अजूनकाही
सध्या तीन चित्रपट गाजतायेत. त्यातला एक हॉलिवुडमधला ‘द पोस्ट’, दुसरा ब्रिटिश चित्रपट ‘द डेथ ऑफ स्टालिन’ आणि तिसरा आपल्या बॉलिवुडमधला ‘पद्मावत’. हे तिन्ही चित्रपट इतिहासाशी संबंधित आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद हा त्या त्या देशातल्या सद्यव्यवस्थेचं प्रतिबिंब दाखवणारा आहे. ‘द पोस्ट’चं अमेरिकेसह सगळ्या जगात कौतुक होतंय. ‘द डेथ ऑफ स्टालिन’ला परवाच रशियानं बंदी घातली आहे आणि ‘पद्मावत’बाबत आपल्याकडे काय चाललंय, हे दिसतंच आहे.
यातला ‘पद्मावत’ हा काही राजकीय भाष्य करणारा इतिहासाधारित चित्रपट आहे, असं नाही. मात्र ‘द पोस्ट’ आणि ‘द डेथ ऑफ स्टालिन’ खऱ्या अर्थानं इतिहासातून भेदकपणे राजकीय व्यवस्थेवर कोरडे ओढणारे चित्रपट आहेत. एक भांडवलशाही अमेरिकेतल्या राजकारणावर टीका करणारा आहे, तर दुसरा साम्यवादी रशियातल्या राजकारणावर. दोन्ही चित्रपटांचं सूत्र समान आहे-सत्ता मिळवण्यासाठीचा आणि ती टिकवण्यासाठीचा राजकारण्यांचा कावेबाजपणा आणि त्यांच्या सत्तासंघर्षात सामान्य जनतेचा जाणारा जीव. शिवाय दोन्ही चित्रपटांचा काळ आसपासचा म्हणता येईल. ‘द पोस्ट’चा काळ हा १९५५ मध्ये सुरु झालेल्या व्हिएतनामयुद्धापासून निक्सन यांच्या १९७०च्या सुमाराच्या अध्यक्षीय कारकिर्दीपर्यंतचा आहे, तर ‘द डेथ ऑफ स्टालिन’चा काळ १९५३मध्ये झालेला स्टालिनचा मृत्यू आणि त्यानंतर ख्रुश्चेव यांनी सता काबीज करण्यापर्यंतचा आहे.
‘द पोस्ट’ हा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वर्तमानपत्राच्या मालक कॅथरीन ग्राहम यांच्या ‘पर्सनल हिस्ट्री’ या पुस्तकावर आधारित आहे, तर ‘द डेथ ऑफ स्टालिन’ हा फ्रेंच लेखक फेबिअन नुरी आणि चित्रकार थिअरी रॉबिन या जोडीच्या फ्रेंच भाषेतल्या चित्रमय पुस्तकावर आधारित आहे.
दोन्ही चित्रपटांच्या विषयाचे सार सारखे असले, तरी ते मांडण्याची त्यांची पद्धत मात्र वेगवेगळी आहे. ‘द पोस्ट’ हा स्टिवन स्पीलबर्गचा चित्रपट थेटपणे आसूड ओढतो, तर ‘द डेथ ऑफ स्टालिन’ हा ब्रिटिश दिग्दर्शक अर्मांडो इयानुची यांचा चित्रपट उपहासातून जळजळीत टीका करतो.
यातल्या ‘द डेथ ऑफ स्टालिन’विषयी अधिक काही. (हा चित्रपट इंग्लंडमध्ये तीन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालाय. हळूहळू इतर ठिकाणी तो प्रदर्शित होतोय. मी राहते त्या बाहरीनमध्ये अलीकडेच प्रदर्शित झाला.) या चित्रपटाचं कथानक नावातूनच सूचित होतं. लाखो लोकांना ठार करणाऱ्या स्टालिनचा मृत्यू, त्यानंतर सुरू झालेला जीवघेणा सत्तासंघर्ष आणि ख्रुश्चेव यांनी योजनाबद्ध पद्धतीनं ताब्यात घेतलेली सत्ता या सत्यघटना दाखवणारा हा चित्रपट आहे.
खरं तर, रशियातलं हे सर्वच राजकारण अंगावर काटा आणणारं आहे. पण चित्रपटात काही ठिकाणी ते विनोदी पद्धतीनं, चिमट्या काढत, खिल्ली उडवत दाखवलंय. पण कोणत्या गोष्टीची खिल्ली उडवायची आणि कोणत्या गोष्टींना गांभीर्यानं दाखवायचं हे चित्रपटकर्त्यांनी पक्कं ठरवेलेलं आहे. सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांना, कणाहीन नेत्यांना विदुषकांसारखे दाखवून त्यांची यात खिल्ली उडवली आहे. त्याचा अंतिम हेतू लोकांवर झालेले अत्याचार, त्यांना ज्या भयग्रस्त परिस्थितीत रोजचा दिवस ढकलावा लागत होता, ते दाखवण्याचा आहे.
चित्रपटाची सुरुवात होते ती कॉन्सर्टनं. रेडिओ मॉस्कोवरत्या कॉन्सर्टचं प्रत्यक्ष प्रक्षेपण चाललंय. मोत्झार्तच्या सिम्फनीचं हे रेडिओवर चाललेलं प्रक्षेपण ऐकून स्टालिन त्याचं रेकॉर्डिंग पाठवण्याचा हुकूम देतो. यानंतर रेडिओचं कामकाज बघणाऱ्या अधिकाऱ्याची धावपळ सुरू होते. कारण कॉन्सर्टचं रेकोर्डिंग केलेलंच नसतं! हे नोकरशाहीच्या कारभाराला साजेसंच... अधिकारी लोकांना पुन्हा आत बोलवायला धावतो. कारण काय तर, टाळ्यांचा आवाज रेकॉर्डिंगमध्ये यायला हवा. स्टालिनच्या दडपशाहीचा यामागे संदर्भ आहे. स्टालिनच्या राजवटीत केजीबीचा लोकांवर कडक पहारा असे. या सर्वशक्तिमान नेत्याचं भाषण संपल्यावर केजीबीला घाबरून लोक टाळ्या वाजवणं थांबवत नसत. त्याचा इतका अतिरेक झाला की, स्टालिन बटन दाबून लोकांना टाळ्या वाजवणं थांबवण्याची सूचना देत असे असं म्हणतात.
अधिकारी धावत येतो तोपर्यंत अर्धेअधिक लोक उठून गेलेले असतात. म्हणून रात्रीच्या वेळी रस्त्यावर सापडतील त्या गरीब लोकांना आत आणून कार्यक्रमाला बसवलं जातं. कॉन्सर्ट पुन्हा सुरू होते. यावेळी कॅमेरा गरीब लोकांवर फिरतो. या लोकांना समोर काय चाललंय याच्याशी काही देणंघेणं नसतं. एक गरीब बाई तिथं बसून स्वेटर विणण्याच्या कामात गुंतलेली असते. केवळ एवढ्या एकाच दृश्यातून साम्यवादी रशियातली विषमता ठळकपणेसमोर येते.
अधिकाऱ्याचं टाळ्या वाजवण्यासाठी लोकांना आणून बसवण्याचं काम मार्गी लागतं, पण दुसरं काम अडून बसतं. पिआनोवादक मारिया स्टालिनचं नाव ऐकल्यावर खवळते. ज्या स्टालिननं माझी जवळची माणसं मारली आहेत, त्याच्यासाठी मी पिआनो वाजवणार नाही, असं ती सांगू लागते. शेवटी दुप्पट पैसे घेऊन ती पिआनो वाजवायला तयार होते. पण तरी ती स्टालिनवरचा आपला राग काढतेच. रेकॉर्डिंगची तबकडी टाकलेल्या पाकिटात ती ऐनवेळी दोन ओळींची चिठ्ठी टाकते, ‘स्टालिन, तू देशाचं वाटोळ केलंय. तुझ्यामुळे मी माझे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी गमावलेत. तू क्रूरकर्मा आहेस.’
ती चिठ्ठी वाचून स्टालिन हसू लागतो अन जमिनीवर कोसळतो. प्रत्यक्ष इतिहासात स्टालिन चित्रपट पाहून परत आल्यावर कोसळतो, एवढाच काय तो फरक. दुसऱ्या दिवशी सकाळी स्टालिन बेशुद्ध पडल्याचं लक्षात येतं आणि मग मंत्री आणि पक्षाच्या केंद्रीय समितीतीले मोजके लोक यांच्या धावपळीला सुरुवात होते. हेही इतिहासाला धरूनच. पण ते चित्रपटात उपहासात्मक पद्धतीनं दाखवलं आहे. स्टालिन बेशुद्ध पडलाय, हे कळल्यावर केंद्रीय समितीतले लोक डॉक्टरांना बोलावण्याचं ठरवतात. पण त्यातली एक व्यावहारिक अडचण त्यांच्या लक्षात येते. स्टालिनच्या हुकुमावरून शहरातले सर्व उत्तम डॉक्टर एकतर मारले गेले आहेत, किंवा लाखो लोकांप्रमाणे त्यांची गुलागच्या श्रमछावण्यांमध्ये आणि सैबेरीयातल्या तुरुंगांमध्ये रवानगी झाली आहे. मग मॉस्कोतल्या सापडतील त्या वृद्ध आणि शिकाऊ डॉक्टरांना एप्रन चढवून आणि त्यांच्या गळ्यात स्टेथेस्कोप अडकवून ट्रकमध्ये कोंबून आणलं जातं.
शेवटी स्टालिनचा मृत्यू होतो अन त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. स्टालिनच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू होते आणि ते करता करता सत्ता मिळवण्यासाठी चाललेल्या चढाओढीचं नाटक सुरू होतं. मोलोन्कोव्हकडे पक्षाचं प्रमुखपद येतं. हा कणाहीन नेता आपली प्रतिमा तयार करण्याच्या तयारीला लागतो. नेत्यांना प्रसिद्धीसाठी प्रतीकात्मक काहीतरी लागतेच. लोकशाहीतही नेते गरिबांचे हात हातात घेतात, लहान मुलांना उचलून घेतात, अलीकडे सेल्फी काढतात. आपली प्रेमळ पित्याची प्रतिमा तयार करण्यासाठी क्रूरकर्मा स्टालिननी लहान मुलीबरोबरचा फोटो प्रसिद्धीसाठी वापरला होता. मोलोन्कोव्हकडे यापेक्षा वेगळे काही शोधण्याची कुवत नसते आणि तेवढा वेळही नसतो. त्याला जनतेसमोर जाताना स्वतःच्या चेहऱ्याची चिंता असते आणि सोबत एक मुलगी न्यायची असते. या धुमाकुळीतही त्याच्या आदेशानं गोड चेहऱ्याची लहान मुलगी शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ चाललेली असते.
या प्रतिमा घडवण्याच्या प्रकाराशी संबंधित पुढं येणारं एक दृश्य राजकीय नेत्यांच्या कुवतीची खिल्ली उडवणारं आहे. शेवटी मोलोन्कोव्ह्लाहवी तशी मुलगी सापडते. मोलोन्कोव्हवर व्हरांड्यात उभा राहून लोकांपुढं येतो. बाजूला महामुश्किलीनं शोधून आणलेली ती लहान मुलगी उभी असते. पण व्हरांड्याच्या उंच कठड्यामुळे ती मुलगी खाली उभ्या असलेल्या जनतेला दिसतच नाही! म्हटलं तर, ही मुलगी म्हणजे नेत्यांच्या लोकांसमोरच्या खोट्या प्रतिमेचं, त्यांनी जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनांचं प्रतीक.
मोलोन्कोव्हची ही वेगळीच धावपळ सुरू असताना तिकडं क्रेमलिनच्या दुसऱ्या भागात बेरिया आणि ख्रुश्चेव्ह यांच्यात सत्ता ताब्यात घेण्यासाठी झुंज सुरू होते. स्टालिननंतर सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असलेला बेरिया मुद्दामच ख्रुश्चेवकडे स्टालिनच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपवतो. त्यातच स्टालिनची मुलगी आणि सततव्होडकाच्या धुंदीत राहणारा त्याचा मुलगा हेही अधूनमधून गोंधळ घालत असतात. स्टालिनच्या मुलाला आपल्या वडलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी भाषण करायचं असतं.
या सर्व गोंधळातच सत्ता मिळवण्यासाठीचं दोन गटातलं राजकारण भरीला येतं. बेरिया वरचढ ठरतोय, असं दिसू लागताच ख्रुश्चेव थंड डोक्यानं योजना आखतो. स्टालिन गेल्यानंतर अंतर्गत कारभार आपल्या हातात घेणाऱ्या बेरीयाला संपवण्याची ती योजना असते. तपशिलात थोडाफार फरक असला तरी वास्तवात तसंच तर घडलंय.
मॉस्को शहरात बाहेरून लोक येऊ नये म्हणून बेरीया वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचा आदेश देतो. ख्रुश्चेव लष्करप्रमुख झुकोवच्या मदतीनं वाहतूक सुरू करतो. स्टालिनचं अंत्यदर्शन घेण्यासाठी लोक मॉस्कोकडे निघतात आणि बेरीयाच्या ताब्यातल्या पोलीस यंत्रणेच्या गोळ्यांना बळी पडतात. याखेळात १५०० सामान्य लोकांचा जीव जातो. शेवटी बेरीयावर अनेक खोटेनाटे आरोप ठेवून त्याचा निर्घृणपणे शेवट केला जातो. प्रत्यक्षातही ख्रुश्चेवनी बेरीयावर अनेक आरोप ठेवून त्याला ठार केलं आणि सत्ता ताब्यात घेतली होती.
हा चित्रपट रशियाच्या इतिहासातल्या एका काळावरचा असला, तरी तो आजच्या रशियावरचाही ठरतो. किंबहुना, या चित्रपटात दाखवलेलं राजकारण रशियापुरतंच मर्यादित नाही. जिथं जिथं लोकशाही संपुष्टात आणून सत्ता बळकावली जाते, जनतेच्या जीवाची पर्वा न करता सत्तेच्या हव्यासापोटी खेळ खेळला जातो, त्या सर्व ठिकाणचं हे चित्र आहे. मग तो तुर्कस्तान असो किंवा उत्तर कोरिया. या चित्रपटाचे दिग्दर्शक अर्मांडो इयानुची यांच्या मते, असं चित्रं आज केवळ रशियातच नाही तर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दिसतंय.
व्यक्तिस्तोम वाढीला लागणारा ‘पोस्ट ट्रुथ’चा हा काळ आहे. म्हणूनच ‘द पोस्ट’ आणि ‘द डेथ ऑफ स्टालिन’सारखे चित्रपट इतिहासाद्वारे त्यातला धोका दाखवतायेत. ‘द पोस्ट’मध्ये आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी वर्तमानपत्र शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात आणि त्यात न्यायालय वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूनं निकाल देतं. स्वतंत्र न्यायव्यवस्थेमुळे लोकशाहीचा विजय होतो. याउलट ‘द डेथ ऑफ स्टालिन’मध्ये न्यायव्यवस्था नावाची बाबच नाही. या चित्रपटाच्या शेवटी दृश्य दिसतं- त्याच मारियाची कॉन्सर्ट चालली आहे. ख्रुश्चेव त्याला उपस्थित आहेत आणि त्यांच्या मागच्या रांगेत बसलेले ब्रेझनेव्ह त्यांच्याकडे रोखून बघतायेत. सत्तेचा त्याच प्रकारचा पुढचा खेळ सुरू होण्याची ती नांदी आहे. यात सामान्य जनतेची अवस्था कवी अनिल म्हणतात तशी, ‘पाहतों हे सर्व आम्ही- साहतों!!’ अशी होते.
हे दोन्ही चित्रपट खऱ्या अर्थानं इतिहासाद्वारे वर्तमानावर भाष्य करणारे चित्रपट आहेत. इतिहासातून काय शिकायचं असतं आणि इतिहासाद्वारे वर्तमान आणि भविष्याकडे कसं बघायचं असतं यावर विचार करायला लावणारे आहेत.
.............................................................................................................................................
लेखिका विशाखा पाटील प्राध्यापक व ग्रंथसंपादक आहेत.
pvishakha@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment