आठवणी गुरुजींच्या
ग्रंथनामा - झलक
प्रा. मधुकर राहेगावकर
  • ‘नरहर कुरुंदकर : ते होते जीवित’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक नरहर कुरुंदकर Narhar Kurundkar

‘उद्याचा मराठवाडा’ या नांदेडस्थित दैनिकाच्या १३व्या वर्धापनदिन सोहळ्यात (२६ जानेवारी) प्रा. मधुकर राहेगावकर यांनी संपादित केलेल्या आणि अभंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘नरहर कुरुंदकर : ते होते जीवित’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील एक लेख.

.............................................................................................................................................

गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिसस्पर्श ज्यांना झाला अशा भाग्यवंतांपैकी मी एक आहे. गुरुजी १९५५ साली प्र.नि. विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले, त्यावेळी मी आठव्या वर्गात शिकत होतो. त्यापूर्वी सातव्या वर्गापर्यंत कविवर्य दे.ल. महाजन सरांनी मराठी हा विषय शिकवला होता. त्या काळी प्र.नि. विद्यालय मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते. पारंपरिक शैक्षणिक चाकोरीतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी योग्य वातावरण प्रदान करणे, मूल्यांची जोपासना करत असताना संस्कार घडवणारे म्हणून सारेजण या विद्यालयाकडे पाहात असत. गुरुजींच्या येण्यामुळे रूढ वातावरणात एक आगळे-वेगळे चैतन्य निर्माण झाले.

तारुण्यातील ताठरपणा, बुद्धिमत्तेची तेजस्विता, अमोघ वक्तृत्वाचा प्रवाहीपणा, विषयाची नावीन्यपूर्ण मांडणी, तर्काचा अनोख्या पद्धतीने घेतलेला आधार या सर्वांबरोबरच विद्यार्थ्यांबाबत अपार करुणा या गोष्टींचे एक अजब रसायन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची आश्वासकता होती. एकीकडे विद्यार्थ्यांना त्यांचा धाक वाटत असे, तर दुसरीकडे त्यांच्याविषयीच्या आदराने मन ओथंबून जात असे. जवळ जावेसे वाटावयाचे, पण मन थरथरत असावयाचे. जवळ जाण्याची हिंमत केली, पहिले शरसंधान सहन केले की, नकळतपणे आपलेपणाचे धागे विणले जात असत. त्यांच्या अंतरंगातील अंतर्वेधी ऋजुतेचे दर्शन घडत असे. मायेच्या ओलाव्याने मन चिंब भिजून ताजेतवाने व तरतरीत होत असे. जवळ आलेल्यांना कायम बांधून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. आयुष्यभर एखाद्या आषाढ-घनातील ‘अमृतमेघा’ प्रमाणे ते बरसत राहिले. अनेकांची जीवने फुलून आली, बहरून गेली, कृतकृत्ये झाली.

प्र.नि. विद्यालयात त्या काळी नाना उपक्रम सुरू झाले. दर शनिवारी पाचव्या तासानंतर होणारी वादसभा, पावसाळ्यातील सहल, चांदण्या रात्रीची सहल, महाराष्ट्रातील मान्यवर कवींची कविसंमेलने, वा.ल. कुलकर्णीसारख्या वक्त्यांची व्याख्याने हे नवे विश्व विद्यार्थ्यांसमोर गुरुजींनी उभे केले. पुस्तकातील अभ्यासक्रम शिकवणे असे त्यांचे साधे-सोपे सूत्र नव्हते. शिक्षण म्हणजे संस्कार, विद्यालय एक संस्कार केंद्र आणि शिक्षक म्हणजे संस्कारांचा मूलस्रोत अशी त्यांची धारणा होती. त्याप्रमाणे वाटचाल होती. ते केवळ वर्गात शिकवणारे शिक्षक नव्हते, तर संस्कारांचा वसा घेतलेले गुरुजी होते. एकाच वेळी ते विद्यार्थ्यांच्या श्रद्धेचा, आदराचा, संस्थेच्या गौरवाचा - सन्मानाचा आणि पालकांच्या कुतूहलाचा-कौतुकाचा विषय बनून गेले होते.

प्र.नि. विद्यालयाची त्या काळी शिस्त अत्यंत कडक होती. मुख्याध्यापक सर्जेगुरुजींचा दरारा होता. प्रार्थनेपूर्वी वर्गात हजर राहिले पाहिजे, हा नियम होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी होत असे. उशीर करणाऱ्यास शासन केले जावयाचे; राष्ट्रगीत सुरू झाले, विद्यार्थी शालेय परिसरात असेल तर त्याने असेल तसे जागचे जागी उभे राहावयाचे. असाच एक प्रसंग. पावसाळ्यातील दिवस. बहुधा आषाढ-श्रावण असावा. नभ मेघांनी भरून आलेले. दुपारी काळोख दाटून आला. पावसाच्या धारा कोसळू लागल्या. एक विद्यार्थी ‘जगन्नाथ दमकोंडवार’ घाईघाईने शाळा गाठण्याचा प्रयत्न करू लागला. तो परिसरात आला आणि प्रार्थना सुरू झाली. तो जागच्या जागी स्तब्ध उभा. त्याच्या हातातील वह्या पुस्तकांना पावसाने झोडपून काढले. माडीवर कार्यालयात उभ्या असलेल्या सर्जेगुरुजी आणि कुरुंदकर गुरुजींनी सेवकामार्फत त्याला बोलावून घेतले. घरी पाठवले. कपडे बदलून येणास सांगितले. त्याला पारितोषिक दिले पाहिजे. मोठ्या कार्यक्रमात भव्य सत्कार करून ते द्यावे, असा आग्रह गुरुजींनी धरला. मुख्याध्यापकांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याचे ठरवले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री कुंजबिहारिलाल हे होते. त्यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. गुरुजींनी सारा प्रसंग निवेदन केला. जिल्हाधिकारी साहेब एवढे प्रसन्न झाले की, त्यांनी स्वत:च्या वतीने एकशे एक रुपये, नुसते घोषित केले नाहीत, तर तत्काळ दिले. त्याचे कौतुक केले. शाळेची स्तुती केली. कितीतरी दिवस हा विषय चर्चेचा झाला होता. भिजत्या पावसात आणि ओलेत्या मनात राष्ट्रभक्तीची प्रेरणा चेतवण्याचे एक अभूतपूर्व कार्य येथे घडले होते. ‘भारत माझा देश आहे,....’ अशी शब्दकोरडी प्रतिज्ञा करण्याचे ते दिवस नव्हते. त्यांचा अर्थ जगण्याचे ते दिवस होते. त्याचे भागीदार माझे गुरुजी होते.

आमच्या शाळेत अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू असा गोविंदा नावाचा सेवक होता. तो मुख्याध्यापकांच्या कार्यालयात कामाला होता. अचानकपणे काय घडले कोण जाणे! त्याच्या मेंदूचा तोल गेला. तो ठार वेडा झाला. त्या स्थितीत त्याला त्याच्यासमोर खुर्चीवर कुणीही बसलेले रुचेना. तो मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर जाऊन बसू लागला. एके दिवशी कार्यालय बंद असताना तो वाचनालयात आला. नेहमीप्रमाणे गुरुजी खुर्चीत पुस्तक वाचीत बसले होते. त्याने गुरुजींना खुर्चीत बसलेले पाहिले. तो पुढे सरसावला. त्याने गुरुजींना फाडकन मारले. क्षणभरच काय झाले ते गुरुजींना कळेना, मात्र दुसऱ्या क्षणालाच सारी वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली. साऱ्या विद्यालयात बातमी पसरली. विद्यार्थी जमा झाले. त्यांनी गोविंदाला घेरले. त्याने काही काळ प्रतिकार केला. नंतर केविलवाण्या नजरेने शून्यात पाहू लागला. विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष त्याच्या अंगावर धावून गेला. त्याने उगारलेला हात गुरुजींनी एकदम पकडला आणि म्हणाले, “वेड्याची थप्पड खावयास भाग्य लागते. मी भाग्यवान आहे.’’ एकाच वेळी सेवकाच्या मनाची स्थिती जाणून घेणारे आणि विद्यार्थ्यांना अंतर्मुख बनवून विचारप्रवृत्त करणारे त्यांचे वर्तन विद्यार्थ्यांना वर्गातील अभ्यासक्रमापेक्षा फार काही शिकवणारे होते. सेवकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे भेटण्यासाठी गुरुजी जात असत. त्याला आर्थिक मदत करत असत. त्यातच पुढे तो निधन पावला. गुरुजी सांत्वनासाठी त्याच्या घरी गेले. संस्थेने त्याच्या कुटुंबीयांना मदत करावी, याची खटपट केली. माणसांच्या माणूसपणावरील त्यांची गाढ श्रद्धा, विद्यार्थ्यांसाठी मानवी जीवनाचा आदर्श वस्तुपाठ होती. मानव्याच्या अस्तित्वाचा तो जिवंत शिलालेख होता.

एकेकाळी नांदेड शहराच्या सांस्कृतिक चळवळीचे प्र.नि.विद्यालय हे एक केंद्र होते. शहरातील प्रत्येक भागातून विद्यार्थी येथे येत असत. स्नेहसंमेलन म्हणजे साऱ्या शहराचे आकर्षण. साऱ्यांची गर्दी नेहमी उसळलेली. साहित्यासोबतच नाट्य आणि संगीत हे संमेलनातील आकर्षण होते. एके वर्षी रात्री विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी असलेल्या नाटकाचा प्रयोग होता. गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून प्रवेशिका वाटण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वारावर कठोर अंमलबजावणीसाठी शिस्तप्रिय कुरुंदकर गुरुजींना सांगण्यात आले होते. मा. शंकररावजी चव्हाण वीज व पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्याप्रमाणे ते त्यांच्या ताफ्यासह हजर झाले. प्रवेशद्वारावर प्रवेशिकेबद्दल गुरुजींनी विचारणा केली. मंत्रीमहोदयांच्या काय झाले, ते तात्काळ लक्षात आले. ते आल्या पावली परतले. बाबा बोधनकर आणि सर्जेगुरुजींना झाली गोष्ट लक्षात आली. ते तत्काळ धावून आले. मंत्रीमहोदयांना भेटण्यासाठी लागलीच निघाले. त्यांची भेट घेतली. दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली मात्र काही उपयोग झाला नाही. ते पुन्हा इकडे फिरकलेच नाहीत. ते दोघे निराश होऊन परतले. गुरुजींना काहीही बोलले नाहीत. नाटकाचा प्रयोग छान रंगला, पण वरील प्रसंगाचे गालबोट लागले. पुढे सहज गमतीने गुरुजी मुख्याध्यापकांना म्हणाले, “तुम्ही दोघांनी माफी मागितली. पण चूक कोणाची? दिलेले काम प्रामाणिकपणे करणे ही चूक असेल, तर मी माफी मागावयास तयार होतो.’’

मुख्याध्यापक निरुत्तर झाले. या प्रसंगाचे सावट बरीच वर्षे मा. शंकररावजींच्या मनावर होते. संस्थेचे व त्यांचे संबंध तणावपूर्णच राहिले. पुढे गुरुजींची विद्वान, लेखक, समीक्षक, विचारवंत व वक्ते म्हणून ख्याती झाली. मा. शंकररावजीही मोठ्या मोठ्या पदावर जात राहिले. झाल्या प्रसंगाची तीव्रता कालांतराने दोघेही विसरून गेले. दुरावा गेला. जवळीक निर्माण झाली. मराठवाड्यास मा. शंकररावजींच्या रूपाने मुख्यमंत्री मिळाला पाहिजे, असे आग्रही मत गुरुजींनी प्रतिपादन केले.

१९६३ चा नोव्हेंबर महिना. माझे वडील सतत आजारी होते. अनेकदा हबीब टॉकीजसमोर पूर्वी जे शासकीय रुग्णालय होते तेथे नेले, आणले होते. त्यांना किडनीचा त्रास होता. त्यावर उपाय कठीणच होता. माझे वडील आजारी आहेत, याची कल्पना गुरुजींना होती. रुग्णालयातून घरी आणले. ते सतत अंथरूणावर पडून होते. धोतराच्या चिंध्या झाल्या होत्या. खाली गादी नव्हती. अंथरलेल्या संतरजीवर त्यांना त्रास होत होता. एकदा तो त्रास असह्य झाला. मला जवळ बोलावले. म्हणाले, “मधू, वाटेल ते कर, पण मला उद्यापर्यंत एक गादी आणून दे आणि जमल्यास धोतर पण पहा. माझे शेवटचे मागणे आहे.’’ माझ्या पोटात कालवाकालव झाली. काहीच सुचत नव्हते. उठलो. सरळ गुरुजींकडे गेलो. हुंदका अनावर झाला. मन मोकळे केले. जवळ पैसे नव्हते. पुस्तक बाजूला टाकले. गुरुजी सरळ माझ्यासोबत निघाले. त्या वस्तू घेऊन दिल्या. मी घरी गेलो. माझे शेवटचे मागणे पूर्ण केले म्हणून वडील मला कुशीत घेऊन मन मोकळे करून घेत होते.

पुढे गुरुजी सतत माझ्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी करत असत. वरील घटनेनंतर दोन महिन्यांनी त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली. मी घाबरून गेलो. त्या आधी मी मृत्यू पाहिलेला नव्हता. अचानक एके दिवशी रात्री १० वाजता त्यांना घरघर लागली. त्यांचे निधन झाले. रात्रभर जागावयास मोजकेच  नातलग हजर होते. मी एका कोपऱ्यात गुढघ्यात मान घालून रडत बसलो होतो. तशीच काळरात्र संपली. पहाट झाली. हळूहळू बातमी प्रसृत झाली. वडिलांचे एक स्नेही घाई -घाईने आले. मला हुंदका अनावर झाला. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. थोड्या वेळाने मला बाजूला घेतले आणि म्हणाले, “मर्तिकाची सोय कशी? पैशाचे काय?’’ मला जीवनाचे खरे वास्तव आता समजले होते. ते पुढे म्हणाले, “आपण एक अर्ज करू मदत करणाऱ्या संस्था आहेत. तू सही कर. प्रसंग निभावून निघेल. काळजी करू नकोस.’’ मी माझे दुःख बाजूला ठेवले. म्हणालो, “तुम्ही चिंता करू नका, काहीतरी व्यवस्था होईल.’’

इतक्यात माझ्या दोन नातेवाईकांचा संवाद माझ्या कानावर आला. आशय असा- मुलास नोकरी आहे. पैसे फेडेल, चिंता करण्याचे कारण नाही. तूर्तास आपण वेळ निभावून नेऊ. त्यांचा अत्यंत व्यवहारी आणि सावध पवित्रा त्याही मन:स्थितीत माझ्या ध्यानात आला. माझी मलाच लाज वाटू लागली. सकाळीच बातमी माझ्या गुरुजींना समजली होती. ते ताबडतोब आले. त्यांनी सारी व्यवस्था शिक्षकांना सांगून करून ठेवली होती. मी निर्धास्त झालो. त्यांच्या खांद्यावर मस्तक ठेवले. मन मोकळे केले. पुढे सर्व व्यवस्थित पार पडले. पण आधीचे रामायण माझ्या नशिबी होते.

कुसुमावतीबाईंचा ‘कला धोबिणीचे वैधव्य’ हा धडा शिकवत असताना गुरुजी म्हणाले होते, ‘जीवनात हसण्यासाठी तर भाग्य लागतेच, पण काही जणांना रडण्याचेही भाग्य असावे लागते.’ मी या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. माझे वडील गेले होते, पण बापासारखा खंबीर पाठीराखा गुरुजींच्या रूपाने माझ्यामागे उभा होता. मी १० फेब्रुवारी १९८२ ला खरा पोरका झालो.

.............................................................................................................................................

​​‘नरहर कुरुंदकर : ते होते जीवित’  ​- ​संपा. प्रा. मधुकर राहेगावकर, अभंग प्रकाशन, नांदेड, पाने - १६७, मूल्य - २३० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4346

.............................................................................................................................................

विद्यार्थ्यांच्या जीवनातील कठीण प्रसंग म्हणजे त्यांना आव्हान वाटत असे. ते त्यांच्या मागे उभे राहत. त्यांचे प्रेम माणसांच्या जीवनावर होते, नव्हे जीवन जगणाऱ्या माणसांवर होते. वैचारिक निष्ठा आणि वैयक्तिक ऋणानुबंध यात मानसिक संघर्ष निर्माण करणारे प्रसंग गुरुजींच्या आयुष्यात अनेकदा आले. त्या वेळी सारे दोषारोप सहन करूनही त्यांचा कल मानवी संबंधांकडे अधिक झुकलेला असे. जीवनावरील व माणसांवरील अतीव श्रद्धेने ते असेच वागत राहिले. स्वत: स्वीकारलेल्या वैचारिक तत्त्वाविरुद्ध वागून लोकनिंदेने भाजून जात असताना आपण कुणाच्या तरी ऋणाची किंमत मोजत आहोत, यात अंतिमत समाधान आहे. तसेच वेदनेचाही भाग आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

शेवटी मानवी जन्म तरी काय आहे? अंतिमत एका अंताचा तो आरंभ आहे. हे जीवनातील कटुसत्य ज्यांना उमगले त्यापैकी गुरुजी एक महनीय व्यक्तिमत्त्व होते. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे झेपावण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. हा जीवनप्रवास वेदनेतून जात असतो. या वेदनेवर हळुवार फुंकर घालून जगणे सुसह्य बनवणे, या दिशेने आपली वाटचाल पाहिजे, हीच गुरुजींची जीवननिष्ठा होती. ते त्या पद्धतीनेच जीवन जगत राहिले. त्यांची ही भूमिका त्यांनी एके ठिकाणी स्वत:च नमूद केली आहे. ‘गोमन्तक’ या नियतकालिकाचे संपादक माधव गडकरी  यांनी गुरुजींना एक लेख पाठवण्याबद्दल पत्र लिहिले होते. त्यात आरंभी त्यांनी असे म्हटले होते की, माणसांनी माणसांना माणसासारखे वागवावे ही अगदी साधी अपेक्षा आहे. जेव्हा समाजात ही साधी अपेक्षाही पूर्ण होताना दिसत नाही, तेव्हा विचारी आणि मानवतावादी मन विषप्ण होते. या पत्राला लेखासोबत पाठवलेले उत्तर आहे.

ते असे- “माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे, हे सूत्र मला मान्य आहे. ते नुसते मान्य नाही, तर माझ्या जीवननिष्ठेचे एक प्रकारे सार आहे. त्यामुळे मी संपूर्णपणे या सूत्रातील विचाराला मनाने आणि बुद्धीने बांधलेला आहे. आचारानेही या सूत्राशी जास्तीत जास्त बांधिलकी ठेवण्याचा माझा सततचा प्रयत्न असतो. पण ही अपेक्षा साधी आहे, हे मात्र मला मान्य नाही. माणसांनी माणसांशी माणसासारखे वागावे, ही अपेक्षा अत्यंत अवघड आणि आचरणात आणण्यास कठीण आहे. ती अवघड आणि कठीण आहे, म्हणूनच तिच्यासाठी जन्मभर झटणे, गरज पडेल, तर या कल्पनेच्या पुरस्कारासाठी जी कोणती किंमत द्यावी लागेल ती देणे आवश्यक ठरते. जे अवघड आहे, ते सोपे समजण्याची चूक आपण करू नये. आणि जे अवघड असले, तरी आवश्यक आणि अपरिहार्य आहे, ते अस्तित्वात आणण्याची जिद्दही आपण सोडू नये.” ही त्यांची जीवननिष्ठा लक्षात घेऊन त्यांना समजून घेणे आणि आपल्या जीवनाची दिशा निश्चित करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......