‘आरज़ू’ वो है जो सीने में रहे नाज़ के साथ
सदर - रौशनख़याल तरुण
हिनाकौसर खान-पिंजार
  • डावीकडे विशाल पोखरकर डॉ. आरजू तांबोळी, उजवीकडे आरजूच्या कुटुंबीयांना मानपत्र देताना प्रा. विलास वाघ आणि उषा वाघ
  • Thu , 25 January 2018
  • रोशनख्याल तरुण आरजू तांबोळी Aarzu Tamboli विशाल पोखरकर Vishal Pokharkar

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये मी आरजूला भेटायला गेले. निळी जीन्स आणि एक प्रिंटेड टॉप घातलेली तिशीतली सडपातळ मुलगी माझ्यासमोर उभी राहिली. अगदी साधं व्यक्तिमत्त्व पण तिच्याशी बोलताना तिच्या विचारांची बैठक, तत्त्वनिष्ठता आणि स्वभावातील बंडखोरी हळूहळू जाणवायला लागली. खरं तर बंडखोरी हा आरजूच्या जगण्याचाच भाग झालाय, हे लक्षात येऊ लागलं.

घरच्यांचा विरोध पत्करून प्रथम तिनं बीएएमएस केलं. कसाबसा विरोध मावळतोय तर परीक्षा होताच घरात सांगून टाकलं, ‘परवापासून मी युपीएससीच्या परीक्षेच्या तयारीला लागणार आहे. त्यासाठी पुण्याला जाणार आहे.’ कुटुंबियांसाठी हा नवा बॉम्ब होता. याबाबतीत तिची मनमानी ऐकली जाणार नसल्याचं आईनं जाहीर केलं. फार हौस असेल तर करावं स्वत:च्या हिंमतीवर म्हणून सांगितलं. मग तिनंही सरळ बॅग उचलली आणि सांगलीतील तिचं आटपाडी गाव सोडून पुण्याची वाट धरली. कुटुंबियांनी मुलगी ‘वठणी’वर यावी यासाठी संपर्क तोडून आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्नही केला; पण ती बधली नाही. नोकरी करत अभ्यासाला लागली आणि विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. मुंबईत आज ती विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करत आहे.

तरी तिच्या वाटेतले काटे संपले नव्हते. धार्मिक विद्वेष पसरवण्याच्या सध्याच्या काळात आरजूनं सहजीवनासाठी एका हिंदू मित्राची निवड केली. पळून किंवा लपून नव्हे तर रीतसर आंतररधर्मीय विवाहाची घोषणाच केली तिनं. मग काय इस्लामिक जमातींचा कडवा विरोध होऊ लागला. कुटुंबियांना निरनिराळ्या धमक्या येऊ लागल्या. पण या साऱ्याला पुरून उरत तिनं समाजसाक्षीनं, कुटुंबियांच्या उपस्थितीतच लग्न केलं. 

आरजूला म्हटलं, ‘भारीच मनमानी केलीस की.’ तर त्यावर ती चटकन म्हणाली, “कुटुंबात काही अडचण असेल, आर्थिक तडजोड करायची असेल तर ते मी शांतपणे समजून घेऊ शकते. त्याप्रमाणे अ‍ॅडजस्टही करेल, पण माझ्या तत्त्वात, मूल्यात काही आडकाठी येणार असतील तर मी अजिबात ऐकत नाही. मग त्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी असते. जोखीम आणि त्याची जबाबदारी पेलण्याची मी जर क्षमता ठेवत असेल तर अन्य कुणी मी कसं जगावं, वागावं हे सांगण्याचं कारणच उरत नाही. अर्थात यासाठी तुम्हाला तुमच्या क्षमता आणि आर्थिक स्वावलंबन हे दोन्ही सिद्ध करावं लागतं.”

आरजू लहानपणापासूनच अशी रोखठोक मतांची. लहानपणापासूनच तिला वाचनाची भरपूर आवड. त्यामुळे निरनिराळ्या पुस्तकांतून, वाचनातून तिची मतप्रक्रिया तयार होत गेली. आरजू तशी मूळची सांगली जिल्ह्यातील आटपाडी या छोट्याशा गावातील. तीन बहिणी, एक भाऊ व आई-वडील असं तिचं कुटुंब. वडिलांची छोटीशी शेती, तर आई तहसील कार्यालयात नोकरीला. पण तिच्या आईकडच्या आजोबांनी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिलं होतं. संघर्ष करत त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवलं होतं. त्यामुळेच तिच्या आईलाही मुलींनी शिकावं असं वाटतं होतं. त्यामुळे घरात बऱ्यापैकी शिक्षणाला पूरक वातावरण होतं.

आरजूनं बारावीनंतर बीएएमएस करायचं ठरवलं. डॉक्टर होऊन गरिब रुग्णांची मदत करायचं असं भाबड्या वयातलं स्वप्न तिला खुणावत होतं. मात्र घरातल्यांच्या मनात वेगळंच होतं. तिथं तिला पहिला विरोध झाला. आरजूला बारावीत चांगले गुण आहेत, तर तिनं बी. एसस्सी करावं असं कुटुंबियांच मत पडलं. शिवाय बीएएमएस वगैरे शिकून कुठं त्या तोडीचं स्थळ शोधत फिरायचं हाही प्रश्न होताच. त्यातून मध्यममार्ग म्हणजे तिनंच आपली सरळरेषेतील एक वाट निवडावी. फार शिकू नये. सर्वांत प्रथम आरजूला हा मुद्दाच खटकला. तिला तिच्या मेरिटवर सांगलीतच बीएएमएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता, किंबहुना मिळाला होता. असं असतानाही भविष्यातील नुसत्या अंदाजावरून वर्तमानातील प्रवेशाची संधी का नाकारायची हेच तिला कळत नव्हतं. तिनं आपण बीएएमएसच करणार असल्याचं घोषित केलं. आरजूचा प्रवेश मेरिटनं झाला तरीही खाजगी संस्थेत झाला होता. त्यामुळे तेथील फीचा प्रश्न उपस्थित करत कुटुंबियांनी पुन्हा हात वर केले. पण यावरही आरजूनं ‘एज्युकेशन लोन’चा उपाय शोधला. आरजूच्या या हट्टापुढं शेवटी तिच्या आई-वडिलांनी हात टेकले आणि एज्युकेशन लोन वगैरेचे सोपस्कार पार करत तिचा सांगलीतील अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केला.

घर सोडून हॉस्टेलमध्ये राहण्याचा हा काळ तिला तिच्या एकूण जाणीवा वाढवण्यासाठी महत्त्वाचा वाटतो. याविषयी आरजू सांगते, “आपले निर्णय घेणं, वेगवेगळ्या गोष्टीत अ‍ॅडजस्ट करणं या गोष्टी तर शिकता आल्याच, पण याच काळात माझ्या लक्षात आलं की, रुग्णांना मदत करणं ही वाटते, तेवढी सोपी गोष्ट नाही. पैशांअभावी लोक मरून जायचे, नातेवाईक हतबल व्हायचे, मोठमोठ्या आजारांसाठी तर लोक त्यांची संपत्ती, जमीन जुमलेसुद्धा पणाला लावायचे. हे सगळं अस्वस्थ करणारं होतं. अनेकदा गरिबांसाठी काही योजना असतात, सुविधा, मदत असते, पण त्याही त्यांना ठाऊक नसतात. या सगळ्याचा परिणाम माझ्या मानसिकतेवर होऊ लागला. आपणही अशाच तकलादू गोष्टीचा भाग व्हायचं का? उद्या आपल्यासाठी लोकांचं जगणं-मरणं हा ‘रूटीन’चा भाग होणार का? असे प्रश्न त्रास देऊ लागले. लोकांना मोफत औषधं पुरवण्याला मला एकटीला किती मर्यादा असू शकतात, या जाणीवेनं खरंतर खडबडून जागंच केलं. अशा लोकांसाठीच्या धोरणनिश्चितीचा भाग होणं जास्त महत्त्वाचं वाटू लागलं. मग बीएएमएसच्या पहिल्याच वर्षी ठरवलं की, पुढं नागरी सेवेमध्ये जायचं.”

खरं तर आरजूनं असं ठरवल्यानंतरही तिला पुढची दिशा माहीत नव्हती. सांगली शहरात ती युपीएससी करणारं कोणी भेटतंय का हे शोधत होती. शेवटी तिला तिच्या मैत्रिणीचा एक शेजारी, जो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, त्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून मूलभूत माहिती मिळवून तिनं काही पुस्तकं चाळायला सुरुवात केली. आरजूचं पहिल्यापासूनच अभ्यासाच्या पुस्तकांपलीकडचं भरपूर वाचन होतं. यातून तिनं मराठी व इतिहास हा विषय घ्यायचं ठरवलं. याच सुमारास तिला स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्रवीण चव्हाणांविषयी माहिती झाली. अन ही मुलगी, बीएएमएसच्या शेवटचा पेपर झाल्यानंतर त्याच रात्री पुण्यासाठी निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी तिला विचारलं, ‘तुझं ठरलंय ना, तुला यातच पुढं जायचं मग सोमवारपासून ये.’

तो शुक्रवारचा दिवस होता. त्यांनी असं एकदम तडकाफडकी सांगितल्यानं आरजूला कळेचना. अद्याप तिनं घरात याविषयी काहीही सांगितलं नव्हतं. सारं तिच्या मनातच होतं. आणि त्याविषयी घरात काहीही कल्पना न देता ती थेट कॉलेजच्या हॉस्टेवरूनच पुण्याला आली होती. त्यांचं काय मत पडेल याची तिला काही कल्पना नव्हती. शेवटी घरी जाऊन तिनं तिचा हा निर्णय सांगितला. अर्थातच पुन्हा प्रचंड विरोध झाला. ‘चांगलं डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण झालेलं असताना हे नवं कसलं खुळ म्हणत’ आईनं प्रचंड विरोध केला. ते तसं बरोबरही होतं. मुलगी दिशाहीन भरटकतेय अशी त्या माऊलीच्या मनात भीती होती. दोन दिवस घरभर नुसतीच घुसमट. पण ती बधत नाही म्हटल्यावर त्यांनी तिला पुढची काहीही मदत केली जाणार नसल्याचं सांगून टाकलं. आरजूनंही तातडीनं गाव सोडलं आणि ती सरळ सामान घेऊन पुण्याला आली. दरम्यान तिची राहण्याची सोयही झाली.

अवांतर वाचनानं विचारांची थोडीबहुत बैठक तयार झालेल्या आरजूला इथं निरनिराळ्या चळवळी, त्यांचे कार्यक्रम यांनी भुरळ घातली. चळवळींमध्ये सक्रिय काम करणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी तिला समाज, प्रश्न यांकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन दिला. अभ्यासाबरोबरच नव्या मोकळ्या आकाशानं तिची समज अधिकाधिक प्रगल्भ होऊ लागली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये ती हिरिरीनं सहभागी होऊ लागली. शक्य तितक्या प्रमाणात सामाजिक कार्याशी जोडून घेऊ लागली. एकीकडे ती ज्ञानाच्या, समजेच्या अंगानं समृद्ध होत होती, तर दुसरीकडं तिची काही प्रमाणात मानसिक घुसमटही सुरू होती.

तिचे आई-वडील तिच्या पुण्यात येण्यावरून इतके रागावले होते की, त्यांनी अक्षरक्ष: संपर्क तोडला होता. क्वचित बहिणी फोन करून चौकशी करत. मात्र आई-वडिलांनी पूर्णपणे बोलणं टाकलं होतं. आर्थिक कोंडी केल्यामुळे तरी मुलगी परत येईल, डॉक्टरच्या प्रॅक्टिसला सुरुवात करेल असं त्यांना वाटत होतं. मात्र आरजू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिला मिळालेल्या स्कॉलरशीपमधून तिचं काही महिने भागले. मात्र पुढची सोय करणंही आवश्यक होतं. युपीएससीच्या अभ्यासासाठी दिवस-रात्रीचा वेळ कमी पडत असताना नोकरी करणं अवघड होतं. पण पर्याय नव्हता. शेवटी तिनं संजीवन हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीची नोकरी स्वीकारली. शिवाय ती युपीएससीवरून एमपीएससीकडं वळू असा विचार करू लागली. दिवसा क्लास आणि अभ्यास व रात्री नोकरी, या प्रकारानं तिच्या अभ्यासावर परिणाम झाल्याचं आरजू कबूल करते.

ती म्हणते, “कुटंबियांचा मानसिक आधार नसणं ही कोणाही माणसाला दुबळी करणारी अवस्था. तो काळ अतिशय मानसिक त्रासाचा होता. घरातले बोलत नाहीत, रागावलेत याचा नाही म्हटलं तरी त्रास होत होता. पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी त्यांचा अबोलाही सहन करण्याची गरज होती. दुसरीकडं कमवणं गरजेचं होतं. याचा परिणाम अभ्यासावर होऊ लागला. यातून मध्यममार्ग म्हणून एमपीएससीची परीक्षा देऊ असा विचार सुरू केला. तब्बल नऊ महिने कुटुंबातील कोणीही आपुलकीनं चौकशी करत नव्हतं. जगानं पाठ फिरवली तरी आपल्यासोबत आपल्या घरातले आहेत म्हटलं की, उत्साहानं सगळ्या विरोधाकडे दुर्लक्ष करता येतं, पण घरातलेच सोबत नव्हते. आठ-नऊ महिन्यांनी आई-वडिलांच्या लक्षात आलं की, ही मुलगी ऐकणार नाही. तिचंच खरं करणार. तेव्हा रागावून उपयोग नाही म्हणत त्यांनी पुन्हा माझं बोट धरलं आणि एका घाणेरड्या मानसिक त्रासातून मी बाहेर पडले.

दरम्यान विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा निघाल्या. पहिल्याच प्रयत्नात मी परीक्षा पास झाले आणि मग उरलासुरला रागही निवळून गेला. त्यानंतर उलट घरातल्यांचं कौतुक व्हायला लागलं. त्यांचा गावात सत्कार झाला. नातेवाईकांनाही कौतुक वाटू लागलं.”

नोव्हेंबर २०१३पासून आरजू मुंबईत विक्रीकर निरीक्षक म्हणू काम करत आहे. कामाकडेही तिचा पाहण्याचा दृष्टिकोन असा की, शासन महसुलीच्या रक्कमेतून निरनिराळ्या योजना राबवतात. त्यामुळे अधिकाधिक महसूल गोळा कसा करता येईल, महसूल बुडवणाऱ्यांकडून तो कसा वसूल करता येईल याच्या ती प्रयत्नात असते. शासकीय नोकरी मिळाली आता मस्त राहू असा तिचा स्वभावच नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

आता आरजूचं क्लास वन अधिकारी बनण्याचं लक्ष्य आहे. प्रत्यक्ष शासकीय नोकरीला लागल्यावर तिनं मुस्लिम समाजातील किती तरुण आहेत याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, पण फारशी चांगली परिस्थिती नसल्याचं तिच्या लक्षात आलं. आयएएस अधिकाऱ्यांमध्ये आजपर्यंत एकही मुस्लिम मुलगी नाही ही गोष्ट भयंकर असल्याचं आरजू सांगते. “निरनिराळ्या योजना जाहीर होतात. तेव्हा मुस्लिमांच्या उन्नतीला पूरक काही नाही म्हणून समाज आरडाओरडा करताना दिसतो, पण मग धोरण बनवण्यात कुठं आहे तुमचा प्रतिनिधी,” असा सवाल ती करते. “जर तुमच्या गरजा सांगणारा कोणी धोरणनिश्चितीच्या प्रक्रियेतच नसेल तर कसं कळणार, काय हवंय या समाजाला? मुस्लिम नेते आहेत. फार तर ते घोषणा करतात मात्र प्रत्यक्ष धोरण बनवणारे, त्यांच्या हाताखालची माणसं, अधिकारी कोण असतात? ते जर मुस्लिम नसतील तर त्यांना मुस्लिम समाजाची नेमकी नस कशी कळणार? यासाठी आज तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे वळणं गरजेचं आहे. ” आरजूचा अभ्यासही अद्याप सुरू आहे. एमपीएससीच्या परीक्षेतून क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन ती अजूनही अभ्यासात मग्न आहे.

दरम्यान, याच प्रवासात तिला तिच्या आयुष्याचा जोडीदारही लाभला- विशाल पोखरकर. विशाल पत्रकार आहे. पुण्याच्या एका दैनिकात तो काम करतो. पुण्यात वेगवेगळ्या वैचारिक कार्यक्रमांना विशालचीही हजेरी असायची. त्यांच्या एका कॉमन मित्राकरवी दोघांची ओळख झाली. हळूहळू मैत्री. दोघांचा स्वभाव, विचार करण्याच्या पद्धती एकमेकांना पूरक आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी एकमेकांचा धर्म आणि इतर गोष्टींचा सारासार विचार केला. जगायला धर्म लागेल का? कितपत लागेल? संस्कार म्हणजे चांगलं जगण्याची चौकट. ती तर आहे आपल्याकडे, बाकी कर्मकांडांची गरज नाही अशा सगळ्यावर त्यांचं एकमत झालं. अन शेवटी त्यांनी एकमेकांना जोडीदार म्हणून निवडायचं ठरवलं. अर्थात हे सोप्प नव्हतं. कारण अडचण होती ती कुटुंबियांच्या मानसिकतेची. धर्माचा मुद्दा उपस्थित करत दोघांचे घरचे विरोध करणार ही गोष्ट ते जाणून होते. असं असलं तरी आरजूनं विशालला सांगून ठेवलं होतं की, ‘कितीही विरोध झाला तरी मी पळून जाऊन लग्न नाही करणार. पोलिस सुरक्षा घेऊ, पण पळून नाही.’

असं का? असं विचारल्यावर आरजूनं खूप छान उत्तर दिलं, “पळून जाण्यानं उगीच टीपिकल मुलीलाच दोषी देण्याच्या गोष्टीपेक्षाही शिक्षणावर त्याचं खापर फुटतं, याचा मला राग येतो. मुलगी दोषी का तर तिचं शिक्षण. मग शिक्षण देणारे कोण तर आई-बाप. यातून एकूणच चुकीचा संदेश जातो. इतर मुलींकडंही मग तसंच संशयानं पाहून पाळत ठेवण्याची भानगड घडू लागते. शिवाय विनाकारण आई-वडिलांपुढे तणावाची परिस्थिती निर्माण होते. हे सगळं टाळायचं असं ठरवून टाकलं होतं. विशालचंही म्हणणं होतं की, कुटुंबियांना पटवून देऊनच लग्न करायचं. मुलं-मुली आपली मतं, आपले विचार ठामपणे कुटुंबियांपर्यंत पोहचवण्यात असमर्थ ठरत असल्यानं विरोध मग लपवाछपवी, त्यातून ताणतणाव वाढत जातो. आंतरधर्मीय लग्न ही छोटी गोष्ट नाही. कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे एक चांगली भावना समाजात रूजायला मदत होते, मात्र पळून किंवा विरोध पत्करून लग्न केल्यानं त्यातील सगळाच परिणाम संपतो. लोकांसाठी ते एक लफडं किंवा चर्चेचा विषय ठरतं. हे सगळं टाळायचं होतं.”

घरी सांगितल्यावर त्यांनी कडाडून विरोध केला असेल असं विचारल्यावर आरजू अगदी सहज म्हणाली, “खरं तर विशेष नाही केला. आर्थिक स्वावलंबन, स्वत: निर्माण केलेली एक ओळख या गोष्टीचा त्यांच्यावर दबाव असेल कदाचित. त्यांनी विरोध करून पाहिला; पण त्यांनाही कुठेतरी ठाऊक होतं की, याला विशेष अर्थ नाही. त्यांना हे मी पक्कं सांगितलं होतं की, मला माझ्या जडणघडणीला साजेसा मुलगाच जोडीदार म्हणून हवा. तसंच विशालच्याही घरी झालं. मला वाटतं बहुदा तिथंही माझं अधिकारी असणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं या गोष्टींचा दबाव त्यांच्यावरही आला. अनेकदा मुलगी जर मुलापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर त्यावर वार करणं कुटुंबियांना सोप्प असतं. पण जर मुलीनं स्वत:ला सर्वदृष्ट्या सिद्ध केलं तर त्यांच्यापुढचा विरोधाचा मुद्दा गळून जातो.”

शेवटी विशाल आणि आरजूच्या घरच्यांनी हिरवा सिग्नल दिला. मात्र त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हॉटसअ‍ॅपवरून व्हायरल होताच तिच्या कुटुंबियावर दबाव आणण्याचे खूप प्रयत्न झाले. निरनिराळ्या इस्लामिक जमातींकडून विरोध होऊ लागला. घरातल्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले. आरजूलाही एक-दोन फोन आले. नातेवाईकांकरवी दबाव आणण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे तिचे वडील लग्नालाच आले नाहीत. सुरुवातीला लग्नास येण्यास उत्सुक असलेल्या इतरही आप्तेष्टांनी माघार घेतली. हे सगळं दुर्लक्ष करत, भीड न बाळगत पुढं जाण्याची दोघांनीही तयारी केली. लग्नाच्या आधीचे चार दिवस अगदीच त्यांच्यासाठी तणावाचे राहिले. धमक्यांपेक्षा कोणाला इजा होऊ नये याची जास्त काळजी त्यांना वाटत होती. यासंदर्भात त्यांनी पोलिस स्टेशनला अर्ज देऊन ठेवला. काही पोलिस साध्या वेशात लग्नात उपस्थित राहिले. अन् त्यांच्या सुदैवानं कोणताही गैरप्रकार न होता त्यांचं नोंदणी पद्धतीनं विवाह झाला.

सध्या समाजसाक्षर असलेल्या मित्रासोबत सहजीवन, करिअर आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग अशा तिहेरी टप्प्यांवर आरजू जगत आहे. सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम मुलींना शिक्षण मिळायला हवं अशी तिची भावना आहे. यासाठी समविचारी मुस्लिम तरुणींना एकत्रित करून काम करण्याचा तिचा मानस आहे. ती म्हणते, “शिकलेल्या, पुढे जाणाऱ्या इतर मुस्लिम मुलींना पाहून नुसतं मुस्लिम समाजानं, त्यांची वाहवा किंवा त्यांच्या कुटुंबियांची पाठ थोपटण्याचे दिवस संपलेत. प्रत्यक्ष स्वत:च्या मुलींना शिकवण्याचे आणि करिअर करू देण्याचे दिवस आहेत. त्यासाठी प्रगतशील विचारांच्या मुस्लिम मुलींना सोबत घेऊन काम करता येईल का असा एक विचार सुरू आहे.”

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vinayak salunkhe

Thu , 25 January 2018

धाडस नावाची चीज बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात असते हे आरजु ने सिद्ध करून दाखवले आहे, प्रवाहाविरुद्ध पोहताना आपल्या शरीराभोवती समाजानं टांगलेली परंपरेची लख्तरे प्रवाबरोबरच वाहून जातात, मग इथं निर्वस्त्र झालो तरी कोणतीही लाज नसते तर इथं असतात तावून सुलाखून निघालेली तळपती नग्न सत्य शरीरे, जी बघवत नाहीत समाजातल्या डोळ्यांना, कारण ती जळजळीत अंजन असतात त्या समाजासाठी जो अजूनही या सत्याचा स्विकार करायला मागेपुढे पाहतोय. हिनाकौसर खान यांना साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक , माणगाव येथे ऐकलंय इथेही अशाच एका मातृत्वाच्या मूर्तीचा म्हणजेच गौरी ताई यांच्यासोबत चर्चा करताना बारकावे टिपणे हे खान मॅडम यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे. अप्रतिम लेख आणि अत्यंत प्रेरणादायी - विनायक साळुंखे, सांगली/कोल्हापूर - 7588167721 - www.envinayak.wordpress.com


vinayak salunkhe

Thu , 25 January 2018

धाडस नावाची चीज बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात असते हे आरजु ने सिद्ध करून दाखवले आहे, प्रवाहाविरुद्ध पोहताना आपल्या शरीराभोवती समाजानं टांगलेली परंपरेची लख्तरे प्रवाबरोबरच वाहून जातात, मग इथं निर्वस्त्र झालो तरी कोणतीही लाज नसते तर इथं असतात तावून सुलाखून निघालेली तळपती नग्न सत्य शरीरे, जी बघवत नाहीत समाजातल्या डोळ्यांना, कारण ती जळजळीत अंजन असतात त्या समाजासाठी जो अजूनही या सत्याचा स्विकार करायला मागेपुढे पाहतोय. हिनाकौसर खान यांना साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक , माणगाव येथे ऐकलंय इथेही अशाच एका मातृत्वाच्या मूर्तीचा म्हणजेच गौरी ताई यांच्यासोबत चर्चा करताना बारकावे टिपणे हे खान मॅडम यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे. अप्रतिम लेख आणि अत्यंत प्रेरणादायी - विनायक साळुंखे, सांगली/कोल्हापूर - 7588167721 - www.envinayak.wordpress.com


Sourabh suryawanshi

Thu , 25 January 2018

आशा गोष्टी समाजात खरच एक सकारात्मक बदल घडवून आणू शकतात...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......