अजूनकाही
शाळेत असताना जवळजवळ प्रत्येकाला ‘मी मुख्यमंत्री असतो तर’ किंवा ‘शिवाजी महाराज आज असते तर…?’ किंवा ‘आज महात्मा गांधी असते तर’ यासारख्या विषयांवर निबंध लिहावा लागतो. त्या काळी ही एक प्रकारची फॅशनच होती. यात विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव मिळायचा. हाच प्रकार वापरून नाटककार उत्तम गडा यांनी सुमारे दीडतास चालणारं एकपात्री नाटक लिहिलं आहे- ‘कार्ल मार्क्स इन काळबादेवी’.
नाटककार उत्तम गडा यांनी अशी कल्पना केली आहे की, जर्मन तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८ ते १८८३) आज पुन्हा पृथ्वी आला असून मुंबर्इतील काळबादेवी भागातील एका लॉजमध्ये उतरला आहे. आज जागतिक पातळीवर राजकारण, अर्थकारण, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मार्क्सचं नाव माहिती नाही, अशी व्यक्ती असणं शक्यच नाही. भगवान गौतम बुद्धाबद्दल असं म्हणतात की, त्यांनी केलेली मांडणी एवढी अभूतपूर्व होती की, त्यामुळे तत्त्वज्ञानाचे दोन टप्पे करावे लागतात. एक बुद्धपूर्व तत्त्वज्ञान व दुसरा बुद्धोत्तर तत्त्वज्ञान. तसंच आधुनिक काळात मार्क्सबद्दल म्हणतात. मार्क्सच्या मांडणीनंतर ‘मार्क्सपूर्व जग’ आणि ‘मार्क्सोत्तर जग’ असे दोन भाग करावे लागतात.
अशा मार्क्सवर दीडतास चालणारं नाटक लिहिणं हे एक शिवधनुष्य आहे, जे नाटककार उत्तम गडा यांनी लीलया पेललं आहे. हे नाटक म्हणजे पारंपरिक अर्थानं मार्क्सच्या जीवनावरचं नाटक नाही. त्यात आजचे कितीतरी संदर्भ चपखलपणे वापरले आहेत. या नाटकाची भाषा हिंग्लिश (हिंदी अधिक इंग्लिश) असल्यामुळे नाटकाचा प्रेक्षकांशी चटकन संवाद प्रस्थापित करतो.
हे नाटक ‘आयडियाज अनलिमिटेड’ या संस्थेनं सादर केलं आहे. मनोज शहा यांची ही नाट्यसंस्था अशा प्रकारच्या नाटकांबद्दल प्रसिद्ध आहे. आयडियाज अनलिमीटेडतर्फे सादर झालेलं पहिलं नाटक म्हणजे सतीश आळेकरांच्या ‘बेगम बर्वे’चा गुजराती अवतार. आजपर्यंत या नाट्यसंस्थेतर्फे महात्मा गांधीच्या जीवनावरील ‘मोहन नो मसालो’, चंदकात बक्षी या प्रसिद्ध गुजराथी लेखकाच्या जीवनावरील ‘हूं चंद्रकांत बक्षी’ आणि अगदी अलिकडचं ‘डॉ.आनंदीबार्इ’. आता त्यांचं ‘कार्ल मार्क्स इन काळबादेवी’ हे नाटक चर्चेत आहे.
कार्ल मार्क्सला १८८३ साली मृत्युनं गाठलं. एवढा जागतिक कीर्तीचा विद्वान, पण लंडनमध्ये त्याच्या प्रेतयात्रेला डझनभर लोकसुद्धा नव्हते. पण त्यानंतर हाच कार्ल मार्क्स जगभर गेला आणि शोषित, पिडीतांना धीर देत राहिला. त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन लेनिनमध्ये रशियात १९१७ साली क्रांती केली. याच तत्त्वज्ञानाचा आधारे माओनं चीनमध्ये १९४९ मध्ये साम्यवादी क्रांती केली. भारतातील काही भागात नक्षलवादी/ माओवादी जोरात आहे. असा मार्क्स जर २०१८ मध्ये भारतातील मुंबर्इ शहरातील व्यापारी वर्गांची मक्का समजल्या जाणाऱ्या काळबादेवी भागात आला तर काय होर्इल, या कल्पनेनेच मनात थरार निर्माण होतो. प्रत्यक्ष नाटक बघणं हा तर विलक्षण अनुभव ठरतो.
अशी संहिता लिहायला मार्क्सच्या व्यक्तीगत जीवनाची, तेव्हाच्या काळाचे सर्व बारकावे व्यवस्थित माहीत हवेत. उत्तम गडा यांनी या संदर्भातील गृहपाठ व्यवस्थित केलेला आहे. परिणामी या नाटकात मार्क्सची श्रीमंत घरात जन्म घेतलेली पत्नी जेनी येते, मार्क्सची मूलं येतात, दोघांचा गरिबीतला संसार येतो, मार्क्सचा भांडवलदार असलेला मित्र एंगेल्स येतो आणि नाटक उत्तरोत्तर रंगत जातं. अंतर्मुख करतं.
मार्क्सचे जसे निस्सीम चाहते आहेत, तसेच त्याचे कडवे टीकाकारही आहेत. मार्क्सबद्दल भरपुर गैरसमज आहेत. नाटकातील मार्क्स म्हणतो की, मी हे गैरसमज दूर करायलाच आलो आहे. मार्क्सचे सर्वांत जास्त उद्धृत केलेलं वचन म्हणजे ‘धर्म ही अफूची गोळी आहे’. या एका सुट्या वाक्याचा आधार घेऊन मार्क्स धर्मविरोधी होता, त्याला धर्म नष्ट करायचा होता वगैरे प्रचार गेली अनेक दशकं सुरू आहे. एवढंच नव्हे तर याच वाक्याच्या जोरावर सोव्हिएत युनियनमध्ये चर्च, मंदिरं, मशिदींवर बंदी घातली होती. १९९१ साली सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यावर त्याच रशियात चर्चमध्ये जाणाऱ्यांची संख्या अतोनात वाढली. नाटकात मार्क्स म्हणतो की, माझं ते वाक्य प्रत्येक जण स्वतःच्या सोयीसाठी अर्धवट वापरतो. ते पूर्ण वाक्य असं आहे- ’religious suffering is, at one and the same time, the expression of real suffering and a protest against real suffering. Religion is the sigh of the oppressed creature, the heart of heartless world, and soul of the soulless world. It is the opium of the masses.’
मतलबी लोकांनी यातील फक्त ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ एवढाच भाग उचलला. या वाक्याचा आधार घेत अनेक देशांतील साम्यवादी पक्षांनी धर्मविरोधी भूमिका घेतली आणि सत्ता आल्यावर धर्मावर बंदी घातली. ही मार्क्सवादाची थट्टा नाही तर काय आहे? हा प्रकार मार्क्स जीवंत असतानाच सुरू झाला होता. म्हणून एकदा वैतागलेल्या अवस्थेत मार्क्स असा म्हणाला होता- ‘देवा मला या मार्क्सवाद्यांपासून वाचव’.
या नाटकात मार्क्सच्या व्यक्तिगत जीवनातील काही हृदयद्रावक प्रसंग येतात. तरुण मार्क्सला युरोपातील जवळजवळ सर्व देश हाकलून देतात. तो जिथं जार्इल तिथं व्यवस्थेविरुद्ध बंडाची तयारी करत असे. आधी त्याचा देश प्रुशीया (म्हणजे आजचा जर्मनी), मग फ्रान्स, नंतर ब्रुसेल्समधून हकालपट्टी झालेला मार्क्स सरतेशेवटी लंडनमध्ये स्थायिक होतो. त्याला मरेपर्यंत अतिशय गरिबीत जीवन कंठावं लागलं.
मुलांचा हट्ट पुरवणारा मार्क्स, एवढ्या भीषण दारिद्रयातही जगातील गरिबी कशी नष्ट होर्इल याचा विचार करणारा, त्यासाठी लेखन करणारा मार्क्स, जेनीचा नवरा अशा अनेक अवस्थेत आपल्याला सहसा माहिती नसलेला मार्क्स समोर येतो. ही या नाटकाची ताकद आहे.
या नाटकाची बांधणी थोडीशी लोकनाट्यासारखी आहे. परिणामी या नाटकाला त्या अर्थानं बंदिस्त संहिता नाही. या नाटकाच्या संहितेत प्रयोगाच्या दिवशी बदल होतात. म्हणूनच यात आजचे संदर्भ येतात. एका प्रसंगी मार्क्स म्हणतो- ‘माझ्या खिशात एक पैसा नाही. शिवाय तुमच्या देशात तर नुकतीच नोटाबंदी झाली आहे’. नाटकात मार्क्स सतत प्रेक्षकांशी बोलतो. एका प्रसंगी तो प्रेक्षकांना ‘मित्रों’ अशी (मोदींची नक्कल करत) हाक मारतो आणि स्वतःच दचकल्याचा अप्रतिम अभिनय करतो.
नाटकात ‘पॅरिस कम्युन’चा उल्लेख येतो. मार्क्स हळुवार भाषेत प्रेक्षकांना त्या आगळ्यावेगळ्या प्रयोगाबद्दल सांगतो. त्यावरून प्रेक्षकांना अंदाज येतो की, ते एक स्वप्न होतं, जे फक्त दोन महिने प्रत्यक्षात आलं. फ्रान्सचा सम्राट तिसऱ्या नेपोलियनच्या पराभवानंतर पॅरिस शहरावर फक्त दोनच महिने (२८ मार्च ते २८ मे १८७१) नागरिकांच्या समितीचं राज्य होतं. या समितीनं कामगारांच्या हक्कांची घोषणा केली होती. हे सर्व कार्ल मार्क्सच्या तोंडून ऐकताना डोळ्यांच्या कडा ओलावतात.
अशा नाटकांना पारंपरिक पद्धतीचा शेवट नसतो. यात नायक-नायिका यांचं लग्न होत नाही. यात असतो तो बौद्धिक आनंद, विचारांची लढार्इ आणि विचार समोर ठेवून केलेली लढार्इ. परिणामी याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम फार वेगळा होता.
नाटककार उत्तम गडा यांचं मनापासून कौतुक करावंसं वाटतं. त्यांनी सुमारे नव्वद मिनिटं चालणाऱ्या प्रयोगासाठी उत्तम संहिता लिहिली, जी एकाच वेळेस पक्की आहे व लवचीकसुद्धा आहे. दिग्दर्शक मनोज शहा ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. त्यांच्या दिग्दर्शनातील व्यावसायिक सफार्इ पदोपदी दिसून येते. प्रकाशयोजना असिम पाठारे यांची तर पार्श्वसंगीत कानिया यांचं आहे. या दोन नाट्यघटकांव्यतिरिक्त या नाटकात काहीही नाही. आहे तो सत्चित पुराणिक यांचा दर्जेदार अभिनय. त्यांनी मार्क्सची जीवनगाथा अशा काही नाट्यपूर्णरीत्या सादर केली आहे की, आपलं चित्त एक क्षणभरही इकडेतिकडे जात नाही. त्यांच्या ऊर्जेबद्दल काय बोलावं? त्यांची ऊर्जा भोवतालचा परिसर व्यापून घेते.
दर्जेदार वैचारिक नाटक म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर ‘कार्ल मार्क्स इन काळबादेवी’ अवश्य बघितलं पाहिजे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment