अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार सुनील कर्णिक यांची सहा पुस्तके ९ फेब्रुवारी रोजी डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई इथे होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. यातील ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून बाकीच्या ‘‘महानगर’चे दिवस, ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’, ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पाच पुस्तकांची पहिली आवृत्ती आहे. या सर्व पुस्तकातील लेख वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकांपैकी ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पुस्तकातील हे एक प्रकरण.
.............................................................................................................................................
काही पुस्तकं वाचायची नसतात. काही विषय टाळायचे असतात. काही अंधाऱ्या जागांवर प्रकाश न पडलेलाच बरा असतो...असं म्हटल्याने कार होतं? नको ते प्रकार वाढत राहतात. अखेर कडेलोट होतो तेव्हा विषयाला तोंड फुटतंच. पण तेव्हाही टाळाटाळ होते. विषयांतर होतं. कुठे काही घडलंच नाही असं भासवलं जातं.
‘बिटर चॉकलेट’ या पिंकी विराणी यांच्या नव्या पुस्तकाबाबत आपण सध्या हा अनुभव घेत आहोत. (मराठी अनुवाद : मीना कर्णिक, अक्षर प्रकाशन, २०० रुपये.)
हे खळबळजनक पुस्तक प्रकाशित होऊन आता सहा महिने झाले; पण अजून त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. जणू काही तो प्रकार आपल्या घरात घडेपर्यंत आपण त्याची दखल घेणार नाही आहोत. ‘भारतातील मुलांच्या लैंगिक शोषणाच्या विदारक कहाण्या’ असं या पुस्तकाचं वर्णन मुखपृष्ठावर केलेलं आहे. आणि खरोखर या कहाण्या थरकाप उडवणाऱ्या आहेत. अशा घटनांची संख्याही फार मोठी आहे. खुद्द लेखिकेनेही हा अनुभव बालपणी घेतलेला आहे आणि त्याची सविस्तर चर्चा तिने प्रस्तावनेत केली आहे. मुळात ही प्रस्तावनाच वाचकाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. पिंकी विराणी सांगतात : ‘लैंगिक शोषणासारखा अक्राळविक्राळ राक्षस अस्तित्वात असलेलं हे जग अजूनही फिरतंर ते तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या जीवावर...’
त्यांनी नमूद केलेला पहिलाच अत्याचार असा आहे -
‘स्टारडस्ट या सिने-निरतकालिकामध्ये सहसंपादक म्हणून मी काम करत असताना...एका मोठ्या स्टारने आपल्या सेटवर सगळ्यांच्या समोर आणि त्या मुलीच्या आईच्या देखत एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची स्टोरी माझ्याकडे आली होती. नायक आणि नायिका यांच्यातील जवळिकीच्या दृश्याचं चित्रीकरण चालू असताना हा नायक मोठ्याने म्हणाला, ‘नारियल फोड दूं क्या?’ त्या मुलीची विधवा आई रागाने वेडी व्हायची बाकी होती. तिने आम्हाला हा संपूर्ण प्रसंग सांगितला, रेकॉर्डवर. हा लेख छापून आल्यानंतर चित्रपटसृष्टीत काही काळ खळबळ माजली. बहुतेकांनी त्यावर विश्वास ठेवायचं नाकारलं, ती मुलगी आणि तिची आई चित्रपटसृष्टीबाहेर फेकल्या गेल्या आणि तो पुरुष स्टार मात्र नेहमीप्रमाणे कामं करत राहिला.
अशा कहाण्या प्रसिद्ध स्त्री-पुरुषांच्याही आहेत. ओप्रा विन्फ्री, व्हर्जिनिया वुल्फ, अशी विदेशी नावंच नव्हेत तर काही भारतीय नावंही या पुस्तकात नमूद केलेली आहेत. अगदी अलिकडे त्यांच्यावर बालपणी झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या हिडीस आणि हिंस्र कहाण्या एकापाठोपाठ बाहेर आल्या, तेव्हा सगळं जग हादरून गेलं. अमेरिकन वृत्तपत्रांनी मथळे दिले : ‘यू फेड देम. यू क्लोज्ड देम. नाऊ दे आर बॅक टु से यू रेप्ड देम.’ (तुम्ही त्यांना खायला घातलंत. तुम्ही त्यांना कपडे पुरवलेत. आता परत येऊन ते तुम्ही त्यांच्यावर बलात्कार केल्याचं सांगत आहेत.)
आणि हे बलात्कार करणारे राक्षस बाहेरच्या जगातून आलेले नसतात, तर अनेकदा घरातलीच माणसं - मुलाचे वडील, काका, आजोबा, विश्वासू नोकर (किंवा चक्क घरातल्या स्त्रियासुद्धा!) ही राक्षसासारखी अमानुष कृत्यं करतात. का करतात ती असं? लेखिकेने तीन प्रमुख कारणं नमूद केली आहेत -
‘आपलं वयाने मोठं असणं, आपल्या हाती सत्ता असणं आणि आपण आपली वासना पूर्ण करू शकणं, या तीन गोष्टींमुळे मुलांचं लैंगिक आणि शारीरिक शोषण होतं. काही वेळा या गोष्टी हेच एक कारण असतं. पण केवळ एवढ्याने आपण शोषण करणाऱ्याची मानसिकता जाणून घेऊ शकतो असंही नाही. मनातल्या मनात आणि शारीरिकदृष्ट्याही सेक्सचा अतिरेकी विचार आणि माणूस व जनावर यांच्यात असलेला भेद जाणून न घेणं ही दोन कारणं असू शकतात, एवढंच फार तर आपल्याला म्हणता येईल. आपण हे मान्य करत नाही, कारण मग माणूस असूनही आपण आपल्या या मूलभूत वासनेवर काबू ठेवू शकत नाही हेही आपल्याला मान्य करावं लागतं. ते मान्य करणं म्हणजे आपला एक प्रकारे पराभवच असतो. त्यापेक्षा आपण त्या वासनेला बळी जाणं मान्य करतो : वारंवार कोणाचाही बळी देऊन.’
ज्या मुलावर असा लैंगिक अत्याचार घडत असतो, त्याची आईसुद्धा त्याविरुद्ध सहसा आवाज उठवताना दिसत नाही. ती सतरा सबबी सांगत राहते. नाही तर मूग गिळून गप्प बसते. भारतीर स्त्री अशी शरणागत का असते? लेखिकेला उमगत नाही. मग ती काही प्रश्न उपस्थित करते -
‘...जाहिरातींमधील आजचा भारतीय पुरुष मात्र भरपूर नफा कमवताना दिसतो. म्हणून मग तो आपली बोर्ड मीटिंग चालू असतानाही वेळात वेळ काढून आपल्या स्पगेटी स्ट्रॅपमधल्या लहान मुलीबरोबर सॅन्डविच खाताना दाखवता येतो. मग नवीन सहस्रकातला हा पुरुष काम करून थकलेल्या आपल्या बायकोच्या बरोबरीने मुलांचे लंगोट बदलताना का दिसत नाही?
प्रत्यक्ष आयुष्यात खरीखुरी आई आपल्या नवऱ्याला हे काम करू देईल का?
आईला चिकटलेल्या मोठेपणाचा असा एक भाग ती झटकू शकेल का?
आणि आई आपल्या मुलाला मासिक पाळीविषयी सांगू शकेल का? आपल्या आईला आणि बहिणीला किंवा नंतर आपल्या बायकोला दर महिन्याला कार होतं ते त्याला बाहेरून कशाला कळायला हवं?
लोकांच्या मुलींबद्दल आदर बाळगायला आई आपल्या मुलाला सांगेल का? ती स्वत:ही कोणाची तरी मुलगी आहेच ना?
उलट आई ही अनेकदा आपल्या सुनेशी वागताना फटकून का वागते? या दोघींच्याही आयुष्याचा केंद्रबिंदू हा पुरुषच का असावा लागतो?
बाप सांगत नसेल तर आपल्या मुलाला निरोध देऊन एड्सची माहिती देण्याचं काम आई का नाही करत?
आपल्या नवऱ्याने आणि मुलाने त्यागाच्या पदावर नेऊन ठेवल्यानंतर, तिथून खाली उतरायचं धाडस करून ती दोघांना त्यांची जागा का नाही दाखवून देत?
आपल्या नावावर घर असताना, बँकेत पैसे असताना आणि चांगली नोकरी असतानाही, कोणतीही बाई आपल्या नवऱ्याला चार गोष्टी सुनावू का शकत नाही?
आई आणि बाप दोघेही आपल्या मुलींना कसं वागायचं ते सांगत राहतात. आता आपल्या मुलांना चार गोष्टी सुनावायची वेळ आलीर असं त्यांच्या मनात का येत नाही?’
हे प्रश्न कळीचे आहेत. निरुत्तर करणारे आहेत. या प्रश्नांमध्ये जी वस्तुस्थिती गृहीत धरली आहे. तिच्यामुळेच पुढे लैंगिक विकृती आणि अत्याचारांचे प्रकार वाढत राहतात असं लेखिकेला सुचवायचं आहे. याबाबत कोणाचं काही दुमत असण्याची शक्रता नाही. पण तरीही ही परिस्थिती बदलावी असं कोणाला वाटत नाही हे लेखिकेचं दु:ख आहे. त्याचं गांभीर्य आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. पण ती जी आकडेवारी आपल्यासमोर ठेवते ती थरकाप उडवणारी आहे :
‘भारतामध्ये २००२ पर्यंत लैंगिकदृष्ट्या शोषण होणाऱ्या मुलांचे (सरकारतर्फे देण्यात आलेले) खाली दिलेले आकडे हे खरं तर प्रत्यक्षातल्या आकड्यांपेक्षा कमी आहेत.
- ४ कोटी १५ लाख ९४ हजार ७३५ लहान मुलगे.
- ६ कोटी २८ लाख ५३ हजार १६० लहान मुली.
या मुलांच्या पालकांनी आणि हितचिंतकांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर?’
तर काय होईल ते वेगळं सांगायला नकोच. या पुस्तकात ‘स्वत:च स्वत:ला बरं करणाऱ्या’ एका मुलीचं गाणं अनुवादित करून दिलं आहे, ते मुद्दाम वाचण्यासारखं आहे -
‘गप्प बस बाळा, बोलू नको काही
आई तुला आणून देणारेय एक गाणारा पक्षी
आणि तो पक्षी जर नाहीच म्हणाला गाणी
तर बाबा तुला देतील लग्नाची अंगठी
आणि ती सोन्याची अंगठी तर झालीच पितळेची
तर बाळा तू स्वत:साठी आण भेट आरशाची.’
या कवितेत सांगितलेला उपाय असा आहे की, इतर कोणी जर आपल्या मदतीला नाहीच आलं तर संकटात सापडलेल्या मुलीने आपलं दु:ख मनातच ठेवावं. त्या संकटातून बाहेर येण्याचा आत्ममग्न मार्ग शोधावा आणि स्वत:चं मन स्वत:तच रमवावं.
या मार्गाने जाणारी शेकडो माणसं आपण दररोज पाहत असतोच. पण तरीही लेखिकेचं आपल्याला निर्वाणीचं सांगणं आहे :
हे पुस्तक मोठ्यांसाठी आहे, पण ते लहान मुलांबद्दल आहे. आपली मुलं, आणि आपल्यातलं मूल... मोठं झाल्यानंतरही आपल्या आत जोरजोरात रडणारं मूल. कृपया या मुलाचं संरक्षण करा.
.............................................................................................................................................
म्हाताऱ्या बायका काय कामाच्या? - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4351
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
mahesh jore
Mon , 05 February 2018
सुनील कर्णिकांनी या पुस्तकांमध्ये इतरांच्या पुस्तकांमधील उताऱ्यांचे संकलन केलेले दिसते आहे. नावे मात्र पुस्तक स्वतः लिहिल्यासारखे वाटावे अशी दिलेली दिसत आहेत.