अजूनकाही
१. नोटबदलाबद्दल अडाणी-अंबानी यांना आधीपासून माहिती होतं : भाजप आमदाराचा आरोप
कुछ नयी बात करो… हे आम्हाला आधीपासून माहिती नसेल का? अहो, सगळी त्यांचीच दुकानं आहेत, तर तुमचं काही वेगळं असेल का? सगळ्या दुकानांत माल एकच, फक्त पाट्या वेगवेगळ्या!
...............
२. मॅच निर्विघ्न पार पडावी, यासाठी कुंबळेच्या उपस्थितीत पिचची पूजा; त्यात गैर काय, कोहलीचा सवाल
आता आयपीएलमध्ये तरी त्या चीअरगर्ल्सच्या शेजारी वेगळा प्लॅटफॉर्म उभारून त्यावर 'चीअरभटजी' बसवा आणि दोन्ही टीम्सच्या वतीने जोरदार होमहवन चालूद्यात. एखादा गडी बाद होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून ठेवायचे, मृत्युंजय मंत्राचा जाप करायचा. तेही वेगळ्या प्रकारचं लोकप्रिय मनोरंजन ठरेल. कोहली वगैरे मंडळींना कद नेसून पाठवा बॅटिंगला आणि रात्री जी टीम जिंकेल, तिने सत्यनारायणाची पूजा घालायची!
...............
३. ५० दिवस त्रास सहन करणं, हीच खरी देशभक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अडीच वर्षांच्या अनुभवानंतर आता एक दुरुस्ती करायला हरकत नाही… तुमच्या देशभक्तीच्या भंपक, सोयीस्कर आणि स्वस्त कल्पना सहन करणं, हे बँकांबाहेरच्या रांगेत उभे राहण्याच्या त्रासापेक्षा असह्य काम आहे… त्या सहन करत राहणं, हीच खरी देशभक्ती मानायला हवी.
...............
४. मोदी सरकारचा मोहम्मदी कारभार, १२५ कोटी जनतेला त्रास देणं हा राष्ट्रीय अपराध, जनतेच्या आक्रोशाचे लाउडस्पीकर होणारे बाळासाहेब हवे होते : उद्धव ठाकरे
अजूनही तेच हवे होते? तुम्ही कशाला आहात मग? तुम्हाला कशाला नेमून गेलेत ते? तुम्ही एकीकडे मोहम्मदाच्या डीजेवर नाच करणार आणि वर आमचा लाऊडस्पीकर हरपला, म्हणून रडूनही दाखवणार? यापेक्षा लाऊडस्पीकर हरपल्याबरोब्बर आपला ब्रास बँड बंद करून टाकायचा होता ना!
...............
५. नव्या निर्णयानुसार आता नागरिकांना लग्नकार्यासाठी बँक खात्यातून अडीच लाखांची रक्कम काढता येणार आहे.
भूक लागली? लग्न करा! घटस्फोटांसाठीही रक्कम काढण्याची तरतूद करून टाका लगेहाथ. म्हणजे विवाहित लोक घटस्फोट घेऊन परत लग्न करतील… देशासाठी लग्न करण्याची अशी सुवर्णसंधी परत मिळणार आहे का दुसरी?
...............
६. गेल्या वर्षी देशभरात केवळ एक लाख ३५ हजार रोजगारांची निर्मिती झाली. सात वर्षांतील हा नीचांक आहे. हे चित्र कायम राहिल्यास देश महासंकटाच्या खाईत जाईल : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी
राष्ट्रपती महोदय, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरचे मजूर मोजले नसणार तुम्ही. त्यांना पगार मिळत नसला म्हणून काय झालं; हाताला काम तर आहे ना!
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment