अजूनकाही
माजी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी त्यांच्या 'नायदर अ हॉक, नॉर अ डव' या पुस्तकात उल्लेख असलेली एक घटना. कसुरी याना हा किस्सा तत्कालीन नवाज शरीफ प्रशासनात मोठे अधिकारी असणाऱ्या सईद मेहदी यांच्याकडून कळाली. कारगीलमध्ये पाकिस्तानी घुसखोर आल्याची आणि रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी शिखरं त्यांनी व्यापल्याची बातमी कळताच वाजपेयी उद्विग्न झाले. आपण दोन देशांदरम्यान शांतता निर्माण करण्यासाठी एवढे प्रयत्न करत असताना पाकिस्तानने आपल्या पाठीत खंजीर खुपसला अशी त्यांची भावना झाली. या उद्विग्न मन:स्थितीत त्यांनी नवाझ शरीफ यांना फोन केला. जेव्हा वाजपेयींनी शरीफ यांना फोन केला, तेव्हा सईद मेहदी त्यांच्या समोरच बसले होते. फोनवर वाजपेयींनी पाकिस्तानच्या विश्वासघातकी कृत्याचा तीव्र निषेध केला. परवेज मुशर्रफ यांनी शरीफ यांना अंधारात ठेवून ही घुसखोरी केली असल्याने शरीफ यांना पण धक्का बसला.
इतक्यात वाजपेयींनी शरीफ यांना विनंती केली की, मी एका व्यक्तीकडे फोन देत आहे तरी तुम्ही त्यांच्याशी पण बोला. समोरून जो आवाज आला तो एकून शरीफ यांना दुसरा धक्का बसला. फोनवर त्यांचे लाडके अभिनेते दिलीप कुमार होते. दिलीप कुमार म्हणाले, “मियां साहेब, हे तुम्ही काय करत आहात? आम्ही तर तुम्हाला शांतता प्रक्रियेचे समर्थक समजतो? तुम्ही जे काही करत आहात त्याचे गंभीर परिणाम भारतीय मुसलमानांवर होतील. तरी तुम्ही लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणा.”
कसुरी यांच्या मते पाकिस्तानच्या लोकनियुक्त पंतप्रधानाला कारगील युद्धाचं गांभीर्य कळलं वाजपेयी आणि दिलीप कुमार यांच्यासोबत झालेल्या या संभाषणानंतर. बॉलिवुड आणि क्रिकेट यांचं भारत-पाकिस्तान संबंधांत एक महत्त्व आहेच. ते कुणीही नाकारलं तरी वस्तुस्थिती याचीच निदर्शक आहे.
बॉलिवुडची पाकिस्तानमध्ये असणारी निर्विवाद लोकप्रियता हे अनेक पाकिस्तानी कट्टरवाद्यांसाठी एक कटू सत्य आहे. चार युद्धांमधले पराभव, बांग्लादेशच्या रूपाने भारताने नकाशावर देऊन ठेवलेली अश्वत्थाम्यासारखी कधीही भरून न येणारी जखम, भारतीय सैन्यासोबत वेगवेगळ्या लढायांमध्ये मारले गेलेले शेकडो सैनिक, एरवी पाकिस्तानी समाजावर असणारी मुल्ला-मौलवींची वज्रमूठ यापैकी काहीही बॉलिवुडची पाकिस्तामधली लोकप्रियता संपवू शकलेलं नाही. पाकिस्तानी राज्यकर्त्यांवर पण भारतीय अभिनेत्यांची -अभिनेत्रींची मोहिनी असते. आम्ही भारतीय राष्ट्रवादाचे स्वयंघोषित प्रवक्ते आहोत असा एकूणच त्यांचा आव असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा एक नेता दरवर्षी पाकिस्तान वारी करतो. अगदी न चुकता. ते पण ज्याला भारतीय जनमानस खलनायक समजते अशा नेत्याच्या मुलीला भेटण्यासाठी. अजून धक्कादायक म्हणजे हा भाजप नेता त्या नेत्याच्या मुलीला आपली बहिण समजतो. 'तिकडे सीमेवर सैनिक' किंवा आणि ‘तुम्ही एसी केबिन मध्ये बसून…’ वगैरे बोलबचन देणाऱ्या ऑनलाइन टोळधाडीला हे एक तर माहीत नसावं किंवा माहीत असलं तरी ते तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असावेत.
वर ज्याचा उल्लेख केला आहे तो नेता म्हणजे माजी मंत्री, विद्यमान खासदार आणि एकेकाळचे विख्यात नट शत्रुघ्न सिन्हा. आणि ज्याच्या मुलीला हा नेता बहीण मानतो तो नेता दुसरा तिसरा कोणी नसून माजी पाकिस्तानी लष्करी हुकूमशहा झिया उल हक. हो तेच झिया उल हक ज्यांनी भारताला जराजर्जर करण्याची रणनीती आखली होती. तेच झिया उल हक ज्यांनी खलिस्तान चळवळ आणि काश्मिरी आतंकवाद्यांना मदत देऊन भारताचे लचके तोडण्याचा बेत आखला होता. शत्रुघ्न सिन्हा आणि झिया उल हक यांची वैयक्तिक मैत्री खुप जुनी आहे. पडद्याआड पाकिस्तान सरकारशी संपर्क साधण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेकदा भारत सरकारला मदत केली आहे. सध्याचे पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी पण सिन्हा यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. सध्या शत्रुघ्न सिन्हा मोदी सरकारवर सतत शरसंधान करत असल्याने भक्तांच्या पण निशाण्यावर आले असल्याने कदाचित त्यांच्या आयुष्यातला हा 'कोळसा' पुन्हा उगाळला जाईल.
'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली. राजकारणातली उद्दिष्ट्ये कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकत न वापरता साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे 'सॉफ्ट पॉवर'. एखाद्या देशाची 'सॉफ्ट पॉवर' म्हणजे त्या देशाची सांस्कृतिक मूल्ये, त्या देशाची कला आणि संस्कृती, खाद्य संस्कृती आणि यासारखे अनेक घटक. आपल्या आजूबाजूच्या परिघाचे जाणीवपूर्वक निरीक्षण केले तरी अमेरिकेचा याबाबतीतला वरचष्मा सहज लक्षात येईल. केएफसी, कोकाकोला-पेप्सी, मॅकडोनाल्ड यांच्याबरोबरीनेच हॉलिवुड हा पण अनेक भारतीयांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
दोन देशांमधील संबंधांमध्ये ही 'सॉफ्ट पॉवर' महत्त्वाची भूमिका बजावत असते. भारत-पाकिस्तान संबंधही त्याला अपवाद नाहीत. भारतीय चित्रपटांची पाकिस्तानमधली लोकप्रियता सर्वविदित आहे. इतकी की बॉलिवुडपुढे लॉलिवुड (पाकिस्तानी चित्रपटसृष्टी) पूर्णपणे झाकोळून गेली आहे. सध्या पाकिस्तानी चित्रपटसृष्टी काही चांगले चित्रपट तयार करत असली तरी तिची परिस्थिती चिंताजनक म्हणावी अशी आहे. आपल्याकडे 'खुदा के लिये', 'बोल', ‘रामचंद पाकिस्तानी' असे काही चांगले पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण ज्याप्रमाणे आपल्याकडे पाकिस्तानी गायक आणि अभिनेत्यांना विरोध करणारे घटक आहेत तसेच ते पाकिस्तानमध्येही आहेत. भारतीय चित्रपटांची लोकप्रियता त्यांना सहन होत नाही. नुकताच दिग्दर्शक कबीर खानला या घटकांचा फटका बसला. एका कॉन्फन्ससाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या कबीर खानला विमानतळावरच उग्र निदर्शनांचा सामना करावा लागला. कारण काय तर 'फॅण्टम' हा त्याने दिग्दर्शित केलेला सिनेमा पाकिस्तानविरोधी होता, असा या निदर्शकांचा दावा होता.
काही वर्षांपूर्वी आपल्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये पाकिस्तानचा प्रत्यक्ष उल्लेख नसायचा. पडोसी मुल्क असा मोघम उल्लेख असायचा. ही परंपरा मोडून काढली ती आमिर खानच्या 'सरफरोश'ने. योगायोग म्हणजे पाकिस्तानी चित्रपटांमध्ये पण सुरुवातीला भारताचा नामोल्लेख नसायचा. 'दुश्मन' असा मोघम उल्लेख असायचा. आता 'वार’सारखे सुपरहिट चित्रपट हा ट्रेंड बदलत आहे आणि भारताचा 'हिंदुस्तान' असा स्पष्ट उल्लेख होत आहे.
दोन वर्षापूर्वी 'वार' हा पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याने बॉक्सऑफिसवरील उत्पन्नाचे सर्व पाकिस्तानी चित्रपटांचे रेकोर्ड मोडले. (दुर्दैवाने ‘धूम ३’ हा चित्रपट काहीच दिवसांनी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने 'वार'चे सगळे रेकोर्ड किरकोळीत काढले.) पाकिस्तानचा सुपरस्टार म्हणून ज्याचा उल्लेख होतो, तो शान नावाचा अभिनेता मुख्य भूमिकेत होता. पाकिस्तानी नायक भारतीय गुप्तहेर संस्थेचे पाकिस्तानमध्ये अराजक माजवायचे मनसुबे कसे उधळून लावतो. हे या चित्रपटांमध्ये दाखवले आहे.या चित्रपटामध्ये भारतविरोधी जहाल संवाद होते.
यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'अंगार वादी' आणि 'लाग' या सुपरहिट चित्रपटांमध्ये काश्मीर प्रश्नांची पार्श्वभूमी होती. अर्थातच या बटबटीत चित्रपटांमध्ये हिंदुस्तानी हे मुख्य खलनायक होते. आपल्याकडच्या 'फौजी'च्या धर्तीवर पाकिस्तानमध्ये पण पाकिस्तानी सैन्यातल्या जीवनावर आधारित 'अल्फा ब्राव्हो चार्ली' नावाची एक सिरियल लोकप्रिय होती. त्याला पण भारतपाकिस्तानमधल्या तणावपूर्ण संबंधांची पार्श्वभूमी होती.
पाकिस्तान भारताशी एकवेळ कशातही बरोबरी करू शकेल, पण चित्रपटांचा स्केल, बजेट, विस्तार, स्टार पॉवर (नोट - यात दर्जाचा उल्लेख नाहीये ) यात ते भारताशी बरोबरी करण्याची कल्पना पण करू शकत नाहीत. भारतीय चित्रपट जगभरातल्या शंभर देशांमध्ये प्रदर्शित होतात, तर पाकिस्तानी चित्रपटाना धड पाकिस्तानमध्ये पण रिलीज मिळत नाही. खरे तर पन्नासच दशक ते ऐंशीचे दशक या काळात लॉलिवुड बऱ्यापैकी जोमात होते. याला ओहोटी लागली ती झिया उल हक यांच्या हुकूमशाही कारकिर्दीपासून. कडवे मुस्लिम मुलतत्ववादी असलेल्या झियांनी अनेक कलांवर वेडगळ बंधने लादली. १९७९ मध्ये सर्व प्रकारच्या चित्रपटांच्या निर्मितीवर त्यांनी बंदी आणली. चित्रपट बनवणे हे इस्लामविरोधी आहे अशी घोषणा केली. ही बंदी तीन वर्षे टिकली. या बंदीने पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीचे कंबरडे मोडले. त्यातून ते कधीच सावरले नाहीत.
सिनेमाला इस्लामविरोधी मानणाऱ्या झियांचे शत्रुघ्न सिन्हा या भारतीय नटाशी घनिष्ट आणि पारिवारिक संबंध होते हा एक मोठा विरोधाभास. हुकूमशाहाची लहर म्हणायचे, अजून काय! याच काळात अनेक चित्रपटगृहांचे रूपांतर धार्मिक स्थळांमध्ये किंवा शॉपिंग मॉलमध्ये करण्यात आले. अपुऱ्या चित्रपटगृहांची समस्या आजही पाकिस्तानी सिनेमाला भेडसावत आहे. त्यातून सिनेमा पायरसी जोरात सुरू झाली. त्याचा बराच मोठा फटका बॉलिवुडलाही बसला. धर्माचा एकसाचीपणा पाकिस्तानी सिनेमाला मारक ठरला. भारतात शाहरुख, आमीर, सलमान च्या खांद्याला खांदा लावून ऋतिक, अक्षय, अजय, जॉन अब्राहम ही मंडळी काम करतात. यातून आपल्या देशाची एक सकारात्मक प्रतिमा बाहेर देशात जाते.
भारत-पाकिस्तान संबंध आणि बॉलिवुड यांच्यातल्या परस्परसंबंधाला अजून एक कंगोरा आहे, तो दोन्ही बाजूच्या कट्टरतावाद्यांचा. बॉलिवुड हे सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे की काय ते दोन्ही बाजूच्या कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर असते. बॉलिवुड चित्रपटांची प्रचंड लोकप्रियता पाकिस्तानी राष्ट्रवाद्यांना पाहवत नाही. शिवाय भारतामधले शाहरुख खान, आमीर खान आणि सलमान खान यांच्यासारखे मुस्लिम नट तिथे सगळ्यात मोठे सुपरस्टार आहेत हे त्यांना डाचते. ही खान मंडळी धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक भारताच प्रतीक आहे असे त्यांना वाटते. शिवाय हे मुस्लिम नट हिंदू मुलींशी लग्न करतात आणि आपल्या मुलांवर हिंदू संस्कार करतात. शिवाय पडद्यावर हिंदू पात्रे साकारतात. त्यामुळे ही मंडळी धर्मबाह्य काम करतात असे त्यांना वाटते. त्यामुळे खान मंडळीेना निशाण्यावर घेण्याचे त्यांचे प्रयत्न असतात.
शाहरुख खानने मध्यंतरी सहिष्णूतेवर एक भाष्य केले असता बराच वादाचा धुराळा उडाला. सोशल मीडियावर शाहरुख खानवर अतिशय जहरी टीका केली. त्याच्या देशप्रेमावर संशय घेण्यात आला. अशाच संधीची वाट पाहात असणाऱ्या हाफिज सईदसारख्या अतिरेक्याला ही सुवर्णसंधी वाटली. त्याने ट्विटरवर शाहरुख खानला पाकिस्तानी नागरिक बनण्याचे आमंत्रण दिले. भारतात मुस्लिम लोकांची कशी गळचेपी होते हे दाखवून देण्याचा त्याचा उद्देश होता. त्याला अनुकूल प्रतिसाद आपल्याकडच्या कट्टरतावाद्यांनी दिला. जणू शाहरुखच पाकिस्तानला ‘मला तुमचं नागरीकत्व द्या’ अशी विनंती करायला गेला होता, अशा आविर्भावात त्यांनी शाहरुख खानवर जहरी टीका सुरू केली. त्याने पाकिस्तानला खरेच निघून जावे अशी भूमिका अनेक कट्टरवाद्यांनी घेतली. काय निष्पन्न झाले यातून? हाफिज सईदने मुत्सद्देगिरीचा हा डाव सहज जिंकला.
दोन्ही बाजूच्या कट्टरवाद्यांना दोन देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण नको असते. पाकिस्तानी कलाकार आपल्याकडच्या कट्टरवाद्यांना नको असतात, तर बॉलिवुड चित्रपटांचे प्रदर्शन पाकिस्तानी कट्टरतावाद्यांना नको असते. सांस्कृतिक साहचर्य वाढून दोन्ही देशांमधले संबंध सुधारले तर आपली जहाल विचारसरणी पोरकी होईल अशी साधार भीती त्यांना वाटते. त्यामुळे अक्षय कुमारसारखा एखादा अभिनेता मी पडद्यावर पाकिस्तानबद्दल वाईट संवाद बोलणार नाही अशी जाहीर भूमिका घेतो, तेव्हा सगळीकडे पसरलेल्या अंधकारमय तिरस्काराने भरलेल्या जगात तो एक आशेचा किरण असतो. सीमेवर अजून जवान शहीद होऊ नयेत आणि अजून निरपराध रक्त सांडू नये यासाठी कुठला मार्ग चोखाळावा? वाजपेयी मार्ग की हाफीज सईदसारख्याचा कट्टरवादी मार्ग, हा खरा प्रश्न आहे. मला वाटत उत्तर उघड आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 04 February 2018
अमोल उदगीरकर, बॉलीवूडमध्ये भरपूर संशयास्पद व्यक्ती आहेत हे सगळ्यांना माहितीये. दाऊद इब्राहिमच्या तालावर कोण नाचतो? अशांना भारताचे सांस्कृतिक दूत बनवण्यात कोणाचा फायदा आहे? शाहरूख खानचा (दत्तक) मामा ISI चा माजी प्रमुख आहे. काय अर्थ होतो याचा? शाहरुख खान काय उगीचंच सुपरस्टार बनला का? एके ५६ हे घाऊकहत्या करणारं शस्त्र घरात बाळगणाऱ्या संजय दत्तला भारंभार चित्रपट कसे मिळतात? त्याचा अभिनय सोडा, साधी भाषाही टपोरी छाप वळणाची आहे. गांधी-नेहरू घराण्यातला नसता तर त्याला कोणी चपराशी म्हणून तरी ठेवला असता का कामावर? अमीर खान हा मौलाना अबुल कलम आझादांच्या घराण्यातला वंशज आहे. पाकिस्तान वेगळा न काढता भारत अखंड ठेवून संख्याबळाने मुस्लिमांनी आपलं हित साधून घ्यावं असं हा मौलाना म्हणंत असेल. या असल्या पिलावळीवर सांस्कृतिक दूत म्हणून आम्ही हिंदूंनी कशापायी विश्वास ठेवायचा? आपला नम्र, -गामा पैलवान