मरणाच्या ‘सुलभ’ वाटा
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 30 January 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar रस्ते Roads अपघात Accident

परवा रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील १३ लोक जीव गमावून बसले. रस्ते अपघात हे आता अपघात न राहता रोजचीच एक घटना असल्यासारखे कुठे ना कुठे घडतच असतात. जिवित हानी मोठ्या प्रमाणावर झाली, वैचित्र्यपूर्ण अपघात, सरकारी बेपर्वाई अथवा चालक, प्रवासी यांचा अतिउत्साह अंगाशी म्हणजेच जीवाशी आला तर त्याची बातमी होते. पूर्वी साथीच्या रोगानं हजारो लोक मरत. तसे हल्ली ‘सेल्फी’च्या साथीनं पटकीच्या साथीपेक्षा वेगानं व अकारण लोक मरतात.

काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या रस्ते वाहतुकीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी दिलेल्या आकडेवारीचा तपशील लक्षात नाही, पण जो काही आकडा होता, तो भयावह आणि चिंता वाढवणारा होता एवढं निश्चित. हे अपघातसत्र कमी व्हावं यासाठी त्यांचं मंत्रालय धडाक्यानं काम करतंय. गडकरींचं काम वेगवान आणि मुदतीत पूर्ण होणारं असतं. तक्रार करायचीच झाली तर एकच देशभर जी टोल वसुली चालू असते, ती मनमानी वाटावी इतकी आणि केवळ ठेकेदारांचं अधिक हित जपणारी असते.

वास्तविक ‘सडक, बिजली, पानी’ हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारात येतात. रस्ते बनवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत ही सबब अर्धसत्य आहे. रस्ते ठेकेदारीच्या बाबतीत कुठल्याच सरकारची, महापालिका अथवा थेट ग्रामपंचायतीची नियत साफ नसते. त्यामुळे फुटक्या हौदात पाणी भरण्यासाठी रस्त्याची टेंडर्स निघतच राहतात. आज सर्वत्र जे रस्त्यांचं क्राँक्रिटीकरण चालू आहे, त्यात नेमकं कुणाचं भलं होतंय? मुख्य रस्ते काँक्रिटचे एकवेळ मान्य, पण अगदी कॉलनीअंतर्गत रस्ते काँक्रिटचे कशाला? कधी काळी अशा कॉलनीतले काळेभोर डांबरी रस्ते एक वेगळंच सौंदर्य आपसूक तयार करत. आता वाटा-पायवाटा, रस्ते, हमरस्ते सगळे काँक्रिटचे आणि इमारती काचेच्या. यातून वाढत्या तापमानाचा त्रास म्हणून वातानुकूल यंत्रणा आणि त्यांच्या शॉर्टसर्किटमधून आगींचं तांडव.

१२५ कोटींच्या या देशात एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर व विकासाच्या नावाखाली एक्सप्रेस वे, प्रचंड लांबीचे बोगदे, महाकाय पूल, सी प्लेन, बुलेट ट्रेन यांची धडाकेबाज आखणी आणि अमलबजावणी, तर दुसरीकडे अनेक खेड्यांत आजही शाळेसाठी मुलांना पाच-दहा किमीचा पायी, प्रसंगी आडवळणांचा प्रवास करावा लागतो. ऊन, वारा, पाऊस आणि सुरक्षितता यामुळे शाळा गळतीचे प्रमाणे वाढले नाही तरच नवल! विकासाचा हा असमतोल म्हणजे प्राथमिक शाळा बंद पडत असताना देशात आणखी दहा-बारा नव्या आयआयटींची घोषणा केली जाते, तेव्हा जखमेवर मीठच चोळलं जातं.

ब्रिटिश एवढे प्रामाणिक की, ते त्यांच्या काळात निर्मिती झालेल्या पूलाविषयी ‘अमूक एका पुलाचं आयुष्य संपलंय. काळजी घ्या किंवा पाडून नवा बांधा’ असं कळवतात. आपले नवे ठेकेदार काल बांधलेल्या रस्त्याची आज गॅरंटी घेत नाहीत आणि त्यांनी कुणी विचारतही नाही. तर असे पूल, मोऱ्या, बोगदे, रस्ते अनेकांचे जीव धोक्यात घालून सार्वजनिक, खाजगी व माल वाहतूक करणारी वाहने नियमित वापरताहेत. मग कधीतरी ‘काळरात्र’ किंव ‘घातवार’ उजाडतो आणि यंत्रणा जागी होते.

परवा कोल्हापूरनजीक १३ जण गेल्यावर त्या जुन्या पुलावर गेले कित्येक महिने बंद असलेले दिवे एमएसईबीने तातडीने सुरू करण्याचं काम हाती घेतलं. आता हे सरकारी दिवे मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या पुलावर रोषणाई करणार? विकासाचं लागलेलं हे वेड फक्त या सरकारचं वैशिष्ट्य नाही. आज आपल्याच नाही तर जगभरातील सरकारं, नव्या बाजारपेठीय जीवनमानासाठी या अशा प्रकारच्या विकासांनी नादावलीत. कारण यात आंतरराष्ट्रीय निविदा नावाचं जे गाजर आहे, ते सर्वांनाच खुणावतंय. काँग्रेससारखा पक्ष ते गाजर किसून खातो, भाजप ते सरळ दोन घासात गट्टम करू पाहतंय. फरक असल्याच तर एवढाच.

हा विकास नादावण्याचं आणखी एक कारण म्हणजे या नव्या व्यवस्थेत पूर्वीच्या उच्चवर्णीय मध्यमवर्गाची, उच्च मध्यम अथवा नवश्रीमंत वर्गात झालेली पदोन्नती आणि त्यांच्या मागोमाग मध्यमजातींनी राजकारण आणि कंत्राटदारी यातून बसवलेलं काळ्या पैशाचं बस्तान. या बदलामुळे, बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे या दोन्ही वर्गातील लोकांचं जीवनमान, राहणीमान, आचार, आहार, विहार यात अमूलाग्र बदल झाला. ‘होऊ दे खर्च’ ही मानसिकता या दोन्ही वर्गात सारख्याच पद्धतीनं वाढली, फक्त ती आविष्कृत करण्याच्या पद्धती वेगळ्या झाल्या. त्यामुळे एक झालं. कोकणात जाण्यासाठी एसटी डेपोत एकत्र दिसणारा हा वर्ग एका बाजूला हॅव बॅक अथवा सेदान श्रेणीतील स्वत:च्या मोटारीनं कोकणात जाऊ लागला आणि यातलाच दुसरा वर्ग सुमो, टवेरा, ट्रॅक्स यातून वाजतगाजत गावागावात शिरू लागला.

याशिवाय कधी काळी दूरस्थ वाटणारे औरंगाबाद, नागपूरचे विमानतळ नियमित गर्दीनं ओसंडू लागले आणि कधीकाळी दबकत या ठिकाणी प्रवेश करणारे आता उर्मटरावांपर्यंत उत्क्रांत झाले. ‘मी बाय एअर येतोय\येतेय’ हे सांगतानाच्या गुदगुल्या आणि बॅगांना विमान कंपन्यांची लकवलेली लेबलं नंतर कितीतरी दिवस तशीच पताकांसारखी फडकवत ठेवणं हा नवाच स्टेटस सिंबॉल झाला!

या वाढलेल्या श्रीमंती आत्मविश्वासानं मग धाडसी प्रवासाच्या कोलंबस आणि वास्को द गामाला लाजवतील अशा आखण्या सुरू झाल्या. नव्या कंत्राटी व्यवस्थेत वाहक रोजंदारीवर उपलब्ध झाले आणि प्रवास कधीही, कुठेही, कितीही कसाही होऊ लागला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं प्रवास करणं गैरसोयीचं, कंटाळवाणं आणि नव्या प्रतिष्ठेला साजेसं वाटेनासं झालं. याला कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जाणीवपूर्वक केलेली आजारी अवस्था. खाजगीकरणाआधीची लक्षणं!

नव्या अर्थव्यवस्थेनं बाजारात खेळवलेला पैसा, नव्या जीवनशैलीला साजेशा अशा विविध ऑफर, एएमआय, क्रेडिट कार्ट यांसारख्या सुविधांमुळे बाजारात जाणीवपूर्वक जाळ्यात ओढण्यासाठी वित्तसंस्थांनी वाढवलेली आभासी पत, त्यातून वस्तू-सेवा यांचं सुलभ वितरण आणि नंतर चक्रवाढ दरानं वसुली, जप्ती, तडजोडी या सर्व प्रकारला सुरुवातीला इभ्रतीसह समोरा गेलेला हा वर्ग, नंतर त्यातलं एकूण गणित लक्षात घेऊन निलाजरा झाला व यातले काही जण ठरवून ठकसेन झाले. ‘चोरावर मोर’ ही नवीनच शैली विकसित झाली.

‘होऊ दे खर्च’ आणि ‘करा खर्च, आम्ही आहोत’ या घोषवाक्यांना साजेसा माहोल तयार करण्यासाठी मग बाजारेपेठेनं राजकीय पुनरुज्जीवनवाद्यांना, सांस्कृतिक क्षेत्राची महाद्वारं उघडून दिली आणि विस्मृतीत जाऊ पाहणारी बारशी, मुंजी, मंगळागौरी, डोहाळजेवणं, यात्रा-जत्रा, नवस, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी, चतुर्थी, ईद, बकरी ईद, मोहरम, दर्गा, बाबा, बर्थ डे, ख्रिसमस, न्यू इअर पार्टी या सगळ्यांना सार्वजनिक ते घरगुती इव्हेंटचं रूपडं बहाल केलं गेलं. बाजाराला ही तथाकथित संस्कृती, व्रतवैकल्यं, धर्मांधता, श्रद्धेला लगडून येणारी अंधश्रद्धा ‘कॅश’ करायची होती. त्यांना गल्ला भरण्यात इंटरेस्ट होता. पण त्यांच्या गल्लाभरू मिशनमुळे सर्वसामान्य जनतेत श्रद्धेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा वाहू लागली. वाढते बा, बापू, साध्वी, प्रवचनं, सत्संग, आश्रम यांची वाढती संख्या आणि खोट्या, दांभिक वासनांध अध्यात्म्याचा क्लोरोफॉर्म इतका समाजाच्या श्वासात भरला की, विवेकाची जागा अविचार, असहिष्णूतेनं घेतली. छोट्यातली छोटी गोष्ट साजरी करण्याची नशा जडत गेली. त्याची कीक हवीशी वाटू लागली आणि गर्दुला जसा निकरावर येतो, तसा समाज पैसा आणि इव्हेंट यांच्या नशेच्या अधिन झाला. या शैलीतून विकसित झालेला वेग जेव्हा वाहनात बसू लागला, तसे फटाके फुटावेत तसे अपघात घडू लागले.

अलीकडच्या अपघातांचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की, यातले ६० ते ७० टक्के अपघात हे सकृतदर्शनी अपघात असले तरी प्रत्यक्षात ते ‘आत्मघात’ होते. यात देवदर्शनाला जाताना किंवा येताना झालेले अपघात संख्येनं लक्षणीय आहेत. या अशा प्रवासात प्रवासी संख्या, प्रवासाच्या वेळेचं नियोजन, वाहनाची देखभाल, चालकाची क्षमता आणि वेळ गाठण्याची स्पर्षा. उदा. शिर्डीत पहाटेच्या आरतीला टच किंवा तिथून सुटलो की फाटे चार वाजता दादर. सात वाजता घरी. धा वाजता ऑफिस. हा अघोरी आत्मविश्वास देवाचं प्रत्यक्ष दर्शनच घडवतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296

.............................................................................................................................................

परवाच्या १३ जणांचं वाईट वाटतं. पण आज एकविसाव्या शतकात नवसानं मूल झालं ही दणकट अंधश्रद्धा. तो फेडण्यासाठीचा घाट आणि रात्री-बेरात्री प्रवासाची बेपर्वाई. पालकमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली. का? नवस बोलले, तो फेडला म्हणून? तो सार्वजनिक वाहनातून प्रवास करत नव्हते. खाजगी बस होती. पुल जुना व अंधारा होता, पण चूक वाहकाची होती. तरीही मदत? मग चंद्रकांत दादा, तुमच्या खात्याच्या खड्ड्यांमुळे आमचा उदार मित्र व कार्यकर्ता कणकवलीचा उत्तम पवार तडकाफडकी गेला. तेव्हा कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा ही मागणी पुरी तर नाहीच केली, पण नुकसान भरपाईचा रुपायाही नाही दिला. उत्तमसारखे शेकडो दुचाकीस्वार रस्त्याच्या दुर्वस्थेमुळे दगावलेत. त्यांना मदत करणार?

याचा अर्थ सरकारी आस्था, मदत ही अपघाताच्या वर्गवारीनुसार किंवा मतदारसंघ निहाय ठरते? अपघाताबाबत सरकारचं धोरण काय? सावित्री नदीवरचा पूल व एल्फिन्स्टनचा पूल निर्धारित वेळेत प्रसंगी लष्कराकडून यामागचं तर्कट काय? मग हाच न्याय इतरत्र का नाही?

थोडक्यात काय? तर बाजारेपेठेनं एक जीवनशैली दिलीय. त्या जीवनशैलीला योग्य वातावरण सरकार, प्रशासन नावाची व्यवस्था आणि मतपेटीवर लक्ष ठेवून असणारे राजकीय पक्ष उद्योगपतींना हाताशी धरून तयार करताहेत. त्याचा वेग असा ठेवलाय की, एखाद्या मिक्सरमध्ये दाणे टाकले की पोलपाटं उडून जातात, बाकीचं पीठ तयार होतं, तसं विकासाच्या प्रचंड मोठ्या दळणवळणात मनुष्य जीव कवडीमोल ठरलाय.

तो ट्रेनमध्ये गुदमरून मरतो, दरवाज्यात लटकताना पडून मरतो, रूळ ओलांडताना मरतो, पुलावर मरतो, जिन्यात घसरून-तुंबलेल्या पाण्यात-गटारात पडून मरतो, गाडीसकट जळून-बुडून मरतो, धडकेनं मरतो, समूहानं मरतो, एकटा सायकलीवरून मरतो.

नव्या जीवनशैलीत प्रत्येक गोष्टीला प्राईस टॅग आहे. तुमच्या अकाली, अपघाती मरणाला सोडून!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Anil Bhosale

Tue , 30 January 2018

'देवाच्या नावानी खपले' असेच म्हणावे लागेल...! याच नावाचे एक पुस्तक पण आहे. या लोकांनी ते वाचले असते तर 'वाचले' असते कदाचीत..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......