अजूनकाही
शेतकऱ्यांच्या पोरांनी नोकरी करू नका असं वक्तव्य महाराष्ट्राचे अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नोकरी करण्यापेक्षा कृषीक्षेत्रातील उच्चशिक्षण घेऊन शेती कसावी असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. माननीय मुख्यमंत्र्यांचं विधान सामाजिक दारिद्रय दर्शवणारं आहे. अलिकडे त्यांच्यावर नव-पेशवाईचा लादत असल्याचा आरोप होतोय. या टीकेवर वरील विधानातून त्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. या विधानावर मुख्यमंत्री सोशल मीडियावर ट्रोल झाले. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधुनिक वामन असून बळीराजाच्या कुटुंबीयावर संक्रांत आणू पाहात आहेत,’ असा विरोधी सूर पाहायला मिळाला.
मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकून मी स्तब्ध झालो. आमचे बापजादे पिढ्यानपिढ्या शेतीची सेवा करून गारद होण्याच्या मार्गावर आहेत. आता कुठंतरी आमची तिसरी पिढी उच्चशिक्षण घेऊन रोजगारासाठी मेट्रो शहरात दाखल झाली, पण अभिजन वर्ग बळीराजांची मुलं उच्चपदावर पोहचू नयेत अशी मानसिकता बाळगून आहे. खरंच हे विधान दुर्दैवी आहे. ज्या काळ्या आईची सेवा आम्ही पिढ्यानं पिढ्यापासून करत आलोय. त्यात तुम्ही काय नवीन सांगू इच्छिता? काल शेतीसमोर जे प्रश्न होते, ते आजही त्याच अवस्थेत आहेत.
राहिला मुद्दा कृषीक्षेत्रातल्या उच्चशिक्षण घेण्याचा, तर सरकार प्राथमिक शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत उच्चशिक्षण घेण्याचा सल्ला बावळटपणाचा आहे. मूलभूत शिक्षणाचे वांधे असताना उच्चशिक्षणाचं स्वप्न दाखवणं विरोधाभासी वाटतं. मुख्यमंत्र्यांनी अहिल्याबाई होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात केलेलं हे विधान मागास विचाराचं असल्याचं मी मानतो. कारण कित्येक कृषी महाविद्यालयं रसातळाला गेली असताना मुख्यमंत्र्यांनं अजून एका कृषी महाविद्यालयाचं उद्घाटन केलं. दुष्काळ, नापिकी, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान हे सगळं पचवूनही शेतकरी खंबीरपणे जगतोय. इतकं सहन करूनही शेतकऱ्यांना हमीभावापासून वंचित ठेवलं जातं. स्वामिनाथन आयोग ‘जुमलेबाजी’ झालाय. हे सर्व सुरू असताना त्याहीपुढे जाऊन स्वत:च्या बापाचं मरण जवळून पाहणाऱ्याला सरकार आणखी त्याच दरीत लोटू पाहतोय.
आमच्या किती तरी पिढ्या वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून शेती करत आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्थेनं लादलेला हा व्यवसाय गेल्या कित्येक वर्षापासून आमची पाठ सोडायला तयार नाही. याउलट सरकारला वाटतं की, त्या पिढीनं तो व्यवसाय तसाच चालू ठेवावा. म्हणजे एखाद्या भिकाऱ्याच्या पोराला आधुनिक पद्धतीनं कसं भीक मागावं असचं याचं प्रशिक्षण मुख्यमंत्री देऊ पाहत आहेत. तसा त्यांचा मानस दिसत आहे, असं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून वाटतं.
का करावंसं वाटलं मुख्यमंत्र्यांना हे वक्तव्य? जी शेतकऱ्याचं पोरं काबाड कष्टानं शेती करू शकतात, काळ्या आईच्या पोटातून सोनं पिकवू शकतात, ते इतर क्षेत्रातही प्रभावीपणे आपला ठसा उमटवू शकतात. कदाचित मुख्यमंत्र्यांना हे उमगलं नसावं. किंबहुना तुम्हाला त्यांच्या मनगटावर भरोसा नसावा! मुख्यमंत्रीसाहेब तुम्हाला शेतकऱ्यांच्या मुलांना उभारीचं घ्यावी असं वाटत नाही का? बळीराजाच्या मुलांना स्वप्नं बघू द्यायची नाहीत का? तुमच्या मनात काय दडलंय? एकदा स्पष्टपणे बोला! भंग्याच्या मुलांनी शिकू नये, कायम तुमचा मैलाच साफ करावा, अशी मानसिकता तुमच्या विधानातून प्रतीत होतेय. मुसलमानांच्या पोरांनी पिढ्यानपिढ्यापासून भंगार व खाटकाचाच व्यवसाय करावा असं तुम्हाला वाटतं का? खाटकाच्या निष्पाप मुलांनी कापलेल्या कोंबड्या, बिर्याण्या तुम्ही किती दिवस झोडणार? अशीच व्यवस्था तुम्हाला चालू ठेवायची का? मुख्यमंत्रीसाहेब एकदा तुम्ही स्पष्ट जाहीर करूनच टाका!
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342
.............................................................................................................................................
या उलट ब्राह्मणाच्या मुलांनी पूजा-पाठ करावा असा सल्ला तुम्हाला द्यायचा आहे का? त्यांनी पौराहित्याचं उच्चशिक्षण घ्यावं, मंत्र-जाप करावा, पूजा घालावी, देवदेव करावा आणि आपला धर्म वाढवावा असं तुम्हाला सुचवायचं आहे का? बरं, ती मुलं ऐकणार आहात का तुमचं? मग आम्ही बरं का ऐकावं?
आमचा बाप आम्हाला आजही आम्हाला म्हणतोय, ‘मी माझं आयुष्य या शेतीत पुरलंय, तुम्ही बाहेर पडा, कामधंद्याला लागा, साहेब व्हा!’ मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या अनुभवापेक्षा आमच्या बापाचा अनुभव पोतंभर तरी जास्तच असेल. त्यानं सोसले आहेत तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे-पावसाळे. त्यामुळेच आमचा उर काहीतरी वेगळं करण्याच्या जिद्दीनं पेटून उठतो. कारण आम्ही बघितलेला असतो आमचा हळहळलेला बाप, काबाड कष्ट करून आम्हालाही शिकवणारा आमचा बाप. आम्हालाही व्हावं वाटतं इंजिनिअर, वकील, डॉक्टर, अधिकारी. आमच्याही असतात इच्छा म्हातारपणी आई-बापाला सुख देण्याच्या, त्यांना फिरायला घेऊन जाण्याच्या. का करता साहेब तुम्ही आमच्या पाहिलेल्या या स्वप्नांचा ऱ्हास?
आपण ग्वाही दिलीय की, पारंपरिक पद्धतीनं शेती कसण्यासाठी सरकार मदत करेल. हे पुस्तकी वाक्य भाषणापुरतं लई झ्याक वाटतं साहेब! आणि तुमच्या भाषणाला जमलेले लोक त्यावर टाळ्याही कुटतात. यापुढे जाऊनही तुम्ही सांगता गेल्या १५ वर्षांत केली नाही, तेवढी मदत आमच्या सरकारनं शेतकऱ्याला केली. यामधून तुम्ही फक्त तुमच्या सोयीचं राजकारण करताय. तुमची मदत खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहचली असती तर एवढ्या आत्महत्या झाल्या असत्या का? नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनं जाहीर केलेल्या अहवालानुसार २०१५ मध्ये ३ हजार २६३, तर २०१६ मध्ये ३ हजार ५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुमच्याच सत्ताकाळात शेतकरी सुळावर चढलाय. या कुटुंबाची हाय नाही का लागणार तुमच्या सरकारला? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आत्मियतेनं सोडून उलट शेतकऱ्यांच्या मुलांना देशोधडीला लावण्याचं नियोजन तुम्ही केलंय. यापेक्षा दुसरं दुर्दैव ते कोणतं?
.............................................................................................................................................
लेखक संदीप जाधव शेतकरी पुत्र असून प्रसारमाध्यमात काम करतात.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 24 January 2018
च्यायला! म्हणे चातुर्वर्णाने शेती लादली तुमच्या बापजाद्यांवर. डोकंबिकं फिरलंय की काय? दादाभाई नवरोजींनी लिहिलेल्या Poverty and un-British Rule पुस्तकात स्पष्टपणे म्हंटलंय की इंग्रजांनी शहरांतील कारागिरीवर भरमसाट कर लावून ती बुडवली. त्यामुळे लोकं अन्नाच्या शोधार्थ खेड्यांकडे गेले आणि शेतीवर अपरिमित भार पडला. सालं, उद्या अपचन झालं तरी ब्राह्मणांनाच शिव्या घालायच्या काय? -गामा पैलवान
Sagar
Wed , 24 January 2018
अभ्यासपूर्ण लेख
Suketu S
Wed , 24 January 2018
अरेरे! ब्राम्हण मुख्यमंत्री झाला म्हणून काही जणांना उठलेला पोटशूळ तीन वर्षे झाली तरी शमला नाही...त्यामुळे हे लोक आता मुख्यमंत्र्याच्या विधानांचा विपर्यास करून त्यांच्या विरूद्ध खोटेनाटे आरोप करत आहेत. अर्थात अशी टिका करणे हा काहीजणांचा पोटापाण्याचा उद्योग आहे त्यामुळे कितिही स्पष्टीकरण दिले तरी ते एेकणारे नाहीत, तरीही प्रयत्न करतो मी... मुख्यमंत्री शेतकरयांच्या मुलांना शेतीत राहण्याचा सल्ला देतात कारण शहरात येउन नोकरी मिळण्याची शाश्वती नाही.तुम्हाला चांगला जाॅब मिळत असेल तर जरूर या शहरात. पण येथे जर पिएचडी लोकच ६००० ची नोकरी करतात तर मग १२, बिए, झालेल्या शेतकरयांच्या पोरांना नोकरी कोण देणार ? आणि नोकरीशिवाय शहरात येउन चोरयामारया करायच्या का त्यांनी की तुमच्या घरी येउन भांडी घासायची ? धोबी का कुत्ता घर का न घाट का बनण्यापेक्षा शेती परवडली ना भाऊ .....दुसरे कारण म्हणजे शेतीतूनही करोडो रूपये कमावले जातात.. अहो बारामतीच्या कडे काही नेते लोक शेतीतून करोडो कमावून 'जाणत्या राजावानी' राहतात हो...ते कदाचित तुमचेच जातभाई असतील..मग शिका त्यांच्याकडून काही...त्या करोडपती नेत्यांप्रमाणे शेतकरयांच्या मुलांनिही शेतीतून करोडपती बनावे अशीच मुख्यमंत्र्यांची इच्छा अाहे, म्हणूनच त्यांनी शेतीतच राहण्याचा सल्ला शेतकरयांच्या मुलांना दिला आहे....अर्थात शहरात येउन भांडी घासायची इच्छा असणारयांनी जरूर यावे शहरात.