अजूनकाही
शिक्षणतज्ज्ञ अरविंद गुप्ता यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं ३० नोव्हेंबर २०१४ रोजी ‘स्टोरी ऑफ स्टफ’ या अॅनिमेशन पटांच्या मराठी आवृत्तीच्या उद्घाटनप्रसंगीचं भाषण. हा कार्यक्रम इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, पुणे इथं झाला होता.
.............................................................................................................................................
खगोलशास्त्रावर संशोधन करणारी पुण्यातली ‘आयुका’ नावाची जी संस्था आहे, तिथंच ‘मुक्तांगण विज्ञान केंद्र’ आहे. गेली अनेक वर्षं अरविंद गुप्ता आणि त्यांचे सहकारी तिथं काम करतायत.
अरविंद गुप्ता हे स्वतःला ‘विज्ञान प्रसारक’ म्हणवून घेतात. तितकं त्यांना पुरेसं वाटतं. पण या एका शीर्षकामागं कोणता माणूस दडलाय हे समजून घेणं आवश्यक ठरतं.
मुक्तांगण केंद्रामधली ही खोली म्हणजे ऊर्जाकेंद्र आहे. खोलीत गेल्यानंतर नजर एका ठिकाणी ठरत नाही. सगळ्या भिंतींवर रंगीबेरंगी खेळणी, विज्ञानाचे प्रयोग, असंख्य भिरभिरे, कारंजी, पंप, कागदांच्या वस्तू, टूथपेस्ट आणि बाटल्यांची टोपणं, पाण्याच्या बाटल्या, लोहचुंबक, तारांची भेंडोळी, ओरिगामीचे कागद, काड्यांपासून केलेल्या भूमितीय आकृत्या अशा अनेक गोष्टी. या सगळ्या टाकाऊ गोष्टींमधनं तयार होतात अदभुत खेळणी, जी विज्ञानाची तत्त्वं तर समजावून सांगतातच, पण त्या आधी आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवतात. आश्चर्यानं आपण भारून जातो.
अरविंदजींना ‘विज्ञानाचा जादूगार’ म्हटलं जातं. पण आपण इथं थांबूया नको. जादूगार थक्क करतो आणि निघून जातो. अरविंदजी त्याच्या पुढची जबाबदारी घेतात. गूढ उकलून दाखवण्याची. पाबळचा विज्ञान आश्रम जसं डी-मिस्टिफिकेशनचं काम करतो, तसंच अरविंदजीसुद्धा वस्तू खोलून मोडूनतोडून पुन्हा नव्यानं बनवतात. ‘द बेस्ट थिंग अ चार्इल्ड कॅन डू टू अ टॉय इज टू ब्रेक इट’ असं ते मानतात.
या केंद्रानं विज्ञान खेळणी कशी बनवावीत हे सांगणाऱ्या एकेक मिनिटाच्या फिल्मस बनवल्या आहेत. तब्बल ७५० फिल्म्स! आणि त्यांचं रूपांतर १८ भाषांमध्ये. कोणत्या भाषा? हिंदी, मराठी, गुजराती, मल्याळम, कन्नड, उडिया, पंजाबी, तमीळ, बंगाली ही यादी इथंच थांबत नाही. चायनीज, कोरियन, जापनीज, उझ्बेक, ताजिक, फ्रेंच, रशियन, कोरियन, स्पॅनिश…अजून किती हव्यात? एक मात्र आहे, ही बहुतेक सगळी भाषांतरं त्या त्या भाषेतल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे, आपणहून केलेली आहेत. कोणताही करार न करता, पैशांची कोणतीही देवाणघेवाण न होता, ही कामं निव्वळ एकमेकांना जोडून घेण्याच्या इच्छेतून तयार झालेली आहेत.
अरविंदजी झपाटून अनुवाद करत असतात. जगभरातली चांगली पुस्तकं ते एकहाती भाषांतरित करतात. अनुवादाचा बॅक टू बॅक नॉन स्टॉप धमाका इथं सुरू असतो. जगभरात चांगलं काही निर्माण झालं की, त्याचा अनुवाद मराठीत आणि हिंदीत होतो. चांगला मराठी लेख दिसला की, तो इंग्रजीत भाषांतरित होतो.
चित्ररूपी पुस्तकांवर त्यांचं भारी प्रेम आहे. त्यांना अनेक मित्र भेटलेत जे स्वतः चित्रं काढतात आणि अरविंदजी लिखाण करतात. आणि हां हां म्हणता नवं पुस्तक समोर येतं. अरविंदजींनी स्वतः भरपूर लिखाण केलं आहे. दुर्मीळ पुस्तकं स्वतः टार्इप करून लोकांना वाचायला उपलब्ध करून दिली आहेत. दूरदर्शनवर त्यांचे विज्ञान खेळण्यांचे असंख्य कार्यक्रम झाले आहेत.
अजून एक गोष्ट. त्यांच्या ऑफिसमधला स्कॅनर सतत चालू असतो. भारतातली आणि जगभरातली उत्तमोत्तम पुस्तकं पूर्ण स्कॅन करून सगळ्यांना मोफत वाचता येतील आणि डाऊनलोड करता येतील अशी सोय या माणसानं केली आहे. जे जे चांगलं आहे, ते ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असा ध्यास घेतलेला हा माणूस आहे. कॉपीलेफ्ट चळवळ किंवा ओपन सोर्स चळवळीचा हा भारतातला फार महत्त्वाचा माणूस आहे.
त्यांच्या वेबसार्इटवर जाऊन बघितलंत तर चक्रावून जायला होतं. थोर शिक्षणतज्ज्ञ जे.पी.नार्इक यांची जवळजवळ संपूर्ण ग्रंथसंपदा, डी.डी.कोसंबींची पुस्तकं, आयझॅक अॅसिमोव्हची पुस्तकं, अनेक थोर लेखकांची महत्त्वाची पुस्तकं, शिवाय पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, अंतराळ, आरोग्य, लैंगिकता, पर्यावरण, गणित, अणुऊर्जा, शेती, समाजशास्त्र, महाराष्ट्रातल्या चळवळी अशा जगण्याच्या सगळ्या अंगांना स्पर्श करणारी जगभरातली महत्त्वाची पुस्तकं या वेबसार्इटवर आहेत. दररोज ५००० पुस्तकं या वेबसार्इटवरून डाऊनलोड होतात. काही लाख लोक रोज या फिल्म्स बघतात. अनुवादित करतात. अरविंदजींच्या खोलीमध्ये जगभरची माणसं, पुस्तकं, विचार सतत येत-जात असतात. जे जे ऊर्जादायी आहे, ते ते त्या खोलीत आपोआप पोचतं.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. समाजापासून आणि मूलभूत प्रश्नांपासून स्वतःला तोडून घेऊन काम करणारे अनेक शास्त्रज्ञ आणि लोक आपल्याला दिसतात. अरविंदजी त्यातले नाहीत. शंकर गुहा नियोगींच्या संघर्षात्मक कामात ते होते. डॉ.अनिल सद्गोपाल, प्रा. यशपाल, प्रा. कृष्णकुमार, लीलातार्इ पाटील अशा शिक्षणक्षेत्रातल्या महत्त्वाच्या लोकांबरोबर ते काम करत आलेयत. आपल्या जडणघडणीमधे यदुनाथ थत्त्यांचा आणि राष्ट्र सेवादलाचा मोठा वाटा आहे हे ते आवर्जून सांगतात. आपण हे लक्षात घेऊया की, त्यांचं विज्ञानासंदर्भातलं काम ही त्यांची व्यापक राजकीय कृती आहे. त्यामुळं त्यांना त्या संदर्भापासून तोडून आपण बघूया नको. त्यांचा आपण विज्ञानाचा जादूगार बनवूया नको. आपण त्यांचं पोस्टर बनवूया नको. आणि आजच्या मॉलसंस्कृतीमध्ये त्यांची विक्री होऊ नये याचीही आपण काळजी घेऊया़.
मंडळी आपल्या सगळ्यांना सध्या खूप राग येतोय. गर्दीचा, गाड्यांचा, धुराचा, स्वतःचा, इतरांचा, दुसऱ्या जातीचा, दुसऱ्या धर्माचा. आपण सारे अस्वस्थ आहोत. चटकन निराश होतो आहोत. अरविंदजी निराश होतात की नाही माहीत नाही. त्यांना राग येतो की नाही माहीत नाही. पण राग आलाच तर ते एक पुस्तक भाषांतरित करत असावेत किंवा फारच राग आला तर स्वतःच पुस्तक लिहीत असावेत असं वाटतं. असो. ही थोडी गंमत झाली.
अरविंद गुप्ता हा एक आवेग आहे. जबरदस्त पॅशन आहे. या धबधब्याखाली गेल्यावर तुम्ही कोरडे राहू शकत नाही. तुम्हीही वाहते होता. साचलेपण दूर होतं. त्यांच्या खोलीत जाताना आपण सिनिक असतो, नाराज असतो, निराश असतो, साशंक असतो. बाहेर येताना मात्र आपण मुलासारखं ताजेतवानं होऊन येतो. जगण्यात जे जे सत्य आणि सुंदर आणि मंगल आहे, त्याची पूजा करणारा हा माणूस आहे. सध्या काही शब्द फारच बदनाम झालेत, आऊटडेटेड झालेत. ‘सुंदर’ आणि ‘मंगल’ हे शब्द ऐकल्यावर एक गट खवळतो. ‘पूजा’ हा शब्द ऐकल्यावर दुसरा खवळतो. पण हा माणूस चांगल्या फिल्मला ‘ये तो प्रशाद है!’ असं म्हणून हात जोडायला कचरत नाही.
‘स्टोरी ऑफ स्टफ’ ही मालिका मराठीत आणण्यासाठी अरविंदजींनीच उद्युक्त केलं. ते या महिन्यापासून मुक्तांगणमधून निवृत्त होतायत. आता हा माणूस ‘रिटायर’ होणार म्हणजे काय होणार कुणास ठाऊक. पण यापुढं त्यांची अनेक पुस्तकं, अनुवादित पुस्तकं आपल्याला वाचायला मिळणार याची मला खात्री आहे.
त्यांच्या खोलीत यानंतर ती सळसळती ऊर्जा असणार नाही याची बेचैनी आहे. पण त्यांचे सहकारी हे काम जोमानं वाढवतील याची खात्री आहे. अरविंदजींनी अनेकांच्या आयुष्यात विश्वास निर्माण केला आहे, आशा निर्माण केली आहे. मित्रासारखं वागवलं आहे. त्यांना सलाम करण्यासाठी हा आजच्या कार्यक्रमाचा घाट घातला आहे.
लाखमालाची गोष्ट
.............................................................................................................................................
लेखक समीर शिपूरकर डॉक्युमेंटरी फिल्ममेकर असून अवकाश निर्मिती या संस्थेतर्फे डॉक्युमेंटरी बनवणे, प्रसार करणे हे काम करतात.
sameership007@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Avinash Sonawane
Wed , 31 January 2018
अरविंद गुप्ता ह्यांची वेबसाईट - http://arvindguptatoys.com