पिफ, समर नखाते आणि तीन उत्कृष्ट सिनेमे!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मीना कर्णिक
  • ‘पिफ' उर्फ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चं आणि त्यातील तीन सिनेमांची पोस्टर्स
  • Thu , 25 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र पिफ PIFF पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल Pune International Film Festival

वर्षाचा शेवट जसा भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानं (इफी) होतो, तशीच नव्या वर्षाची सुरुवात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (पिफ) होते. महाराष्ट्राचा अधिकृत महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिफचं हे सोळावं वर्ष होतं. पुण्याच्या महोत्सवानंतर ताबडतोब मुंबईत आणि नागपूरमध्ये पिफमधले काही महत्त्वाचे आणि पारितोषिकप्राप्त सिनेमे दाखवले जातात. त्या निमित्तानं-

.............................................................................................................................................

दृश्य तसं नेहमीचंच होतं. पुण्याच्या सिटी प्राईड कोथरूडमधलं. पिफमध्ये प्रत्येक वर्षी दिसणारं. दहा-पंधरा तरुण मुलं-मुली समर नखातेंच्या भोवती कोंडाळं करून उभी होती. ‘सर, कुठला सिनेमा बघू आता?’, ‘सर, आत्ताच अमुक अमुक सिनेमा बघितला, तुम्ही सांगितलं म्हणून. बोलूया का त्याबद्दल?’, ‘सर, सर, उद्या मी तमुक सिनेमा बघणार आहे, कसा आहे तो?’ आणि समर नखाते अतिशय आनंदानं या प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. गंमत म्हणजे, ही दहा-पंधरा मुलं-मुली आपापल्या सिनेमांना गेली की, आणखी नवीन मंडळी हजर होत होतीच! बरं, सगळी मुलं काही पुण्यालाच शिकणारी होती असंही नाही. नखाते सर महाराष्ट्रभर फिल्म अप्रिसिएशनची शिबिरं घेत असल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या अफाट आहे. कोणी सोलापूरहून आलं होतं, तर कोणी बारामतीहून. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जागतिक सिनेमा शिकावासा वाटणाऱ्या मुला-मुलींची संख्या वाढतेय, त्यांना आपल्या शहराबाहेरचंच नव्हे, तर देशाबाहेरचं जग बघायचंय. ज्या देशांची भाषाही आपल्याला माहीत नाही, तिथल्या संस्कृतीशी ओळख करून घ्यायचीय. आपल्या स्वत:च्या कक्षा विस्तारायच्यात. अतिशय आश्वासक असं हे दृश्य होतं.

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं हे खूप मोठं वैशिष्ट्य मानायला हवं. सिनेमा शिकवणाऱ्या शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येनं असल्यामुळे इथं विद्यार्थ्यांची खूप गर्दी असते. इतकी तरुण मुलं मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही महोत्सवाला लाभत असतील. गोव्याच्या इफीला वातावरणाचा वेगळा माहोल असतो, तसाच पुण्याला तरुणाईचा आगळा रंग असतो.

मात्र केवळ प्रेक्षक संख्येवर महोत्सवाचं यशापयश तोलायचं नसतं. ते अर्थातच, दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांवर आधारलेलं असतं. पिफ सुरू झाल्यापासून समर नखाते, सतीश आळेकर, मकरंद साठे ही मंडळी सिनेमाच्या निवड समितीवर आहेत. त्यात मधल्या काळात अभिजित रणदिवेची भर पडलीये. पण सोळा वर्षं एकाच समितीनं सिनेमांची निवड करायची याचा अर्थ सोळा वर्षं एकाच प्रकारच्या सेन्सिबिलिटीजचे सिनेमे निवडले जाणं असा सूर या वर्षी प्रकर्षानं ऐकू आला. याचा अर्थ, जे सिनेमे निवडले गेले होते त्याबाबत फार नाराजी होती असं नाही, पण आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो, मराठी सिनेमांची स्पर्धा असो की, जागतिक सिनेमांची निवड, सगळा भार एकाच समितीवर टाकणं योग्य आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असल्याचं जाणवलं.

आणि तरीही केवळ ‘सिटी प्राईड’, कोथरूडलाच नव्हे, तर ‘मंगला’सारख्या भर शहरातल्या थिएटरमध्येही होणारी गर्दी पाहून पुण्याच्या प्रेक्षकांनी या महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे मोठी दाद दिली होती असंच म्हणावं लागेल. तरुणांबरोबरच मध्यमवयीन प्रेक्षकही खूप मोठ्या संख्येनं सिनेमांना गर्दी करत होते. केवळ मराठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले आणि जागतिक सिनेमांच्या विभागातले शोजही हाऊसफुल जात होते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चीनच्या ‘फ्री अँड इझी’ या दिग्दर्शक च्युन कंग यांच्या सिनेमानं पहिला क्रमांक पटकावला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं असली की, माणसामधली सर्जनशीलता अधिक प्रखरपणे कशी समोर येते, त्याचं हा सिनेमा म्हणजे उत्तम उदाहरण म्हणायला हवं.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

म्हटलं तर ‘फ्री अँड इझी’ विनोदी अंगानं जाणारा सिनेमा आहे. अब्सर्ड म्हणावा असा. चीनच्या वायव्येला असलेलं एक जुनं औद्योगिक शहर. उद्योग बंद पडल्यामुळे रिकामं झालेलं. भकास. बर्फानं आच्छादलेलं. पहिल्याच दृश्यामध्ये आपल्याला सिनेमाची जातकुळी लक्षात येते.

बर्फामधून चालणारा एक पुरुष आपल्याला दिसतो. हातात एक ब्रीफकेस. त्याला आणखी एक पुरुष भेटतो. दुसरा पुरुष पहिल्याला काहीतरी विकू पाहतो. कराटे शिकायचंय का, अमुक हवंय का? त्याचे प्रश्न संपल्यावर पहिला पुरुष त्याला सांगतो, मी पण सेल्समन आहे, साबण विकतो. आपल्या बॅगेतला साबण काढून तो दुसऱ्या पुरुषाला देतो. म्हणतो, ‘वास बघ किती छान आहे!’ दुसरा पुरुष साबण नाकाशी नेतो आणि बेशुद्ध पडतो. पहिला पुरुष ताबडतोब साबण पुन्हा बॅगेत ठेवतो आणि त्याचे खिसे तपासून त्यातलं पैसे, पाकीट काढून घेतो.

सिनेमा जसा पुढे सरकतो तसं आपल्या लक्षात येतं की, या शहरात जी काही थोडी माणसं राहिली आहेत, ती पोटपाण्यासाठी असेच उद्योग करताहेत. आपल्याला भेटणारी सगळीच पात्रं कोणत्या ना कोणत्या प्रकारे बनेल आहेत, लबाड आहेत. अगदी तिथले दोन पोलीस अधिकारीसुद्धा.

अगदी कमी व्यक्तिरेखांचा हा सिनेमा. साबणवाला पुरुष, दोन पोलीस, त्यातल्या एका पोलिसाचं जिच्यावर प्रेम आहे ती बाई, तिचा नवरा, एक बौद्ध भिक्खू आणि एक आपल्या हरवलेल्या आईचा शोध घेत असलेला ख्रिश्चन मुलगा. वेगवेगळ्या प्रसंगात ही मंडळी एकमेकांना भेटतात. त्यातून काहीतरी घडत राहतं. पण याचा अर्थ दिग्दर्शक एक सरळसोट कथा सांगतोय असा होत नाही. किंबहुना, त्याला मुळी गोष्ट सांगायचीच नाहीये असं वाटत राहतं. या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून चीनमधल्या परिस्थितीवर त्याला भाष्य करायचंय. तेही अत्यंत थंडपणे. सर्वत्र पसरलेला बर्फ यात भरच घालतो. वातावरणातलं गोठलेपण या इथं राहणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा एक भाग बनून गेलंय, त्यांना कोणतंही भविष्य राहिलेलं नाहीये असं वाटत राहतं. यातला विनोदही पोट धरधरून हसायला लावणारा नाही. चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता शांतपणे केलेला विनोद आहे. आणि म्हणूनच तो अधिक भिडणारा आहे. किंवा टोचणी देणारा आहे.

पिफमध्ये दोन उत्तम थ्रिलर्स पहायला मिळाले. त्यातला एक होता जपानी दिग्दर्शक हिरोकाझू कोरीडा यांचा नवाकोरा सिनेमा, ‘द थर्ड मर्डर’. आपल्या आवडत्या दिग्दर्शकाचा सिनेमा पाहताना मनात अपेक्षा असतात. आणि मग अपेक्षाभंग झाला नाही की खूप आनंद होतो. म्हटलं तर हा सिनेमा सरळ सरळ मर्डर मिस्ट्री आहे. किंवा, ती मिस्ट्री नाहीच. एक खून होतो. आपल्याला तो होताना दिसतो. खून करणारा मिसुमी कबुलीजबाबही देतो. दोन खुनांसाठी तीस वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्यानं केलेला हा तिसरा खून असतो. त्याचा वकील म्हणून प्रसिद्ध अॅटर्नी शिगेमोरीची नेमणूक होते. मिसुमीला फाशी होऊ नये, जन्मठेपेची शिक्षा व्हावी एवढेच प्रयत्न फार तर आपण करू शकतो, याची कल्पना शिगेमोरीला असते. पण जसजसा शिगेमोरी या प्रकरणाचा तपास सुरू करतो, समोर आलेल्या पुराव्यांचा शोध घेऊ लागतो, तसतसा आपल्या क्लायंटनेच हा खून केलाय का असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊ लागतो. त्यात भर म्हणून प्रत्येक भेटीत मिसुमी आपल्या कबुलीजबाबात बदल करत असतो.

मिसुमी आणि शिगेमोरी यांचं आरोपी आणि वकील म्हणून असलेलं नातं हळूहळू बदलत जातं. त्यानंतरची या दोघांची एकत्र दृश्यं कोरीडानं अतिशय तरलपणे चित्रित केली आहेत. शिगेमोरीचा चेहरा आणि त्यावर सुपरइम्पोज केलेला काचेच्या पलीकडून दिसणारा मिसुमीचा चेहरा यासारखी दृश्यं सिनेमा संपल्यानंतर खूप काळ मनात रेंगाळत राहतात. ‘लाईक फादर लाईक सन’ किंवा ‘अवर लिट्ल सिस्टर’ किंवा ‘आफ्टर द स्टॉर्म’ या त्याच्या आधीच्या तीन सिनेमांमध्ये जाणवला होता, तोच हळुवारपणा इथंही दिसत राहतो. मात्र, ते तीन सिनेमे आणि ‘द थर्ड मर्डर’ यांची जातकुळी अतिशय वेगळी आहे. कौटुंबिक नातेसंबंधांचा वेध घेणारा हा दिग्दर्शक इथंही कुटुंबाविषयीच बोलतो, पण अगदी निराळ्या कॅनव्हासच्या माध्यमातून. कोरीडाच्या सुरुवातीच्या सिनेमांची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. संथ आणि संवादी, आणि तरीही बांधून ठेवणारा. मात्र, सिनेमा संपल्यानंतरही यातलं रहस्य स्पष्टपणे समोर येत नाही. समोर जे काही घडतं त्याचा अर्थ लावण्याचं काम दिग्दर्शक आपल्यावर सोडून मोकळा होतो.

‘आय अॅम अ किलर’ या पोलीश सिनेमाला १९७०च्या दशकात पोलंडमध्ये घडलेल्या घटनांचा आधार आहे. एका गावात बायकांचे खून होऊ लागतात. खुन्यानं आपण तीस खून करणार असल्याचं पत्र पोलिसांना पाठवलेलं असतं. अकरा खून झाले तरी तपास लागत नसल्यानं तरुण पोलीस अधिकारी यानुझवर ही जबाबदारी सोपवली जाते. आणि त्याच्या हाती गुन्हेगार लागतो. यानुझवर कौतुकाचा वर्षाव होतो. त्याला बढती मिळते. वर्तमानपत्रांमधून त्याच्यावर लेख येतात. तो जणू सुपरमॅनच बनून जातो. अचानक मिळालेली सुबत्ता त्याला सुखावून जाते.

तीन महिन्यांनंतर न्यायालयात केस उभी राहणार असते. या काळात आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करायचे असतात. मात्र, आरोपीच्या विरोधात पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळत नाहीत. त्याच्या अटकेनंतर खून थांबतात, पण म्हणून तो काही पुरावा ठरू शकत नाही. दरम्यान, यानुझच्या सहाय्यकाला एक नवीन पत्र मिळतं. गेले दोन महिने आपण आजारी असल्यामुळे खून केलेले नाहीत आणि आता आपण बाहेर आलो आहोत असं त्या पत्रात लिहिलेलं असतं. हा सहाय्यक मग गेल्या काही काळात उपचार घेऊन बाहेर पडलेल्या मानसिक रुग्णांची यादीच तयार करतो. आरोपीनं अर्थातच आपल्यावरचे सगळे आरोप नाकबूल केलेले असतात. त्याच्याशी बोलताना, त्याच्याकडून माहिती काढून घेताना यानुझ त्याच्या जवळ जातो. दोघे एकत्र फुटबॉलची मॅच बघतात, बायकोनं केलेला ख्रिसमस केक यानुझ त्याच्यासाठी घेऊन येतो, त्याच्या मुलांना भेटण्याची त्याची इच्छा यानुझ पूर्ण करतो. आणि मग, कशावरून हाच खुनी आहे या विचारापर्यंत यानुझचा प्रवास होतो. एका बाजूला, यानं खून केला नसावा ही खदखद आणि दुसऱ्या बाजूला त्याला खुनी ठरवल्यामुळे आपल्याला मिळत असलेली सुखं यांच्या कात्रीत यानुझ सापडतो.

एका पोलिसाचं मानसिक द्वंद्व हा या सिनेमाचा केंद्रबिंदू आहे. पोलंडच्या कम्युनिस्ट राजवटीत मोठ्या पदावर असलेल्यांना मिळणाऱ्या सुखसोयींची लालसा सर्वसामान्यांना वाटू शकते, मुळात मनानं चांगला असलेला माणूस स्वार्थ आला की बदलू शकतो आणि मग तो कोणत्या पातळीपर्यंत खाली जाऊ शकतो हे दिग्दर्शक मॅसिए पिपझिका दाखवतो.

.............................................................................................................................................

लेखिका मीना कर्णिक चित्रपट समीक्षक आहेत.

meenakarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख