अजूनकाही
‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद चैताली भोगले यांनी केला असून तो नुकताच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित झाला आहे. बालपणापासून अँडरसनच्या गोष्टी वाचत आलेल्या भोगले यांनी या अनुवादाच्या निमित्तानं अँडरसनच्या गोष्टींचं उलगडून दाखवलेलं मर्म...
.............................................................................................................................................
डोळ्यांमध्ये एखादं अंजन घातल्यावर कसं सगळं जास्त जास्त दिसावं किंवा भिंगातून कसं सगळं मोठं मोठं दिसावं तसंच काहीसं लहान मुलांचं गोष्टीचं पुस्तक वाचताना होत असणार. हॅन्स अँडरसनच्याच एका गोष्टीत चेटकिणीची आज्ञा मानून झाडाच्या पोकळ बुंध्यात खूप खूप खाली उतरत चाललेल्या सैनिकासारखं गोष्टीत खोल खोल उतरत जाण्याचा अनुभव प्रत्येकानेच आपापल्या लहानपणी घेतलेला असणारच. तिथं पडलेल्या सोन्याच्या मोहरांच्या राशीनं डोळे दिपायचे ते त्यांच्या किमतीमुळे नाही तर पिवळ्या धम्म रंगाच्या चकचकाटामुळे आणि मग तितकंच कौतुक मातीत उगवलेल्या इवल्या फुलाचंही असायचं. मनावर अजून हिशेबीपणाची, व्यवहारी चतुरपणाची, अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांची ओझी नसताना त्या अद्भुतरसात मारलेली बुडी म्हणजे काय होतं हे मोठं झाल्यावर पुन्हा अनुभवणं कठीण...
एकदा हॅन्स अँडरसनच्या परिकथांचं एक पुस्तकही हाती लागलं. या गोष्टी मात्र आजवर वाचलेल्या सगळ्या गोष्टींहून थोड्या वेगळ्या होत्या. त्यात म्हटलं तर अद्भुतरम्यता होती, पण म्हटलं तर त्या माझ्याच वयाच्या लहान लहान मुलांच्या धिटुकल्या गोष्टी होत्या. अचानक त्या जादूच्या प्रदेशात शिरायच्या, अचानक आपल्याशीच गप्पा मारल्यासारख्या बोलू लागायच्या, आपल्याच अवतीभोवतीचं जग समोर उभं करायच्या. त्या वाचताना कधी खळखळून हसूही यायचं, पण अंती मनामध्ये विचित्रशी बोच उरायची. ती पुन्हा पुन्हा त्या गोष्टींकडे खेचून न्यायची. कधी पुस्तकांतून, कधी इंग्रजीच्या धड्यांमधून, कधी चित्रपटांतून, कधी अनिमेशन्समधून किंवा गाण्यांतून या गोष्टी पुन्हा पुन्हा भेटत राहिल्या. त्या कधी दूर गेल्याच नाहीत. त्यांचे संदर्भ जगण्यामध्ये पुन्हा पुन्हा डोकावत राहिले.
खरं तर अँडरसनच्या गोष्टी किती दूरदेशीच्या. त्याच्या ध्रुवीय बर्फाळलेल्या प्रदेशाचा इथल्या सदा घामानं घुसमटलेल्या उष्ण कटिबंधीय जगण्याशी कसलाच संबंध नाही. त्याचा तो शुभ्र रंगांच्या छटांनी आणि आकाशातील प्रकाश लहरींनी झगमगणारा प्रदेश आपल्या धडसा ओळखीचाही नाही. तिथल्या बर्फाची, थंडीची कल्पना नाही. त्यामुळे वसंताबरोबर सृष्टीतील सगळे रंग परतत असतानाची वर्णनं या गोष्टीमध्ये जशी सतत नव्याने हरखून जात केलेली दिसतात, त्यातला आनंदही पूर्णपणे कळू शकत नाही. पण कदाचित लहान मुलांजवळ असणारे कल्पनेचे पंख त्यांना कितीही दूरवरची सैर सहज घडवून आणतात. त्यामुळे हे परकेपण कधी जाणवलं नसावं. शिवाय प्रत्यक्षदर्शनाची उणीव भासू नये इतकी तंतोतंत वर्णनं या गोष्टींच्या सोबतीला नेहमीच होती. आणि फुला-पक्ष्यांची-झाडांची अनोळखी नावं कितीही वेगळी वाटली, तरीही त्यातली मुलं-मुली आपल्याच वयाची असल्यानं त्यांचं भावविश्व मात्र ओळखीचं होतं.
मोठं होता होता या गोष्टींमधलं अद्भुत मागे सरलं. भोवतालच्या जगाच्या व्यवहारांकडे डोळे उघडून पहायला हळूहळू शिकताना या गोष्टी नव्यानं भेटल्या. माणसं, त्यांच्या स्वभावातले बारकावे, साध्यासुध्या वागण्यात दडलेले अनेक अर्थ समजून घेत आपणही हळूहळू मोठे होत असतो. या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा बरोबर आणि चूकचे ढोबळ अर्थ विचारांना येऊन चिकटण्याची भीती सगळ्याच कोवळ्या मनांना सतत असते. बुद्धीचे नकळत कप्पे पडतात. हा ढोबळपणा मग बघताबघता नकळत जगण्याचाच भाग होऊन बसतो. चकचकाट आणि खरंखुरं सौंदर्य, मोकळं मन आणि उथळपणा, स्वत:वर मनस्वीपणे प्रेम करणं आणि आत्मप्रौढी वगैरे एकमेकांच्या फार जवळजवळ असलेल्या गोष्टींमधले बारीक बारीक भेद लक्षात येत नाहीत. हरणं आणि जिंकणं याच्या अध्येमध्ये आणि पारही असलेल्या अनेक शक्यता लक्षात येत नाहीत. आपलं जगणं व्यवहारी चतुरपणावर बेतलेलं असावं की, चांगुलपणावर यात निवड करता येत नाही.
अँडरसनच्या गोष्टींनी कळत नकळत या गोष्टींमधली पुसटशी रेषा ठळक करून दाखवली. उथळपणाचा त्याला भारी राग. अशा गोष्टींना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्यांची तो आपल्या गोष्टींमधून पदोपदी खिल्ली उडवताना दिसला. मग ती गोष्ट धर्माची असो, कलेची किंवा हुशारीची. नायटिंगेलच्या गोष्टीमध्ये राजाचा उत्तराधिकारी बुलबुलच्या शोधात निघतो, तेव्हा गायीच्या हंबरण्याला आणि बेडकाच्या डराव डराव करण्यालाच तो बुलबुलचा आवाज समजतो. पुढे यंत्र पक्ष्याच्या गाण्यातली यांत्रिक आवर्तनं आणि खऱ्या बुलबुलचं उत्स्फूर्त गाणं यातला फरक गानगुरूंपासून ते दरबाऱ्यांपर्यंत कुणालाही कळत नाही ना त्याबद्दल कसली खंत त्यांना सतावत. उलट उत्स्फूर्ततेचा अभाव हेच त्या यंत्रपक्षाच्या गाण्याचं बलस्थान ठरतं, कारण मग ते सगळ्यांनाच समजायला सोप्पं जातं. त्याची गणितासारखी फोड करून येताजाता म्हणता येतं. मनीबॉक्स नावाच्या गोष्टीत 'माणूस माणूस' खेळणारी खेळणी आपल्याजवळ असलेली मर्यादित तोकडी माहिती ज्ञानीपणाचा आव आणत एकमेकांनाच ऐकवत बसतात.
असा उथळपणा भरजरीपणाच्या नावाखाली समाजात खपवूनही घेतला जातो, हेही बहुधा त्याला दाखवून द्यायचं असावं. म्हणूनच आपण सपशेल नागडे आहोत, हे लक्षात आल्यावरही त्याच्या गोष्टीतला राजा ओशाळा होऊन पळून जात नाही, तर मान उंचावून आणि छाती पुढे काढून तसाच चालत राहतो आणि त्याचे सेवकही त्याच्या अदृश्य अंगरख्याचं टोक सोडून देत नाहीत. 'द बेल' नावाच्या त्याच्या गोष्टीमध्ये खोल जंगलातून येणाऱ्या अज्ञात घंटानादाच्या शोधात निघालेली बरीचशी मंडळी जंगलाच्या बाहेरच थांबतात. पथारी पसरतात. गाणीबजावणी करतात. शेजारी लगोलाग उभ्या राहिलेल्या दुकानातल्या जिनसा खातात आणि काय सुंदर सहल झाली म्हणून समाधानानं घरी परततात. आवाजाचा शोध घेणं त्यांच्या दृष्टीनं गरजेचंच नसतं. पण या गोष्टीत अंतिमत: जी दोन मुलं टोकापर्यंत पोहोचतात, तेव्हा तिथं त्यांच्या पुढे उभा ठाकतो विश्वाचा अनादी घुमट.
लौकिकाच्या पार जाणाऱ्या अशा एखाद्या आणखी विशाल तत्त्वाकडे घेऊन जाणारे त्याच्या गोष्टींचे असे अमूर्त, संदिग्ध शेवट तेव्हा कोड्यांसारखे भासायचे. लहान मुलांच्या गोष्टी म्हटल्या की, त्यात धाडस, अचाट संकटं, लांबलचक प्रवास हे सगळं असणारच, ते इथंही असायचं. पण अँडरसनची विलक्षण दृष्टी हे साहस आणि अचाटपण शोधायची अगदी साध्यासुध्या गोष्टींमध्ये. खेळण्यांच्या जगावर बेतलेल्या त्याच्या टीन सोल्जरसारख्या गोष्टीमध्ये टेबलवरची खेळण्यांची दाटीवाटी, वाऱ्यानं उघडलेली खिडकी, पाऊस, नाल्यातील पाण्याचा प्रवाह वगैरे सर्वसामान्य जगण्यातल्या नेहमीच्या बिनमहत्त्वाच्या गोष्टीच त्या छोट्याशा सैनिकासाठी महाकाय संकटासारख्या चाल करून येतात. सैनिक पत्र्याचा असल्याने त्याची हालचाल होणं वास्तवात शक्यही नाही. पण तरीही त्या सैनिकाचा असा असहाय्य प्रवास हा अखेर त्याच्या अविचल निग्रही बाण्याची गोष्टच बनायचा. वास्तवाची जराही मोडतोड न करता कल्पनेच्या जगात घेऊन जाण्याची त्याची अशी हातोटी थक्क करणारी होती.
लहान मुलांसाठीच्या गोष्टी म्हणून गोडमिट्ट शेवट करण्याचं दडपणही बहुधा या परिकथाकारानं मानलं नसावं. त्यामुळे सुखान्त शेवट साधण्यासाठी गोष्टीच्या स्वत:च्या म्हणून असलेल्या तर्कामध्ये त्यानं ढवळाढवळ केलेली कधी दिसली नाही. त्याची मरमेड पहिल्यांदा भेटली ती पुस्तकातून नव्हे तर डिस्नेच्या अनिमेशनमधून. त्यात ती अगदीच हसरी, खेळकर, आपल्या फ्लाउंडर माशाबरोबर मस्ती करणारी अशी होती. त्या गोष्टीचा शेवटही अगदी साचेबद्ध होता, ज्यात अखेरीस राजपुत्र चेटकिणीची खांडोळी करतो आणि मरमेडला कायमसाठी पाय मिळतात. पुढे मूळ गोष्टीत तिचा सदा खिन्नतेत बुडालेला स्वभाव समजला आणि कोपनहेगनच्या बंदरावर उभारलेल्या तिच्या शिल्पाच्या उदासवाण्या देहबोलीची संगती लागली. या गोष्टीचा शेवट तर धक्कादायकच वाटला होता. तिथं अखेरपर्यंत मरमेडला ना माणसाचं शरीर मिळत नाही, ना राजपुत्र तिला आपलंसं करत, पण एक अनोखं पारदर्शी शरीर मात्र मिळतं आणि अश्रू ढाळण्याची मुभा हे तिचं बक्षीस ठरतं. या संदिग्धतेची, चांगलं आणि वाईट, बरोबर आणि चूक यांच्या पल्याड असणारी, वास्तव आणि कल्पनेची सहज सरमिसळ करणारी एक तिसरी वाट या गोष्टींनी दाखवून दिली. या वाटेनं अभिजात साहित्याच्या वाचनाकडे सहज आणून सोडलं.
मधला काही काळ अँडरसन फारच भाबडा आणि शब्दबंबाळ वाटण्याचाही होता. तेव्हा त्याच्या गोष्टींवरच्या टीकाही वाचनात आल्या. बाटलीचं बूच, माणसाची सावली, वह्या-पुस्तकांमधली नाचरी अक्षरं, बगिचातलं फूल न् फूल अशा समोर येईल त्या त्या प्रत्येक वस्तूची गोष्ट बनवण्याची त्याची तऱ्हा, ती वर्णनं पाल्हाळीक वाटू लागली. लाल बूट घालण्याची अनिवार इच्छा असण्यात वाईट काय आहे? तशी इच्छा करणाऱ्या मुलीला सतत नाचत राहण्याची क्रूर शिक्षा त्यानं का द्यावी असं वाटू लागलं. त्याचे विचार फारच जुनाट आणि साचेबद्ध वाटताहेत का, पुन्हा पुन्हा तो तेच ते सांगतोय का असंही कधी वाटलं. पण आज पुन्हा या गोष्टींकडे थोडं त्रयस्थपणे पाहताना दिसतात त्या गोष्टींमधल्या अपार शक्यता. त्यानं मांडून ठेवलेल्या संकल्पना कित्येक वर्षं पुरतील अशाच आहेत. ती बीजं कुठे ना कुठे सतत उगवताना दिसतात. बदकाचं कुरूप पिलू, नागडा राजा, लाल बुटांतली मुलगी, अखंड वाट पाहणारी मरमेड, पैशानं भरलेली मातीची डुक्करपेटी या सगळ्या संकल्पना अजूनही रूपं बदलून पुन्हा पुन्हा समोर येत राहतात. काळाच्या रेट्याला पुरून उरणं कदाचित यालाच म्हणत असावेत.
आणि अखेर तो जी मानवी तत्त्वं मांडू पाहतो, ती काळ कितीही बदलला तरीही शाश्वत राहणार आहेतच. गोठलेल्या हृदयांना प्रेमानेच पाझर फुटेल हे त्यानं सांगितलेलं तत्त्व 'फ्रोझन' पाहताना नव्यानं सापडलं. ‘स्नो क्वीन’मधला के आणि ‘फ्रोझन’मधली एल्झा या एकमेकांपेक्षा सर्वस्वी भिन्न व्यक्तिरेखा आहेत. पण ‘स्नो क्वीन’ची गोष्ट हीच ‘फ्रोझन’मागची प्रेरणा आहे. तिच्या गाभ्याशी असलेल्या गोठलेल्या, प्रेमहीन मनांच्या प्रतीकाचा अत्यंत सुंदर विस्तार चित्रपटात झाला आहे. मरमेडची गोष्ट ढोबळपणे सांगणाऱ्या डिस्नेनेच तो बनवलाय हे महत्त्वाचं. त्यातला ओलाफ म्हणजे तर शेकोटीच्या प्रेमात पडलेल्या अँडरसनच्या स्नोमॅनचाच वंशज असावा बहुतेक. काळ बदलेल, त्यानुसार संदर्भ बदलत राहतील पण या शक्यता अनेक काळापर्यंत नव्या कलाकृतींना प्रेरणा देत राहतील, वेलीसारख्या वाढत विस्तारत राहतील. या गोष्टींचा मूळचा कणखर कणा त्यांना आधार देईल.
या अनुवादाच्या निमित्तानं अँडरसनच्या गोष्टी पुन्हा तपशीलवार, बारकाईनं वाचल्या हे झालंच, पण त्यांच्याबद्दल अनेक वर्षं मनामध्ये साचलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली ही विशेष समाधानाची गोष्ट आहे. या गोष्टींच्या गारुडातून कधी सुटका होण्याची शक्यता नाहीच, पण त्यांचं ऋण किंचितसं उतरून थोडा श्वास घेण्याइतकी मोकळीक जरूर मिळाली आहे.
.............................................................................................................................................
‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342
.............................................................................................................................................
लेखिका चैताली भोगले मुक्त पत्रकार, अनुवादक आहेत.
chaitalib6@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment