अजूनकाही
विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांना प्रकाश वृत्तवाहिन्यांवर ‘लाईव्ह’ अश्रू ढाळताना पाहिल्यावर या माणसात कोडगेपणा खच्चून भरलेला आहे याची खात्री पटली. राम मंदिराच्या उभारणीसाठी आधी विखारी धर्मांध चळवळ आणि नंतर त्यापेक्षाही जास्त विखारी आंदोलन करताना मरण पावलेल्या किंवा गुजरातेत झालेल्या दंगलीत बळी पडलेल्या कोण्याही जाती-धर्माच्या माणसाच्या मरणानं दु:ख होऊन किमान एखादा तरी अश्रू तोगडिया यांच्या डोळ्यातून बाहेर पडल्याचा आजवरचा अनुभव नाही. गेला बाजार, या आंदोलनानं धार्मिक विद्वेष टोकाचा वाढून समाजात फूट पडली, अस्वस्थतेचं मळभ देशात कायमचं मुक्कामाला आलं, अनेकांच्या डोळ्यातले अश्रू सुकले आणि समाजाच्या एका गटात तर अपरंपार भय निर्माण झाल्यावर तरी त्याबद्दल पश्चातापाचा एखादा तरी अश्रू प्रवीण तोगडिया यांनी गाळल्याचा एकही दाखला नाही. आता मात्र स्वत:वर आलेल्या तथाकथित मरणाच्या (खरं तर बाजूल फेकलं जाण्याच्या!) सावटानं राम मंदिरासाठी प्राण देण्याची ‘शूर’ भाषा करणारे तोगडिया भयभीत झाले असून जाहीरपणे ते अश्रू ढाळत आहेत. त्याला नकाश्रू हाच शब्द योग्य आहे!
१२ डिसेंबर १९५६ रोजी गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील एका खेडेगावात प्रवीण तोगडिया यांचा जन्म झाला आणि वयाच्या १२व्या वर्षी अहमदाबादला स्थानांतरीत झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची जुळलेली नाळ किमान त्यांच्या बाजूनं तरी अजूनही कायम आहे. ‘त्यांच्या बाजूनं अजूनही कायम आहे’ असं एवढ्यासाठी म्हटलं की, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रवीण तोगडिया आपले वाटत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली असल्याचं परिवारात उघडपणे बोललं जात आहे. कारण, संघ तसंच एकेकाळचे जीवश्च्चकंठश्च मित्र नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडिया यांच्या दुरावा निर्माण झाला आहे. अर्थात त्यासाठी कारणीभूत आहे प्रवीण तोगडिया यांचा महत्त्वाकांक्षी स्वभाव. याचा अर्थ नरेंद्र मोदी महत्त्वाकांक्षी नाहीत असा मुळीच नाही. म्हणून जरा वेगळ्या शब्दात स्पष्टच सांगायचं तर, हा तोगडिया आणि मोदी या दोन महत्त्वाकांक्षामधील उफाळून आलेला संघर्ष आहे आणि नरेंद्र मोदी त्यावर मौन बाळगून आहेत!
नरेंद्र मोदी आणि डॉ. प्रवीण तोगडिया हे दोघेही रा. स्व. संघाचं ‘प्रॉडक्ट’. दोघंही अगदी कट्टर केडर बेस्ड. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादलाच घेतलेले प्रवीण तोगडिया हे कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी म्हणून ओळखले जात. त्यामुळे वैद्यक पदवी अभ्यासक्रमाला सहज प्रवेश मिळवून ते डॉक्टर (एमबीबीएस) झाले. पदवी मिळाल्यावर डॉ. प्रवीण तोगडिया यांनी एमएस ही पदवी संपादन केली. रुग्णाला झालेल्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियात (Surgical Oncology) ते पारंगत होते आणि अहमदाबादेत एक धन्वंतरी नावाचं एक रुग्णालयही त्यांनी सुरू केलं होतं. अर्थात वैद्यक व्यवसायापेक्षा तोगडिया यांचं मन संघाच्या कामात जास्त गुंतलेलं होतं; हे ओघानं आलंच. संघातून डॉ. प्रवीण तोगडिया यांची १९८३ साली विश्व हिंदू परिषदेकडे, तर नरेंद्र मोदी यांची १९८४ साली भाजपकडे रवानगी करण्यात आली. निष्ठावान स्वयंसेवकांना परिवारातल्या विविध संस्था संघटनांकडे असं ‘डेप्युटेशन’वर पाठवण्याची संघाची परंपरा आहे. भाजपच्याही जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीतही संघाचे असे स्वयंसेवक पाठवलेले असतात!
पुढे भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांना दिल्लीला राष्ट्रीय पातळीवर सामावून घेतलं, तर कडव्या हिंदुत्वाची धार असणारं अत्यंत आक्रमक वक्तृत्व असणारे डॉ. प्रवीण तोगडिया विश्व हिंदू परिषदेत मोठ्ठ प्रस्थ बनले. धार्मिक भावनांना थेट हात घालणारी प्रक्षोभक भाषणं आणि खाजगीतही बोलताना विखारी, भडक भाषा हे प्रवीण तोगडिया यांचं बलस्थान बनलं. अंगार ओकणाऱ्या या भाषेतून आणि त्यातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राम मंदिर उभारणी चळवळीतले ते आघाडीचे; इतके आघाडीवरचे की ‘स्टार प्रचारक’ बनले की, धार्मिक विद्वेषाचा अंगार बाळगणारे आणि तो समाज मनात पसरवणारे डॉ. प्रवीण तोगडिया झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत फिरू लागले! पुढे ते विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष झाले.
संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीच्या कथा एकेकाळी परिवारात कौतुकाचा विषय होता. नंतर नरेंद्र मोदी यांची खपा मर्जी झाली. ‘ती’ सीडी गाजली आणि संजय जोशी यांना भाजपनं वाळीत टाकलं (संघ मात्र जोशी यांच्या पाठीशी होता आणि अजूनही आहे. म्हणून संजय जोशी परिवारात अजूनही नरेंद्र मोदी यांच्या नाकावर टिच्चून टिकून आहेत!). असंच सौहार्द तोगडिया आणि मोदी यांच्यात होतं म्हणे! दोघं एका स्कूटरवर कसे फिरत आणि एक ग्लास पाणीही कसं वाटून घेत अशा, प्रवीण तोगडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीच्या कौतुक कथाही एकेकाळी परिवारात रंगलेल्या आस्मादिकांनीही एक पत्रकार म्हणून संघ बीट कव्हर करताना ऐकल्या आहेत.
शंकरसिंह वाघेला यांनी भाजपच्या नेतृत्वाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू केल्यावर पक्षानं नरेंद्र मोदींना गुजरातेत परत पाठवलं. २००१च्या विधानसभा निवडणुका जिंकताना मोदी-जोशी-तोगडिया यांच्यात ‘ये दोस्ती हम नाही तोडेंगे’ असे घट्ट बंध होते. ती निवडणूक जिंकवून देण्यात तोगडिया यांनी कसं जीवाचं रान केलं याच्या दंतकथा काँग्रेस गवताप्रमाणे तेव्हा फोफावलेल्या (का मुद्दाम पसरवल्या गेलेल्या) होत्या. तेव्हाच विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिरापेक्षा सत्तेच्या वलयाचं महत्त्व तोगडिया यांना समजलं आणि निवडणुका जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी बजावल्यानं आपलं नेतृत्व मोदी यांनी मान्य करावं या इच्छेची बीजं प्रवीण तोगडिया यांच्या मनात अंकुरली.
पुढच्या काळात प्रवीण तोगडिया यांचे समर्थक (की पंटर?) गोरधन झडाफिया राज्याचे गृह राज्यमंत्री झाले आणि असं म्हणतात की मंत्रालयात तोगडिया यांचा हस्तक्षेप इतका वाढला की, त्यामुळे गुजरातेत मुख्यमंत्री मोदी यांना एक समांतर सत्ताकेंद्र निर्माण झालं. इथूनच मोदी आणि तोगडिया यांच्यात दुरावा वाढण्यास सुरुवात झाली. परिणामी झडाफिया यांना नरेंद्र मोदी यांना मंत्रीमंडळातून हाकललं. नंतरच्या २०१२च्या निवडणुकीत विधानसभेची उमेदवारीही नाकारली. मग झडाफिया यांनी महागुजरात जनता पार्टीची स्थापना केली. त्यामागे अर्थातच प्रवीण तोगडिया यांचा हात होता. विधानसभा निवडणुकीत झडाफिया यांच्या महागुजरात जनता पार्टीच्या पाठीशी प्रवीण तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषदेची ताकद उभी केली. तरी मोठ्या बहुमतानं विजयी होण्यात नरेंद्र मोदी आणि भाजपला यश मिळालं. मोदी आणि तोगडिया यांच्यात उभा दावा सुरू झाला. मोदी यांची मर्जी खपा होणं म्हणजे समूळ उच्चाटन हा अनुभव संजय जोशी आणि झडाफिया यांना मिळाला. पुढे तोच आघात मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही कसा केला हे सर्वविदित आहे!
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296
.............................................................................................................................................
खरं तर राजकीय पक्षात एकमेकाला खाली ओढण्याचे प्रकार घडतच असतात आणि तो राजकारणाचा एक भाग असतो. ‘डिफरंट’पणाचं ‘सोवळं’ पाळणारा भाजपही त्या राजकारणाला अपवाद नाहीच. राष्ट्रीय पातळीवरचा बलराज मधोक ते लालकृष्ण अडवाणी असाच कशाला महाराष्ट्रातही भाजपनं अण्णा डांगे, सूर्यभान वहाडणे, ना. स. फरांदे , मधु देवळेकर अशा अनेकांना वळचणीला टांगलं होतंच की! आता नेमकी तशीच घुसमट आणि उपेक्षा एकनाथ खडसे यांच्या वाट्याला आलेली आहे. अगदी अशाच प्रकारे बाजूला टाकून खच्ची करण्याचे झालेले प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी कसे उधळून टाकले हेही महाराष्ट्राला ठाऊक आहे.
मुख्य मुद्दा मोदी आणि तोगडिया यांच्यातील संघर्षाचा आहे. झडाफिया आणि संजय जोशी यांच्या झालेल्या ‘राजकीय शिरकाणा’ नंतरही तोगडिया धडा शिकले नाहीत, कारण एव्हाना तेही विश्व हिंदू परिषदेचे मोठे नेते झालेले होते. पण आता बाजी उलटलेली आहे. तोगडिया यांचा विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे. तोगडिया यांना मुदतवाढ देण्यात आता संघाला मुळीच रस नाही, कारण संघाच्या इशाऱ्याबरहुकूम अशोकजी चौगुले किंवा कोकजे यापैकी एकाला विश्व हिंदू परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्यास तोगडिया यांनी विरोध केला आणि स्वत:च्या मर्जीतील राघवजी रेड्डी यांना अध्यक्ष करण्याचं राजकारण खेळल्यानंतर ठिणगी पडलेली आहे. रा. स्व. संघ प्रतिकूल झाल्यानं विश्व हिंदू परिषदेचे पुन्हा एकदा सर्वेसर्वा होण्याचे दरवाजे बंद झालेले आहेत. भारतीय जनता पक्ष सध्या नरेंद्र मोदी यांच्या मुठीत बंद आहे. त्यामुळे तिकडेही तोगडिया यांना संधी मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. दोन्ही बाजूंनी अशी कोंडी झालेली असून पुन्हा वैद्यक क्षेत्रात घरवापसी असं (आणि मिळवलेल्या वैद्यक ज्ञानाचा प्रक्षोभक, उन्मादी हिंदुत्वाच्या नादात बहुदा विसर पडल्यानं) अंधार दाटून आलेलं भवितव्य स्पष्ट दिसत असल्यानं प्रवीण तोगडिया सैरभैर झालेले आहेत, व्याकुळले आहेत. त्यांचा तडफडाट सुरु आहे. ‘पद्मावत’ या चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचाही विरोध, ही प्रवीण तोगडिया यांची अपरिहार्य अगतिकता आणि त्यामागे मोदी सरकारला विरोध आहे हेही, आपण समजून घ्यायला हवं.
पन्नास सुरक्षा जवानांच्या गराड्यातून एखादा अविश्वसनीयपणे बेपत्ता होण्याची प्रवीण तोगडिया यांची नौटंकी आणि जाहीर नकाश्रूची पार्श्वभूमी ही अशी आहे. त्यामागे ना राम मंदिर उभारणीची कळकळ आहे ना गो-प्रेम. आहे तो केवळ वैफल्य ओतप्रोत भरलेला कांगावा!
(छायाचित्रे ‘गुगल’च्या आणि तोगडिया यांच्या वैद्यक शिक्षणाचा संदर्भ विकिपीडियाच्या सौजन्याने)
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vilas Kolape
Thu , 01 February 2018
तोगडीया यांची नथुराम गोडसेपेक्षा वेगळी नाही नथुरामाने जीवावर उदारहोवून महात्मा गांधीचा खून केल्यानंतर स्वतः फाशी गेला. एवढं करूनही त्याची उपेक्षाच झाली संघान त्याच सदस्यत्व सुध्दा नाकारलं.जगभर त्याची छी तू च झाली. तोगडीया जो त्रिशूल घेऊन दिल्लीत फिरत होते त्याचीच भिती त्याना वाटायला लागली आहे. नथूरामापेक्षा वाईट छळाला त्याला सामोर जावं लागणार. भोगा आपल्या कर्माची फळं.