डार्विन, डार्विन काय म्हंतोस?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • डॉ. सत्यपाल आणि डार्विन
  • Tue , 23 January 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar डॉ. सत्यपाल सिंह Satyapal Singh डार्विन Darwin

रोशन सातारकर नावाच्या एक लावणी सम्राज्ञी होऊन गेल्या. ‘येऊ कशी कशी मी नांदायला, नांदायला नांदायला नांदायला, मला बाई जायाचं नांदायला’ या त्यांच्या गाण्यांनी रेकॉर्ड केले. त्यांचेच एक रोंबा सोंबा पद्धतीचं गोणं होतं, ‘डार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस, डार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस…भलताच बाई येडा दिसतोस…’ हे गाणंही तसं गाजलं होतं. परवा ते पटकन ओठांवर आलं, जेव्हा आदरणीय केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री नामदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी थेट डार्विनचा उत्क्रांतीवादच स्वच्छ भारत योजनेअंतर्गत कचऱ्यात काढला!

काहीही अर्थ नसलेला हा बिनबुडाचा सिद्धान्त मूर्खासारखं सगळं जग घोकंपट्टी करत बसलाय. माकडाचा माणूस झाला म्हणे! असं कधी होतं का? मग प्राणी संग्रहालयात किंवा आपल्या माथेरान, खंडाळा घाटात वर्षानुवर्षं जी माकडं दिसतात, ती एव्हाना माणूस बनून शर्ट-पँट घालून कामधंद्याला नसती का लागली? माकड ते माकड, माणूस तो माणूस! आज जसा माणूस जन्मतो, तसाच थेट माणूस जन्माला आला. आला म्हणजे आला. कुणाच्या पोटी? औरस का अनौरस? कुठे? कधी? असले मूर्खासारखे न्यूटनछाप प्रश्न विचारू नका. फारच कंड असेल तर वेद वाचा. वेदात सगळ्याची उत्तरं आहेत. कोरियात काय होणार इथपासून ते दीपिका रणबीरच्या लग्नापर्यंत. हे कोश, गुगल, विकीपिडिया वगैरे काल-परवाचं. या सगळ्याचं मूळ वेदात. त्यामुळे मूर्ख डार्विननं माकडाचा माणूस केला, पण म्हणून आपण आपलं माकड होऊ द्यायचं नाही. आपण वेदप्रामाण्य मानायचं. बाकीचं सगळं उपटून फेकून द्यायचं. मंत्री म्हणून खात्यांर्गत आदेश म्हणून पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रमातून डार्विन यापुढे उत्क्रांत होता कामा नये, किंबहुना तो होणार नाही असा आदेशवजा बंदोबस्तच केला जाणार आहे. मंत्री महोदयांचं नावच ‘सत्यपाल’ असल्यानं तेही एकप्रकारे वेदस्वरूपच!

मुळात मेकॉले, माँटेसरी वगैरे विदेशी लोकांनी आपली प्राचीन प्रगत संस्कृती पाहून, त्यातली विद्वता वगैरे पाहून, शास्त्र, गणित, पांडित्य पाहून विस्फारित नेत्रांनी, सत्तेचा व भाषेचा दुरुपयोग करून आपली संस्कृती मागास ठरवली. आधुनिक म्हणून निसत्व, भ्रष्ट असं शिक्षणात भरताड घुसवून विज्ञान वगैरे म्हणत आपले सारे वैद, शास्त्रं, पुराणं, स्मृती, संहिता वगैरे आपल्याच लोकांना हाताशी धरून नष्ट केलं. विविध धर्म, पंथ, समाज इथं फेरीवाल्यांसारखे जागोजाग उभे करून बुद्धिप्रामाण्यवादाच्या नावाखाली जे जे उदात्त, उन्मन, महन्मंगल; ते ते अप्रगत, बुरसटलेलं ठरवत आमच्याच घरात आम्हाला बदनाम केलं!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इतकी शतकं सहन केलं, आता नाही. आदरणीय सत्यपाल सिंह हे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रात आयपीएस श्रेणीतले व मुंबई-पुण्यासारख्या शहराचे पोलिस आयुक्त वगैरे होते. त्यांचं आताचं निखळ भगवं रूप पाहता, सेवेत असताना त्यांनी किती ‘संत’विचारांनी अनेक कारवाया करून गुन्हेगारांना सत्प्रवृत्त करून, भक्तीमार्गाला किंवा थेट मोक्षाच्या मार्गावर नेऊन उभं केलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. सत्यपाल सिंह यांची पोलिसी कामगिरी एवढी पुण्यशील व वेदप्रमाण्याला धरून झाली की, राजकारणात उतरताच त्यांना खासदारकीचं तिकीट तर मिळालंच, पण पहिल्याच निवडणुकीत विजयी होऊन थेट मंत्रीही झाले! ८४ लाख योनी फेऱ्यातून त्यांनी जो मानवजन्म मिळवला (माकडातून नव्हे!) त्याचं सार्थक यापेक्षा अधिक ते काय?

पुन्हा दुग्धशर्करा योग असा की, ‘हाती राज्यघटना तरी डोक्यात वेद’ अशा पक्षाचीच बहुमतीय सत्ता. ज्या राज्याचे ते खासदार, तिथं मुख्यमंत्रीपदी साक्षात एक योगी. या योगी महाराजांनी मुख्यमंत्री आसन, दालनच नव्हे तर मंत्रालयच भगव्या रंगात रंगवून टाकलं. याचा प्रभाव म्हणून काही गावात ग्रामस्थांनी सरकारी मदतीनं बांधलेली शौचालयंही भगव्या रंगात रंगवून टाकली! आता काही धर्मद्वेष्टे, पाखंडी याला भगवा ज्वर, भगवा आतंकवाद वगैरे म्हणतात. पण रंगपेटीत एखाद्या विषाणूसारख्या शिरलेल्या लाल, हिरव्या तुकड्यांना कसं तुडवायचं, नामशेष करायचं हे पार वेदातच सांगितलेलं आहे. एकदा वेद वाचले की, अवघा रंग एकचि होतो. आणि तो म्हणजे भगवा!

तर पुन्हा आपण त्या डार्विनकडे वळूया. खोटारडेपणाचा कळस म्हणजे माणसानं किती करावा? माकडापासून माणूस? उद्या म्हणाला कोकीळेपासून लता मंगेशकर झाल्या आणि राजहंसापासून बालगंधर्व! आता साक्षात रामायणात वानरांनी (पहा आमच्या संस्कृतीत माकड, मर्कट यांना सुद्धा सहृदयतेनं वानर म्हणतात. नाहीतर यांची ‘मंकी संस्कृती’! मंकी हिल म्हणे मूर्ख. ‘वानरकडा’ म्हणता येत नाही?) सेतू बांधला! काय बांधला? तर सेतू. तोही भर समुद्रात! हिंदी महासागरात. ना निविदा काढल्या, ना बीआरटी, ना परदेशी साहाय्य, ना इंजिनिअर, ना पोलाद, ना सिमेंट, ना यंत्र, ना तंत्र. मग कसं काय घडलं? फक्त मंत्र! श्रीराम म्हटलं की शिळेचा थर्माकोल व्हायचा, हवेत उचलून पुन्हा पाण्यात टाकला की, थेट क्राँकिट. श्रीराम-शिळा-थर्माकोल-हवा-पाणी-क्राँकिट! वानर तर होतेच, पण खारीनंही त्यात योगदान दिलं. म्हणजे दोन साक्षात प्राण्यांनी हा सेतू बांधला.

आणि तो वेडपट डार्विन म्हणे माकडापासून माणूस झाला! त्याला किमान काही शैक्षणिक पात्रता असती तर अगदी प्राथमिक म्हणता येईल असं, वानरापासून बाहुबली हनुमान झाला असं म्हणाला असता. पण एवढं डोकं कुठं असायला? वाचायचं नाहीच काही, त्यातून वेद तर नाहीच! मग दळभद्रीच निपजणार आणि असले सिद्धान्त मांडणार! आणि जगाच्या इतिहासात मूर्खांना डोक्यावर घ्यायचे प्रकार बुद्ध, कबीर, चार्वाकापासून ते कोण राळेगणच्या अण्णापर्यंत! गांधी तर किती प्रकारचे पहिला, दुसरा, सरहद, आफ्रिकन!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

बरं झालं, तीन वर्षांपूर्वी भारतीय नव्हे हिंदू जनतेला भान आलं, सहस्त्रवर्षाची झोप उडाली आणि अस्मितेनं प्रखर सूर्यतेज पेट घेतला आणि हे सरकार निवडून आणलं. आता निवडणुका होतील, पण बदलणार काहीच नाही. कोटी कोटी वेदप्रामाण्य मानणारी हिंदू मनं आता हे राजशकट कुणा दुसऱ्या हाती देण्याची ऐतिहासिक चूक पुन्हा करणार नाहीत. आता जब तक सूरज-चाँद (चाँद कसला? चंदा, चंद्रमा!) रहेगा, तब तक ये हिंदू तनमन कमल का फूल सर आँखोपर रखेगा!

हे सरकार किती दूरदृष्टीचं पहा. एका खाकी वर्दीतल्या माणसालाच शैक्षणिक, सांस्कृतिक धडा शिकवायला मंत्रीपदी नेमलं. पुन्हा नाव ‘सत्यपाल’ आणि कारभार हाती घेताच कशी काही महिन्यातच त्या डार्विनची गचांडी धरली की नाही? खरं तर तो जिवंत असता तर नॅचरल जस्टीस म्हणून दिल्लीत माकड पकडणाऱ्यांनाच त्याला पकडायचे आदेश दिले असते!

म्हणजे बघा यांचे ते शोध, प्रयोग, शास्त्र, शस्त्रक्रिया आणि आमची तेवढी पुराणातली वांगी! यांचा विकी डोनर एकविसाव्या शतकात उपजला. आमच्या हनुमानाच्या नुसत्या धर्मबिंदूंनी पुत्र निर्मिला. ती भाकडकथा. तुकाराम सदेह वैकुंठाला गेले ते मिथक आणि यांची विमानं उडतात तो शोध! ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले ही दंतकथा आणि हिमेश रेशमियाचं गाणं ही स्टोरी? यांच्या फेसबुक वॉल डिजिटल क्रांती आणि कुलकर्णी भावंडांनी भिंत चालवली तो ट्रिक सीन? माणसावार गजमुखाचं कलम हे थोतांड आणि यांच्या त्या प्लास्टिक सर्जरी. चांडाळांनो किती दिवस श्रेय दडवून ठेवाल? किती दिवस मोहन्जोदरो, हडप्पा कराल? किती तेजोमहाल पळवाल? किती मंदिरं बाटवाल? आता हिंदू शांत बसणार नाहीत, सत्यपाल जो आया है!

आता मंडळी कामालाच लावली आहेत. न्यूटन, आर्किमिडिज, पायथागोरस, गॅलिलिओ, एडिसन, ग्रॅहम बेल वगैरे सगळ्यांचीच सीबीआय, एसआयटी, ईडीतर्फे चौकशी लावली पाहिजे. चौकशा समित्या नेमून पार ते आईन्स्टाईन वगैरेंची ही पुनर्तपासणी करायला हवी. या सर्वांनी नक्कीच चोरून वेद वाचले असणार!

इंटलेक्युअल कॉपीराइट वेदांपासूनच सुरू करायला हवा. अहो, साध्या ‘वडाची साल पिंपळाला’ या वाकप्रयोगातच शेतीप्रयोग आहे. एक तीळ सात जणांत वाटून खावा हे सार्क देशाचं जन्मकूळ नाही काय? ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ हे अर्थतत्त्व कधी मान्य करणार? ‘खाईन तर तुपाशी…’ यात क्वालिटी कंट्रोल दिसतोय ना सरळ सरळ. तरीही डोक्यावर पट्टी बांधणार तुम्ही? महाभारतात संजयानं रनिंग कॉमेंट्रीचा जन्म घातला, तर कृष्णानं भर समरांगणात गीता सांगून कार्यसंस्कृतीची घडीच नाही का बसवली? लसींचा शोध आणि शंकराचं विषप्राशन वेगळं कसं बघणार तुम्ही? शबरीची उष्टी बोरं हे टेस्टिंगचे प्रकार नाहीत का? तर अंगटा कापूनही धनुर्विद्या चालू ठेवणं म्हणजेच कौशल्य विकास, हे यांना कोण समजावणार?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

डॉ. सत्यपाल यांच्यासमोर पडलेला कामाचा डोंगर पाहिलात ना! साधारण जगाचीच पुनर्मांडणी करायचीय. भारत महासत्ता होणार म्हणजे नुसती आर्थिक किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणातली वज्रमूठ नव्हे तर जगाचा सगळा इतिहास, मानववंशशास्त्रीय, सांस्कृतिक, तथाकथित विज्ञानाची पुनर्मांडणी करून भूगोलही बदलून वेदमाहात्म्य जगभर पसरवून, नासा वगैरे मोडीत काढून सर्व जगच एक वेदभूमी म्हणून हिंदुस्थानी अमलाखाली आणणं म्हणजे महासत्ता!

या नव्या महासत्तेत म्लेंच्च, ख्रिस्ती, यहुदी आणखी जे कुणी असतील त्यांनी वेदभूमीची लेकरं म्हणून मौजीबंधन करून वेदाभ्यासास लागायचं, उपासना स्वातंत्र्य मिळेल, पण बलोपासना फक्त वेदांची! स्मार्टसिटीप्रमाणे प्राइड सिटीज म्हणून मोहन्जोदरो, हडाप्पा, मथुरा, वृंदावन, कुरुक्षेत्र, पंडूभूमी, गोकुळ यांची पुननिर्मिती केली जाईल आणि तिथं रामराज्याप्रमाणे संविधान चालवले जाईल.

देशाची घटना आणि त्यात करायचे बदल याविषयी अकारण वाद उकरले जातात. मुळात संविधान म्हणजे नवा वेदच! नवा असला तरी वेद हे महत्त्वाचं. आता नवा वेद जुन्या वेदांशिवाय पुढे मार्गक्रमणा कसं करणार? आपण नवे कपडे रोज थोडेच घालतो? सणासुदीलाच घडी मोडतो, पुन्हा घडी करून ठेवून देतो! संविधान आपला हा असा भरजरी ठेवा आहे. तो सणासुदीलाच वापरावा. जसा १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि नवा राष्ट्रीय सण म्हणून १४ एप्रिल!

आता आम्हाला सांगा डॉ. सत्यपाल यांच्यासारख्यांना ही जी दिव्य व दूरदृष्टी प्राप्त झालीय, ती वेदांपासून की माकडापासून? बहुधा तो डार्विन हा मनुष्यप्राणी नसून एक मर्कटच असावा साक्षात! त्याला मनुष्यजन्माचं स्वप्न पडलं असावं. आणि खात्रीनं सांगतो, त्या दिवशी होलिकोत्सव असणार आणि त्यानं भांग प्यायली असणार!

आता भांगेला तुम्ही आद्य ड्रग मानायलाच तयार नसाल तर चर्चाच थांबली!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Nilesh Shinde

Fri , 09 February 2018

डार्विन चा सिद्धांत हा इथे स्पष्ट होतो असे वाटत नाही का ? ज्या वेळेस राम लंकेमध्ये जाण्यास निघाले त्यावेळेस त्या काळी असणारी माकडे ( वानरे ) ह्यांनी राम-सेतू बांधला, म्हणजे माकडांचा उतांक्रांतिवाद हा विकसित होत होता म्हणजे ज्यावेळेस राम होते त्या वेळेस माकडांचा उतांक्रांतिवाद हा चालू होता आणि माकांडांपासून मानव उत्क्रांत होत होता ही गोष्ट ह्या महाशयांना कशी पटली नाही किंवा त्यांना लक्षात आली नाही, ( ज्या डार्विन ला संपूर्ण जग मानत त्यांना आपल्या भारतात स्थान नाही , भारताच्या अधोगतीला असे मंत्री जबाबदार आहेत की ज्यांनी भारताच्या नेहमी अधोगतीस असे वक्तव्य आणि काम केले आहे )


ADITYA KORDE

Sat , 03 February 2018

नक्की काय म्हणावे ते समजत नाही.... आम्ही आतापर्यंत ( अधून मधून)वाचत होतो कि आपल्या उच्च भारतीय संस्कृतीत दशावतार जे आहेत ते डार्विनचा उत्क्रांतीवाद आम्हाला हजारो वर्षे आधी पासून माहिती होता, मग हे काय नवीन कि दशावतारात हनुमानाला स्थान नाही म्हणून ही हुल्लडबाजी .... आम्हा हनुमान्भक्तांच्या भावना दुखावल्या कि आता ...


ram ghule

Wed , 24 January 2018

very nice and intellectual article thanks


Gamma Pailvan

Tue , 23 January 2018

डॉ. सत्यपाल सिंहांच्या सांगण्यावरून माणूस माकडापासून उत्क्रांत झालेला नाही असं समजून चाललो होतो. उपरोक्त लेख वाचून लेखकदेखील माकडापासून उत्क्रांत झालेला नाही याची खात्री पटली. ( म्हणजे लेखक आजूनही माकडच आहे! आधीच मर्कट त्यांत डार्विनचं मद्य प्यायला!! मग त्यास सत्यपालाचा विंचू चावला!!! वगैरे, वगैरे, वगैरे!!!!) -गामा पैलवान


Amol Gore

Tue , 23 January 2018

।। डार्विन, माकड आणि माणूस ।। मानवाची उत्पत्ती बंदरापासून झाली,हा डार्विनचा सिद्धांत खोटा आहे,हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले.आपण मर्कटवंशाचे दिवे आहोत.हे शालेय पाठयपुस्तकात आमच्या लीलाना सुमारच उरलेला नव्हता. गुरुजींनी एकदा 'वानर आणि टोपीविक्रते' गोष्टींचे तात्पर्य काय असे विचारले असता 'आपल्या पूर्वजांना अशी टोपी घालणे योग्य नव्हे',असे उत्तर दिल्याने आम्हाला उठबशाची शिक्षा मिळाली होती.रामयण काळात हनुमंतासह समस्त वानर सेना प्रभू रामचंद्राच्या मदतीसाठी धावून अली.सीतेच्या शोधातसाठी त्यांनी लंकेपर्यत रामसेतू बांधला.हे त्यांनी भक्तीपोटी नव्हे,तर पितृक प्रेमातून केलं असावं,असा आमचा डार्विन वाचल्यामुळे गैरसमज झाला होता.सत्यपालांनी खरं काय ते सांगून आमच्या मानगुटीवर बसलेलं भूत उतरवून टाकलं ते बरं झालं.


Sourabh suryawanshi

Tue , 23 January 2018

उपरोधाचा बाप ...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......