अजूनकाही
गेल्या वर्षी जानेवारी महिना जगभरच्या स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रियांमध्ये गाजवला होता ॲश्ली ज्यूडनं… नीना डोनोवॅनची कविता अमेरिकेतल्या रॅलीमध्ये म्हणून. स्त्रियांच्या योनीला तुच्छ लेखत ‘ग्रॅब देम बाय पुसीज्’ म्हणणाऱ्या ट्रम्पचा निषेध अमेरिकेच्या रस्त्यांवर धुवांधार कोसळला होता. ‘आम्ही स्त्रिया हे असलं आता ऐकून घेणार नाही, सहन करणार नाही, काटेरी उत्तर देऊ’ असा जबरदस्त आवाज उठवला होता देशोदेशीच्या स्त्रियांनी.
पण हे स्वातंत्र्याचे, सत्याचे उद्गार अखेर काही सीमित कप्प्यांमध्येच उमटतात. दूरवर त्यांचे प्रतिध्वनी उमटतात की नाही कोण जाणे!
आमच्या देशात या जानेवारी महिन्यात जे रणकंदन उसळलं, त्याचे दोन्ही पक्ष स्त्रीद्वेष्टेच म्हणायचे! ‘पद्मावती’ या विषयावर कोट्यवधी रुपये घालून, नाचगाणी टाकून खपाऊ चित्रपट काढणारा संजय लीला भन्साळी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ‘पद्मावती ही आमची माता आहे. तिचं अमुकतमुकढमुक प्रकारे चित्रण होऊ नये’ असं चित्रपट न पाहताच आग खाणारी राजपूत पुरुषांची झुंड. संजय लीला भन्सालीच्या जोडीला एक गरीब बिचारी धमक्या मिळणारी स्त्री- दीपिका पदुकोण... आणि झुंडीच्या जोडीला बिनतक्रार पुरुषी वर्चस्व सहन करणाऱ्याच नव्हे, तर त्या वर्चस्वाचं जीव जाईस्तोवर उदात्तीकरण करणाऱ्या गरीब बिचाऱ्या स्त्रियाही होत्या. दीपिका सिद्धीविनायकाला साकडं घालत होती आणि राजपूत झुंडीच्या स्त्रिया जोहारासाठी नावनोंदणी करत होत्या. सगळीच शोबाजी, सगळाच मद्दडपणा.
स्वरा भास्कर या अभिनेत्रीनं संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती उणे आय’चा जबरदस्त समाचार घेतला आहे. चित्रपट काढण्याचं, दाखवण्याचं त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहो असं स्पष्ट करतानाच तिनं पद्मावतीच्या निर्मितीवर कोरडे ओढले आहेत. अँश्ली ज्यूडचा जसा संतप्त आवाज तिथं उमटला, तसा आमच्याकडे स्वरा भास्करचा उमटला.
ती भन्सालीला म्हणतेय, तुझा हा चित्रपट पाहून अखेरीस मला वाटलं की, माझं संपूर्ण अस्तित्व माझ्या योनीपुरतंच सीमित झालं...
या काळात- जिथं विवेकाची मूल्यंच फक्त मानवी जीवन सुखकर करायला उपयोगी येणार आहेत, तिथं युद्धात पुरुषांची हार झाली तर आधीच योनीशुचितेची तरतूद म्हणून जाळून घेऊन जीव द्यायचा अविवेकी, कालबाह्य पर्याय झगमग उदात्तीकरण करून पडद्यावर आणणं हा नादानपणाच आहे.
मागास मूल्यांकडे संस्कृतीच्या नावाखाली वाटचाल हा आजघडीच्या भारतीय सत्ताधुरिणांचा गेमप्लॅन आहे. आणि या वाटचालीचा आधार घेऊन जशा बकवास पौराणिक मालिका चालवल्या जातात, बाबाबुवांची कडेकोट दुकानं चालवली जातात; तसाच इतिहासातील संदर्भांचे टेकू घेऊन अनैतिहासिक दंतकथांवर अधिकच बकवास चित्रपट निर्माण होऊ लागले तर नवल नाही. ‘बाहुबली’नं करोडो ओढले, आपणही ओढू. त्या ‘बाहुबली’त निदान सतीबिती घालवून बायकांचं शरणत्व दाखवलं नव्हतं.
स्वरा भास्कर म्हणते, त्याप्रमाणे पद्मावतीच्या शेवटच्या जोहाराला मंत्रोच्चारासारखं गंभीर संगीत देऊन जे काही उदात्तीकरण केलं, त्यानं करणीसेना पुढेमागे खूश होणार आहे. आणि स्त्रियांच्या योनीशुचितेला उगाच नव्यानं भाव येणार आहे, निदान काही कप्प्यांतून तरी. नवऱ्याच्या निधनानंतर बायकोला काहीही कामजीवन असू नये यासाठी आधीच भारतीय समाजात अनेक जाचक बंधनं टिकून आहेत. त्यांना नवा केशरी रंग चढवला गेला नाही तरच नवल.
याच राजपुतांच्या प्रदेशात एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर रूपकुंवरला जाळून मारण्यात आलं आणि सती माँ म्हणून तिचं मंदिर उभारून धंदाही सुरू झाला. अशी सती मंदिरं ही शोक प्रकट करण्याची, आपल्या घृणास्पद परंपरांना तिलांजली देण्याची ठिकाणं बनायला हवी होती. पण होतं आहे उलटंच. तिथं जाऊन स्त्रियांना डोकं टेकावं लागतं... तुही तुझ्या नवऱ्याच्या पलिकडे तुझ्या जिवाचा विचार करायचा नाही, असं अप्रत्यक्षपणे बिंबवलं जातं.
योनीशुचितेचा बडिवार आजही माजवला जातो.
कंजारभाट समाजातल्या इंद्रेकर दाम्पत्यानं काही वर्षांपूर्वी कौमार्य-तपासणीला नकार दिला होता. आजही कंजारभाट समाजात नवपरिणित दाम्पत्याच्या पहिल्या रात्रीवर समाज लक्ष ठेवतो. चादरीवर हायमेन फाटल्यानंतरचं रक्त दिसलं नाही तर छळ होतो. आणि मुख्य म्हणजे खाजगीपणा उद्ध्वस्त केला जातो. आजही नीलेश कळस्कर आणि त्याची नियोजित वधू यांनी या प्रथेला विरोध करून संघर्ष उभारला आहे. आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाकडून धाकदपटशा होतोच आहे.
मूल झालं नाही तर स्त्रियांनाच दोष देण्याचं प्रमाण अजूनही या देशात महाभयंकर आहे. हिंदू धर्मांतील अनेक समाजांत अजूनही घुंघटची सक्ती असते. मनाप्रमाणे वागलं नाही तर सुनेचा शारीरिक छळ करण्यात पुत्रवंत कुटुंबियांचा अधिकार मान्य केला जातो. पोरीची योनीशुचिता सांभाळण्याचं दडपण येणार म्हणूनही मुलगी नको असते. आणि तिच्या योनीचा वापर करणारा कुणी नवरदेव विकत घेणं परवडणार नाही म्हणूनही मुलगी नको असते... अनेक प्रांतांत. तथाकथित जन्मजात शूरवीरांच्या समाजांत नि प्रदेशांत तर फारच.
अशा विविध पातळ्यांवरचा मागासपणा या देशात असताना उत्तम प्रतीचं विज्ञानातून जन्मलेलं तंत्रज्ञान वापरून चित्रपट जेव्हा असल्या फालतू प्रथांचं उदात्तीकरण करतात, तेव्हा खरं म्हणजे तो कायमचा डब्यात घालवण्याची आपली जबाबदारी आहे. करणीसेनेच्या झुंडगिरीच्या विरोधात एक आवाज म्हणून पद्मावती पाहायला जाणं हा म्हणूनच प्रतिसाद होऊ शकत नाही. फुकट पाहायला मिळणारा ट्रेलर आणि गाणी बघून सडके अंडे किती सडके आहे ते कळेलच. ते अख्खं पाहण्यासाठी पैसा मोजण्याची गरज नाही.
पण अर्थात या असल्या फसव्या कलाहीन आणि अकलाहीन प्रयत्नांतही जग पुढे जायचं थांबणार नाहीच. विवाहाआधी कंडोम वापरणाऱ्या तरुणींची संख्या वाढते आहे अशी ताजी बातमी आहे. स्त्रियांनी घटस्फोट मागण्याचं प्रमाण वाढतं आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्वतःचं जीवन नीट जगावं, काम करावं असं मानून पुन्हा लग्न करणाऱ्या स्त्रियांची संख्याही वाढते आहे. स्त्रीचं जगणं हे केवळ तिनं लग्न केलेल्या पुरुषाच्या आधारेच अर्थपूर्ण आहे, हा विचार तसा सांस्कृतिक-केराच्या टोपलीत केव्हाच जाऊ लागला आहे. तो काही वर्षांत पूर्णपणे जाईल.
स्त्रीही पुरुषाइतकीच स्वयंसिद्ध, स्वयंपूर्ण आणि स्वतःच्या इच्छेनं जोडीदार निवडणारी वा टिकवणारी होणार आहे. मनाविरुद्ध लग्न टिकवून त्यात गुलाम बनून राहण्याचा काळ आता उतरणीला लागला. पटलं-रुचलं तरच निष्ठा. एकतर्फी निष्ठा मान्य असणार नाही, हे ठणकावून सांगणाऱ्या आम्हा कणखर स्त्रियांचा काळ सुरू झाला आहे. या काळात प्रवेश करायला काहींना वेळ लागेल. अजूनही काही आयुष्यं बरबाद होत राहतील. अजूनही काही कवट्यांआडची बुद्धी, भावना मागास सांस्कृतिक मूल्यांच्या वरवंट्याखाली चेचल्या जात राहतील. पण आता जोहारात योनी सांभाळणाऱ्या विकल स्त्रियांचे देह पडणार नाहीत हे नक्की.
ही कालबाह्य मूल्यंच विवेकाच्या अग्नीत जळोत. कालबाह्य विषयांना सजवून चित्रपट काढणाऱ्यांच्या बुद्धीचा खेद वाटतो. त्याचा राजकीय वापर करणाऱ्यांचा तिटकारा वाटतो आणि आमच्या मातेचा अपमान वगैरे नाटकं करणारांची किव वाटते.
शेवटी, कुठल्या नतद्रष्ट विषयावरून आपल्या देशात रणधुमाळी माजते, आणि कुठले सुमार हुतात्मा ठरतात, हे पाहाणं क्लेशकारक आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296
.............................................................................................................................................
लेखिका मुग्धा कर्णिक यांची ‘अॅटलास श्रग्ड’, ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ इत्यादी अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
mugdhadkarnik@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
SARA A
Wed , 31 January 2018
काही लोक कोणताही विषय हा ओढून ताणून शेवटी , समता, महिला हक्क वगैरे यांकडेच आणतात. अहो भरपूर वर्ष एेकतोय आम्ही या विषयावर कंटाळा आला आता....खर म्हणजे आता पुरूषांनाच रक्षणाची गरज निर्माण झाली आहे. सेक्शन ४९८A चा कसा दुरूपयोग होतो ते माहीत नाही का तुम्हाला ? हे अस काही वाचून कुंडलकरांच्या लोकसत्तातील लेखाची आठवण झाली...व हे पटले की काही हक्कवादी रिकामटेकड्या लोकांचा वेळ जात नसल्याने ते समाजातील इतरांना भडकवतात व त्यांच्या संसाराची वाट लावून मजा बघत राहतात.