु अशा प्रकारची साहित्य संमेलनं ही जशी जातीची, धर्माची, विचारसरणीचीसुद्धा होऊ लागली. तशाच प्रकारे त्यामध्ये आणखी एकाची भर पडली. ती म्हणजे ‘स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलना’ची. माझी पुढची पिढी कोणाचा इतिहास अभ्यासणार आहे? थोर समाजसुधारक म्हणून क्लासेसकर्त्यांचा इतिहास अभ्यासणार आहे काय? का गुगल, फेसबुक, ट्वीटरचे संस्थापक किंवा ऑलिंपिकमध्ये मायकेल फ्लेप्स, उसेन बोल्ट यांसारखे सुवर्णपदकांचे विश्वविक्रम करणाऱ्या व्यक्तींचा इतिहास अभ्यासणार आहेत? माझ्या पिढीतल्या विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षेतलं वाया गेलेलं आठ-दहा वर्षांतील उद्ध्वस्त जीवन... हा भविष्यातील इतिहास अजिबात बनू शकत नाही!!! आमचं असं स्वत:चं कर्तृत्व काय? की ते कर्तृत्व भविष्यातील पिढीसमोर ‘सोनेरी इतिहास’ म्हणून उभा असेल? हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यानं स्वत:ला विचारावा.

स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या शाखेतून आलेले असतात. यामध्ये ‘शास्त्र’ शाखेचे विद्यार्थी युपीएससी किंवा एमपीएससीसाठी प्रयत्न करताना दिसतात. एमबीबीएस, बीएचएमएस, एमडी, बीई, एमई, एमटेक, बीटेक या शाखांमधील हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करण्याच्या फंदात पडतात. यांच्या या शाखीय शिक्षणाचा समाजाला प्रत्यक्ष फायदा होणार असतो; परंतु अधिकारी पदावरून आपल्याला प्रशासकीय व्यवस्थेत जाऊन व्यापक स्वरूपाचं काम करता येईल या निर्बुद्ध आशेनं स्वत:च्या अंगभूत कला-कौशल्याची हत्याच केली जाते. ‘वाणिज्य आणि शेतकी’ शाखेतील विद्यार्थी हे बँकिंगच्या स्पर्धा परीक्षा देतात. वास्तविक पाहता शेतकी पदवी घेणारा विद्यार्थी शेती क्षेत्रात भरीव योगदान देईल किंवा विविध बदल घडवून आणेल अशी अपेक्षा असते; परंतु हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या नादाला लागतात आणि आपल्या आयुष्याची उमेदीची वर्षं यात खर्च करतात. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका नावाजलेल्या ‘सीओईपी’ या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वयम्’ नावाचा उपग्रह बनवला आणि त्याचं यशस्वी उड्डाणही झालं. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून अनेक मान्यवरांपर्यंत त्या विद्यार्थ्यांचं कौतुकही झालं.

एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे नव्यानेच पुण्यात दाखल झालेला माझा नवीन मित्र. त्यानं एका  अॅकॅडमीमध्ये जवळपास ऐंशी हजार भरून युपीएससीचा क्लास लावला. तो सांगत होता, लेक्चरचा पहिला दिवस. त्या लेक्चरमध्ये मुलांच्या शैक्षणिक शाखा विचारल्या गेल्या. त्यात अभियांत्रिकी शाखेकडून आलेले नव्वद टक्के विद्यार्थ्यी होते, राहिलेले दहा टक्के इतर शाखेतून आलेले. समजा, विद्यार्थी दशेत असताना सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी केलेली कर्तबगारी पहायला मिळते, तर दुसरीकडे त्याच शाखेची मुले पुढे अभियांत्रिकीची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली तर त्यांच्या शिक्षणावर पालकांनी आणि शासनाने केलेल्या खर्चाचं काय? याचं कारण फक्त एकच. स्पर्धा परीक्षेचं निर्माण केलं गेलेलं आभासी वातावरण.

महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे बारा हजार विद्यार्थी कृषी पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यातील फक्त दोन हजार विद्यार्थ्यांना नोकरी लागते अन् उरलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी हे पुणे, मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसतात. ही वस्तुस्थिती आहे, हे आम्हाला नाकारता येणार नाही. त्यानंतर ‘कला’ शाखेतील विद्यार्थ्यांचा विचार केला तर या स्पर्धा परीक्षा ‘तरुणांचं भविष्य नष्ट करण्याच्या उद्देशानंच निर्माण झाल्यात की काय?’ अशी साधार भीती वाटते. खरं तर एकाच आखाड्यात बी.ई करणारा हुशार विद्यार्थी आणि त्याच आखाड्यात बी.ए.ची परीक्षा ‘एटीकेटी’ने पास होणारा विद्यार्थी यांची बौद्धिक कुस्ती लावली जाते. साहजिकच विजय ठरलेला असतो. कला शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत कला असतात. कोण उत्तम कवी असतो, कोण उत्तम गायक असतो, कोण उत्तम चित्रकार असतो, कोण उत्तम लेखक असतो, कोण उत्तम वक्ता असतो, तर कोण उत्तम खेळाडू असतो. अशा विविधांगी कलांत पारंगत तरुण आपापल्या क्षेत्रात नावारूपाला येऊ शकतात; परंतु स्पर्धा परीक्षेच्या नादाला लागून या तरुणांनी स्वत:च्या कलेची एक प्रकारची हत्याच केलेली असते.

याला पालकदेखील काही प्रमाणात कारणीभूत आहेत. स्पर्धा परीक्षेचा झालेला प्रचार अन् प्रसार यामुळे अंगभूत कलेची हत्या करून प्रत्येक विद्यार्थी (स्पर्धा परीक्षा करणारा) हा माझ्या शेजारचा, माझ्या सोबतचा मुलगा किंवा मुलगी स्पर्धा परीक्षा करते म्हणून मीही करते किंवा करतो, हे चारचौघांत मान्य करायला कोणी तयार नसतं. आणि म्हणून एकाकडे पाहून दुसरा... दुसऱ्याकडे पाहून तिसरा अन् तिसऱ्याकडे पाहून चौथा स्पर्धा परीक्षा करत सुटतो. याचा परिणाम म्हणून विद्यार्थी ‘स्पर्धा परीक्षाग्रस्त’ व्हायला लागतात. आणि हा संसर्गजन्य रोग झपाट्याने वाढतच आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा हा रोग वाढेल कसा, या दृष्टीनेच प्रयत्न केले जात आहेत किंवा तशा प्रकारचं अनुकूल वातावरण निर्माण केलं गेलं आहे\जात आहे.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या माझ्या अनेक गरीब मित्रांची आणि त्यांच्या जीवनाची फरफट पाहण्यासारखी नाही. ते सदाशिव पेठेतल्या काही धोकादायक इमारतीत (अगदी एक-दोन रिश्टर स्केलच्या भूकंपातही पडतील अशा) दाटीवाटीनं राहतात. कोण सकाळचं दूध घालण्याचं काम करतो... कोण रात्रपाळीत एटीएमच्या बुथवर पहारेकऱ्याची नोकरी करतो... कोण आपल्या पोटाचा प्रश्न मिटावा म्हणून एखाद्या खानावळीत पार्टटाईम वेटरची नोकरी करतो... तर कोण पेपर टाकण्याचे काम करतो.

खरं तर याच मुलांमध्ये मला रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, विजय भटकर दिसतात. याच मुलांत मला बाबा आमटे, अभय बंग आणि रवींद्र कोल्हे दिसतात. याच मुलांत मला भविष्यातले शेकडो सुवर्ण पदकं मिळवणारे खेळाडू दिसतात आणि याच मुलांमध्ये समाजाच्या व्यथा मांडणारे साहित्यिक दिसतात. पण प्रश्न आहे, मला दिसून उपयोग काय? याची जाणीव केवळ मला होऊन उपयोग काय? हे सर्व स्वत:ला बुद्धिवादी, मानवतावादी आणि पुरोगामी म्हणविणाऱ्या लोकांना आणि विचारवंतांना का दिसत नाही? कारण यांना संघटना उभी करणं आणि त्यासाठी तरुणांना हातशी धरणं अन् त्यांना चिथवणं इतकंच माहिती असतं. असो!

प्रत्यक्ष राज्यव्यवस्थेची धुरा सांभाळणाऱ्या आणि या होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या कल्याणाची जबाबदारी असणाऱ्या राजकीय व्यवस्थेतील माणसांनी (लोकप्रतिनिधींनी) डोळ्यावर पट्टी बांधली आहे काय? आणि असेल तर... त्यांनी ती पट्टी काढावी आणि राजकीय स्वार्थासाठी चाललेली आपापसांतील दिखावू भांडणं मिटवून या मुलांच्या कल्याणाचा विचार करावा.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या माझ्या मित्रांना मला इतकंच सांगायचं आहे की, ‘स्वप्नं पहा, स्वप्नं जगा’ हे ऐकायला खूप चांगलं वाटतं; पण एकच स्वप्न लाखो जणांनी पाहिलं आणि त्या स्वप्नांची वाटचाल एकाच मार्गावर सुरू झाली तर ती स्वप्नं, स्वप्नच राहत नाहीत. तर ती एक स्पर्धा होते. खरं तर ती एक जीवघेणी स्पर्धा होते. त्यात काही जणांचा जीवानिशी बळी जातो, काहीजण स्वप्न भंगली असली तरी त्या स्वप्नातून बाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत ती मुलं स्वप्नंच जगायला लागतात, स्वप्नातच वावरायला लागतात. वास्तव परिस्थितीचं भान न ठेवता एखाद्या संमोहित झालेल्या रुग्णासारखं. अशा स्वप्नांना (खरं तर स्पर्धापरीक्षेच्या वातावरणाला) आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काही कमी नाही. त्याचा टक्का आज कमी वाटत असेलसुद्धा; पण भविष्यात तो वाढणार आहे.

काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दोन विद्यार्थी ‘आपण स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी झालो’ असं सांगत आपल्या आप्तस्वकियांची, समाजाची आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वत:ची फसवणूक करत राहिले आणि दुसऱ्याचीही. त्यातील पहिला श्रीकांत पवार आणि दुसरा हनुमंत खाडे. त्यांच्या या कृत्यामागे अधिकारी होण्याची स्वप्नं, मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा, तो मानसन्मान, जागोजागी होणारा सत्कार, व्याख्यानांसाठी येणारी आमंत्रणं आणि समाजात निर्माण होणारा दरारा ही कारणं होती. अशा वेळी अक्षय कुमारचा ‘स्पेशल 26’ या चित्रपटाची आठवण होते. कारण ‘चोर होऊन चोऱ्या करणं तसं अवघड काम... पण अधिकारी होऊन चोऱ्या करणं तसं सोपं काम’ हे स्पष्ट आहे. असो! दोष या बोगस अधिकाऱ्यांचा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांचा असेलही; परंतु त्याहूनही जास्त दोष स्पर्धा परीक्षेचं कृत्रिम वातावरण तयार करणाऱ्या खाजगी क्लासेस आणि अॅकॅडमीवाल्यांचाही आहे, हेदेखील नाकारता येणार नाही.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ठराविक वर्षं त्यासाठी दिली पाहिजेत आणि त्या वर्षात आपण यशस्वी झालो नाही तर निराश न होता त्यातून बाहेर पडलं पाहिजे. ज्या कोणत्या शाखेचं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, त्या शिक्षणासंबंधीचा व्यवसाय किंवा नोकरी करावी. स्पर्धा परीक्षेला दुसरा पर्याय असू द्या! तो पर्याय मात्र तुम्हाला जे काही येतंय (कौशल्य किंवा कला), ज्यामध्ये तुम्ही पारंगत आहात, त्यामध्येच सर्वोत्कृष्ट बनण्याचा असावा. असा विचार आत्महत्या केलेल्या डॉ. विकास बोंदर या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याने केला असता तर कदाचित तो त्याच्या भागातील चांगला डॉक्टर होऊ शकला असता किंवा त्याच्याही पुढे जाऊन डॉ. आमटेंसारखं कार्य करू शकला असता. स्पर्धा परीक्षेकडे न वळता घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून नोकरी-व्यवसाय करणारे काही कमी नाहीत. वयाच्या विशी-पंचविशीमध्ये कथाकार, कादंबरीकार आणि कवी असणारे, साहित्यिक क्षेत्रात लेखक म्हणून स्वत:चा ठसा उमटवणारे सागर कळसाईत, हणमंत कुराडे, सागर सुरवसे, स्वप्निल कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर यांसारखे लेखकसुद्धा आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या पात्रतेचा जरूर आहे. गरज आहे ती त्यांनी स्वत:ला ओळखण्याची आणि व्यवस्थेनं त्यांची दखल घेण्याची. फक्त अधिकारी होऊन समाजसेवा करता येते किंवा समाजाचे प्रश्न सोडवता येतात, या भाबड्या स्वप्नातून जागं व्हा!

.............................................................................................................................................

लेखक अर्जुन नलवडे दै. प्रभात (पुणे)मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.
arjunpralhad@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

abhijit suryawanshi

Fri , 09 February 2018

छान लेख


vishal pawar

Wed , 07 February 2018

स्पर्धा आणि परीक्षा ....????


Gokul Navale

Wed , 07 February 2018

खूपच छान


Prashant

Wed , 07 February 2018

very important, essential article.


Prashant

Wed , 07 February 2018

good article


Sourabh suryawanshi

Wed , 07 February 2018

यामध्ये मुलांचा काय दोष? इतर faculty कडे पण गर्दी आहेच की 2009 पासून MPSC मध्ये घोटाळा चालू आहे यावर पण research हवा ना?


Sourabh suryawanshi

Wed , 07 February 2018

सरकारचा पण दोष आहेच ना एकतर पारदर्शक कारभार नाही result वेळेवर नाही ...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......