स्वत:च्या विरोधात चार शब्द
ग्रंथनामा - आगामी
सुनील कर्णिक
  • सुनील कर्णिक आणि त्यांची सहा पुस्तके
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सुनील कर्णिक Sunil Karnik डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

ज्येष्ठ पत्रकार सुनील कर्णिक यांची सहा पुस्तके ९ फेब्रुवारी रोजी डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई इथे होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. यातील ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून बाकीच्या ‘‘महानगर’चे दिवस’, ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’, ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पाच पुस्तकांची पहिली आवृत्ती आहे. या सर्व पुस्तकातील लेख वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकांपैकी ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’ या पुस्तकातील हे एक प्रकरण.

.............................................................................................................................................

‘ललित’ नावाचं ग्रंथप्रसाराला वाहिलेलं मासिक गेली चाळीस वर्षं दरमहा प्रसिद्ध होत आहे. या मासिकात सुरुवातीची अनेक वर्षं जयवंत दळवी ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने जे हलकंफुलकं आणि प्रसन्न लेखन करत असत, त्या जागी सध्या ‘टप्पू सुलतान’ या टोपणनावाने पुण्याचे एक गृहस्थ लिहीत असतात. त्यांनी दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखात माझ्याविषयी पुढील मजकूर प्रसिद्ध झाला आहे -

‘महानगरचे सुनील कर्णिक हे महाबिलंदर आणि महाबेरकी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी साहित्यिक ‘तळ आणि गाळ’ उपसणारे अनेक लेख ‘महानगर’मधून लिहिलेले आहेत. आणि श्री. पु. भागवत किंवा नारायण सुर्वे यांसारख्या साहित्यिकाबद्दल ‘न छापण्याजोग्या (पण चविष्ट) गोष्टी’ स्वत:च लिहिलेल्या आहेत.’ वगैरे.

या वर्णनातील ‘महाबिलंदर आणि महाबेरकी’ ही विशेषणं वाचून मला मनातल्या मनात घेरी आली. म्हणजे काही सुचेनासंच झालं. थोड्या वेळाने डोकं थोडं ताळ्यावर आल्यावर मी स्वत:ला विचारलं की, आपल्या अंगात जर इतके मोठे दुर्गुण असतील तर आजवर ते आपल्या लक्षात कसे आले नाहीत? आणि हे आपलं वर्णन जर खरं असेल तर ते दुर्गुण स्वत:मध्ये ठेवून समाजात वावरणं हे समाजाच्या दृष्टीने घातक नाही का?... पण मुळात हे वर्णन खरं मानलं पाहिजे.’

पण ही सगळी अक्कल दुसऱ्याला शिकवायला ठीक असते; ती स्वत: आचरणात आणायची म्हणजे अशक्यप्राय गोष्ट असते; हेच खरं. माझ्या अंगात कोणताही दुर्गुण आहे हे स्वीकारायलाच माझं मन तयार होईना. पण तसं उघडपणे मला बोलताही येईना. त्यामुळे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी माझी विचित्र अवस्था झाली. अखेरीस मी एका मित्राला पकडलंच आणि त्याच्याकडे ‘तो’ विषय काढला.

‘अरे, अरे, हे बघ ‘ललित’मध्ये माझ्याबद्दल काय छापून आलंय.’

हे ऐकताच तो अतिशय निरागसपणे, गोड हसला. त्याचा अर्थ असा होता की ‘ललित’मधलं ते वर्णन त्याने वाचलं होतं, एवढंच नव्हे तर त्याला ते पटलंही होतं. हे आणखी माझ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं. मी तडफडत त्याला म्हणालो, ‘अरे, पण तू मला सांग, मी एकदम महाबिलंदर आणि महाबेरकी कसा होईन? त्याआधी साधा बिलंदर आणि साधा बेरकी या पहिल्या पायरीवर कोणी तरी मला उभं करायला नको का?’

हे ऐकूनही तो मख्खासारखा गप्प राहिला. आता आपलं म्हणणं त्याला कसं पटवून द्यावं ते मला कळेना. म्हणून मग मी सुचेल ते बडबडलो,

‘तुम्ही मला एकदम काळ्या सिंहासनावर कसं बसवता? त्याआधी बसायला साधं काळं फडकं का देत नाही?’

हे ऐकल्यावर एखाद्या बावळट माणसाला साधा विचार समाजावून सांगावा तसा तो मला म्हणाला,

‘हे बघ, काही वर्षांपूर्वी तू जेव्हा ‘ललित’ मासिकात काम करत होतास, तेव्हा ‘ललित बिलंदर’ होतास. आता तू ‘महानगर’मध्ये असल्यामुळे महाबिलंदर’ आहेस. कळलं?’

‘मला कळलं.’ मी म्हणालो, ‘म्हणजे मी जर ‘मटा’मध्ये काम करत असतो तर ‘मटा बिलंदर’ ठरलो असतो आणि ‘नवा काळ’मध्ये असतो तर ‘नवा बिलंदर’ झालो असतो!’

‘हो. आणि उद्या जर तुझी नोकरी जाऊन तू बेकार झालास तर तू ‘बेकार बिलंदर’ होशील! आणि त्यानंतर तू मेलास तर ‘मेला बिलंदर’ होशील!’

मित्र फारच क्रूर बोलत होता.

‘अरे, अरे! पण तू माझा मित्र आहेत की शत्रू आहेस?’

‘मी तुझा मित्रच आहे. पण ‘ललित’मधल्या त्या सदर लेखकाला तू हा प्रश्न विचारला असतास तर त्याने काय उत्तर दिलं असतं ते मी तुला सांगितलं.’ च्यायला, याने तर मला निरुत्तर केलं.

यानंतर दोनतीन दिवसांचीच गोष्ट. मी कामानिमित्त जिथे जिथे जात असतो त्यांपैकी एका अक्षरजुळणी केंद्रात गेलो, तर तिथे काम करणाऱ्या एका मुलीने गेल्यागेल्याच मला अत्यंत सौम्य शब्दांत हटकलं,

‘अहो, तुम्ही ‘ललित’चा दिवाळी अंक बघितलात का?’

ते उद्गार ऐकताच तिचे सगळे सहकारी अर्थपूर्ण हसले.

मला ते सहन होईना. मी म्हणालो, ‘अरे ‘ललित’ नावाचं काही मासिक आहे हे कालपर्यंत तुमच्या गावीही नसेल! आणि आज तिथे माझी बदनामी झाल्याबरोबर ती ताबडतोब तुमच्यापर्यंत आलीसुद्धा? कमाल आहे. पण याआधी त्याच सदरात माझ्याबद्दल चार चांगले शब्दही छापून आले आहेत, त्याबद्दल मात्र तुम्ही कधी बोलला नाहीत?’

माझा मूळचा काळा चेहरा संतापाने अधिकाधिक काळानिळा होत होता.

‘तसं नाही,’ तिची रदबदली करत तिचा एक सहकारी म्हणाला, ‘आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही बोललो.’

हे बोलतानाही त्याच्या चेहऱ्यावरचं हसू लपत नव्हतं.

‘हे बघ, आम्हाला वाईट वाटलं हे वाक्य कोणी हसत हसत म्हणत नाही!’

मी कडवट विनोद करू पाहत होतो, पण मनातून मी रडत आहे सर्वांना कळत होतं.

मग मी घाईघाईने चेहर्‍यावरून हात फिरवतोय असं भासवून स्वत:चे डोळे चाचपून पाहिलं. त्यांच्यातून पाणी येत नव्हतं हे बयं होतं.

चार दिवसांनी बाकीचे सगळे ती गोष्ट विसरून आपापल्या कामाला लागले, पण आपल्या चारित्र्याला लागलेला काळिमा मला चैन पडू देईना. मी पुन्हा एकदा मित्राला पकडलं आणि त्याच्याकडे तो विषय उकरून काढला - ‘अरे, इतके लोक इतक्या भानगडी करतात, पण त्यांच्याबद्दल मात्र कोणी ब्र काढत नाही -’

‘उदाहरणार्थ?

‘उदाहरणार्थ, ती भक्ती बर्वे नावाची नटी होती, ती म्हणे दरवेळी नवा मुख्यमंत्री आला की दहा टक्क्यांचा फ्लॅट मिळवायची. असे सहा फ्लॅट म्हणे तिने स्वत:च्या नावावर करून घेतले होते. ही कुजबुज मी अनेक वेळा ऐकली आहे. पण याविरोधात जाहीरपणे कोणीच काही बोलत नाही. आणि माझ्या बाबतीत मात्र -’

‘हे बघ,’ तो मला समजावत म्हणाला, ‘तिचे गुण इतके मोठे होते की त्या तुलनेत तिचे दोष नगण्य ठरले. तुझं तसं नाही.’

त्याला काय उत्तर द्यावं तेच मला कळेना.

हा सर्व वर लिहिलेला मजकूर मी त्या मित्राला दाखवला. तर तो म्हणाला, ‘ललितमध्ये जे छापून आलंय तेच यावरून सिद्ध होतंय.’

‘काय?’

‘हेच की तू महाबिलंदर आणि महाबेरकी आहेस.’

त्याने माझी बोलतीच बंद केली.

.............................................................................................................................................

महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २०० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4350

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......