अजूनकाही
देशभर पेटलेल्या वादंगामुळे संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित झालेला 'पद्मावत' हा चित्रपट अखेर पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला. चित्रपट पाहिल्यानंतर याबाबत निर्माण झालेले वादंग किती निरर्थक आणि वेडपटपणाचे होते याची प्रचिती येते.
'पद्मावत' या चित्रपटात चितोडच्या राणी पद्मावतीची ऐतिहासिक गाथा सांगण्यात आली आहे. अर्थातच तिला 'भन्साळी टच' आहे. त्यामुळे ती नेत्रदीपक झाली आहे. भन्साळी यांनी चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट 'पद्मावत' या काव्यसंग्रहावर बेतलेला आहे आणि त्याला कसलाही ऐतिहासिक आधार नाही, असं स्पष्ट केल्यामुळे राणी पद्मावतीच्या इतिहासासंबंधीचे बरेच दावे-प्रतिदावे निकालात निघाले आहेत. मात्र भन्साळी यांनी कल्पना आणि इतिहास यांची अतिशय बेमालूम सांगड घालून पडद्यावर राणी पद्मावतीची शौर्यगाथा सादर केली आहे. तिची मांडणी अर्थातच भन्साळी यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे अतिशय भव्यदिव्य पद्धतीनं करण्यात आली आहे. त्यामुळे ती प्रेक्षणीय झाली आहे.
तेराव्या शतकाच्या प्रारंभी घडलेली ही ऐतिहासिक कथा आहे. पाठ्यपुस्तकात असल्यामुळे ती अनेकांना कदाचित त्रोटक स्वरूपात माहीतही असेल. कामांध आणि सत्तापिपासू असलेला अल्लाउद्दीन खिलजी आपल्या काकाचा - जलालुद्दीन खिलजीचा - खून करून दिल्लीची सत्ता बळकावतो. त्यावेळी मेवाड प्रांतातील चितोडगडाचा राजा महारावळ रतनसिंग हा असतो. त्याची पत्नी महाराणी पद्मावती अतिशय रूपवान असते. राजा रतनसिंगकडून अपमानित झालेला त्याचा राजगुरू राघो चंदन हा आपला अपमानाचा बदला घेण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीकडे येतो आणि त्याच्याजवळ पद्मावतीच्या सौंदर्याची तारीफ करतो. पद्मावतीसाठी आसुसलेला अल्लाउद्दीन खिलजी तिला मिळवण्यासाठी लगेच चितोडगडावर हल्ला करतो, मात्र राजपुतांच्या कडव्या प्रतिकारामुळे त्याला अभेद्य चितोडगड जिंकता येत नाही. शेवटी आपला वेढा उठवण्यासाठी तो पद्मावतीच्या किमान दर्शनाची अपेक्षा ठेवतो.
ठरल्याप्रमाणे खिलजी चितोडगडच्या किल्ल्यात येतो आणि रतनसिंग आपल्या वचनाला जागून त्याचं स्वागत करतो, मात्र पद्मावतीचं त्याला क्षणिक दर्शन घडतं. त्यामुळे तिच्या दर्शनानं तो आणखीनच वेडापिसा होतो. त्यानंतर तो दगाफटका करून राजा रतनसिंगला कैद करतो. आणि दिल्लीला घेऊन जातो. आणि त्याच्या सुटकेसाठी पुन्हा पद्मावतीची मागणी करतो. मेवाडचं राज्य वाचवण्यासाठी राणी पद्मावती त्याची अट मान्य करते. खिलजीकडे ती जाते, पण गनिमी काव्यानं राजा रतनसिंगची सुटका करून ती त्याला पुन्हा चितोडगडावर घेऊन येते. परंतु त्यामुळे संतप्त झालेला खिलजी जय्यत तयारीनिशी पुन्हा चितोडगडावर हल्ला करतो. यावेळच्या हल्ल्यात यशस्वी होऊन तो चितोडगड जिंकतो खरा, पण राणी पद्मावती? ती त्याला कधीच मिळत नाही.
तेराव्या शतकातील ऐतिहासिक काळ पडद्यावर उभा करण्यात भन्साळी यांना चांगलं यश आलं आहे. विशेषतः त्यामध्ये राजपूत संस्कृतीची झलक पाहायला मिळते. त्यादृष्टीनं केलेली वेशभूषा, तसंच किल्ले-राजवाड्याच्या अंतरंगातील अनेक गोष्टी, खिलजीचा महाल, आणि युद्धाची दृश्यं दाखवताना समोरचं 'मैदान-ए-जंग' पाहून भव्यतेची कल्पना येते. विशेषतः तोफांच्या गोळ्यांचा किल्ल्यांच्या भिंतीवर होणारा मारा पाहून एकीकडे मन विषन्नतेतं भरून येतं, मात्र त्याच वेळी युद्धाची दृश्यं पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. ऐतिहासिक कथेला साजेसे असलेले प्रकाश कपाडिया यांचे संवाद ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
''राजपूत के कंगना में उतनीही ताकद हैं, जितनी राजपुतोंकी तलवार मे हैं'' यासारखे संवाद राजपुतांच्या शौर्याचे आणि धैर्याचं दर्शन घडवतात. अशा संवादातून राजपूत समाजाचं उदात्तीकरणच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धात राजपुतांच्या चालीरीतींवर अधिक भर देण्यात आला आहे. अगदी शेवटचं राणी पद्मावती आणि इतर राजपूत महिलांचं 'जोहार'चं दृश्य देखील अतिशय संयतपणे चित्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे ते प्रभावी ठरलं आहे. चित्रपटातील गाणीही ('घुमर' आणि इतर) कथेला पूरक ठरली आहेत.
या ऐतिहासिक कथेत अल्लाउद्दीन खिलजी, महाराणी पद्मावती आणि राजा रतनसिंग ही तीनच प्रमुख पात्रं आहेत. त्यामुळे कथाही त्यांच्याभोवतीच फिरते. दीपिका पदुकोण हिनं राणी पद्मावतीच्या भूमिकेत कर्तबगारीबरोबरच कारुण्याच्या छटेचं उत्तम दर्शन घडवलं आहे. रणबीर सिंग याने कामांध आणि सत्तापिपासू अल्लाउद्दीन खिलजी अतिशय प्रभावीपणे रंगवला आहे. त्याचं खाणं, बोलणं, वागणं (आणि नाचणंही) मुलुखावेगळं दाखवलं आहे. त्यामुळे इतर सर्वांपेक्षा त्याची भूमिका अधिक भाव खाऊन जाते. त्यामानानं शाहीद कपूरनं राजा रतनसिंगची भूमिका संयतपणे पार पडली असली तरी त्याची अतिशय सरळमार्गी भूमिका खिलजीच्या समोर फिकी पडते.
अन्य कलाकारांपैकी रझा मुराद (जलालुद्दीन खिलजी), जिम गर्भ (मलिक कफूर), अदिती राव हैदरी (मेहरुन्निसा - अल्लाउद्दीन खिलजीची पत्नी) यांचीही कामं चांगली झाली आहेत.
राजपूत संस्कृतीचं अंतरंग, त्यांचे शौर्य, अल्लाउद्दीन खिलजीचं क्रौर्य, फंद-फितुरी, पद्मावतीचा असीम त्याग, हे सारं पाहायचं असेल तर 'पद्मावत' हा भव्यपट पाहायला हवा.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Prabhakar Nanawaty
Tue , 30 January 2018
हिंदी चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर यानी 'पद्मावत'चे दिग्दर्शक, लीला भन्साली यांना लिहिलेले अनावृत पत्र 'दि वायर'वर वाचत असताना या चित्रपटाच्या भव्य, दिव्यतेचा आवाका कळाला. दिग्दर्शकाची मानवी मूल्यांकडे बघण्याचा कोता दृष्टिकोनही कळाला. त्यामुळे 'कौतुकाचा ओव्हरडोस देऊन आपण सुमारांचे उदात्तीकरण करत नाही आहोत ना?' असे वाटू लागते