प्रिय राणी आणि अभय बंग...
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण बर्दापूरकर
  • महात्मा गांधी मिशनमधील डॉ. अभय बंग यांच्या सोबतच्या प्रकट मुलाखतीचे छायाचित्र डॉ. अर्पित शहा यांच्या तर अन्य छायाचित्रे ‘गुगल’च्या सौजन्यानं
  • Sat , 03 February 2018
  • पडघम कोमविप डॉ. अभय बंग Abhay Bang डॉ. राणी बंग Rani Bang

१.

राणी आणि अभय या डॉक्टर बंग दाम्पत्याला ‘पद्मश्री’ हा सन्मान जाहीर झाल्याचं कळल्यावर आनंदाचे कल्लोळ भेटीला आले. त्याची अनेक जीवाभावाची कारणं आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यात प्रांजळ मैत्री आहे. त्यातही अभयशी जास्त संपर्क असतो. अकृत्रिम मैत्रीचे हे बंध आमच्या पुढच्या पिढीतही कायम आहेत. राणी आणि अभय या बंग डॉक्टर दाम्पत्याच्या, महावटवृक्षाच्या पसरलेल्या अत्यंत विस्तीर्ण सावलीसारख्या वैद्यक सेवा आणि त्या अनुषंगानं उभारलेल्या कामाचं स्वरूप लक्षात घेता खरं त्यांना ‘पद्मविभूषण’ नाही तर किमान ‘पद्मभूषण’ सन्मान मिळायला हवा होता, असं अजूनही वाटतं. आणि या वाटण्याशी असंख्य सहमत होतील यात शंकाच नाही. कोणा एकाला नव्हे तर डॉ. बंग दाम्पत्याला त्यांच्या कामाबद्दल ‘पद्मश्री’ मिळालेली आहे. एखाद्या दाम्पत्याला पद्म सन्मान मिळण्याचा गेल्या चार दशकांच्या पत्रकारितेतला माझ्या स्मरणातील हा पहिलाच प्रसंग आहे.

या पद्म सन्मानाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंग दांपत्याची महात्मा गांधी, विनोबा आणि लोकशाहीवर अढळ, अविचल निष्ठा असल्याचं जगजाहीर आहे. त्यांचं वर्तन आणि व्यवहारही त्या निष्ठेला साजेसा व्रतस्थ आहे, तरी हिंदुत्ववादी विचारच्या सरकारनं त्यांना पद्म सन्मान दिला आहे. त्यानिमित्तानं अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ‘त्यांच्या हिंदुत्ववादा’चे कट्टर विरोधक ज्येष्ठ संपादक, विचारवंत कुमार केतकर यांना हाच सन्मान मिळाला होता याचं स्मरण झालं. त्यामुळे समकालीन राजकीय परिस्थिती अगदीच काही हाताबाहेर गेलेली नाही असा दिलासा देणारा विचार क्षीणपणे का असेना मनात रेंगाळला.    

औरंगाबादला स्थायिक झाल्यापासून म्हणजे अलीकडच्या पावणेचार वर्षांत पूर्वी जशा होत, तशा अभयशी नियमित होणाऱ्या भेटी थांबलेल्या आहेत. पण त्याला मिळालेल्या पद्मश्रीचा एसएमएस वाचल्यावर किती विपरीत परिस्थितीत अभय व राणीनी काम सुरू केलं हे आठवलं आणि मन भूतकाळात डोकावलं. पणजी, कोल्हापूर, चिपळूण अशा काही गावांत उमेदवारी केल्यावर ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकासाठी १९८१च्या जानेवारी महिन्यात नागपुरात पत्रकारिता सुरू केली, तेव्हा मेडिकल बीट माझ्याकडे होतं. त्या काळात अभय बंग ही एक दंतकथा असल्यासारखी चर्चा वैद्यक क्षेत्रात होती. अभयची अत्यंत साधी राहणी, अफाट गुणवत्ता, वैद्यक क्षेत्रात त्यानं घेतलेली उत्तुंग भरारी, त्याचं गांधीवादी असणं आणि निर्लोभी वागणंही... अशा अनेक बाबी चर्चेत असायच्या.

अभयचा जन्म वर्ध्याचा आणि त्याचं बालपण सेवाग्राम आश्रमातलं, तर राणीचा जन्म चंद्रपूरचा आणि तोही सुखवस्तू कुटुंबातला. जाती-धर्माच्या कक्षा ओलांडणारी त्यांची प्रेमकथा आणि विवाह नागपूरच्या वैद्यक व्यवसायात कौतुकाचा होता. यथावकाश अभयची भेट झाली. पहिली भेट तशी औपचारिकच ठरली. याच दरम्यान गांधीवादी ठाकूरदास बंग यांचा तो मुलगा असल्याचं कळलं. याच काळात केव्हा तरी अभय-राणी या दोघांनी गडचिरोलीत काम सुरू केलं. ते दोघंही डॉक्टर असले तरी त्यांना वैद्यक ‘व्यवसाय’ करायचा नव्हता, तर वैद्यक ‘सेवा’ समाजाला द्यायची होती. वैद्यक सेवा हे समाज परिवर्तनाचं साधन आहे अशी त्यांची धारणा होती.

तेव्हा भाई सावंत राज्याचे आरोग्य मंत्री होते. खासगी क्षेत्रातील वैद्यकीय कौशल्य सरकारी रूग्णालयात उपचारासाठी येणार्‍या गोर-गरीब रुग्णांसाठी उपलब्ध करून घेण्याचा प्रयोग त्यांनी सुरू केला. त्यातून गडचिरोलीला एक दुर्दैवी घटना घडली. नुसतीच घटना नाही तर एक खूप मोठं एक वादळ उभं झालं. त्या काळात अभयच्या अधिक जवळ जाता आलं. वैद्यक सेवेच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या त्या वादळातही शांत राहण्याचा आणि घडणार्‍या घटनांचं तर्कसंगत विश्‍लेषण करण्याचा अभयचा स्वभाव तेव्हा ठसठशीतपणे लक्षात आला. नंतरच्या काळात पुण्याला होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचं प्रायोजकत्व स्वीकारलेल्या गुटखा कंपनीच्या आणि धान्यापासून मद्याला विरोध अशा गाजलेल्या वादातही त्याचा हा शांतपणा ढळला नाही.  

नागपूरचं तरुण भारत हे दैनिक तेव्हा वासंतिक अंक प्रकाशित करत असे. त्यानिमितानं बंग दाम्पत्याशी दीर्घ म्हणावी अशी भेट झाली. त्या वर्षीच्या वासंतिक अंकाच्या संपादनाची जबाबदारी प्रकाश देशपांडेकडे सोपवण्यात आली होती. जरा हटके विषय निवडायचा म्हणून विदर्भात पूर्ण वेळ काम करणार्‍या सर्व विचारांच्या करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या रचनात्मक कामाची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा पूर्ण अंक काढायचं प्रकाशनं आणि मी ठरवलं. यातील डॉ. राणी व डॉ. अभय बंग आणि मोहन हिराबाई हिरालाल यांच्यावर लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर आली. त्यासाठी गडचिरोलीला जाऊन आठवडाभर मुक्कामाला राहिलो. या मुक्कामात राणीच्या हातची चव मला समजली, हे आता तिला आठवतं का हे मला ठाऊक नाही, पण याच भेटीत आम्ही एकेरीच्या सलगीवर पोहोचलो. बंग दाम्पत्याशी तेव्हापासून आजवर चालत आलेल्या गेल्या पावणेचार दशकांच्या मैत्रीची बीजं त्या भेटीत अंकुरली. ते मैत्रीचं झाड आता गर्भश्रीमंतीनं बहरलेलं आहे!

पुढच्या काळात सर्च या संस्थेची (स्थापना १९८८) सुरुवात झाल्यावर नागपुरात असणारी काही कामं करण्याची जबाबदारी हळूहळू अभयनी माझ्याकडे केव्हा सोपवली ते कळलंच नाही. सर्चच्या भित्तीपत्रकांची छपाई, पाण्याच्या मोटारी वगैरे दुरुस्त करणं, सर्चला भेटी देण्यासाठी येणार्‍यांची नागपुरात सोय आणि त्यांना नीट गडचिरोलीकडे रवाना करणं...वगैरे कामांचा त्यात समावेश होता. पुढे अभयला या ‘सर्च’च्या कामांसाठी नागपुरात स्वतंत्र यंत्रणा उभारता आली. पत्रकारितेतल्या वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि व्यापात मीही आकंठ बुडालो. अभयच्या कामात कसा गोवला होतो, हे जसं आजवर कळलेलं नाही, तसंच त्यापासून केव्हा व कसा हळूहळू दूर झालो हे कळलेलं नाही. आमच्या गाठीभेटी मात्र कायम राहिल्या. अभय व राणीच्या कामाचाही विस्तार झपाट्यानं व्हायला सुरूवात झाली. आदिवासींच्या आरोग्याच्या काळजी आणि सेवेपासून सुरू झालेला अभय आणि राणी बंग यांच्या कामाचा व्याप विविध दिशांनी होऊ लागला. माता संगोपन, आदिवासी मातांचे अकाली होणारे मृत्यू टाळणं, कुपोषित बालकांच्या आरोग्याची काळजी आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असा हा विविधांगी विस्तार होत गेला.

२.

कुपोषण हा काही फार गांभीर्याचा विषय आहे याची जाणीवच तेव्हा कुणाला नव्हती. हे गांभीर्य सर्चनी सर्वांत प्रथम सरकार आणि समाजाच्या निदर्शनाला आणलं. कुपोषणाचे विविध पैलू आहेत; त्याचा संबंध अन्न, त्या कुटुंबाची जीवन पद्धती, त्या भागातले सामाजिक वातावरण अशा विविध बाबींशी आहे आणि त्याकडे बघण्याचा शासन नावाची जी काही यंत्रणा आहे. तिचा दृष्टिकोन किमानही संवेदनशील नाही हे लक्षात आणून दिलं ते राणी व अभय यांनीच. तोपर्यंत आदिवासी विकास हा रस्ते, नावापुरतं उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती वगैरे भोवतीच केंद्रित झालेला होता. आदिवासींच्या विकासाचा संबंध त्याच्या भावजीवनाशी, त्यांच्या जगण्याशी, त्यांच्या जीवनशैलीशी आहे याची जाणीव ना सरकारला होती ना प्रशासनाला. हे सर्वांत प्रथम ओळखलं ते बाबा आमटे यांनी आणि त्या दिशेनं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्या कामाला मूर्त स्वरूप मिळवून दिलं प्रकाश आणि मंदा आमटे यांनी. बाबा आमटेंच्या नंतरच्या पिढीतील अभय-राणी बंग, विकास आणि भारती आमटे, प्रकाश आणि मंदा आमटे, शुभदा देशमुख आणि सतीश गोगुलवार, मोहन हिराबाई हिरालाल अशा अनेकांनी आदिवासी विकासाच्या तोपर्यंत प्रस्थापित असणार्‍या कल्पनांना धक्का देऊन आदिवासी विकास म्हणजे नेमकं काय, याचं भान सरकारला आणि समाजाला आणलं.

कुपोषणाचा शेवट क्वचित बालमृत्यूत होतो हे तोपर्यंत केवळ माहीत होतं, मात्र हजारो-लाखो आदिवासी बालके कुपोषणामुळे महाराष्ट्रासारख्या कथित ‘पुरोगामी आणि प्रगत’ राज्यात मृत्यूमुखी पडत आहेत याची जाणीव शहरी पांढरपेशा समाजाला नव्हती. हा समाज सोडा, जिल्हा प्रशासनाला आणि ज्यांच्यावर राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी सोपवण्यात आलेली आहे, त्या आरोग्य यंत्रणेलाही ती नव्हती. अभय-राणी बंग दाम्पत्यानं मात्र या प्रश्‍नासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करायलाच नव्हे तर कुपोषणाचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवायलाही सुरूवात केली. मेळघाट परिसरात शेकडो आदिवासी बालकं कुपोषणामुळे मृत्यूमुखी पडत आहेत, ही बातमी लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीनं आजच्या भाषेत सांगायचं तर ‘ब्रेक’ केली, तेव्हा महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही धक्का बसला. कुपोषणामुळे होणार्‍या बालमृत्यूंची दखल अगदी बीबीसीसारख्या वृत्तवाहिन्यांपर्यंत घेतली गेली. कुपोषणामुळे होणार्‍या बालमृत्यूचं वास्तव किती प्रखर, भीषण आणि आक्राळविक्राळ आहे. हे अभयनी जेव्हा ‘कोवळी पानगळ’ या अहवालातून मांडलं, तेव्हा संवेदनशील माणसानं मनाच्या तळातून हादरुन जावं इतकं ते अविश्वनीय वाटत होतं.

कुपोषणाचा प्रश्‍न केवळ गडचिरोली किंवा मेळघाटसारख्या आदिवासी दुर्गम भागापुरताच मर्यादित आहे, अशा तोवर असणार्‍या समाजाला ‘कोवळी पानगळ’नं सुरुंगच लावला. कारण अभय, सर्च आणि त्याच्या सहकारी संस्थांनी मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत कुपोषणामुळे बालमृत्यू लाखोंच्या संख्येने कसे होत आहेत हे साधार सिद्ध केलेलं होतं. मध्यमवर्गीय सुखासीन समाज आणि असंवेदनशील प्रशासनाचा बुरखाच त्यामुळे टराटरा फाटला. कुपोषणाचा विषय मग अभयसाठी त्याच्या संपूर्ण आयुष्याची मिशनच ठरला. गडचिरोलीपासून ते अगदी अमेरिकेपर्यंत मिळेल त्या व्यासपीठावर संधी मिळेल, तेव्हा आक्रमकपणे केवळ मांडतच नव्हता तर सर्चच्या माध्यमातून गडचिरोली भागात हे कुपोषण आणि त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी काही मॉडेल्सही राबवत होता. या मॉडेल्सना मिळणारं यश आदिवासी माता आणि कुपोषित बालकांच्या मृत्यूचा दर कमी झाल्यानं सिध्द होत गेलं. हे मॉडेल मग अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य झालं आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर अन्य काही राज्यातही त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.  

-हे वाचायला जितकं सोपं वाटतं तितकं ते काम मात्र सोपं नव्हतं. सरकार, शासन, समाज आणि अभय ज्या वैद्यक क्षेत्रातला आहे, त्याच्या त्या बिरादारीलाही हे सगळं पटवून देणं खूप मोठ्या जिकिरीचं होतं. त्यासाठी रात्रीचाही दिवस करून अभय राबत होता. या काळात तो इतका राब-राब-राबला की, त्या अविश्रांत श्रमातून अभयला हृदय विकाराचा त्रास झाला. आपल्या इतक्या गंभीर आजारातून शिकण्याचा आणि इतरांना शिकवण्याचा दृष्टिकोन ठेवून वावरणारा अभय एक विलक्षण रुग्ण लोकशिक्षकही झाला. या जीवघेण्या हृदय विकारानंतर अभयनी आपला हृदयरोग साक्षात्कारी कसा आहे आणि आजच्या ताणावपूर्ण वातावरणात अपरिहार्यपणे येणार्‍या या हृदयरोगापासून स्वतःला दूर कसं ठेवता येईल याची एक चळवळ उभारली. पाहता पाहता वैद्यक दृष्टिकोनातून उभारलेल्या याही चळवळीला एक सामाजिक स्वरूप आणि महत्त्व प्राप्त झालं.

३.

विषय म्हणा की प्रश्‍नांच्या जागरुकतेबद्दल व्यासपीठावर अभय जितका शांतपणे ठाम असतो. जे काही घडतं आहे त्याकडे चिकित्सक दृष्टीकोनातून बघायचं, त्यातून शिकायचं आणि ते इतरांना शिकवायचं अशीच ‘लोक शिक्षकाची’ त्याची वृत्ती असते. हृदयाच्या जीवघेण्या दुखण्यातून बरा झाल्यावर धीर गाळून अभय गप्प बसला नाही. पथ्यपाणी सांभाळत पुन्हा तो पूर्वीच्याच जोमानं कामाला लागला. नेहमीच्या कामासोबत त्याला हृदय रोगाबाबत जनजागृती हे नवीन डायमेन्शन मिळालं आणि अभयचे दौरे सुरू झाले. काही वर्षांनंतर अभयची पुन्हा एकदा अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली. त्यासाठी मुंबईला जाण्याआधी अभयची भेट झाली. त्या वेळी अभयनं ‘मी जरा मुंबईला जाऊन अ‍ॅन्जिओप्लास्टी करून येतो’, हे अशा स्वरात सांगितलं की, जणू काही तो बाजारात एखादं खेळणं आणायलाच चाललेला आहे. आपल्या आजाराचा कोणाताही बाऊ न करणं हा त्याचा स्वभावच आहे!

त्याचे दौरे हाही सहज शैलीतला भाग असतो. शहराच्या दुसर्‍या एखाद्या वस्तीत जाऊन यावं, इतक्या सहजपणे तो केवळ राज्यात आणि देशातच नाही तर परदेशात अनेक ठिकाणी जाऊन येत असतो. हे सगळं करत असताना अभयला एकदाच नाही तर अनेकदा मनस्ताप सहन करावे लागतात, टीकाही झेलावी लागते. काही वेळा तर ही टीका जिव्हारी लागणारी कशी असते, याचा जो एक अनुभव त्याला एका ज्येष्ठ संपादकाकडून कसा आला त्याचा मी साक्षीदार आहे. पण, झालेला तो मन:स्ताप इतरांना न जाणवू देता अभयनं एकट्यानं सहन केला. खरं तर, या टीकेला उत्तर देण्याचा अधिकार त्याला होता. आजवर केलेल्या त्याच्या कामातून त्याचा प्रतिवाद समाजासमोर यायलाही हवा होता. शिवाय समाजानं तो प्रतिवाद मान्यही केला असता. पण, ती टीका करणार्‍याचं साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातलं काम आपल्या प्रतिवादामुळे समाजदुय्यम ठरवेल अशी अत्यंत दुर्मीळ समंजस आणि आचंबित करणारी भूमिका अभयनं घेतली. अभय ही एक मोहिनी आहे, कशी असते हे सांगतो- त्याच्या सर्वच विशेषत: सरसकट मद्यबंदीच्या मागणीचा मी विरोधक आहे, तरी आमच्यात दुरावा नाही. उलट अशा काही मतभेदांमुळे आमच्या मैत्रीची खुमारी वाढलेली आहे. अभयची मोहिनी अशी की, पुढे धान्यापासून मद्य करण्याच्या धोरणाला विरोध करण्यासाठी त्याच्या पुढाकारानं उभ्या राहिलेल्या चळवळीत मी पत्रकार आणि कार्यकर्ता म्हणूनही सहभागी झालो! 

महात्मा गांधी-विनोबा, माणूस आणि विज्ञान या प्रेरणा असणाऱ्या अभयचं काम इतकं बहुपेडी आहे की, त्याचं नुसता अंदाज घ्यायचा झाला तरी आपल्याला दमायला होतं. कोणतंही काम हाती घेण्याच्याआधी त्याविषयी साद्यंत माहिती मिळवायची, त्याबाबतचा वैज्ञानिक दृष्टीकोन तपासायचा आणि शिस्तबद्ध मांडणी कारायची अशी त्याची कामाची शैली आहे. ऐकीव माहिती, ‘लूज टॉक’ला त्याच्याकडे थारा नाही. वैद्यक सेवेतून परिवर्तनाची कास त्यानं धरली, कुपोषणाचा विषय ऐरणीवर आणला, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी त्यानं आंदोलन उभारलं, नंतर धान्यापासून मद्य निर्मिती बंद करण्याची मोहीम त्यानं हाती घेतली, हृदयरोगाविरुद्ध लोकशिक्षण सुरू केलं, अलिकडच्या दहा-बारा वर्षात तरुणांना विधायक दृष्टी देणारं निर्माण हा उपक्रम त्यानं हाती घेतलेला आहे. या ‘निर्माणी’चं जाळं आता राज्यभर पसरलेलं आहे. दोन वर्षापूर्वी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळात हे निर्माणी कोणताही गाजवजा न करता झोकून देऊन काम करताना बघायला मिळाले. शासनाच्या अनेक समित्यांवर अभयला तळमळीनं काम करताना मी बघितलंय. इतकं सगळ करत असून आणि कायम प्रसिद्धीच्या झोतात असून उल्लेखनीय म्हणजे, तो स्वभावानं तुसडा नाही. समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची त्याची संवय अजून तुटलेली नाही. त्याला लिहायला आणि इतरांचं वाचायला आवडतं (मध्यंतरी तो आत्मपर लेखनात मग्न होता. ते काम कुठपर्यंत आलंय त्याबद्दल आमच्यात अशात बोलणं नाही.), त्याला संगीतात रुची आहे. त्याला चक्क गुणगुणतांना मी बघितलंय.

४.

आवर्जून सांगायची एक गोष्ट म्हणजे राणी आणि अभय या दोघांच्याही प्रकट मुलाखती घेण्याची दुर्मीळ संधी एक पत्रकार म्हणून मला मिळालेली आहे. दिल्लीत महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमात राणीशी जाहीर गप्पा मारण्याची संधी मला मिळाली. राणीच्या; म्हणजे तिच्या आणि अभयच्या कामाचा प्रवास ऐकून दिल्लीतील मराठी माणसं भारावून गेली. मुलाखतीचा शेवट करताना मी विचारलं. ‘राणी, तुमचं जगणं वेगळं आहे, पण पती-पत्नी म्हणूनही तुम्ही जगावेगळे आहात का? म्हणजे इतर सर्व पती-पत्नीत होतात तसे तुमच्यात रुसवे-फुगवे, भांडणं होतं की नाही?’ खळाळून हसत राणी उत्तरली, ‘अरे आम्हीही माणसासारखी माणसं आहोत! आमच्यात भांडणं नाही, पण, वाद होतातच की!’

दोन वर्षापूर्वी औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशनच्या कॉलेज ऑफ जर्नालिझम ​अँड मास कम्युनिकेशनच्या एका कार्यक्रमात अभयची प्रकट मुलाखत मी घेतली. नंतर रात्री उशीरापर्यंत अभय, मंगला आणि मी असे आम्ही तिघं आमच्या घरी गप्पा मारत बसलो. आम्ही तीनेक वर्षानी असे निवांत भेटलो होतो. त्यावेळी पुन्हा एकदा अभयमधली कुटुंबवत्सलता अनुभवता आली आणि माणूस म्हणून अभय कधीही उतणार नाही, मातणार नाही याची खात्री पटली. पुरस्कार, सन्मान अभयसाठी नवीन नाहीत.

मला आठवलं, मॅक ऑर्थर फाऊंडेशनचा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी अभयला फोन केला, तेव्हा त्या पुरस्काराच्या सुखद धक्याने मीही खूपसा गहिवरून गेलेलो होतो. डोळ्याच्या कडाही ओलावल्या होत्या. अभयला हे सांगितल्यावर तो म्हणाला, ‘माझीही अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. खरं तर पुरस्कार आणि पैशापेक्षाही जे काही करता आलं आणि त्यामुळे जे मित्र जोडले गेले; ते धन जास्त मोठं आहे...’

२००७मध्ये १ नोव्हेंबरला मला कार्यालयातच हृदयविकाराचा त्रास झाला. वोक्हार्ट या रुग्णालयात दाखल झालो. तेव्हा अभय आणि राणी मुंबईत होते. दोन दिवसांनी एका संध्याकाळी अभयला हे एका कार्यक्रमात कळलं. दुसर्‍या दिवशी सकाळीच तो नागपुरात परतला आणि थेट रूग्णालयात पोहोचला. डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग आले म्हटल्यावर रुग्णालयात साहजिकच सॉलिड हलचल माजली. संबंधित डॉक्टरांकडून सर्व माहिती घेण्यापासून ते नंतर शस्त्रक्रिया होईपर्यंत अभयनं स्वतः लक्ष घातलं. नंतर मंगलाची- माझ्या पत्नीची मरणाच्या दारातून परत आणणारी हृदयाची बायपास झाली. तिच्या हृदयाला आठ ठिकाणी ग्राफ्टिंग करण्यात आलं. त्याही वेळी हाच अनुभव आम्हा उभयतांना आला. त्या दोन्ही प्रसंगात अभय अशा वडिलकीच्या आत्मीयतेनं वागला की, हा केवळ कुपोषितांचा, आदिवासींचाच नव्हे तर मित्रांचाही रक्ताच्या नात्याचा विश्‍वस्त आहे याची डोळे पाणावणारी साक्ष पटली. म्हणून मी नेहेमीच म्हणतो, अभय भेटला की, समाधानाची गर्द सावली पसरलेल्या गावात मुक्कामाला गेल्यासारखं वाटतं.

गेल्या ४० वर्षांच्या पत्रकारितेत जगण्याच्या चंदनी संदुकीत असंख्य ऐवज जमा झालेले आहेत, बंग दाम्पत्य त्यापैकी एक सुगंधी अनमोल ऐवज आहे.

जाता जाता - या मजकुरात अभयविषयी जास्त लिहिलं गेलंय, हे खरंय पण राणी आणि अभय यांना मी एकरूप मानतो!

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......