एकेकाळी जैद वाईट संगतीच्या मुलांच्या नादीला लागून वाया तर जाणार नाही ना अशी शंका वाटत होती. पण वडिलांची एक युक्ती अशी काही कामी आली की, जैदच्या आयुष्याचा तो टर्निंग पॉइंट ठरला. तो स्वत: तर वाईट संगतीपासून दूर झालाच, पण आज लहान-मोठ्या गुन्ह्यांत अडकणाऱ्या मुलांना आयुष्याची चांगली दिशा देण्याचं काम करत आहे.
जैद सय्यद हा तरुण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टीआयएसएस) रिर्सोसेस सेलमध्ये काम करत आहे. या माध्यमातून विधीसंघर्षित बालकांचं समुपदेशन, पुनवर्सनाचं पुण्यातील काम पाहत आहे.
पुण्यातील बाल न्याय मंडळात येणाऱ्या विधीसंघर्षित मुलांना सामाजिक आणि न्यायिक मदत पुरवण्याचे काम जैद करतो. इथं येणारी मुलं चोरी, नशाबाजी, अपघात किंवा अगदी बलात्कार, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यांत अडकलेली असतात. काही अडकवलेली असतात. बहुतांश मुलं किरकोळ चोरी किंवा मोटारसायकलींची चोरी करणारी असतात. अशा मुलांना गुन्हेगार न मानता, त्यांची परिस्थिती समजून घेणं, त्यांचं म्हणणं ऐकणं, गोरगरिब असतील तर त्यांना विधी सेवा प्राधिकरणाचा वकील मोफत उपलब्ध करून देणं, समुपदेशन करणं, कामाचं प्रशिक्षण देणं आणि मार्गी लावणं अशी एक मोठी जबाबदारीची प्रक्रिया राबवावी लागते. अर्थात इथंच ही जबाबदारी संपत नाही तर ती मुलं पुन्हा वाममार्गाला लागणार नाहीत ना याच्याकडेही लक्ष द्यावं लागतं. टीएसएसच्या माध्यमातून हे सर्व काम जैद आणि त्याचे दोन साथी मिळून करत आहेत. याशिवाय तो राबता फाऊंडेशन या आपल्या एनजीओमार्फतही विविध उपक्रम करत आहे. या माध्यमातून उडान एक्सप्रेस ही मिनीबस सुरू केली आहे. देशात शिक्षणाविषयी जनजागृती करणं आणि मरगळलेल्या लोकांमध्ये चेतना निर्माण करणाऱ्या गोष्टी सांगण्याचा मुख्य उद्देश ठेवून ही मिनीबस फिरत आहे.
जैद तसा सुशिक्षित संपन्न कुटुंबातला. त्याच्या भावंडांपैकी काही जण तर उच्च शिक्षण घेऊन परदेशीही गेले आहेत. पण जैदच्या बाबतीत म्हटलं तर त्याला त्याची दिशा अशी सापडतच नव्हती. अभ्यासाची आवड नाही आणि पुढे आपल्याला काय करायचं याची जाण नाही अशा अवस्थेत जैद होता. जैदचे वडील एकेकाळी उर्दू दैनिक इन्कलाबचे वार्ताहर होते. शिवाय त्यांना स्वत:ला सामाजिक कार्याची आवड असल्यानं ते सतत उपक्रमशील राहिले. बाबरी मशीद पडल्यानंतर सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘सारे जहाँ से अच्छा...’ या नावानं ते ठिकठिकाणी नाटक करायचे. पुढे याच नावानं या नाटकाचं पुस्तकही प्रकाशित झालं. आजही ते ठिकठिकाणी ‘मोटिवेशनल स्पीकर’ म्हणून जातात.
वडिलांची ही ख्याती आपल्याला उभं करायला पुरेशी आहे असा काहीसा गर्व जैदला होता. जैद सांगतो, “मी पहिल्यापासून अभ्यासात मागे. दहावीपर्यंत पन्नास टक्क्यांच्या आसपास राहिलो. जगण्याची दिशा ठरलेली नव्हती. माझ्या घरात सख्खे, चुलत मिळून आम्ही एकूण १२ भावंडं आहोत. त्यापैकी ९ जण डॉक्टर आहेत. माझी मोठी बहीण एम. डी. आहे. भाऊसुद्धा डॉक्टर आहे. या गोष्टीचं दडपण वाटायचं, पण ते लगेच निघूनही जायचं. अब्बांना लहानपणापासून समाजकार्य करताना पाहिलंय. तर वाटायचं आपण असं काहीतरी करूयात. पण तेही काही पक्क नसायचं. शिवाय घरच्या सुबत्तेमुळे गरिबी, पैशांचा अभाव अशा गोष्टीही नव्हत्या की, आपण त्यासाठी उभं रहावं. आला दिवस मजेत घालवा इतकंच माझं तत्त्वज्ञान होतं. शिवाय वस्त्यांवस्त्यांमध्ये भाईगिरी करत फिरणाऱ्या मुलांची कमी नसते. माझीही अशा मुलांशी चांगलीच गट्टी जमली. त्यांच्याबरोबर तासन तास टाईमपास करणं, उनाडक्या करणं, टिंगलटवाळी करणं यात दिवस जायचा आणि मुख्य म्हणजे हे चुकीचं आहे याची जाणीवही नव्हती. बारावीला मला ३८ टक्के पडले. एवढे कमी टक्के मिळाल्यानं नाही म्हटलं तरी वाईट वाटलं. पण वडिलांनी हुरूप दिला आणि अगदी पेढे वाटायला लावले.”
जैद पेढे वाटत असताना अर्थातच लोकं त्याची टक्केवारी विचारत आणि मग मोठ्या भावंडांची हुशारी आणि त्याचा मठ्ठपणा यांची तुलना झाली. परिणामी, आपलं काही अभ्यासात होऊ शकत नाही असं वाटून तो अधिकच घराबाहेर राहून टवाळक्या करत फिरू लागला आणि वडिलांना काळजी वाटू लागली. दरम्यान त्याने बी. ए.साठी प्रवेश घेतला होता. पण कॉलेजमध्येही तासाला बसण्यापेक्षा कँटीनमध्ये टाईमपास कर, लेक्चर्स बुडव असे उद्योग चालायचे. मग वडिलांनी डोकं लढवलं आणि त्याला सांगितलं ‘तू अभ्यासाबरोबरच स्वत:चा काहीतरी व्यवसाय सुरू कर.’ त्यासाठी त्यांनी सशे पालनाची गोष्ट सुचवली. मुलाला चांगलं वळण लागावं म्हणून वडिलांनी नुकसान होणार आहे हे माहीत असतानाही सशापालनाची जबाबदारी जैदवर टाकली. सतत निकम्मा समजल्या जाणाऱ्या जैदला ही जबाबदारी महत्त्वाची वाटू लागली. त्यामुळे त्यानेही पूर्णपणे झोकून देऊन कामाला सुरुवात केली. सशांकडे लक्ष देणं, त्यांचं खाणं-पिणं पाहणं, खोलीची स्वच्छता अशा एक ना अनेक गोष्टी तो करू लागला. त्यामुळे आपोआपच त्याला कोणी बाहेर बोलावायला आलं की, तो या कामात व्यस्त असे. मग याव्यतिरिक्तच्या वेळात अभ्यास असा दिनक्रमच तयार झाला. परिणामी मन भरकटणं कमी झालं आणि तो अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू लागला. या काळात त्याला अभ्यासाचीही गोडी वाटू लागली. कालांतरानं व्यवसाय मागे पडला पण जैदच्या वडिलांना जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं होतं. वाईट संगतीपासून जैद वाचला होता.
बी.ए.च्या शेवटच्या वर्षी जैद आपल्या चुलत भावाकडे पाचगणीला गेला. एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी जैदचा हा चुलत भाऊ काम करत होता. कामाविषयीची त्याची आस्था, झोकून देऊन काम करणं हे सर्व पाहून जैद भारावून गेला आणि त्यानं ठरवलं की आपणही एम.एस.डब्ल्यू करायचं. घरातही त्याच्या वडिलांमुळे त्याला सामाजिक काम आणि त्यातील गुंतागुंत याची पुसटशी ओळख होती. आई-वडिलांनी विश्वास दाखवला.
शिक्षण पूर्ण होताच जैद ‘सेव्ह द चिल्ड्रेन’ या संस्थेत रुजू झाला. इथल्या अनुभवाविषयी जैद सांगतो, “इथं माझ्या कामाचं स्वरूप निधी मिळवणं या स्वरूपाचं होतं. या कामात मला रस नव्हता. आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं आहे, असं त्याला वारंवार वाटत होतं. त्याबाबत वरिष्ठांशी बोललो तर ते म्हणायचे, ‘हाही त्याच कामाचा एक भाग आहे. हा निधी अंतिमत: मुलांच्या भल्यासाठीच तर तू गोळा करत आहेस.’ त्यांचं म्हणणं तंतोतंत बरोबर होतं, पण माझं अशा प्रकारच्या कामात मन रमत नव्हतं. त्यामुळे तिथून लवकरच बाहेर पडलो.”
यानंतर जैद पिपल्स फाऊंडेशनमध्ये स्वत:ला अजमावू लागला. ते सगळे शिकण्याचे आणि समजून घेण्याचे दिवस होते. इथं त्याला खूप वेगवेगळे अनुभव आले. जैद सांगतो, “लहान मुलांमध्ये मूल्य रुजवणं आणि मूल्यवर्धन करणं यासाठी शाळांमध्ये जाऊन काम करायचा असा एक प्रकल्प होता. यासाठी आधी शाळांना जोडून घेणं गरजेचं होतं. या कामाची माझ्यावर जबाबदारी टाकली. त्यासाठी मी सर्वांत आधी उर्दू शाळांना जोडून घेतलं. मी ज्या परिसरात वाढलो होतो, जे बघत वाढलो होतो, ते पाहता मला असं वाटलं की, उर्दू शाळांनाही या प्रकल्पाशी जोडून घ्यायला हवं आणि मी तसं केलं. मात्र यातून माझ्या वरिष्ठांना वाटलं की, मी हे जाणूनबुजून करत आहेत. त्यांनी मला बोलावून सांगितलं की, आपण संस्थेत सर्व धर्मांसाठी काम करतो. तू फक्त असा मुस्लिम शाळांचाच का विचार करतो आहेस? हा प्रश्न माझ्यासाठीही नवा होता. संस्थेच्या कामांमध्ये आपण धर्मनिरपेक्षपणेच काम करायला हवं हे मलाही कळत होतं, पण उर्दू शाळांमध्ये काम करणाऱ्या संस्था कुठे आहेत? माझ्या आसपासच मला घाण दिसत असेल तर मी झाडू घेऊन अन्य ठिकाणी जाऊन झाडण्याला काय अर्थ? माझा दृष्टिकोन मी वरिष्ठांना सांगितला. त्यांनाही तो पटला. पण ही गोष्ट माझ्या मनाला चटका लावून गेली. माझ्या कामामागचा दृष्टिकोन विचारण्याआधी मला थेट त्याविषयी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांचा हेतू चुकीचा नव्हता तरीही...!”
जैद हा पुण्याच्या मुस्लिम बहुल समजल्या जाणाऱ्या कोंढवा परिसरात लहानाचा मोठा झाला. उर्दू माध्यमात शिकला. त्यामुळे त्याला उर्दू शाळांतील प्रश्न अधिक जवळून कळत होते. जैद सांगतो, “मी लहान असताना, कोणत्याही संस्था माझ्या शाळेत कुठलाही उपक्रम घेऊन आल्याचं मला तरी आठवत नाही. एकप्रकारे उर्दू माध्यमातील शाळा मुख्य शालेय व्यवस्थेशी तुटल्यासारख्या वाटतात. मी स्वत: फिल्डमध्ये उतरल्यानंतरही कधी उर्दू शाळांमध्ये, मुस्लिम वस्तींमध्ये काम करणारी फारशी माणसं पाहिलेली नाहीत. त्यामुळे मला त्यांच्यासाठी काम करायला आवडतं. तिथले प्रश्न समजून घेणं हे महत्त्वाचं वाटतं. आता मी राहत असलेल्या कोंढवा परिसराचा विचार केला तर सध्या या भागात तरुणांची युवा मंडळं, बज्म ए सर्कल असं नाव असणारे गट दिसायला लागले आहेत. भाईगिरी करणाऱ्या या मुलांपुढे कुठलंच लक्ष्य नाही. त्यामुळे इथंही तेवढ्याच कामाची गरज आहे.”
जैदने कोंढव्यातील आठ शाळांमध्ये मूल्यवर्धनाचा प्रकल्प हाताळला. याशिवाय पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये, विशेषकरून झोपडवस्ती असणाऱ्या परिसरांतील शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला. तो या प्रकल्पाचा प्रमुख होता. विद्यार्थ्यांना खेळीमेळीतून अगदी साध्या गोष्टी सांगणं हा उपक्रमाचा भाग होता. उदाहरणादाखल तो सांगतो, “आपण मुलांना धाडसाविषयी खूप गोष्टी सांगतो. राजामहाराजांच्या पराक्रमाची गोष्ट सांगतो. पण साधं खरं बोलण्यासाठी धाडस लागतं किंवा जी माणसं खरं बोलतात ती किती धाडसी असतात हे सांगत नाही. अशा स्वरूपाचं काम आम्ही करत होतो. शिवाय शिक्षकांनाही नेमकं मुलांशी कसं वागावं, बोलावं याबाबत सतत अपग्रेड करण्यासाठी काही कोर्सेस घेणं, पालकांसाठीही प्रशिक्षण शिबीरं… त्या मुलांशी जोडून राहणं असा दीर्घ प्रक्रियेचा हा कार्यक्रम होता.”
या प्रकल्पावर जैद दोन वर्षं राहिला. त्याच्या एकूण कामाच्या पद्धतीमुळे सुरुवातीला त्याच्यावर अविश्वास दाखवलेल्या संस्थाप्रमुखांनाही नंतर आनंद वाटला. या संस्थेतील कामानंतर जैद आर्क या लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेसोबत गेला. मुलांच्या हक्कासाठी काम करणारी ही शिखर संस्था. त्याआधी त्यानं कसून अभ्यास करून कायद्याची माहिती करून घेतली. या संस्थेच्या माध्यमातून त्यानं अनेक वेळा बालकामगारांची सोडवणूक केली. कायदा आणि पोलिस यांची विचित्र तेढ असते असं सांगत जैद म्हणतो, “बाल न्याय कायद्यानुसार, १८ वर्षाखालील कामगार मुलं ही बालकामगारच असतात. मात्र पोलिस १४ वर्षांवरील मुलांना पकडत नाहीत. अशा वेळी पोलिसांशी खूप हुफात घालावी लागते. हॉटेल मालकही वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणायचा प्रयत्न करतात. एकदा असंच सापळा रचून एका हॉटेलमधून मुलाची सोडवणूक केली तर स्थानिक नगरसेवक, कार्यकर्त्यांनी फार त्रास दिला. बालकामगार सापडल्याची तक्रार लिहून घेण्यासाठी पोलिसही तयार नव्हते. खरं तर त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र होतं. कृतीदल म्हणून आम्हाला अशा प्रकारे कारवाई करण्याची पुर्ण मुभा होती, मात्र कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत होते. शेवटी पोलिसांनीच त्यांना हुसकावून लावलं आणि रात्री बाराच्या सुमारास तक्रार नोंदवून घेतली. अशा प्रकारचे खूप अनुभव येत गेले आणि त्यातून शिकतही गेलो.”
जैदने आर्कबरोबरच असताना शाळांमध्ये राईट टू एज्युकेशन कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठीही खूप प्रयत्न केले. अनेकदा शाळेतील मुलांसाठी गणवेश, वह्या-पुस्तकं, रेनकोट अशा वस्तू कागदोपत्री दिलेल्या दिसायच्या, मात्र प्रत्यक्षात त्या पोहचलेल्या नसायच्या. यासाठी पाठपुरावा करून त्या मिळवण्याचं काम तो आवडीनं करत होता. याच सुमारास टीएसएसमध्ये लहान मुलांचा एक प्रकल्प हाताळण्यासाठी पुण्यातील व्यक्तीची गरज असल्याचं माहीत झालं. जैद त्या प्रकल्पात सहभागी झाला. एकेकाळी जैद स्वत: वाईट संगत असणाऱ्या, भाईगिरी करत फिरणाऱ्या मुलांबरोबर फिरला होता. त्यामुळे एकाअर्थी त्याच्या स्वानुभवाचा फायदा मुलांना चांगल्या वाटेवर आणण्यासाठी होत आहे.
टीएसएसचा हा पथदर्शी प्रकल्प पुणे, मुंबई, यवतमाळ, अमरावती या ठिकाणी सुरू आहे. पुण्यातील हा प्रकल्प जैद व त्याचे दोन साथी पाहत आहेत. जैद आपल्या या अनुभवाविषयी सांगतो, “इथं चोरी, नशाखोरी अशा प्रकरणांमध्ये जास्त करून मुलं येतात. गरिबाघरची जास्त असतात. पालकांना कायदेशीर माहिती नसते. अशा वेळी त्यांना मोफत वकील मिळवून देण्याचं काम आम्ही करतो. मुलांचं समुपदेशन करतो. त्यांची समस्या समजून घेऊन त्यांना मदत करतो. पालकांनाही समुपदेशनाची गरज असते. अन्यथा तेही मुलांना दोष देत राहतात. त्यामुळे मुलं सुधारण्याऐवजी अधिक बिघडतात. १४-१५ वर्षांपुढील मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग, रंगारी काम, हाऊसकिपिंग, इंग्लिश स्पिकिंग क्लासेस शिकवली जातात. मुलं इथून बाहेर पडतात, तेव्हाही आमची गरज असते. अनेकदा शाळा त्यांना परत घेत नाहीत. किंवा मग शिक्षक-मुलांचं वागणं चुकीचं असतं. तेव्हा शाळेत भेट देऊन शिक्षकांनाही याविषयी समजावून सांगतो. मुलांकडे कसं पाहिलं पाहिजे हे शिक्षकांना सांगावं लागणं हे दुर्दैवच! पण तेही करावं लागतं.
आपल्या समजात शिक्का मारणं ही लोकांची आवडती सवय असते. एखादा एकदा का निरीक्षणगृहात जाऊन आला की, त्याच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहिलं जातं. खरं तर कायदाही त्यांना गुन्हेगार समजत नाही. पण या मुलांना त्यांची चूक, गुन्हा याची सतत आठवण करून दिली जाते. मुलांपेक्षा या पठडीबाज शिक्कामोर्तब करणाऱ्या मानसिक वृत्तीवर आम्हाला आमची ऊर्जा अधिक खर्चावी लागते.”
निरीक्षणगृहातून मुलं बाहेर पडली की, संस्था हात झटकून मोकळी होत नाही. उलट त्यांचं सर्व सुरळीत सुरू होईपर्यंत त्यांच्या पाठीशी राहते. पुण्यातील ३९ पोलिस स्टेशनमध्ये जैदच्या मोबाईल नंबरची नोंद आहे. जेणेकरून बालकांना काही अडचण आल्यास ते त्याला केव्हाही फोन करू शकतात. याविषयी जैद सांगतो, “मुलं बाहेर पडल्यानंतरही आम्ही साधारण काही महिने त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. ती पुन्हा या दृष्टचक्रात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची चौकशी करत राहणं, ती योग्य वाटचाल करत आहेत की नाही हे पाहणं सुरू राहतं. यामुळे मुलांमध्ये कुणीतरी आपल्यासोबत आहे याची भावना प्रबळ होते अन ते वाममार्गाकडे वळण्यास धजावत नाहीत. काही वेळा तर पोलिस, चोरीच्या गुन्ह्यात खूप दिवस गुन्हेगार सापडले नाहीत तर या मुलांवरच ते गुन्हे नोंदवून त्यांना पकडतात. अशा वेळी मुलं खचतात. गुन्हा नसताना अटक झाल्यानं मुलांचा यंत्रणेवरचा विश्वास उडतो. त्यामुळे अशा मुलांना आपण सोबत आहोत ही जाणीव देणं खूप महत्त्वाचं असतं. पोलिसांनाही सेंसीटाईज करण्यासाठी कार्यक्रम, उपक्रम राबवत असतो. काही मुलं गुन्हेगारीच्या दलदलीतून लवकर बाहेर पडतात. क्षणभराची चूक विस्मरणात ढकलून उज्वल भविष्याची हाक देतात. निरीक्षणगृहातून बाहेर पडलेले काहीजण डॉक्टर, इंजिनियर, हॉटेल मॅनेजर असे उच्चशिक्षितही झाले आहेत. वेळीच मार्गदर्शन, प्रेम आणि त्यांच्या प्रश्नांना समजून घेतल्यास ही मुलंही पुढे चांगलं आयुष्य जगू शकतात.”
याचबरोबर जैद वडील व पत्नी मदिहाबरोबर राबता फाऊंडेशनचंही काम पाहत आहे. राबता फाऊंडेशन ही त्यांची स्वत:ची संस्था आहे. या माध्यमातून शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी एक डिजिटल बस त्यांनी तयार केली आहे. मुस्लिम एज्युकेशन नॉर्थ एशियाय या संस्थेनं या प्रकल्पासाठी निधीची मदत केली आहे. या बसमध्ये प्रोजेक्टर व बैठकव्यवस्था आहे. व्याख्यान देण्यासाठी आवश्यक सोयी आहेत. ही बस दुर्गम भागात शिक्षणाचं महत्त्व सांगत फिरते. वाड्या वस्त्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं विविध योजना, शिक्षणाच्या योजना पोहचवण्याचं काम करते. दीर्घकालीन उपक्रम असल्यानं टप्प्याटप्यानं तो देशभर फिरत राहणार आहे. आत्तापर्यंत सात राज्यात ५२ गाव-शहरांमध्ये प्रसाराचं हे काम झालं आहे आणि येत्या काळातही ते सुरू राहणार आहे.
हा प्रकल्प फक्त मुस्लिम भूभागासाठी आहे का असा प्रश्न केल्यावर जैद म्हणाला, “आपल्या देशातील सर्व आर्थिक निम्न स्तरातील लोकांना डोळ्यापुढे ठेवलं आहे. शिक्षणाचा अभाव, रोजगाराच्या अपुऱ्या संधी, अपुरी माहिती यामुळे मागे पडलेल्या सर्वांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्व अशिक्षित बांधव सुशिक्षित झाल्यास समाजात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होऊ शकते. मुलींच्या शिक्षणामुळे त्यांच्यावर कोसळलेल्या प्रत्येक परिस्थितीत त्या झुंजारपणे उभ्या राहू शकतात. शिक्षणाचा हा सकारात्मक संदेश घेऊन आम्ही आपल्या देशवासीयांसाठी फिरत आहोत.”
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.
greenheena@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Thu , 01 February 2018
सुंदर....