‘कहाणी पाचगावची’ ही फक्त एका गावाची गोष्ट नाही...
ग्रंथनामा - झलक
मिलिंद बोकील
  • ‘कहाणी पाचगावची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 26 January 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक कहाणी पाचगावची Kahani Pachgavchi मिलिंद बोकील Milind Bokil

प्रसिद्ध कथा-कादंबरीकार मिलिंद बोकील यांचं ‘कहाणी पाचगावची’ हे नवं पुस्तक नुकतंच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला बोकील यांनी लिहिलेलं मनोगत...

.............................................................................................................................................

‘गोष्ट मेंढा गावाची’ हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झाले, तेव्हा ते गाव करत असलेल्या अद्भुत प्रयोगाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. मात्र तेव्हा एक प्रतिक्रिया अशीही होती की, हे अपवादात्मक असे एक उदाहरण आहे. अशा प्रकारची काही गावे असतात की, जिथे एखाद्या चांगल्या तळमळीच्या समाजकार्यकर्त्यामुळे परिवर्तन झालेले दिसते. बाकीच्या गावांमध्ये असे काही होत नाही. महाराष्ट्रातल्या गावांचे सर्वसाधारण चित्र असे आहे की- गावांत भांडणे, गटबाजी आणि राजकारण असते, शेतीची दुर्दशा झालेली असते, शेतकऱ्यांच्या मुलांना शेती करण्यात रस नसतो, एकजुटीने गावाचा विकास करावा असे कोणाला वाटत नाही आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होऊ लागलेले आहे. मेंढ्यासारख्या एखाद्या लहान, आदिवासी गावात ‘स्वराज्याचा’ प्रयोग होऊ शकेल; पण इतर ठिकाणी ते शक्य नाही.

या आक्षेपाला उत्तर द्यायचे म्हणून नाही, पण मेंढ्याचा अभ्यास चालू असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाचगावकडे लक्ष वेधले गेले होते. मेंढा गावासोबत काम करणाऱ्या मोहन हिराबाई हिरालाल यांचेच एक तरुण सहकारी विजय देठे तिथे असाच प्रयत्न करत होते. ‘गोष्ट मेंढा गावाची’ हे पुस्तक तयार होत असतानाच म्हणजे जून २०१२ मध्ये पाचगावलाही सामूहिक वनाधिकार मिळाल्याचे समजले. तसा हक्क मिळणारे चंद्रपूर जिल्ह्यातले ते पहिले गाव होते. मात्र वनाधिकार मिळाल्याने लगेच काही विकास सुरू झाला नव्हता. वनाधिकाराची अंमलबजावणी करण्यात मेंढा गावाला जेवढ्या अडचणी आल्या नव्हत्या, त्यापेक्षा जास्त अडचणी पाचगावला येत होत्या. मात्र त्या सगळ्या अडचणींना तोंड देत हे गाव निश्चयाने, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या स्वशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी धडपडत होते. विजय देठे यांच्याकडून ही सगळी प्रक्रिया समजत होती. त्या वेळी असे लक्षात आले की, पाचगावचा हा लढाही शब्दांकित करण्यासारखा आहे. फेब्रुवारी २०१४मध्ये पाचगावला भेट दिली, तेव्हा तिथल्या गावकऱ्यांसमोर ही कल्पना मांडली. त्यांना ही कल्पना आवडली आणि नंतर असा अभ्यास करण्यात यावा, असा रीतसर ठरावच त्यांच्या ग्रामसभेने मंजूर केला.

त्यानंतर पाचगावला भेटी देणे, तिथे राहणे, गावकऱ्यांशी बोलणे, त्यांची चाललेली सगळी प्रक्रिया समजावून घेणे असा अभ्यास सुरू झाला. मेंढा गावाच्या बाबतीत असे होते की, बहुतांशी प्रक्रिया घडून गेलेली होती. तिचे ऐतिहासिक शब्दांकन करायचे होते. मात्र पाचगावमधली प्रक्रिया ही अभ्यासकासमोरच उलगडत होती. त्यामुळे सहभागी निरीक्षणाच्या पद्धतीनेच ती समजावून घेतली. त्यामध्ये निरनिराळ्या गोष्टी सामील होत्या, पण दोन सर्वांत महत्त्वाच्या. एक म्हणजे- गावकऱ्यांसोबत जंगलात हिंडणे आणि दुसरे- अर्थातच ग्रामसभेच्या बैठका पाहणे. पाचगावला गेलेलो असताना असा एकही दिवस गेला नाही की, ज्या दिवशी जंगलात फेरी झाली नाही. पाचगावच्या गावकऱ्यांनी आपली वनसंपदा अत्यंत काळजीपूर्वक जपलेली असल्याने त्या जंगलात भटकंती करणे ही एक अनुपम आनंदाची गोष्ट होती. निरनिराळ्या ऋतूंत जंगलाचे निरनिराळे वैभव दिसायचे. उन्हाळ्याच्या शेवटी ओढ्याकाठच्या झाडावर जांभळांचे रसदार घोस लगडलेले असायचे. पावसाळा झाल्यावर सगळ्या रानात ओल्या मातीचा आणि भिजलेल्या पानांचा घमघमीत वास दरवळायचा. हिवाळ्यात सगळ्या झाडांना धुक्याने लपेटलेले असायचे. पानगळती झाली की, सगळ्या भूमीवर पिवळ्या पानांचे आच्छादन पसरायचे. हिरव्यागार बांबूंची बेटे तर कायमच सळसळत असायची. जंगलात ठिकठिकाणी भेकरांचे, सांबरांचे, गव्यांचे, रानडुकरांचे ठसे दिसायचे. वाघाचेही असायचे. मात्र अनेक वेळा उशिरापर्यंत बसूनही वाघ कधी दिसला नाही (पाचगावच्या ग्रामस्थांना मात्र त्याचे नेहमीच दर्शन होते). स्थानिक गावकऱ्यांच्या ताब्यात जंगलाचे व्यवस्थापन दिले की, ते जंगल कसे समृद्धीने डवरून येते याचे आदर्श उदाहरण म्हणजे पाचगाव आहे.

मात्र समाजशास्त्राच्या अभ्यासकाच्या दृष्टीने सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ग्रामसभेच्या बैठका. या पुस्तकात लिहिले आहे त्याप्रमाणे आठवड्यात ग्रामसभेच्या किमान दोन बैठका होतातच आणि त्या अत्यंत विधिवत्, गंभीरपणे होतात. ग्रामसभा भरवून आपल्यापुढच्या प्रश्नांची चर्चा करणे, हा पाचगावच्या गावकऱ्यांचा जसा छंद आहे तसेच एक पवित्र कर्तव्यही. उघड्या आकाशाखाली, तासन्तास चालणाऱ्या ग्रामसभेच्या बैठकांमधून समाजहृदयाची धपापती स्पंदने जशी समजायची, तशीच समाजबांधणीची प्रक्रिया हळूहळू कशी आकाराला येते याचेही ज्ञान व्हायचे. जनता ही एक संकल्पना आहे; मात्र ग्रामसभा हे त्या जनतेचे खरेखुरे, प्रत्यक्ष असे शक्तिरूप आहे. त्या शक्तिरूपाचे दर्शन घडणे ही भाग्याची आणि साफल्याची गोष्ट होती.

अभ्यासकाच्या दृष्टीने आणखी एक समाधानाची गोष्ट म्हणजे, पाचगावच्या ग्रामसभेने आपले सगळे रेकॉर्ड अत्यंत व्यवस्थितपणे ठेवलेले होते. ग्रामसभेच्या प्रत्येक बैठकीचा सविस्तर वृत्तांत अगदी पहिल्या दिवसापासून लिहिलेला होता. त्यामुळे प्रत्येक बैठकीला उपस्थित राहता आले नाही तरी त्यात काय चर्चा झाली, ते सहजच कळून यायचे. बहुतेक सगळे आर्थिक व्यवहार बँकांमार्फतच होत असल्याने सगळे हिशेब पारदर्शी होते. प्रत्येक कुटुंबाला किती मजुरी मिळाली याचा नेमका आकडा उपलब्ध होत होता. पुस्तकात वर्णन केले आहे त्याप्रमाणे इतरही तऱ्हेतऱ्हेची रजिस्टर्स, पत्रव्यवहाराच्या फायली आणि नोंदवह्या अगदी काळजीपूर्वक राखलेल्या होत्या. गावाकडे कॉम्प्युटर असल्याने यातल्या बहुतेक नोंदी या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मिळू शकायच्या.

पाचगावच्या गावकऱ्यांनी अभ्यासाच्या या प्रक्रियेला अत्यंत मनापासून सहकार्य केले- विशेषत: तिथल्या तरुणवर्गाने. पाचगावच्या या सगळ्या प्रक्रियेचा आधार तिथला तरुणवर्ग आहे. ज्या गावात सळसळत्या रक्ताची तरुण मुले एकोप्याने पुढे येतात, त्या गावाला आपोआपच पुरोगामित्व प्राप्त होत असते; कारण तरुण माणसे पुढे, भविष्याकडे बघणारी असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ही सगळी कहाणी या गावकर्‍यांनी एकत्र बसून ऐकलेली आहे. या संपूर्ण पुस्तकाचे वाचन दिनांक ६, ७ व ८ मार्च २०१७ रोजी पाचगावच्या ग्रामस्थांसोबत करण्यात आले. ते ऐकण्यासाठी सरासरी ८० ते ९० गावकरी तिन्ही दिवस उपस्थित होते. ग्रामसभेने सर्व मजकूर ऐकून आणि आवश्यक तिथे दुरुस्त्या सुचवून या मजकुराला मान्यता दिली. हे ऐकणे त्यांना सोपे गेले नसणार, कारण त्यांच्याच वागण्या-बोलण्याचा इतिहास त्यामध्ये वर्णन केलेला आहे; परंतु अत्यंत गंभीरपणे आणि तन्मयतेने त्यांनी हे कथन ऐकले.

अभ्यासकाच्या दृष्टीने सोईची असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, पाचगाव हे मराठी बोलणारे गाव आहे. या गावातले बहुसंख्य गावकरी गोंड असले तरी काळाच्या ओघात ते मराठी ग्रामीण संस्कृतीचा भाग झालेले आहेत. मेंढा गावाची भाषा गोंडी होती. तिथले गावकरी मराठी बोलू शकत असले तरी मला गोंडी येत नसल्याने त्यांच्याशी आत्मीय संवाद साधणे कठीण व्हायचे. कोणत्याही लेखक-अभ्यासकासाठी भाषेचा दुवा महत्त्वाचा असतो. पाचगावमध्ये ती अडचण नव्हती. त्यामुळे तिथल्या स्त्री-पुरुषांशी सहज संवाद होऊ शकला. त्यांच्या भावभावना आणि विचार समजून घेता आले.

मराठी ग्रामीण संस्कृतीचा हिस्सा असणे हीसुद्धा पाचगावच्या संदर्भात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अबुजमाडमधले माडिया गोंड हे एक टोक मानले, तर मेंढा गावचे गोंड हे दुसरा टप्पा आहेत, तर पाचगावचे गोंड हे तिसरा टप्पा मानता येतील. काळाच्या ओघात आणि भौगोलिक स्थलांतरामुळे या आदिवासी समूहांचा भोवतालच्या व्यापक समाजाशी संपर्क आला. मेंढा आणि पाचगाव या दोन गावसमूहांचा जो अभ्यास केलेला आहे, त्यावरून असे दिसते की, आपले स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून या गावांनी भोवतालच्या समाजव्यवस्थेशी जुळवून घेतलेले आहे. त्यासाठी स्वत:मध्ये जे आवश्यक वाटते ते परिवर्तन केलेले आहे. आदिवासी समूहांचा विकास कसा करायचा, हा प्रश्न अनेकदा चर्चेला येतो. या प्रश्नाचे खरे उत्तर असे आहे की- आपला विकास कसा करायचा, हे त्या-त्या समूहांनी स्वत: ठरवायचे आहे. ती इतरांनी सांगायची गोष्ट नव्हे. भोवतालच्या व्यवस्थेने ते करण्यासाठी त्यांना आवश्यक तो अवकाश, संधी आणि उसंत उपलब्ध करून दिली पाहिजे. अशी संधी जेव्हा मिळते तेव्हा मेंढा व पाचगावचे आदिवासी स्वत:चा विकास कसा करतात आणि तो करत असताना सगळ्या समाजालाच मार्गदर्शक होईल अशी प्रक्रिया कशी चालवतात, हा समजून घेण्याचा खरा मुद्दा आहे.

या पुस्तकात वर्णन केलेली कहाणी ही पाचगाव या एका गावाची असली, तरी प्रत्यक्षात आता हे एकटे-दुकटे गाव राहिलेले नाही. वन हक्क कायदा (२००६) किंवा सुधारित ‘पेसा’ कायदा (२०१४) या अंतर्गत अनेक आदिवासी गावांना असा विकास करण्यासाठी आता संधी उपलब्ध झाली आहे. केवळ गडचिरोली जिल्ह्यातच बाराशेहून अधिक गावांना सामूहिक वन हक्क मिळालेले आहेत. ही कहाणी पुस्तकरूपाने आणण्याचा एक उद्देश असाही आहे की, हे अधिकार मिळाल्यानंतर विकासाची प्रक्रिया कशी चालवता येते याचे उदाहरण या गावांपुढे यावे. या सगळ्या वनाधिकारप्राप्त गावांनी जर अशी समन्यायी, उत्पादक विकासाची प्रक्रिया चालवली, तर एक फार मोठी अबोल क्रांती देशामध्ये घडून येईल.

त्या दृष्टीने पाहिले तर हे आधुनिक राज्यशास्त्र आहे. ‘स्वराज्य’ ही काही जुनाट संकल्पना नाही. ती खरे तर अति-आधुनिक संकल्पना आहे. शहरातले मध्यमवर्गीय लोक या संकल्पनेला पूर्ण पारखे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व कळत नाही. खरं तर ७३व्या आणि ७४व्या घटनादुरुस्तीचा हाच उद्देश आहे, पण आपण तो प्रत्यक्षात आणलेला नाही. प्रतिनिधींच्या हातात सत्ता सोपवून आपण लोकशाहीचे विडंबन हताशपणे बघत बसलेलो आहोत.

ही कोंडी कशी फोडता येईल याचे पाचगावसारखे गाव आपल्या परीने दिग्दर्शन करते, ही त्याची विशेषता आहे. या पुस्तकाच्या शेवटी म्हटले आहे त्याप्रमाणे ही सुफळ, संपूर्ण झालेली कहाणी नाही. नुकतेच बीज पेरून तगवलेले हे एक लहानसे रोप आहे. अशी रोपे आपण जोपासणार की नाही आणि अधिक प्रमाणात लावून त्यांचा विस्तार करणार की नाही याचा निर्णय समाजाने करायचा असतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4345

.............................................................................................................................................

लेखक मिलिंद बोकील प्रसिद्ध कथा-कादंबरीकार आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......