अजूनकाही
“भिडे गुरुजी महात्मा फुले यांना ‘देशद्रोही’ म्हणत; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तिरस्कारानं करत. छत्रपती शाहू महाराजांबद्दल बरं बोलत नसत. हे सारं आम्हाला खटकायचं. पण आम्ही भावनेच्या भरात होतो. गडकिल्ले, मोहिमा, एकेरी पद्धतीचा इतिहास ऐकलेला होता. दुसरी बाजू आम्हाला कळू दिली नाही, पण जेम्स लेन प्रकरणात गुरुजींना विचारलं, ‘आपली भूमिका काय?’ गुरुजी म्हणाले, ‘हा आपला विषय नाही’. माँ जिजाऊंची बदनामी, निंदानालस्ती होताना भिड़े गुरुजी गप्प राहिले, तेव्हा आम्हाला त्यांचं खरं रूप कळलं. आम्ही गुरुजींच्या शिव प्रतिष्ठानपासून अलग व्हायचा निर्णय घेतला.”
मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजींच्या विचारांनी भारावलेले आणि आता वेगळं होऊन शिवराज्य मंचाची स्थापना केलेले कार्यकर्ते इंद्रजीत घाटगे बोलत होते. इंद्रजीत आता चाळीशीत आहेत. कागल, जि. कोल्हापूर इथं ते कार्यरत आहेत. १९९८ साली ते भिडे गुरुजींच्या प्रभावाखाली आले होते.
सुरुवातीला भिडे यांच्या कामाशी संपर्क कसा आला, याविषयी इंद्रजित सांगतात, “कागलमध्ये सुप्त शार्दूल बालोत्कर्ष संस्था आहे. लहान मुलांसाठी ही संस्था काम करते. आम्ही या संस्थेत काम करत होतो. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. कागळजवळच्या सांगाव गावच्या मित्रांनी आम्हाला शिव प्रतिष्ठान आणि गडकिल्ले मोहिमेविषयी कळवलं. शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या आकर्षणातून आणि प्रेमापोटी आम्ही शिव प्रतिष्ठानच्या कामाला लागलो. स्वत:ला महाराजांचे मवाळे समजून अहोरात्र तनमनधनानं या कार्यात आम्ही मित्र सहभागी झालो. सात-आठ वर्षं जीवाचं रान करून काम केलं. स्वत:च्या करिअरचा विचार केला नाही, कुटुंबाचा विचार केला नाही. अटोकाट प्रयत्न करत एकेकाला प्रतिष्ठानशी जोडत गेलो. बेळगाव ते गोव्यापर्यंत, कागल ते साताऱ्यापर्यंत अथक प्रयत्न केले.”
१९९८च्या दरम्यान इंद्रजीत यांच्यासारखे हजारो बहुजन तरुण शिक्षण, करिअर, कुटुंब या गोष्टींना क्षुल्लक मानून भिडे गुरुजींच्या कार्यात सहभागी होत होते. त्यातून शिव प्रतिष्ठान ही संघटना बांधली जात होती.
इंद्रजीत शिव प्रतिष्ठानचा विस्तार कसा झाला, काम कसं चाले याविषयी स्वानुभव सांगतात- “कागल तालुक्यात आम्ही पायी, सायकल वर जसं जमेल तसं गावोगावी जात असू. एकेका गावात चार-पाच वेळा आम्ही गेलो होतो. नंतर चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गारगोटी, निपाणी, पन्हाळा इथं गेलो. त्या त्या ठिकाणी बैठका होत. तरुण कार्यकर्ते जोडायचे आणि शिव प्रतिष्ठानमध्ये त्यांना सदस्य करून घ्यायचं. नंतर त्यांना भिडे गुरुजींच्या व्याख्यानांना न्यायचं. गड-किल्ले मोहिमेत न्यायचं. गड-किल्ले मोहिमत सहभागी झालेले कार्यकर्ते भारावून जात आणि शिव प्रतिष्ठानचे पक्के कार्यकर्ते बनत. भिडे गुरुजींच्या व्याख्यानात मुस्लीम, दलित द्वेष हे मुख्य सूत्र असे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा तिरस्कार असे. एकेरी, द्वेषाचा इतिहास तरुणांच्या डोक्यात भरवला जात असे आणि विचारशक्ती मारून टाकली जात असे.”
शिव प्रतिष्ठानमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी फक्त भिडे यांचे आदेश मानून काम करायचं असा नियम होता. ते जे सांगतील ते खरं, बाकी त्याविषयी प्रश्न, शंका उपस्थित करायच्या नाहीत, अशी संघटनेत शिस्त होती.
या कडव्या शिस्तीविषयी इंद्रजीत सांगतात – “सांगलीचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि भिडे गुरुजी जी कामं सांगत ती आम्ही इमानेइतबारे करत असू. शिवाजी-संभाजी महाराजांचा वीरश्रीयुक्त इतिहास भिडे गुरुजी प्रभावी वक्तृत्वातून मांडत. त्याला आम्ही भुललो होतो. ब.मो.पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाच्या प्रती खपवायचा आम्हाला आदेश आला. आम्ही या पुस्तकाचे आगाऊ पैसे जमा करून एक हजार प्रतींची नोंदणी केली. पण सांगलीहून पुस्तकं काही येईनात. मग विचारणा सुरू केली तर टाळाटाळीची, हिणकस उत्तरं मिळू लागली. आम्ही लोकांचे पैसे जमा करून भरले होते. त्याच्याशी भिडे आणि त्यांच्या सांगलीच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना काहीच देणं-घेणं नाही, हे लक्षात येत होतं. भिडे यांना प्रश्न, शंका आवडत नाहीत. होयबा कार्यकर्ते आवडतात, हे कळत गेलं. या प्रकारानं घुसमट वाढत चालली होती.”
सात-आठ वर्षं इंद्रजीत आणि त्यांचे सहकारी मित्र, कार्यकर्ते शिव प्रतिष्ठानमय होऊन गेले होते. पण त्यांना वरिष्ठांची वागणूक खटकत होती. भिडे गुरुजी आणि त्यांच्या भोवतालच्या कार्यकर्त्यांचं बोलणं-वागणं यातून विसंगती दिसत होती.
इंद्रजीत सांगतात – “प्रतिष्ठानचे पंढरपूरचे एक कार्यकर्ते पुण्यात उच्चशिक्षण घेत होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, शिकायला पैसे नाहीत म्हणून त्यांचं शिक्षण बंद पडायची वेळ आली होती. आम्हाला वाटे भिडे गुरुजींचं एवढं नाव, वजन आहे, पतंगराव कदम त्यांना मानतात. कदमांकडून कार्यकर्त्यांना शिष्यवृत्ती मिळाली असती. कदम अशा शिष्यवृत्त्या गरजूंना देत होते. पण त्यांच्याकडे भिडे गुरुजींनी शब्द टाकणं गरजेचं होतं. त्यांच्या एका शब्दावर हे काम झालं असतं. पण गुरुजींनी या प्रकरणात सरळ कानावर हात ठेवले. ते आपल्या अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यासाठी एक शब्द वाया घालवायला तयार नव्हते. तिथं आमचा भ्रमनिरास व्हायला सुरुवात झाली. कार्यकर्त्याचं दु:ख नेत्याला दिसत नसेल तर ते संघटन कुचकामी आहे असं वाटायला लागलं.”
बहुजन समाजातील मुलांना त्यांच्या शिक्षणात मदत न करणं, त्यांच्या करिअर, कुटुंबांबद्दल अनास्था दाखवणं हा शिव प्रतिष्ठानचा खाक्या इतरही अनेक प्रकरणांत इंद्रजीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाणवला. शिकून माणसं गांडू बनतात, मग शिकायचं कशाला, हा गुरुजींच्या सिद्धान्त आहे. या सिद्धान्तावर ठाम राहत गुरुजींनी लाखो बहुजन जातीतली मुलं नादाला लावली, संघटनेत भरती केली. त्यातल्या अनेकांची शिक्षणं अर्धवट सुटली. अनेकांचं करिअर बरबाद झालं. अनेकांवर हिंसाचार, दंगल, निदर्शनं, मारामाऱ्या या प्रकरणांत पोलिस केसेस झाल्या. इंद्रजीत आणि त्यांचे मित्र याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत.
याविषयी इंद्रजीत कळवळून सांगतात – “खरं सांगू का, हा बहुजन मुलांना देशोधडीला लावण्याचा समजून-उमजून केलेला डाव आहे. बहुजनांच्या पोरांची आयुष्यं मातीमोल करायचा यांचा खरा धंदा आहे. मुस्लीम द्वेष शिकवून बहुजन पोरांना अतिरेकी करण्याचं यांचं कारस्थान आहे.”
इंद्रजीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गुरुजींचा अंदाज आला होता. पण त्यांना त्यांचा खरा चेहरा जेम्स लेन प्रकरणात उघड झाला. या काळातली या कार्यकर्त्यांची घुसमट खूप मोठी होती.
या घुसमटीविषयी इंद्रजीत सांगतात, “जेम्स लेननं शिवाजी महाराजांविषयी विकृत लिखाण केलं. माँसाहेब जिजाऊंची बदनामी होत असताना भिडे गुरुजी चूप. त्यांच्याभोवतीचे शिवभक्त, शिवसैनिकही चिडीचूप. गुरुजींना याबाबत काहीही मार्गदर्शन केलं नाही. त्यांना विचारलं तर बोलायचं टाळलं. गुरुजींची ही लबाडी बघून आम्ही शिव प्रतिष्ठानचा त्याग केला आणि शिवराज्य मंच स्थापन केला.”
शिवराज्य मंच या संघटनेमार्फत इंद्रजीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजसेवा सुरू ठेवली आहे. ते व्याख्यानं, अभ्यास, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करतात. आझाद हिंद सेनेत लढलेल्या एका कुटुंबाला त्यांनी मदत केली. त्या कुटुंबाचं घर दुरुस्त करून दिलं. गुरुजींच्या तावडीतून सुटून शाहू-फुले-आंबेडकर यांचे ग्रंथ आता ते अभ्यासतात. त्यावर चर्चा करतात.
कोल्हापूरचे विजय पाटील आणि त्यांचे मित्रही वैचारिक मतभेद झाल्यानं भिडे गुरुजींपासून वेगळे झाले. विजय हे १९९४ साली झपाटल्यासारखे भिडे गुरुजींचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले.
विजय पाटील आता चाळीशीच्या उंबरठ्यावर आहेत. ते गुरुजींच्या प्रभावानं झपाटलेल्या दिवसांविषयी सांगतात – “१९९४ या वर्षी आम्ही गुरुजींकडे आकर्षिले गेलो. १९९२ साली बाबरी मशीद पडली. त्यानंतर दंगली, बॉम्बस्फोट झाले. देशात मुस्लीम द्वेष वाढवणं हा संघ परिवाराचा कार्यक्रम जोरात होता. आम्ही १७-१८ वर्षांची पोरं होतो. छ. शिवाजी-संभाजी महाराज यांच्या प्रेमात बुडालेल्या आम्हाला भिडे गुरुजींनी बैठकीत मुस्लीम द्वेषाचं बाळकडू दिलं आणि आम्ही नादावलो. मी तर एवढा नादावलो की, गुरुजींचा आदर्श घेऊन अविवाहित राहिलो. रात्रंदिवस काम केलं. पण जेम्स लेन प्रकरणानंतर लक्षात आलं की, आम्हाला फसवलं गेलंय. आमची उमेदीची वर्षं वाया गेली. माझ्यासारख्या अनेकांची ही भावना झाली.”
इंद्रजीत घाटगे, विजय पाटील यांची फसवलं गेल्याची भावना प्रातिनिधिक आहे. ज्या भागात संघाच्या शाखा नाहीत, तिथं संघ गुरुजीसारख्यांना पुढे करून तरुणांना नादी लावतो, असं या दोघांचं निरीक्षण आहे. इंद्रजीत सांगतात – “गुरुजींनी ते संघाचे २५ वर्षं स्वयंसेवक होते, हे आमच्यापासून हेतूत: लपवलं. राजकीय भूमिकेचा विषय आला की, गुरुजी म्हणत, ‘राजकारण हा लुच्च्या, लफग्यांचा प्रांत. तो आपला विषय नाही.’ पण गुरुजी मात्र आतून भाजपला मदत करत होते. हा त्यांचा कावा आम्हाला उशीरा कळला.”
माँ जिजाऊंची बदनामी करणाऱ्या शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांशी भिडे यांचे हितसंबंध आहेत. सांगलीत शिव सन्मान परिषदेत बोलणाऱ्या वक्त्यांना मारहाण करण्यासाठी भिडेंचे समर्थक अंगावर धावून गेले, तेव्हा त्यांना अडवून बदडणाऱ्यांमध्ये विजय पाटील पुढे होते. त्याविषयी ते सांगतात – “मी भिडे समर्थकांना अडवलं, चोपलं. त्यानंतर गुरुजींचा फोन आला. म्हणाले, ‘तू बाजू बदललीस, मला खूप दु:ख झालं!’ ”
इंद्रजीत, विजय या दोघांशी बोलताना जाणवलं की, एका मोठ्या फुसवणुकीच्या भुलभुलैय्यातून सुटल्याचं, शहाणं झाल्याचं समाधन त्यांच्या बोलण्यात दिसत होतं.
भिडे गुरुजी यांनी शिवप्रतिष्ठान कसं उभं केलं? त्यात तरुणांची, विद्यार्थ्यांची भरती कशी केली जाते? याविषयी पुढे येणारी माहिती खूप अस्वस्थ करणारी आहे. भिडे आणि त्यांचे समर्थक सांगली-सातारा-कोल्हापूर परिसरात १५ ते २५ वयोगटातील मुलांना ठरवून शिव प्रतिष्ठानमध्ये ओढतात. त्यांच्या मनात द्वेष पेरतात. मुस्लिमांविषयी तिरस्काराची भावना निर्माण करतात. द्वेष आणि तिरस्कारानं मन कलुषित झालेले तरुण मग शिव प्रतिष्ठानच्या पालखीचे भोई, धारकरी बनतात.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342
.............................................................................................................................................
हे नेमकं घडतं कसं? एकेकाळी स्वत: शिव प्रतिष्ठानमध्ये काम केलेले पत्रकार दत्तकुमार खंडागळे सांगतात – “सांगली-कोल्हापूरच्या भूमीत छ. शिवाजी-संभाजी महाराज यांच्याविषयी प्रेमाची, अभिमानाची भावना स्वाभाविकपणे असतेच. तरुण विद्यार्थ्यांमध्ये ही भावना वाढवून तिचं भिडे आणि त्यांचे समर्थक मुस्लीम द्वेषात रूपांतर करतात. संभाजी महाराजांना मारणारा औरंगजेब म्हणजे आजचा प्रत्येक मुस्लीम आहे. त्याचा द्वेष-तिरस्कार केलाच पाहिजे. त्याला नष्ट करणं हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे, अशी हिंसक भावना तरुण मनांत पेरली जाते. त्यातून उग्र मानसिकता तयार झालेले तरुण दंगली करायला तयार होतात. दंगलीत हिंसा केलेल्या अशा शेकडो तरुणांवर गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस झाल्या आहेत. ऐन तरुण्यात या कार्यकर्त्यांचं आयुष्य तुरुंग, न्यायालयात येरझरा घालण्यात वाया गेलेलं मी पाहिलं आहे. बहुजन पोरांचं आयुष्य असं नासवलं जात आहे.”
बहुजन मुलांचं आयुष्य नासवण्याचं तंत्र कसं आहे? मुलांना संवेदनशील वयात पकडून त्यांना कसं घडवलं जातं, हे पाहिल्यावर हा खूप नियोजित आणि हुशारीनं तयार केलेला प्रोजेक्ट आहे हे लक्षात येतं. त्याविषयी खंडागळे सांगतात – “शिव प्रतिष्ठानचे तीन कार्यक्रम खूप लोकप्रिय आहेत. एक – गड-किल्ले मोहीम. दोन – दुर्गा दौड. तीन – छ. संभाजी महाराज बलिदान मास. गड-किल्ले मोहीम पाच दिवसाची असते. त्यात हजारो तरुणांना गड-किल्ल्यांच्या सहवासात नेलं जातं. त्या ऐतिहासिक वातावरणात त्यांना द्वेषाचा इतिहास शिकवला जातो. दुर्गा दौडमध्येही हजारो कार्यकर्ते सहभागी होतात. बलिदान मासमध्ये छ. संभाजी महाराजांना ठार केलं त्या दिवसापासून महिनाभर विविध कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांमधून आक्रमक, हिंसक कार्यकर्ते घडवले जातात.”
स्वत: खंडागळे १९९५ ते २००१ दरम्यान भिडे गुरुजींच्या द्वेष तंत्राला बळी पडले होते. ते स्वत:ही टोकाचा मुस्लीम द्वेष करत. मुस्लीम माणूस पाहिला की, त्यांना औरंगजेब आठवे. पण जेम्स लेन प्रकरणानंतर संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांचे खायचे दात दिसले आणि ते दूर झाले. भिडे गुरुजी छ. शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘भगवान शिवाजी महाराज’ असा करतात. महाराजांची मंदिरं बांधायला सांगतात. महाराजांसमोर मंत्र म्हणायला लावतात. नैवैद्य दाखवतात. महाराजांचं दैवतीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप खंडागळे करतात.
भिडे गुरुजी तरुणांचं करिअर बरवाद करतात. आयुष्य वाया घालवतात, हे आता स्पष्ट होतंय. ‘पोरं धरा आणि नासवा’ हे त्यांचं तंत्र घातक आहे, याविषयी लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत.
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Pramod Jagtap
Tue , 02 February 2021
आई वडीलांनी आपली मुले, अशा विकृत माणसांपासून सांभाळावी...
Gamma Pailvan
Sun , 28 January 2018
रोहन दलवाई, तुमच्याशी सहमत आहे. त्याचं काय आहे की भिडे गुरुजींच्या मालकीची फुटकी कवडीही नाही. भिडे गुरुजींसोबत एव्हढी वर्षं घालवून इंद्रजीत घाटगे यांना अक्कल आली नाही तर दोष इंद्रजीत घाटग्यांचा आहे. भिडे गुरुजींचा नाही. अशा वेळेस मी इंद्रजीत घाटगे यांच्या पायाशी बसणार नाहीये. भिडे गुरुजींच्याच पायाशी बसणं फायद्याचं आहे. एकंदरीत इंद्रजीत घाटगे, विजय पाटील, दत्तकुमार खंडागळे इत्यादि लोकांच्या लायकीचा संबंध येत नाही. तुम्ही बोललात ते अगदी बरोबर बोललात. आपला नम्र, -गामा पैलवान
Manoj Sakpal
Fri , 26 January 2018
Very nice.
Roshan Dalwai
Thu , 25 January 2018
@ Gamma Pailvan तुम्ही बसा त्यांच्या पायाशी नाहीतर लोटांगण घाला मात्र दुसर्यांची लायकी काढू नका! एवढ्या सरळ आणि सोप्या भाषेत, संदर्भासहित स्पष्टीकरण देण्यात आले आहे तरी सुद्धा डोळ्यावरची झापडं काढावयाची नसतील तर नका काढू पण जे कोणी यातून बाहेर पडू इच्छितात त्यांना हिणवण्याचा आपणास कोणताही अधिकार नाही...
Gamma Pailvan
Wed , 24 January 2018
जेम्स लेनने संभाजी भिड्यांना विचारून पुस्तक लिहिलं होतं का? आपली भिडे गुरुजींच्या पायाशी तरी बसायची लायकी आहे का ते प्रथम पाहावं माणसाने. नाहीतर आहेच उचलली जीभ लावली टाळ्याला! -गामा पैलवान
vishal pawar
Wed , 24 January 2018
चांगले विश्लेषण.
ram ghule
Wed , 24 January 2018
nice article
Sourabh suryawanshi
Wed , 24 January 2018
दगड हातात घेण्यास लावणारा कोणताही व्यक्ती वाईटच मग तो जन्मदाता बाप असो वा आध्यात्मिक गुरू वा राजकीय नेता . असे लोक दंगली वेळी स्वतः पुढे कधी येत नाहीत . त्यांचे स्वार्थी हितसंबध जोपासण्यासाठी तरुण मुलांचा उपयोग (की दुरूपयोग) होतो.