अजूनकाही
तुमचा इतिहास तो माझाही असायलाच पाहिजे? किंवा माझाच इतिहास खरा- हा अट्टहास मुळात येतोच कुठून? याचं उत्तर शोधायला नेमका 'इतिहास' काय असतो हेही समजून घेणं आवश्यक ठरतं. सध्या जे काही सभोवताली घडतंय- अगदी ‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादापासून ते थेट भीमा-कोरेगावपर्यंत या सगळ्याला 'इतिहास' हाच कारणीभूत आहे की, आपली समकालीन अस्मिता जपण्याचा भोंगळ प्रयत्न? आणि इतिहास असलाच तरी तो असा का मांडला गेला असावा किंवा त्याचे सोयीसाठी केले गेलेले समकालीन रचनात्मक बदल आणि कालांतराने त्याचे अर्थ-अन्वर्थ याचाही अभ्यास होणे किंवा माहिती असणे क्रमप्राप्त ठरते.
आजपर्यंत जगभरातील बऱ्याच इतिहासतज्ज्ञ व अनेक तत्त्वज्ञांनी इतिहासाची परिभाषा ही सत्ताकेंद्रित ‘अधिकारात’ सामावली असल्याचे दाखवून दिले आहे. त्यानुसार आजतागायत इतिहास हा तसा मांडला जातोय. हाच इतिहास अशा प्रकारे, त्या त्या काळात, त्या त्या अधिकार राज्यात किंवा राजांच्या काळात सत्तेला अनुसरून मांडला गेला. इतिहासाचा केंद्रबिंदू सत्ता आणि त्याला कायदेशीरता मिळवून देणे हाच होता. त्याचे बहुतांशी उद्दिष्ट्य हे सत्तेची प्रखरता वाढवणे हेच होते (अर्थातच काही वगळून).
मग आपल्याला हा इतिहास राजे-महाराजे, सरदार-उमराव, उच्चकुलीन व थोर व्यक्तींच्या आणि/किंवा त्यांच्या वंशावळीतून (Genealogical )- त्याही पुढे त्यांच्या पराक्रमांच्या मिथकांतून दाखवला गेला, जातो. याच वंशावळीच्या पराक्रमाच्या गाथा आजच्या वर्तमानाची जाणीव व महत्त्व हयात पिढ्यांना सांगताना दिसतात. आणि कुठे वर्तमानात आपल्यालाच चुकल्यासारखे वाटत असेल तर तुलनेसाठी 'प्रमाण' म्हणून या इतिहासाकडे आपण पाहतो (किंवा तसे पाहण्यास भाग तरी पाडले जाते). मग त्या तुलनेतून तुमचे-आमचे इतिहासाचे उदात्तीकरण आणि व्यक्तीचे दैवतीकरण सुरू होते.
मध्ययुगीन इतिहासात याचे प्रमाण अधिक दिसते. कारण मध्ययुगीन इतिहासालासुद्धा सरंजामशाहीच्या छटा आहेतच ना! मग हा इतिहास वर्तमानात काही लोकांना एकांगी, बंधनकारक, लखलखीत, पण अधीन करणारा आणि काहीअंशी जुलमीसुद्धा वाटू शकतो. कारण कालांतराने उदात्तीकरणामुळे तो अनपेक्षित कर्तव्यांची अपेक्षा उभयतांकडून करतो. परंतु काही लोक त्यात रममाण होणे स्वीकारतात. शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न. पण तरी समाजामधील किंवा त्यातील उपघटक किंवा गटांमधील घर्षणास इथूनच सुरुवात होते.
पण हे सगळं इथेच थांबत नाही- इतिहास फक्त सत्तेविषयीच नाही मांडला जात तर त्या सत्तेचं अजून जास्त सशक्तीकरण करण्याचं कामही त्यामार्फतच होतं. कारण इतिहास हे सत्तेचंच चर्चाविश्व (discourse) आहे. म्हणून त्यातून येणारी बंधनं, अधीनत्व यांना ही कायदेशीरता प्राप्त होते. हेच ऐतिहासिक-चर्चाविश्व सत्तेची भुरळ पाडतं. त्याचवेळी दहशतही निर्माण करतं आणि अस्थिर बनवतं. आणि म्हणून काहींना या इतिहासातील प्रस्थापितातेविषयी आवाज उठवावासा वाटतो. त्यात गैर काही आहे असे नाही आणि नाहीच असंही अगदी मांडू शकत नाही. म्हणूनच कदाचित ओरिएन्टलिस्ट इतिहासाची गरज स्वातंत्र्यसंग्रामात वाटली असावी. किंवा आफ्रिकेत वंशभेद आणि रंगभेदातून प्रति-इतिहासाच्या निर्मितीला सुरुवात झाली असावी.
आता उदहारण घ्यायचच झालं तर भीमा-कोरेगावचंही घेता येऊ शकतं. दलितांसाठी इतिहास हा इतिहास नाही आहे, तर तो वर्तमानही आहे. जर एखादा इतिहास कुठल्या एका समाजगटाला आपल्या थोर वंशावळीचा पराक्रम सांगत नसेल तर तो शोधला तरी जातो किंवा एखाद्या घटनेतून आजच्या वर्तमानात त्यालाही कायदेशीरता मिळवून देण्याचा प्रयत्न करून शौर्याचे प्रतीक म्हणून त्याकडून प्रेरणा घेतली जाते. यात बरोबर किंवा चूक असे काहीच नाही. प्रत्येक व्यक्ती किंवा समूह आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची नोंद कुठे ना कुठे मिळेल याच्या शोधातच असतो. जर एखाद्या समाजाला आजही ऐतिहासिकच वागणूक मिळत असेल तर त्याला कितीही सर्वसमावेशक होता आपला राज्यकर्ता आणि तो माझा किंवा फक्त तुझा नाहीतर तुमचा-माझा-सर्वांचा आहे सांगण्याचा प्रयत्न केला तरी ढसाळांसारखे 'या सत्तेत जीव रमत नाही' लिहावेच लागणार! ‘आम्हाला ‘थोर’ आणि ‘वैभवशाली’ असा वारसा किंवा त्याचा इतिहास नाही. ज्याच्या सत्तेतुन गौरवशाली वंश येतो तसेही कुठे उल्लेखित नाही. आम्ही कायम सावलीतच होतो, ना प्रतिष्ठा ना कुठले अधिकार होते. आणि म्हणूनच आम्ही बोलण्यास सुरवात केली आणि आता आमचा इतिहास सांगण्यास सुरवात केली’, असे जर वंचित आणि दलित वर्ग म्हणत असेल तर इतरांकडे उत्तरे नसतील. असलेच तर कृतीतून ते दिसून येतातच.
आता उदाहरण 'पद्मावती' या चित्रपटावरून झालेल्या वादाकडे पाहू. इतिहासावर सदैव होणारा अन्याय म्हणजे त्याचं मूल्यनिर्णयात्मक होणारं विश्लेषण आणि त्यातून काढले जाणारे अर्थ. म्हणजेच मूल्यनिर्णयात्मक विश्लेषणात अल्लाउद्दीन खिल्जी हा चांगला होता किंवा वाईट होता हे ठरवलं जातं. इथं प्रायोगिक पुरावे सादर करण्याअगोदरच आपल्या वैयक्तिक कल असलेल्या बाजूनं पुरावे सादर करून निष्कर्षाला येणं- स्वीकारलं जातं. यालाच आपण आनुषंगिक दृष्टीकोन असंही म्हणू शकतो.
इतिहासाला हे मापदंड लावणंच मुळात चुकीचं. इतिहास हा आहे तसाच मांडला जायला हवा. प्रत्यक्षार्थात्मक विश्लेषणातूनच इतिहास मांडला जायला हवा. ज्यात प्रायोगिक पुराव्यांवर अधिक भर असायला हवा. खिल्जीने बाजारपेठीय सुधारणा आणल्या- याला अनेक पुरावे आहेत. म्हणून यावरून खिल्जी हा चांगला किंवा वाईट ठरत नाही. त्याचं बाजारपेठीय धोरण एवढंच फक्त चांगलं ठरतं.
या उलटचंही खरं आहे की, स्वाऱ्या करून लुटणंसुद्धा काही कुठल्या राजाला चांगलं किंवा वाइट ठरवत नसतं. म्हणून जोहर झाला तर हे शोधून त्या काळातील समाजाची कारणमीमांसा होऊन इतिहास मांडला जायला हवा. मग त्यात ‘पद्मावती’ होती किंवा नाही हे दुय्यम ठरेल. वाद मूल्य निर्णयात्मक-आनुषंगिक इतिहासातून निर्माण होतो, तर संवाद हा प्रत्यक्षार्थात्मक-अनुमानजन्य इतिहासाशी होत असतो. तरीही माझा आशावाद वेडा नकोच ठरायला म्हणून मी म्हणेल अशा इतिहासातून वाद होणं अटळ आहेच. म्हणून काय खरा इतिहास मांडणाऱ्यांनी तो मांडणं सोडून द्यायचं नसतं. आणि माहीत असणाऱ्यांनी तो सांगणं सोडायचं नसतं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342
.............................................................................................................................................
यातून अजून एक उदहारण आपल्याला मिळतं ते पेरुमल मुरुगन यांचं. मुरुगन यांनी आपल्या ‘माथोरुबागन’ (‘वन पार्ट वुमन’) या कादंबरीमध्ये 'कोंगुवेल्लाला गौंडर' या जातीतील पुरातन काळापासून चालत आलेल्या अमानुष प्रथेवर लिहून काहीअंशी टीकाही केली. ज्यानुसार अपत्य होत नसलेल्या गृहिणीनं यात्रेतील आवडेल त्या पुरुषाशी संग करणं, तेही सर्व संमतीनुसार आणि मग त्यातून मिळालेल्या अपत्यास ‘सामी पिल्लई’ म्हणजेच देवाचं मूल समजून आनंद साजरा करायचा. आता हे फक्त ऐतिहसिकच नव्हतं तर ही समकालीन प्रथादेखील आहे. हे पुस्तकात वाचून गौंडर समाजातील लोकांनी मुरुगन यांचा मानसिक छळ करून जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या मुरुगन यांनी फेसबुकवरून आपल्यातला लेखक मेल्याची घोषणा करावी लागली. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की, इतिहास फक्त पराक्रमीच असावा अशी लोकांची सक्ती तरी कुठे असते? तो लाजिरवाणा असला तरी त्यालाही कायदेशीरता प्राप्त करून देणारा समाज आजही हयात आहेच ना! आणि विशेष म्हणजे मुरुगन स्वतः गौंडर समाजातीलच आहेत.
या वरील सर्व लेखन प्रपंचातून निष्कर्ष काढणंदेखील अयोग्य ठरेल. तरीही शेवटी थोरांच्या इतिहासतही कनिष्ठांचा इतिहास सामावलेला असतो किंवा बलवंतांचा इतिहास हा दुबळ्यांचाही इतिहास असतो- ज्यात विविधतेचा गुणधर्म आढळून येतो. काहींचा इतिहास हा इतरांचा असेलच असंही नाही. म्हणून तो शोधला जातो, किंवा तो ठासून तरी सांगितला जातो. त्यातून काय घ्यायचं काय सोडायचं हे जरी व्यक्तिसापेक्ष असलं तरी अभ्यासकांनी एक पारदर्शक चर्चाविश्व तयार करण्याचं धनुष्य पेलायला हवं.
.............................................................................................................................................
लेखक हितेश पोतदार विविध महाविद्यालयं आणि स्पर्धापरीक्षा केंद्रांत राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे अध्यापन आणि अध्ययन करतात.
hdpotdar199@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 23 January 2018
हितेश पोतदार, तुम्ही म्हणता की खिलजी चांगला की वाईट ते ठरवता येत नाही. मात्र त्याचं बाजारपेठीय धोरण चांगलं होतं. मग हाच न्याय नथुराम गोडश्यांना लावायचा का? नथुराम गोडसे हा इसम चांगला की वाईट ते माहित नाही. पण त्याने ज्या कारणासाठी गांधींची हत्या केली ते कारण नक्कीच समर्थनीय आहे. ते कारण असं की, गांधी टेररिस्ट फायनान्सर होते. आक्रमक पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावेत म्हणून उपासाला बसले. निदान तशी त्या काळी समजूत तरी होती. या कारणांचा अधिक खोलवर उहापोह नथुराम गोडश्यांच्या फाशीपूर्व भाषणांत आहे. आपला नम्र, -गामा पैलवान