दिवाळी अंक : लसाविमसावि
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • पद्मगंधी, इत्यादी आणि वसा
  • Fri , 18 November 2016
  • दिवाळी अंक २०१६ Divali Ank 2016 पद्मगंधा Padmagandha इत्यादी Ityadi वसा Vasa

पद्मगंधा

‘पद्मगंधा’चा दिवाळी अंक पूर्णपणे वाङ्मयीन तर असतोच, पण त्याचबरोबर तो गंभीर साहित्य चर्चाही करणाराही असतो. पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे हे साहित्यव्रती प्रकाशक आहेत. ते साहित्याकडे गंभीर जीवननिष्ठेचा भाग म्हणून पाहतात. नुकतंच लोकसाहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांचं निधन झालं. पद्मगंधाने त्यांची वीसेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यांच्या संशोधनाविषयी जाखडे यांना खूप आस्थाही आहे. त्यामुळे यंदाचा ‘पद्मगंधा’चा संपूर्ण अंक डॉ. ढेरे यांना अभिवादन करणारा आहे. ढेरे यांच्या लेखनात ‘मिथक’ ही संकल्पना वारंवार येते. त्यामुळे या अंकात याच विषयावर एक भरगच्च परिसंवाद आहे. ‘मिथकांचे अवतरण’ या परिसंवादात तब्बल २३ लेख आहेत. गणेश देवी, आनंद पाटील, दीपक घारे, प्रशांत बागड, हेमंत खडके, देवानंद सोनटक्के, महेंद्र कदम, शाहू पाटोळे अशा विविध मान्यवर लेखकांनी त्यात लेख लिहिले आहेत. तरीही संपादकांचं असं म्हणणं आहे की, मिथक हा विषय इतका व्यापक आहे की, अजून काही लेखांचा समावेश करायला हवा होता. हा परिसंवाद आणि त्यातील लेख यांच्याविषयी अनुकूल-प्रतिकूल लिहिता येईल, त्यातल्या अनेक लेखकांची मतं आपल्याला पटतीलच असंही नाही. भौतिक वास्तवाच्या आणि तर्कबुद्धीच्या प्रेरणा ओलांडून मानवी संस्कृतीविषयीची अनेक रहस्यं समजून घेण्यासाठी मिथकांचा आधार घ्यावाच लागतो. त्या मिथकांविषयीचं एक भान देण्याचं काम हा परिसंवाद नक्कीच करतो.  या परिसंवादाला साजेसं अंकाचं मुखपृष्ठ आहे. जाखडे यांनी तर म. गांधींनाही संपादकीयात मिथकच म्हटलं आहे. डॉ. ढेरे यांचा ‘मराठी सत्कवींचे जगन्नाथदर्शन’ हा अप्रकाशित लेख आणि संजय आर्वीकर यांचा ढेरे यांच्या रंगभूमीविषयक विचारांचा आढावा घेणारा लेख, यांचाही समावेश या अंकात आहे. याशिवाय श्रीकांत बोजेवार, मानसी होळेहोन्नुर, बब्रूवान रुद्रकंठावार, समीना दलवाई यांच्या वाचनीय कथा आहेत. थोडक्यात पद्मगंधाचा दिवाळी अंक गंभीर, वाङ्मयीन पण सकस साहित्य देणारा आहे.

सर्वोत्तम –  शोध आबे फारीयाचा (रूपेश पाटकर)

उत्तम मध्यम –  हरमान हेसे आणि त्याचे प्रकाशक (जयप्रकाश सावंत),  काकासाहेब गाडगीळ (नरेंद्र चपळगावकर)

मध्यम मध्यम – नागपूरचे साहित्यविश्व – द. भि. कुलकर्णी

‘पद्मगंधा’, संपादक – अरुण जाखडे,  पाने - २७२, मूल्य – २०० रुपये.

……………………………………………………………

वसा

एक दखलपात्र दिवाळी अंक असा अलीकडच्या काळात ‘वसा’ने लौकिक मिळवला आहे. या वर्षीचा अंकही त्याला फारसा अपवाद नाही. या अंकाच्या मुखपृष्ठावर भारताच्या नकाशाला एक खिंडार पडल्याचं दाखवलं आहे, तर खालच्या बाजूला ‘कुणाचा नाद, कुणाचा उन्माद, कुणी बरबाद, हाच का राष्ट्रवाद?’ या ओळी छापलेल्या आहेत. त्यामुळे या अंकात साधारण गेल्या दीडेक वर्षांतल्या घटना-घडामोडींविषयीचे लेख आहेत. मराठा समाजाचे लाखालाखाचे मोर्च सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी त्यानिमित्ताने एक दीर्घ लेख त्यांच्या ब्लॉगवर लिहिला होता. मराठा समाजाविषयीची चर्चा एकारलेपणाकडे जाऊ लागली असताना आसबे यांनी ती हा लेख लिहून संतुलित करायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर दखल घेतली गेली. काहींनी त्याच्या परस्पर पुस्तिका छापल्या. तोच लेख या अंकात पुनर्मुद्रित केला आहे. लता प्रतिभा मधुकर यांनी रोहित वेमुलाची आई, राधिका यांच्याविषयी तर सुबोध मोरे यांनी गुजरातमधील दलित आंदोलनाचा नेता, जिग्नेश मेवाणी यांच्याबद्दल लिहिलं आहे. हे दोन्ही लेख ठीक म्हणावेत असेच आहेत. त्यातून फार नवं काही हाती लागत नाही. ‘संघाचे आव्हान आणि आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळ’ हा सुरेश सावंत यांचा लेख वाचनीय आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्याने लिहिला असला तरी तो संयत आहे. रझिया पटेल, राज असरोंडकर व राही श्रुती गणेश यांचे अनुक्रमे राष्ट्रवाद, देशभक्ती आणि देशद्रोहाविषयीचे लेख प्रतिक्रियावजा आहेत. समर खडस यांनी मुस्लीम धर्माचा सामंजस्याकडून अतिरेकाकडे झालेला प्रवास आणि शशिकांत सावंत यांनी जॉन अपडाईक या अमेरिकन लेखकाचा घेतलेला आढावा वाचनीय आहे. मुकुंद कुळे यांनी अस्तंगत होऊ लागलेल्या बैठकीची लावणीविषयी लिहिलेला लेख या लावणीची सर्वांगीण ओळख करून देतो. जयंत पवार यांची कथा आणि प्रतिमा जोशी यांच्या कविता वेगळ्या, अर्थपूर्ण आणि आशयघन आहेत.

सर्वोत्तम – मराठा आंदोलन, असंतोष आणि बहुजनवादी चळवळीची दिशा (प्रताप आसबे)

उत्तम मध्यम – एक सुन्न दुपार आणि बाबू भंगारवाल्याची वखार (जयंत पवार)

मध्यम मध्यम – जॉन अपडाईक : अमेरिकन समाजाचा आरसा (शशिकांत सावंत)

‘वसा’, संपादक – प्रभाकर नारकर, पाने – १७६, मूल्य – १२० रुपये.

……………………………………………………………

इत्यादी

‘इत्यादी’च्या दिवाळी अंकाचे सरळ तीन विभाग आहेत. एक- कथा, दोन- विशेष लेख आणि तीन – रियाज. त्यांना ‘उत्तम मध्यम’, ‘मध्यम मध्यम’ आणि ‘उत्तम मध्यम’ असं स्थूलपणाने म्हणता येईल. कथा विभागात प्रणव सखदेव, गणेश मतकरी, पंकज भोसले, मनस्विनी लता रवींद्र या तरुण आश्वासक कथाकारांच्या जोडीला अनिल रघुनाथ कुलकर्णी या ज्येष्ठ कथाकाराची ‘कावळे’ ही पुनर्मुद्रित कथाही आहे. याच विभागात कुलकर्णी यांची मुलाखतही आहे. ती मात्र अजून चांगली होऊ शकली असती. अतिशय सरधोपट प्रश्नांना कुलकर्णी यांनी प्रामाणिक उत्तरं दिल्याने ती वाचनीय मात्र नक्कीच झाली आहे. त्यातून कुलकर्णी यांच्यासारख्या प्रसिद्धीपराङमुख लेखकाला समजून घ्यायला मदत होते. ‘विशेष लेख’ विभागातील चिन्मय दामले यांचा सांबाराच्या इतिहासाविषयीचा, निरंजन घाटे यांचा प्राचीन भित्तीलेखनाविषयीचा, सोनाली नवांगुळ यांचा मानद बापाविषयीचा आणि प्रवीण पाटकर यांचा लैंगिकतेविषयीचा, हे लेख माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. माहितीपूर्ण-वाचनीय हे शब्दप्रयोग अनेकांना काहीसे सरधोपट वाटू शकतात. यापेक्षा अधिक नेमक्या शब्दांचा वापर करता येईलही, पण त्यातून हाच आशय व्यक्त होईल. त्यामुळे हे शब्द गांभीर्यानेच वापरलेले आहेत. तिसऱ्या ‘रियाज’ या विभागात सुनील सुकथनकर (चित्रपट), वसंत आबाजी डहाके (साहित्य), सुहास बहुलकर (चित्रकला), सुचेता भिडे-चाफेकर (गायन) आणि नंदा खरे (साहित्य) यांचे लेख आहेत. या प्रत्येक क्षेत्रात ‘रियाजा’चं काय महत्त्व आहे, या व्यक्ती त्याकडे कसे पाहतात, याविषयी त्यांनी केलेलं मनोगत किमान एकदा वाचून पाहायला हरकत नाही. त्यातून या व्यक्तींचा दृष्टिकोन समजून घ्यायला मदत होते. संत ठोकाराम यांची खुसखुशीत भेटही आहेच.

सर्वोत्तम – …..

उत्तम मध्यम – कथा विभाग, रियाज विभाग

मध्यम मध्यम – लेख विभाग

‘मनोविकास’, संपादक – आशिश पाटकर, पाने – १९६, मूल्य – १६० रुपये.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......