२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा एकोणिसावा लेख आहे.
.............................................................................................................................................
‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ हे असगर वज़ाहत यांचं नाटक स्वातंत्र्यपूर्व काळ, गांधीहत्या, स्वराज्य, सुराज्य ते गांधीजींचं जीवनविषयक तत्त्वज्ञान, स्त्री-पुरुष संबंध, लोकशाहीची मूल्यं, हिंदूधर्माच्या व्याख्या, भारत या राष्ट्राची संकल्पना, फाळणीनंतरचा भारत यावर आजच्या समकालीन दृष्टिकोनातून अतिशय टोकदार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतं. यात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करावा ही गांधींची सूचनाही ऐरणीवर येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात गांधी-गोडसे यांना समोरासमोर उभं केलं आहे.
या नाटकाच्या कथानकात असगर वजाहत यांनी काही ऐतिहासिक तथ्यांमध्ये खूप मोठं स्वातंत्र्य घेतलं आहे. गांधींवर बिर्ला हाऊसमध्ये नथुराम गोडसे पिस्तुलातून गोळ्या झाडतो आणि प्रार्थना सभेच्या समुदायासमोरच ‘हे राम!’ म्हणत गांधी गतप्राण होतात. नथुराम गोडसेवर खटला चालतो. त्याला कारावास होतो. हा प्रत्यक्ष इतिहास आहे.
गोळ्या घालून गतप्राण झालेले गांधी-गोडसे समोरासमोर येतात, हे एवढं मोठं स्वातंत्र्य हे नाटक वाचताना सूज्ञ, सुजाण वाचकाला फार मोठा धक्का वगैरे देत नाही. कारण लेखकाला या दोघांना समोरासमोर आणून त्या काळाचा, त्यातल्या ठळक घटनांचा, तत्त्वज्ञान आणि वास्तव यांचा धांडोळा घ्यायचा आहे. आणि या धांडोळ्याच्या निमित्तानं त्या काळातल्या, निर्णायक शक्तींना, सत्ताकेंद्रांना आणि प्रशासन यंत्रणेतल्या दुर्बळ सांगाड्यालाही उघडंवाघडं पाडण्याचा प्रयत्न आहे.
नाटक हे तसं खूपच सशक्त माध्यम आहे. विविध पात्रं, घटनाक्रम, संघर्ष आणि तडजोडींच्या माध्यमातून विषय-आशयाला निष्कर्षाप्रत नेऊन प्रत्यक्ष घटित, काल्पनिकतेनं उभं केलेलं प्रत्यक्ष आभास चित्र यांच्या पाठशिवणीतून, नाटक वेगवेगळ्या शक्यतांच्या मुशीतून साऱ्या अर्थगठनाला एका वेगळ्या भारदस्त इप्सिताकडे नेतं. प्रत्यक्ष घटितातील वास्तवापेक्षा हे कल्पित वास्तव अधिक अर्थवाही, अधिक विश्वसनीय आणि विषयवस्तूच्या तळाचा ठाव घेणारं, अधिक सकस, थोडंसं जाज्वल्य आणि दूरगामी प्रभाव निर्माण करणारं ठरतं.
काळाची सरमिसळ झाली नसती तर तळ गाठण्याचा हा उद्देश गाठताच आला नसता. शिवाय ऐतिहासिक स्वातंत्र्य घेताना लेखकानं वास्तवातली पात्रं, वास्तव घटना यांना कुठेही धक्का पोचवलेला नाही. केवळ पात्रांना एकमेकांच्या समोरासमोर उभं करून त्यांच्या जीवनसाराचा गोळीबंद वापर नाट्यपरिणामासाठी केला आहे.
शिवाय नाटक माध्यमाच्या जशा काही मर्यादा आहेत, तशीच त्याची शक्तिस्थानं अमाप आहेत. मग गांधींची गोडसेनं हत्या केल्यानंतर ते जिवंत कसे हा बाळबोध प्रश्न गौण ठरतो. साररूपानं गोडसे-गांधी आजही आमच्या मनावर परस्परविरोधी भूमिका घेऊन ठाम उभे राहतातच. स्थळ, काळ आणि कृती यांच्या कसोट्यांवर गोष्टींना तपासून शेवटी कृतीची एकतानताच महत्त्वाची ठरते.
गांधी, प्यारेलाल, गोडसे, नेहरू, पटेल, मौलाना आझाद या ज्ञात पात्रांबरबरोच बीएला शिकत असणारी सुषमा, विद्यापीठात शिकवणारा तिचा प्रियकर, सुषमाची आई आणि फणिंद्रनाथ रेणू यांच्या ‘मैला आंचल’ या प्रख्यात कादंबरीतलं पात्र बावन दासही आहे. मात्र ही सारी पात्रं तोंडावळ्यानं नवी वाटत असली तरी वृत्तीनं ती गांधींच्या अवतीभवतीच्या पात्रांसारखी त्यांच्या जीवनाशी एकरूप होतात. त्यांच्या या एकरूप होण्यात त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षांची होरपळ होत असली तरी गांधींवरील श्रद्धेमुळे ती बंड करून उठत नाहीत. अगदी उपकथानक म्हणूनही नाटकाच्या रचनेत त्यांना विशेष स्थान नाही. पण त्यांच्या आग्रहांचे पडसाद दूरगामी सिद्ध होतात. गांधी समजण्यात मोठा हातभार लावतात.
स्वातंत्र्य मिळालं, आता काँग्रेस पक्षाचं विसर्जन करावं या गांधींच्या मताला पाठबळ मिळत नाही. परिणामत: गांधी बाहेर पडतात आणि बिहारमध्ये जाऊन ग्रामीण भागात कार्य करायला सुरुवात करतात. इथंच नेहरू-गांधींमध्ये ठिणगी पडते. सरकारमध्ये राहून आपण जनतेची सेवा करू शकत नाही काय? यावर गांधींचं सडेतोड उत्तर येतं- ‘सरकार अधिकार गाजवतं. सेवा करत नाही.’ सरकारं ही सत्तेची प्रतीकं असतात आणि ती केवळ आपली स्वत:ची सेवा करतात. म्हणून सत्तेपासून जेवढं दूर राहतं येईल, तेवढं बरं असं गांधी निक्षून सांगतात.
नेहरूंच्या दृष्टीनं देशाला वाचवण्यासाठी धोरणं तयार करावी लागतील. ती अमलात आणावी लागतील. नियोजन आयोग स्थापन करावा लागेल. पंचवार्षिक योजना आखाव्या लागतील. मग देशातली गरिबी आणि विषमता दूर होईल. आणि या साठी कमिटेड सरकार असणं जरुरी आहे. गांधी-नेहरूला समजावतात की, तू पानांकडून मुळांकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहेस. शासनानं नीती आखल्या म्हणजे लोकांचं कल्याण होईल असं तुला वाटतंय. माझं उलट मत आहे. लोकांना सशक्त करा. त्यांना स्वत:साठी काय योग्य आहे ते चांगलं ठाऊक आहे. ते आपल्या कल्याणाचे मार्ग स्वत: शोधतील. त्यावर अमल करतील.
यावर नेहरू काँग्रेस वर्किंग कमिटीपुढे हा प्रस्ताव ठेवण्याचं मान्य करतात. पण गांधी निक्षून सांगतात की, काँग्रेस वर्किंग कमिटीनं हा प्रस्ताव मान्य केला नाही तर त्यांचा काँग्रेसशी काहीही संबंध राहणार नाही. गांधी आपले सहकारी प्यारेलालला विचारतात की, काय अजून त्यांना त्यांच्या सोबत राहायचं? त्यांचं भविष्य त्या लोकांसोबत आहे जे त्यांना सोडून गेलेत.
प्यारेलाल एक निष्ठावान अनुयायी असल्यानं उलट विचारतात, ‘बापू, माझा एवढा अपमान तर तुम्ही कधीच केला नव्हता.’ ही खरी धगधगती निष्ठा. ही सच्ची नाती.
याचे पडसाद नाटककार नथुरामच्या गोटात दाखवतो. करकरे नथुरामला वर्तमानपत्रातली बातमी वाचून सांगतो- बघितलंस नथुराम,गांधींनं काँग्रेस सोडली. भकडलेला नथुराम उखडतो- अरे गांधीतर पुरता ढोंगी आहे. अरे, तो तर कधी काँग्रेसचा साधा सभासदही नव्हता. गांधी कधी खरं बोलला? सतत वल्गना करायचा- पाकिस्तान माझ्या तिरडीवर बनेल. पण बघितलं ना काय झालं? पाकिस्तानचा जन्मदाता जीना नाही, गांधी आहे. हिंदूंचं जेवढं अहित औरंगजेबानं केलं असेल, त्याच्यापेक्षा काही पट अधिक गांधीनं केलं आहे.
गोडसे पुढे म्हणतो, पण तुमच्याआमच्यासारखा दिसणारा माणूस एवढा शक्तिशाली आहे की, ज्युरी पण तोच आहे, जज पण तोच आहे. मुकदमा तोच दाखल करतो, तोच ऐकतो आणि फैसला पण तोच ऐकवतो. आणि सारा देश त्याचा निर्णय मान्य करतो. हे सारं घडतं आम्हा हिंदूंच्या बळावर.
नाट्यसंघर्ष उभा करण्याचं लेखकाचं कौशल्य परिपक्वतेचं आणि माध्यमावरच्या प्रभुत्वाचं दर्शन घडवतं.
बिहारमधील पुरुलिया जवळीला सांगी गावात आपला आश्रम गांधी सुरू करतात. तिथं पोचायला १३ किलोमीटर पायी चालत जायला लागतं.
प्रार्थना सभेनंतर जिल्ह्याचा डेप्युटी कमिशनर रामनाथ गांधींना येऊन भेटतो. सोबत जिल्ह्याचे इंजिनीअर एस.पी.सह साऱ्या अधिकाऱ्यांचा लवाजमा. हँडपंप वगैरे लावण्याच्या, टेलिफोन लाईन सोडण्याच्या योजना त्यांच्या राबवायच्या असतात. गांधी सांगतात गावकऱ्यांबरोबर चर्चा करा. गावकऱ्यांची भाषा त्यांना येत नसते. यावर गांधी त्यांना विचारतात- यांची भाषा येत नसेल तर त्यांचा विकास कसा करणार तुम्ही लोक? त्यांना गांधींच्या सुरक्षेसाठी तिथं पोलीस चौकी सुरू करायची असते. गांधी त्यांना सांगतात गाववाल्यांचं आपलं प्रशासन आहे आणि त्यांना कुठलीही असुरक्षितता वाटत नाही. इथं सारं काही सुरक्षित आहे. त्यांनी निघावं आता.
पुढे बिहारचे मुख्यमंत्री श्री बाबू स्वत: गांधींना भेटायला येतात. ग्रामस्थानी स्वयम प्रशासन उत्तम रीतीनं चालवलं जात असल्यानं त्यांच्या प्रशासनाचा रोल अगदी नगण्य असतो. गांधी तिथल्या प्रधानमंत्र्याला बावनदासला बोलावतात. तो विहीर खोदणं, बांध घालणं, रस्ते तयार करणं अशा लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या कामांची यादीच घडाघडा सांगतो.
शेवटी गांधी श्री बाबूंना सांगतात की, नेहरूंना जाऊन सांगा या चार जिल्ह्यांत सरकार स्थापन झालं आहे. इथले लोक आपलं सरकार सक्षमपणे चालवत आहेत. आणि हीच इथली संस्कृती आहे. शिवाय दोन सरकारांच्या संघर्षाचा प्रश्न उदभवणार नाही हेही सांगतात.
अचानक कस्तुरबा त्यांच्यासमोर उभ्या ठाकतात. आणि विचारतात, जीवनभर न विचारलेला प्रश्न. त्यांच्यासोबत गांधी न्यायानं वागले नाहीत असा आरोपही करतात त्यांनी आदर्शाच्या नावाखाली साऱ्या स्त्रियांना भरडून काढलं आहे. त्या हेही सुनावतात की, प्रत्येक प्रयोगात आपला बळी दिला गेला. आता तरी स्त्रियांना यातना देणं बंद करा. जे तुम्हाला ईश्वर मानतात त्यांवरच तुम्ही मनोवैज्ञानिक हिंसा करत आलात. थांबवा हे.
गांधी अस्वस्थ होतात आणि स्वत:लाच प्रश्न विचारतात – हे काय होतं? कस्तुरबा की माझीच प्रतिछाया? मला भेडसावणारी?
अशा अनेक तरल संघर्षांची पेरणी लेखकानं प्रत्येक दृश्यात केली आहे. कस्तुरबा आधीच गेल्यात हे माहीत असूनही त्यांचं हे अवतरणं, गांधींना त्यांच्या समोर पिंजऱ्यात उभं करणं खूप मोठं नाट्य निर्माण करतं. गांधी या महामानवाला माणसाच्या पातळीवर समजून घ्यायला मदत करतं.
पुढे गांधींवर देशद्रोहाचे आरोप वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींकडून केले जातात. गांधी त्यांचं खंडन करतात. पण गांधींवर देशाविरुद्ध कटकारस्थान केल्याचा खटला चालतो. २००० पानांची बिहार सरकारची फाईल शेकडो कार्यालयातून फिरून दिल्लीच्या गृह मंत्रालयात पोचते. आणि देशाच्या घटनेचा व देशाचा अवमान करणाऱ्या गांधींवर वेगवेगळ्या कलमांखाली खटला चालून गांधींना अटक करण्याची शिफारस केली जाते. कॅबिनेटच्या अनुमतीनं नेहरू ही शिक्षा अमलात आणतात. गांधींना अटक केली जाते. त्यांच्याबरोबर प्यारेलाल, सुषमा, बावनदास, निर्मला देवी यांनाही कैद केलं जातं.
गांधींना कारावास होतो. गांधी आपली दिनचर्या कारागृहातही शांतपणे चालू ठेवतात. गोडसेंच्याच खोलीत त्यांना ठेवावं असा ते आग्रह धरतात. त्यांना त्यांच्या बरोबर संवाद साधायचा असतो. जेलर आणि शासकीय यंत्रणा सुरक्षेच्या कारणास्तव त्याला साफ नकार देतात. शिवाय कारागृह काही संवादाचं व्यासपीठ नाही हे ठणकावून सांगतात. पण गोडसेबरोबर संवाद घडावा याच्यासाठी गांधी आग्रहीच नाही, तर हटवादाच्या टोकाची भूमिका घेतात. अन्न सत्यागृहाची धमकी देतात. उपोषणामुळे गांधींची प्रकृती खालावते. त्यांची तोळामासा प्रकृती ध्यानात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात ठराव करून त्यांना गोडसेशी बोलण्याची संधी दिली जाते.
गोडसेला गांधींचं हे आणखी एक नाटक वाटतं. गांधी गोडसेला विचारतात – गोळी घातल्यानंतर लोक तुझा तिरस्कार करायला लागतील असं तुला वाटलं नाही? तुझ्यावर या कृत्यासाठी प्रेम करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा ही संख्या फार मोठी असेल याचं भय तुला वाटलं नाही? अजूनही संवादाचा मार्ग निघू शकतो का, याबाबत मला तुझ्याशी बोलायचंय. गोडसे मान्य करतो. आणि सांगतो की, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, हिंदू जातीसाठी, हिंदू धर्मासाठी आणि हिंदुस्थानला वाचवण्यासाठी मला तुमची हत्या करायची होती. हिंदुस्थान केवळ हिंदूंचं राष्ट्र आहे, हिंदूंचा देश आहे.
गांधी गोडसेला समजावण्याचा प्रयत्न करतात की, हिंदुस्थान त्याच्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. परमेश्वराची कृपा आहे या देशावर…
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीला केवळ गांधीच कृपा मानू शकतात या गोडसेच्या भर्त्सनेवर गांधी सांगतात- स्वातंत्र्य केवळ मनाचं आणि विचारांचं असतं. हिंदू मत कधीच पराजित झालं नाही. भारतानं वर्षानुवर्ष समन्वयाचं, एकतेचं राजकारण केलंय.
गोडसे गांधींवर पुन्हा आगपाखड करतो, जर पाकिस्तानच्या निर्मितीला त्यांचा विरोध होता तर मग त्यांनी पाकिस्तानला ५५ करोड रुपये देण्यासाठी अन्न सत्याग्रह का केला? तुम्ही आपल्या सिद्धान्ताच्या आडून पाकिस्तानचं तुष्टीकरण केलंय. भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरकडे हात करून गोडसे सांगतो, हा आमच्या अखंड भारताचा नकाशा आहे?
गोडसे तुझा अखंड भारत तर सम्राट अशोकाच्या साम्राज्याएवढाही नाही. तू अफगाणिस्तानला सोडलंय. ते प्रांतही सोडले जे आर्यांचं मूळ स्थान होतं. अरे, हा नकाशा ब्रिटिशांनी तयार केलेला आहे.
तुरुंगात गांधी संडास साफ करण्याची मोहीम हाती घेतात. जेलर त्यांना अनुमती देत नाही. गांधी त्याला ऐकवतात की, हे जेल देशाचं आहे आणि देशाला साफ ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पण जेलर याला कायद्याचं उल्लंघटन मानतो. गांधी उलट त्याला विचारतात, जेल मॅन्युअलमध्ये संडास कैद्यांनी साफ करू नये असं कुठे लिहिलं आहे?
शेवटी गांधी गोडसेला सांगतात की, जर तू या अठरापगड जातीतल्या लोकांना हिंदू मानत नसशील तर तू हिंदू नाहीस. आधी तर तू देशाला लहान केलं नथुराम. आता हिंदुत्वालाही लहान करू नकोस. दुसऱ्यांना उदार बनवण्यासाठी आधी स्वत:ला उदार व्हावं लागतं.
चोरून चोरून पत्रव्यवहार करणाऱ्या आणि भेटीगाठी घेणाऱ्या सुषमा-नवीनला गांधी लग्नाला परवानगी देतात. पण अखंड ब्रह्मचर्याचं पालन करण्याच्या अटीवर. संयमाशिवाय मनुष्य पशू आहे हेही बजावून सांगतात. या नवदाम्पत्याला भगवदगीता भेट देतात.
गोडसे सांगतो गीता माझं जीवनदर्शन आहे.
यावर गांधी सांगतात किती अजब आहे. गोडसे, गीता तुला माझी हत्या करायला प्रेरणा देते आणि मला तुला क्षमा करण्याची प्रेरणा देते. हे कसलं रहस्य आहे?
गोडसे सांगतो- गांधी तुमची हत्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक होती. देशाच्या हिंदू जनतेचा तो निर्णय होता.
गांधी सांगतात गीता शत्रू आणि मित्रांबद्दल एकच भावना असण्याबद्दल सांगते. जर मी शत्रू होतो तरीही तू माझ्याबद्दल शत्रुभाव का ठेवलास? अरे गोडसे, गीता सुख-दु:ख, सफलता-विफलता, शत्रु-मित्रांत भेद मानत नाही. समानता बरोबरीचा भाव गीतेत आहे.
सगळ्यांना आपल्या विचारांचं स्वातंत्र्य आहे, पण कुणाची हत्या करण्याचं स्वातंत्र्य कुणालाही नाही. ज्या माणसात त्यागाची भावना आहे. तो मनुष्य साऱ्या गुणांचा स्वामी मानला जातो.
दोघांचा हा संवाद होतो, पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम राहतात.
असगर वजाहत यांनी हा घटनांचा पट मांडून ठेवलाय, पण निर्णय सूज्ञ वाचक-प्रेक्षकांवर सोडलाय.
खरं म्हणजे गांधी-गोडसे एवढंच काय नेहरू, पटेल ही सारीच पात्रं आज एक मिथ झालेली आहेत. मायथॉलॉजी आणि मिथ्स हे कवी, नाटककार यांचं फार मोठं भांडवल. या मिथ्सना एकमेकांसमोर उभं करून आजच्या संदर्भात त्यांचे, त्यांच्या ताणतणावांचे आणि संघर्षांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. काळाबरोबरचं स्वातंत्र्य काव्यात्म न्यायाच्या दृष्टीनं सत्याचा शोध घेण्याच्या दृष्टीनं क्षम्य ठरतं. घटित वास्तवापेक्षा हे काव्यगत वास्तव अधिक दूरगामी ठरतं.
अनेक पात्रं, अनेक घटना, अनेक घटनास्थळं असूनही ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ या थोड्या फॅन्सी शीर्षकाच्या नाटकातून असगर वज़ाहत यांनी सत्ताकारण, लोककल्याण, व्यक्तिगत निष्ठा आणि त्यांचं उदात्तीकरण यांच्यावर फार प्रभावी भाष्य केलं आहे. अतिशय संयतपणे एका ज्वलंत विषयाच्या तळाचं सत्य शोधण्याला युवा वर्गाला प्रवृत्त केलं आहे.
.............................................................................................................................................
.......................................................................................................................................
.......................................................................................................................................
लेखक प्रा. कमलाकर सोनटक्के ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.
sontakkem@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Sat , 03 February 2018
एक प्रश्न ह्या लेखाच्या वर जो फोटो दिलाय त्यात महात्मा गांधींच्या अंगावर जानवे आहे का? का ती घड्याळ बांधलेली दोरी आहे ? तसे असेल तर घड्याळ दिसले नाही ... अर्थात जानवे (बहुधा) उजव्या खांद्यावरून असते पण शंका आली म्हणून विचारले ....