डंकर्क : पराभवाची शौर्यगाथा
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
पवन नंदकिशोर गंगावणे
  • ‘डंकर्क’चं एक पोस्टर
  • Sat , 03 February 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा English Movie डंकर्क Dunkirk ख्रिस्तोफर नोलन Christopher Nolan

(Spoiler warning : सिनेमा बघितलेला नसल्यास आपल्या जबाबदारीवर पुढील लेख वाचावा.)

युद्धपट म्हटलं की, आपल्याला आठवतात प्राणपणाला लावून लढणारे सैनिक. शूर, कधीही माघार न घेणारे, आपल्या देशाचं रक्षण करणारे, प्रतिकूल परिस्थितीतही शौर्य दाखवून युद्ध जिंकणारे. पण शत्रूला धूळ चारून युद्ध जिंकणे हाच विजय असतो का? तर उत्तर आहे हो, कारण सगळ्या महान गाथा आणि सिनेमे हेच शिकवतात की, योद्धा कसे आपल्या मातृभूमीचे रक्षण करतात. परंतु यापलीकडेही एक प्रकारचा विजय असतो, शत्रूच्या तावडीतून सुटण्याचा. कारण बऱ्याच युद्धातील विजय-पराजयाला त्या-त्या वेळची परिस्थितीसुद्धा कारणीभूत असते. जो जिंकतो तोच नेहमी शूर असतो असे नाही. जो युद्ध हरलेला असतो, कदाचित तोही जर परिस्थिती अनुकूल असती तर जिंकू शकला असता. यामुळे पुढचं युद्ध लढण्यासाठी आज जिवंत राहणं खूप महत्त्वपूर्ण बनतं. याच कारणाने बऱ्याच राजांनी प्रतिकूल वेळी माघार घेऊन नंतर कधीतरी आक्रमण केल्याच्या अनेक नोंदी इतिहासात मिळतात.

इ.पू. ३३८ मध्ये अथेनियन्स आणि मासेडोनियन्समध्ये युद्ध झालं होतं. या युद्धात मासेडोनियन्सनी विजय प्राप्त करून ३००० अथेनियन सैनिकांचा नरसंहार केला होता. डेमोस्थेनॉस जो की, अथेनियन सैनिकांच्या पायदळातील एक सैनिक तसेच प्रवक्ता होता, रणांगणातून पळून आला होता. आपल्या राज्यात परतल्यावर जेव्हा त्याला लोकांनी ‘पळपुटा’ म्हटले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, "The man who runs away may fight again." म्हणजे जी व्यक्ती पळून जाते ती पुन्हा एकदा लढू शकते. याच वाक्याचं रूपांतर पुढे "He who fights and runs away will live to fight another day," या प्रसिद्ध म्हणीत झालं. रणांगणात मरणं ही जरी बऱ्याच सभ्यतांमध्ये शौर्याची बाब समजली जाते, तरी ती फारशी प्रॅक्टिकल नाही. कारण युद्ध ही सैन्याच्या बळावर जिंकली जातात आणि ती युद्ध जिंकण्यासाठी सैनिकांचं जिवंत राहणं आवश्यक असतं. जेव्हा शत्रू तुम्हाला चारही बाजूंनी वेढतात, तेव्हा मृत्यूची वाट पाहत बसण्यापेक्षा तिथून जीव वाचवून पळून जाणं कधीही बेहत्तर. कारण 'जिंदा रहेंगे तो और भी लड़ेंगे', याच धर्तीवर बनवला गेला आहे क्रिस्टोफर नोलनचा 'डंकर्क'.

सप्टेंबर १९३९ ला जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं. प्रत्युत्तरात फ्रान्स आणि ब्रिटिशांनी जर्मनीवर हल्ला करत दुसऱ्या विश्वयुद्धाचा बिगुल वाजवला. ब्रिटिश सैन्याला फ्रान्सची मदत करण्यासाठी पाठवण्यात आलं आणि या दोन्ही देशांनी मिळून ऑक्टोबर १९३९ ते एप्रिल १९४० दरम्यान जर्मनीशी युद्ध केलं. याच कालावधीत जर्मनीनं बेल्जियम आणि नेदरलँड्सवर विजय मिळवून फ्रान्सवर संपूर्ण ताकदीनं हल्ला चढवला आणि फ्रान्स-ब्रिटिश सैन्याला मागे ढकलत इंग्लिश चॅनलपर्यंत आणलं. चार लाख सैनिक डंकर्कच्या तटावर अडकले, जिथं त्यांच्यासमोर होता अथांग समुद्र आणि मागे होते विशाल असं दिसणारं जर्मनीचं सैन्य. फ्रेंच सैन्यानं एक अभेद्य भिंत बनवून जर्मन सैनिकांना अडवून ठेवलं. पण ते जास्त वेळ थांबवलं जाणार नव्हतं. ब्रिटिश सैनिकांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी जर्मनीचं सैन्य त्यांच्यावर विमानातून पॅम्पलेट्स फेकायचे, ज्यात डंकर्कचा नकाशा असायचा आणि कसं जर्मनीनं ब्रिटिश सैन्याला वेढलंय याच चित्र दाखवून 'We surround you' (आम्ही तुम्हाला वेढलंय) हे लिहिलेलं असायचं.

एकीकडे सतत होणारे हवाईहल्ले ज्यात मदतीसाठी येणारं प्रत्येक जहाजावर जर्मन विमानं हल्ला करून बुडवून टाकायचं, तर दुसरीकडे क्षणोक्षणी पुढे सरकत असलेलं जर्मनीचं पायदळ. एकीकडे आग आणि एकीकडे फुफाटा, अशी स्थिती झालेल्या या सैनिकांकडे पळायला किंवा लपायला जागाच नव्हती. या बिकट परिस्थितीत अडकलेल्या या चार लाख सैनिकांना अपेक्षा होती एका चमत्काराची. कारण या स्थितीतून त्यांना फक्त एखादा चमत्कारच वाचवू शकत होता. 

क्रिस्टोफर नोलननं फारच कमी काळात ‘मेमेंटो’, ‘द डार्क नाईट’ चित्रत्रयी, ‘इनसेप्शन’, ‘इन्टरस्टेलर’ असे महत्त्वाकांक्षी सिनेमे बनवून हॉलिवुडमध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान बनवलंय. क्रिस्टोफर नोलन हे नाव त्याच्या चाहत्यांच्या गळ्यातलं ताईत बनलंय. नोलनच्या पुढच्या सिनेम्याची वाट चाहते जागतिक स्तरावर पाहत असतात. नेहमी थ्रिलर आणि साय-फाय सिनेम्यांकडे कल असलेल्या नोलननं जेव्हा युद्धपटाची घोषणा केली, तेव्हा बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसला की, या कथेत नोलनला प्रयोग करायला स्कोप मिळेल का? पण युद्धपटाच्या फॉरमॅटमध्येही नोलननं त्याची प्रयोगशीलता कायम ठेवत ‘डंकर्क’च्या रूपानं एक आगळावेगळा युद्धपट आपल्यासमोर आणला. ‘डंकर्क’मध्ये एक प्रयोग प्रामुख्यानं पाहायला मिळतो आणि तो म्हणजे सायलन्सचा वापर. सिनेम्यात संवाद खूप कमी आहेत. दृश्यांवर स्टोरीटेलिंगचा भार दिलेला आहे.

कथेची सुरुवात टॉमी (फियॉन व्हाईटहेड) पासून होते, जो गोळीबारातून वाचून डंकर्कच्या तटावर येऊन पोचतो. तिथं त्याला दुसरा एक सैनिक भेटतो (अनेरीन बर्नार्ड). दोघांमध्ये एका शब्दाचंही संभाषण होत नाही, पण  ते एकमेकांना सहाय्य करून जमेल त्या मार्गे जहाजावर चढण्याचा प्रयत्न करतात. बहुतेक सर्वच युद्धपटांमध्ये सैनिक एकत्र जमून, शेकोटीसमोर गप्पा करताना त्यांच्या घरची पार्श्वभूमी सांगतात की, त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलं आहेत किंवा आई आणि प्रेयसी आहे. जेणेकरून आपल्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि ते सुरक्षित घरी पोचावेत, या आशेनं आपण त्यांचा प्रवास बघतो.

इथं येतो ‘डंकर्क’मधील दुसरा प्रयोग, तटस्थपणाचा. इथं आपल्याला कुठल्याही पात्राची बॅकस्टोरी दिली जात नाही. कोण कुठून आलाय, त्याच्या घरी कोण वाट पाहतंय, तो या युद्धात डंकर्कपर्यंत कसा येऊन पोचला हे तर सांगितलं जात नाहीच, पण काही मोजकी पात्रं वगळता आपल्याला सगळ्या पात्रांची नावं सुद्धा सांगितली जात नाहीत. यामुळे आपण या पात्रांशी भावनिक स्तरावर जोडले जात नाही आणि तटस्थपणे काही अनोळखी लोकांची जीव वाचवण्यासाठीची धडपड पाहू लागतो. कसे हे सैनिक रक्षाजहाजांवर चढण्याचा अपयशी तर कधी यशस्वी प्रयत्न करतात आणि नियती त्यांना पुनःपुन्हा डंकर्कच्या तटावर आणून सोडते. काही वेळानंतर तर तो तट आपल्यालाही एक नकोशी असलेली, दळभद्री जागा वाटायला लागते, जी मूकपणे या सैनिकांना गिळंकृत करत आहे.

प्रत्येक वेळी जेव्हा एखादं पात्र नाईलाजानं त्या तटावर पोचतं, तेव्हा प्रेक्षकाचं मन तुटायला लागतं. तटस्थपणे सिनेमा बघतानाही ही पात्रं सुरक्षित घरी पोचावीत ही भावना जेव्हा डोकं वर काढायला लागते, तेव्हा अजाणतेपणी आपल्यालाच आपल्यातील माणुसकी जाणवते. आपण एका अनोळखी माणसाप्रती करूणाभाव दाखवतो. आणि हीच गोष्ट खूप महत्त्वाची वाटते.

क्रिस्टोफर नोलनला वेळेशी खेळण्याचा खूप शौक आहे. जो आपण त्याच्या ‘मेमेंटो’, ‘इन्सेप्शन’ आणि ‘इन्टरस्टेलर’ या सिनेमात याआधी पाहिलाय. घटनांच्या उलटक्रमानं जाणारा ‘मेमेंटो’ असो, किंवा एकाच वेळी वेगवेगळ्या स्वप्नांच्या जगातील ‘इनसेप्शन’ असो की, वेळेला एका माळेत बांधणारा ‘इन्टरस्टेलर’ असो, या सगळ्या सिनेमांत वेळ या संकल्पनेचा नोलननं मोठ्या खुबीनं वापर केला आहे. तसं पाहता वेळेचा युद्धपटाच्या कथेत वापर करणं ही काहीशी विचित्र कल्पना वाटते, पण नोलननं त्याच्या लेखनशैलीतून या सिनेम्याला तीन भागात विभागलं आहे - १. जमीन (The mole), २. समुद्र (Sea) आणि ३. हवा (Air).

समुद्रातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी तटाच्या नजीक एक बंधारा बांधला जातो, ज्याला मोल म्हणतात. मोलचा वापर जहाजांना तटाजवळ आणण्यासाठी केला जातो. हे सगळे सैनिक या तटावर येऊन अडकतात आणि तिथून सुखरूप निघण्याचा प्रयत्न करतात हे मोलचं कथानक. जे एका आठवड्यात घडलेलं असतं.

दुसरीकडे वेमाऊथच्या (Weymouth) किनाऱ्यावर नौदलाचे अधिकारी मच्छिमारांच्या लहान बोटी, यॉटस् घेत आहेत, जेणेकरून डंकर्कच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन सैनिकांना वाचवण्यात येईल. इथं मिस्टर डॉसन (मार्क रायलन्स) नावाचे वयस्क गृहस्थ त्यांचा मुलगा पीटर (टॉम ग्लिन-कार्णे) आणि त्याच्या मित्र हॅरी (बॅरी कोघन) सोबत स्वतःच या प्रवासावर निघतात. हे कथानक एका दिवसात घडतं. तर तिसरीकडे तीन स्पिटफायर वैमानिक ब्रिटिश सैनिकांचं जर्मन हवाईहल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी उड्डाण करून फ्रान्सकडे निघालेत. हे कथानक एका तासात घडतं.

डंकर्क आलटूनपालटून आपल्याला या तीनही कथा दाखवत राहतो. लक्ष देऊन पाहिल्यास बऱ्याचदा एका टाईमलाईनमधील पात्र/घटना दुसऱ्या टाईमलाईनमध्ये पाहायला मिळतात आणि शेवटी एका उत्कंठावर्धक शेवटात या तिन्ही कथा एकत्र येतात. बऱ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न पडला होता की, सिनेमा सरळ ज्या क्रमानं घटना घडतात तसा का नाही दाखवला गेला? हा फक्त नोलनचा वेळेशी पुन्हा एकदा खेळण्याचा अट्टाहास होता का? करता येतं म्हणून काहीही करायचं का? तर यालाही एक तर्क आहे, जो आहे डंकर्कमधील पुढचा प्रयोग, तो म्हणजे दृष्टिकोन. वेगवेगळ्या घटना प्रत्येक व्यक्ती त्याच्या दृष्टिकोनानं पाहतो आणि त्यामुळे प्रत्येक घटनेवरील प्रतिक्रिया ही व्यक्तीसापेक्ष असते. पीटरला त्यानं आणि त्याच्या वडिलांनी वाचवलेला सैनिक (किलीयन मर्फी) पळपुटा वाटतो. कारण तो प्रखरपणे डंकर्कला पुन्हा जाण्यास नकार देतो. पण तो कोणकोणत्या गोष्टींना सामोरा जाऊन असा भित्रा झालाय याची कल्पना पीटरला नसते. कॉलेन्सचं (जॅक लॉवडन) विमान पाण्यात पडते तेव्हा त्याचा सहकारी फॅरियरला (टॉम हार्डी) वाटतं की, कॉलेन्स त्यातून बचावलाय पण वस्तुस्थितीत कॉलेन्स पाण्यात बुडत असतो. तटावरील सैनिकांना याची कल्पना नसते की, त्यांच्यासाठी विन्स्टन चर्चिलनं एवढी मोठी बचाव मोहीम सुरू केली आहे. त्यांना वाटत असतं की आपल्या देशानं आपल्याला टाकून दिलंय, मरायला सोडलंय. पण वास्तविक पाहता डॉसन आणि फॅरियर स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांना वाचवायला निघालेले असतात.

शेवटी एक सैनिक कॉलेन्सला विचारतो की "आम्ही मरत असताना तुम्ही कुठे होतात?" पण त्याला मात्र त्या दिवशी कॉलेन्सनं शत्रूंची किती विमानं हाणून पाडली होती याची पुसटशी कल्पनादेखील नव्हती. हे युद्ध मानसिक, शारीरिक, राजनैतिक, जमीन, पाणी, हवा अशा अनेक स्तरावर लढलं जात होतं आणि ते चालू असताना प्रत्येक घटना विविध व्यक्तींवर काय परिणाम करते, हे दाखवण्यासाठी कथानक तीन भागात विभागलं गेलं आहे.

शेलशॉक होऊन घाबरट बनलेला सैनिक हे पात्र हे सिनेमात एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. असंच एक पात्र नोलनच्या ‘इन्टरस्टेलर’मध्ये होतं ज्याचं नाव होतं डॉक्टर मॅन. तोही दुरून पाहिल्यास अत्यंत घाबरट आणि स्वार्थी वाटतो, पण स्वतःला त्याच्या जागी ठेवल्यावर जाणवतं की, आपणही तेच केलं असतं. टॉमी आणि गिब्सन सतत तटावरून पळण्याचा प्रयत्न करताहेत, परंतु किलीयन मर्फीचं पात्र कदाचित हे सगळं आधीच करून बसलाय. त्यावर इतके हल्ले झालेले आहेत की, आता त्याला त्याच्या बांधवांना वाचवण्यासाठीही डंकर्कला परत जायचं नाहीये. यातून स्वबचावाची भावना दिसून येते, तसंच युद्ध व त्याचे भीषण मानसिक परिणाम दिसून येतात. व्हिएतनाम युद्धातून परतलेल्या अनेक सैनिकांना नंतर सामान्य जीवन जगता आलं नाही. कारण त्या युद्धात जे काही त्यांनी पाहिलं, सोसलं होतं, त्यानं त्यांना पार हादरून सोडलं होतं. असंच काहीसं या सैनिकांसोबतही झालं असणार. 

स्पीटफायर वैमानिक फॅरियर (टॉम हार्डी) मला सिनेमातील सर्वांत महत्त्वाचं पात्र वाटतं. उड्डाण करतानाच त्यांना बेसकडून आदेश मिळालेले असतात की, परतीसाठी इंधन वाचवून ठेवा. पण पहिल्याच हल्ल्यात त्यांचा फॉरटीस लीडर (नोलनच्या आवडत्या मायकल केन यांचा आवाज) मारला जातो. आणि फॅरियर जो की सेकंड इन कमांड असतो, त्याला या सगळ्या मिशनची जबाबदारी घ्यावी लागते. याच हल्ल्यात फॅरियरच्या विमानाचं फ्युल गेज तुटतं. त्याचं अर्धेअधिक इंधन गळून जातं, पण तो त्याच्या सहकाऱ्याला याची जाणीव न होऊ देता मिशन चालू ठेवतो. जेव्हा कॉलेन्सच्या मागे एक शत्रू विमान लागते, तेव्हा तो "He's on me."(तो माझ्या मागे लागलाय.) म्हणतो तर प्रत्युत्तरात फॅरियर "I'm on him." (पण आता मी त्याला संपवेन) असं म्हणून जेव्हा त्याची शत्रूला हाणून पाडण्याची शूर वृत्ती दाखवतो, तेव्हा अंगावर शहारे येतात.

शेवटी बरीच विमानं पाडून फॅरियर बेसकडे जायला निघतो, पण आपल्या सैनिकांचे जात असलेले नाहक बळी पाहून त्याचा पाय घराकडे ओढावत नाही. त्याला जाणवतं की, तो जर परतला तर अनेक बळी जातील आणि तो त्याचा निर्णय बदलून अत्युच्च शौर्य आणि त्यागाचं प्रदर्शन करतो. निर्विकार चेहरा व आवाज ठेवूनही टॉम हार्डीचा फॅरियर खूप काही बोलून जातो. आणि सिनेमा संपल्याच्या बऱ्याच दिवसानंतरही तुमच्या डोक्यातून जात नाही.

आपल्या सैनिकांसाठी धावून जाणारा डॉसन असो की, स्वतःच्या सैन्याचे हाल पाहून अस्वस्थ झालेला रॉयल नेव्ही कमांडर बोल्टन (केनेथ ब्रनाघ) असो, जो सगळे सैन्य बचावलं गेल्यानंतरच तट सोडायचा निर्णय घेतो. डंकर्क अशा शूर पात्रांनी भरलेला आहे जे छोट्या-मोठ्या प्रमाणात आपापल्या परीनं शौर्य दाखवतात आणि या बचावकार्यास हातभार लावतात.

व्हीएफएक्स आणि ग्रीन स्क्रीन्सचा तिटकारा असलेल्या क्रिस्टोफर नोलननं इथंही त्याची परंपरा कायम ठेवून बहुतेक इफेक्ट्स प्रॅक्टिकलच ठेवलेत. शूटिंग एखाद्या स्टुडिओत न करता जिथं ही घटना घडली होती, त्याच डंकर्कच्या तटावर केली आहे. कथेत प्रमाणीकरण आणण्यासाठी दुसऱ्या विश्वयुद्धात वापरल्या गेलेल्या खऱ्याखुऱ्या विमान आणि जहाजांचा वापर केलाय. सैनिकांची गर्दी दाखवण्यासाठी आफ्टरइफेक्ट्स न वापरता एरिअल शॉट्समध्ये चक्क पुठ्ठयाचे कटआऊट्स उभे केलेत. २०१७ साली जिथं भारतातही दर छोट्या-मोठ्या दृश्यासाठी सर्रासपणे व्हीएफएक्सचा वापर होतो, तिथं हॉलिवुडचा इतका मोठा दिग्दर्शक व्हीएफएक्स टाळतो, ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. होयते वॅन होयतेमा यांची सिनेमाटोग्राफी नितांत सुंदर झालीये. ९० टक्के सिनेमा हा आयमॅक्स कॅमेऱ्यावर शूट केला गेलाय. हवाई दृश्यं चित्रित करण्यासाठी विमानावर कॅमेरे बसवण्यात आले होते आणि जेव्हा समुद्रावरील एरियल शॉट्स मोठ्या पडद्यावर येतात, तेव्हा छातीत धडकी भरते. शेवटच्या मॉनटाजमध्ये टॉम हार्डीच्या विमानाची केलेली सिनेमाटोग्राफी तर निव्वळ अतुल्य आहे.

जर्मन म्युझिक कम्पोजर हान्स झिमर यांनी २००५ साली बॅटमॅन बिगिन्ससाठी पहिल्यांदाच क्रिस्टोफर नोलनसाठी बॅकग्राऊंड म्युजिक कम्पोज केलं होतं. तिथून पुढे नोलनच्या सर्वच सिनेमांना संगीत झिमरनेच दिलं. नोलनला नेहमीच झिमरला कलात्मक आव्हान देण्यात आनंद मिळतो. ‘इन्टरस्टेलर’ची मेन थीम तयार करण्यासाठी नोलननं कथा न सांगता एका लिफाफ्यात फक्त 'मुलगी आणि वडिलांची भावनिक कथा', 'वैज्ञानिक संशोधन', 'मनुष्यजातीची झेप' असे काही मुद्दे लिहून पाठवले आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं झिमरनं एक ट्यून तयार केली, जी इंटरस्टेलरची मुख्य थीम बनली.

‘डंकर्क’ची सगळी पात्रं संकटात आहेत. प्रत्येक क्षणाला शत्रू पुढे सरकत आहे आणि जितका जास्त वेळ हे सैनिकं त्या तटावर थांबतील तितका त्यांचा जीव जाण्याचा धोका जास्त आहे. म्हणून इथली मुख्य थीम 'Race against time' वेळेसोबत लागलेली शर्यत, ही होती. नोलननं त्यांचा हा दृष्टिकोन झिमरला सांगितला. ११ ट्रॅक्स असलेल्या या साउंड ट्रॅकमधील प्रत्येक ट्रॅकमध्ये घड्याळीच्या टिकटिकचा आवाज आपल्याला ऐकू येतो, जो निवांत क्षणी हळुवारपणे तर धोक्याच्या क्षणी पटपट वाजून आपल्याला संकटाचा आभास करून देतो. ती घड्याळीची टिकटिक झिमरनं नोलनच्या पॉकेट वॉचमधून रेकॉर्ड केलीये.

या सिनेमातील ५० टक्के परिणामकारकता ही नुसती झिमरच्या स्कोरमधून येते. हा बॅकग्राऊंड स्कोअर सतत वातावरण तणावपूर्ण ठेवतो. जर बसल्या ठिकाणी, काहीही न करता तुमचा रक्तदाब वाढवायचा असेल तर या अल्बममधील 'ऑइल' ही थीम ऐका. जर स्फूर्ती मिळवायची असेल तर 'सुपरमरीन' ही थीम ऐका. हान्स झिमरचा हा स्कोर कथानकाचाच एक भाग बनून आपल्यासमोर येतो. हीच गोष्ट साउंड एडिटिंग बाबतही म्हणता येईल. पूर्ण सिनेमात आपल्याला कधीच शत्रूचा चेहरा पाहायला मिळत नाही. पण साउंडएडिटिंगमधून तो कधी विमानाच्या, कधी बॉम्बच्या स्वरूपात सतत जाणवत राहतो. जसं काही एखादं गिधाड आकाशात घिरट्या मारतंय. 

नुकत्याच पंतप्रधान पदावर विराजमान झालेल्या विन्स्टन चर्चिल यांच्यावर आपल्या सैनिकांना सोडवण्याची जबाबदारी येऊन पडली होती. डंकर्कच्या उथळ तटापर्यंत मिलिटरीची जहाजं पोचत नव्हती आणि मोलवर ती पोचलीच तरी जर्मन एअरफोर्स त्यांवर बॉम्बहल्ले करत होती. अशा वेळी जेव्हा सैनिक घरी पोचू शकत नव्हते, तेव्हा घर त्यांच्यासाठी धावून आलं. चर्चिल यांनी आपलं बुद्धीचातुर्य वापरून ऑपरेशन डायनॅमो सुरू केलं, ज्यात नेव्हीनं सामान्य जनतेच्या बोटी वापरून डंकर्कवरून आपलं सैन्य सोडवून आणलं. ज्यात शेकडो नागरिकांनीसुद्धा आपला सहभाग नोंदवला.

हे युद्ध चालू असताना हिटलरने अचानक २२ मे १९४० ला डनकर्कवरील सर्व मिलिटरी कार्यवाया थांबवण्याचा आदेश दिला. हिटलरनं हॉल्टचा आदेश का जारी केला होता, हे आजतागायत एक रहस्य आहे. कदाचित हा इंग्लंडकडे मैत्रीचा हात पसरवण्याचा एक प्रयत्न होता. पण हा प्रश्न मात्र नेहमीसाठी अनुत्तरित राहील. हिटलरच्या हॉल्टमुळे २६ मे ते ४ जून १९४० या कालावधीत ऑपरेशन डायनॅमो यशस्वीरित्या पार पडले आणि ८०० बोटींच्या मदतीनं ३३८,२२६ सैनिकांना वाचवण्यात ब्रिटिश नेव्हीला यश मिळालं. अशा प्रकारची ही एकच बचावमोहीम होती. तिथं अक्षरशः 'मृत्यूच्या तावडीतून सुटून येणं' हा वाक्प्रचार सत्यात उतरवला गेला होता. म्हणूनच Dunkirk Evacuation ला Miracle of Dunkirk (‘डंकर्क’चा चमत्कार) म्हणून संबोधलं जातं.  ‎

सिनेमा पाहिल्यावर बऱ्याच जणांनी म्हटलं की, सिनेमा भावनिक आवाहन करत नाही किंवा सिनेमा अचानक सुरू होतो आणि अचानक संपून जातो. कारण Dunkirk evacuation नंतर युद्ध सुरूच होतं. हो, युद्ध तर या घटनेच्या आधी आणि नंतरही सुरूच होतं. पण हा सिनेमा या घटनेबद्दल आहे. ‘डंकर्क’चं कथानक आहे एका भयावह परिस्थितीतून काही धाडसी लोक कसे हिंमत न हारता बाहेर पडतात, म्हणून ना आपल्याला त्याआधीच्या घटना दाखवल्या जातात ना त्यानंतरच्या. तसं पाहता डंकर्कची बचावमोहीम हे एक प्रचंड अपयशच होतं. पण ते ब्रिटिश सैन्याला आणि परिणामी इंग्लंड आणि फ्रान्सला हिंमत आणि धाडसाचा नवा चेहरा देऊन गेली. इथूनच दुसऱ्या महायुद्धानं कायमची कलाटणी घेतली असं बऱ्याच इतिहासकारांचं मत आहे. 

डंकर्कहून जेव्हा सैनिक घरी परततात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड शरम होती. युद्धासाठी गेलेल्या सैनिकाला तिथून पळून यावं लागणं, यापेक्षा दुसरी नामुष्की जगात नाही. माना खाली घालून, चेहरा लटकवून हे सैनिक घरी परततात. कारण त्यांना वाटत असतं की, आपण आपल्या देशाचं नाव खराब केलंय. शेवटी चहा व ब्लँकेट वाटत असलेला म्हातारा नजरेला नजर देत नाही, खाली नजर ठेवून निमूटपणे ब्लँकेट देतो, हे बघून अॅलेक्स मरून खच होतो. तो वृत्तपत्र वाचायलाही नकार देतो. कारण त्याला वाटत असतं की, त्यात त्यांच्यासाठी शिव्याशापच लिहिलेले असतील. पण त्याच्यामागून आलेल्या टॉमीला मात्र हे दिसतं की, ती ब्लँकेट वाटणारा व्यक्ती अंध होती. म्हणून नजरेला नजर देऊ शकत नव्हता आणि जेव्हा तो अंध व्यक्ती टॉमीला म्हणतो, "तुम्ही चांगली कामगिरी बजावलीत." तेव्हा टॉमी म्हणतो, "आम्ही तर फक्त...जीव वाचवून परत आलोय." यावर अंध व्यक्तीचं एक समर्पक उत्तर असतं, "...आणि ते पुरेसं आहे." वृत्तपत्रातही प्रधानमंत्री चर्चिल यांच्या स्टेटमेंटमध्ये सैनिकांच्या धैर्याची स्तुती केलेली असते.

इथं पुन्हा दृष्टीकोनाची किमया दिसून येते की, जसं आपल्याला वाटतं तसं नेहमीच नसतं. चर्चिल यांच्या प्रसिद्ध स्टेटमेंटमधील "विजय हेच आपलं ध्येय आहे, मग रस्ता कितीही लांब किंवा कठीण असो." याच स्टेटमेंटमधील "We shall go on to the end. We shall fight in France, we shall fight on the seas and oceans, we shall fight with growing confidence and growing strength in the air, we shall defend our island, whatever the cost may be. We shall fight on the beaches, we shall fight on the landing grounds, we shall fight in the fields and in the streets, we shall fight in the hills; we shall never surrender." (आम्ही कधीच समर्पण करणार नाही) या ओळी नेहमीसाठी अमर झाल्या आणि इथूनच 'डंकर्क स्पिरिट' ही संज्ञा प्रचारात आली.

‘डंकर्क’चा शेवटचा मोन्टाज हा इतका प्रभावी आहे, जणू काही हे एखादं काव्य आहे! शेवटी जेव्हा डोळे अश्रूंनी भरून जातात, तेव्हा आपल्याला या कथेतील सुंदरता खऱ्या अर्थानं जाणवते. या पराभवानं इंग्लडला इतकं काही शिकवलं, जितकं हजार विजयांनी सुद्धा शिकवलं नसेल. परिस्थिती कितीही बिकट असली तरी गुडघे टेकवायचे नाहीत, ही शूर प्रवृत्ती इथून जन्माला आली. डंकर्कची घटना ही पराभवाची शौर्यगाथा आहे. आणि त्यामुळे ही घटना आणि हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आणि आवर्जून पहावा असा आहे.

.............................................................................................................................................

लेखक पवन नंदकिशोर गंगावणे चित्रपट अभ्यासक आहेत.

g.pavan018@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Yogesh Deore

Mon , 05 February 2018

सिनेमा पाहिलेला नसताना स्वतःच्या जबाबदारीवर लेख वाचला. खूप छान प्रकारे लिहले आहे. शूरवीरता, योध्या, पराक्रम ह्या संज्ञा आपल्याकडे अतिरंजित केल्या आहेत. त्याला डंकर्क छेद तर देतोच पण विजय कसा असू शकतो ह्याविषयी नवीन प्रकाश टाकतो. कारण ते युद्ध जर्मनी हारली होती. लेख वाचताना सिनेमा पाहिला नाही म्हणून खेद वाटत नाही कारण लेख क्रमाक्रमाने व्यवस्थित लिहला आहे. आणि लेखाचे मांडण्याचे कौशल्य सुंदर आहे. thanks, Pawan.


Nandkishor Gangawane

Sat , 03 February 2018

Superb. Very nice review by Pavan Gangawane. I have already seen this movie, but I got huge information bt the review. Well-done Pavan ji, you are doing well and enjoying your writing skill and I feel a professional writer within you.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख