अजूनकाही
१७ नोव्हेंबर २०१२. गेले दोन-तीन दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यवस्थतेची चर्चा चालू होती. ‘बाळासाहेब स्थिर’ अशा सर्व वर्तमानपत्रांमध्ये हेडलाइन्स झळकल्या होत्या. पण दुपारी चारनंतर बाळासाहेब गेल्याची अचानक चर्चा सुरू झाली. साडेपाचच्या सुमारास ३ वाजून ३० मिनिटांनी बाळासाहेबांचं निधन झालं असल्याचं जाहीर झालं. पत्रकार असल्याने आणि ऑफिसमध्येच असल्याने आधीपासूनच कामाला सुरुवात केली होती. दरम्यान मुंबईभर दुकानं बंद होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या! नऊपर्यंत दुकानं, रिक्षा सर्व बंद झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. फक्त लोकल चालू होत्या. पण त्या बहुतेक रिकाम्या धावत होत्या. काम आटोपून घरी जायला निघालो तेव्हा एक सहकारी म्हणाले, ‘इथंच जेवून घ्या. बाहेर जेवण मिळणार नाही.’ पण मी म्हटलं, ‘ठाणे-वाशी बंद होईल, बेलापूर, त्यातलं दिवाळं हे टिपिकल छोटंसं कोळ्यांचं गाव बहुधा होणार नाही.’ म्हणून न जेवताच घणसोली स्टेशनवर आलो. लोकलमध्ये फारच तुरळक माणसं होती. बेलापूरला आलो तर सारंच बंद. वडापाव, बिस्किट काहीही मिळत नव्हतं. दिवाळे गावातलं एक मेडिकल स्टोअर कसंबसं उघड होतं. तिथून एक कॅडबरी घेतली. पण तिनं किती पोट भरणार? शेवटी तसाच झोपलो.
लोकलमध्ये असतानाच प्रसाद पोतदारचा फोन आला. तीनेक वर्षांपूर्वी लोअर परळला, डिलाइल रोडला राहत असताना एकदा प्रसाद सहज गप्पा मारताना म्हणाला होता, ''बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा 'न भूतो न भविष्यती' अशी निघेल. तेव्हा आपण जिथं कुठे असू तिथून ती पाहायला यायचं.” त्याला मीही होकार दिला होता. त्याचा फोन आला तेव्हा त्याने, 'तुला आठवतं का आपलं काय ठरलं होतं?' असा प्रश्न विचारला. त्या आधी दोनेक दिवसांपूर्वी ही घटना मी ऑफिसमध्ये एक-दोघांना सांगितली होती. मी प्रसादला होकार दिला.
त्यानुसार दुसऱ्या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास वाशीला प्रसादच्या ऑफिसजवळ पोहोचलो. ट्रेनला अगदी तुरळक माणसं होती. दोघं वाशीहून दादरला निघालो. रविवार असल्याने गर्दी एरवीही कमी असते. त्यात आज बाळासाहेब गेल्याने मुंबई बंद होती. दादरला उतरलो, तर सर्व माणसं शिवसेना भवन-शिवाजी पार्कच्या दिशेनं जात होती. रिक्षा-टॅक्सी-बेस्ट सर्व काही बंद होतं. आयडिअलच्या चौकात महानगरपालिकेचा पाण्याचा टॅंकर उभा होता. त्याची अंगठ्याएवढी धार अखंड चालू होती. आयडिअलसमोरून आम्ही शिवसेना-भवनच्या दिशेनं निघालो. बहुतांश माणसं स्टेशनच्या दिशेनं येत होती. शिवाजी मंदिरनंतरच्या एका गल्लीच्या तोंडाशी कुणीतरी लोकांना चहा देत होतं. तिथं मोठी रांग लागली होती. डावीकडच्या एका गल्लीत पोहे वाटणं चालू होतं. तिथंही मोठी गर्दी होती. आम्ही गर्दीतून शिवसेना-भवनच्या दिशेनं सरकत होतो. इथं खूपच गर्दी होती. शिवसेना-भवनच्या समोर एका मोठ्या इमारतीचं बांधकाम चालू होतं. कंपाउंडवरून उड्या मारून आम्ही त्या इमारतीत गेलो. त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या जिन्यानं शेवटच्या मजल्यावर गेलो. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बरेच लोक होते. तिथून खालचा परिसर चांगला दिसत होता. शिवसेना-भवनचा चौक गर्दीनं अगदी फुलून गेला होता. बाळासाहेबांचं पार्थिव भवनातून बाहेर आणलं, तेव्हा थोडी रेटारेटी झाली, पण दुसऱ्याच क्षणाला आजूबाजूच्या अनेकांनी कॅमेरे काढून त्यांचे फोटो काढायला, व्हिडिओ शूटिंग करायला सुरुवात केली. त्यांचं पार्थिव असलेली गाडी शिवाजी पार्कच्या दिशेनं नेता यावी म्हणून वाट काढावी लागत होती. कारण दोन्ही बाजूंनी गर्दी होती. गाडी जसजशी पुढे जायला लागली, तसतसे फोटोंसाठी मोबाईल उंचावायला लागले. 'परत या, परत या, बाळासाहेब परत या', 'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' या घोषणा चालू होत्या. गाडी शिवाजी पार्कच्या दिशेनं सरकायला लागली, तसे आम्ही खाली उतरायला लागलो.
त्या वेळी मी दादरपासून पुष्कळ दूर बेलापूरला राहत होतो, पण बेलापूरही बंद असल्याने मला चहा-सिगारेट-नाश्ता काहीही मिळालेलं नव्हतं. सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नव्हतं. प्रसादने येताना सोबत थोडं फराळाचं आणलं होतं. ते त्याने बॅगमधून बाहेर काढलं. तेव्हा साडेचार वाजले होते. त्या इमारतीत बसून आम्ही लाडू-चकली-चिवडा-करंज्या यांचा समाचार घेतला. मग खाली उतरलो. शिवाजी पार्कच्या दिशेनं जाणाऱ्या एका चौकातल्या पेट्रोल पंपाशेजारी एक छोटी पोलीस-चौकी होती. तिथं पाण्याचा नळ होता. काही लोक तिथं बाटलीने पाणी पीत उभे होते. आम्हीही तिथं पाणी प्यायलो. मग शिवाजी पार्कवर गेलो. शिवाजी पुतळ्याच्या दिशेनं तीन मांडव उभारलेले होते. मधल्या मांडवात सेनेचे नेते-पुढारी होते. डावीकडच्या कोपऱ्यात न्यूज चॅनेल्सच्या ओबी व्हॅन्स उभ्या होत्या. मधल्या मांडवाच्या समोर चिता उभारली होती. शिवाजी पार्कला शिवसेना पूर्वीपासून 'शिवतीर्थ' म्हणून संबोधत आली आहे. आज त्याचा जोरदार पुनरुच्चार होत होता. 'परत या, परत या, बाळासाहेब परत या' ही कमालीची करुण आणि भाबडी घोषणा दिली जात होती. तिला प्रतिसाद मात्र तुलनेनं फारच कमी जणांकडून दिला जात होता. गर्दीतून सहजपणे मांडवापर्यंत जाणं शक्य नव्हतं, पण थोडा प्रयत्न केला असता, तर फारसं कठीणही नव्हतं; पण आम्हाला एकूण सोहळा पाहायचा होता.
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या बाजूला एक छोटं उद्यान आहे. त्याच्या कंपाउंडवर चढून काही लोक उभे राहिले होते. मग आम्हीही त्यावर चढून मधल्या सिमेंटच्या खांबावर उभे राहिलो; पण आमच्यासमोरचा बराचसा भाग रिकामा होता. मांडव आणि त्याच्या दोन्ही बाजूंची गर्दी त्यापुढे होती. त्यामुळे सगळं स्पष्ट दिसत नव्हतं, पण बाजूला टीव्ही. स्क्रीन लावलं होतं. त्यावर आम्ही सगळं पाहत होतो. शिवाजी पार्क पूर्ण भरून त्याभोवतीही मोठी गर्दी होईल, असा प्रसादचा आधी अंदाज होता. मलाही तसंच वाटत होतं.
बाळासाहेबांचं पार्थिव शिवाजी पार्कवर आलं. नंतर शरद पवार, अमिताभ बच्चन, रितेश-अमित देशमुख, छगन भुजबळ, विनोद खन्ना, अनिल अंबानी, सीताराम कुंटे, सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवानी, अरुण जेटली, राजीव शुक्ला, सुभाष गोयल, प्रफुल पटेल, पृथ्वीराज चव्हाण, गोपीनाथ मुंडे, महेश मांजरेकर, प्रवीण तोगडिया हे सेलिब्रिटी लोक आले. कुणाचं तरी भाषण होणार, असं मला वाटत होतं, पण कुणाचंच भाषण झालं नाही. राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना टीव्हीच्या पडद्यावर सतत दाखवलं जात होतं. नंतर मंत्रपठणाला सुरुवात झाली. बाळासाहेबांना चितेवर ठेवण्यात आलं. त्यावर लाकडं ठेवली जायला लागली. उद्धव ठाकरे यांनी मडकं खांद्यावर घेऊन चितेभोवती फेऱ्या मारल्या. चिता पेटवली. ती थोडी नीट पेटली, म्हणजे लोकांना धूर दिसायला लागला, तसं काही लोकांनी बाहेर पडायला सुरुवात केली, पण बाहेर पडणारे लोक अगदी थोडे होते. बाकी गर्दी चिता पाहत शांतपणे उभी होती.
आम्ही खाली उतरून चितेच्या दिशेनं सरकायला लागलो. बऱ्यापैकी जवळ गेलो, तर लोक चितेच्या दिशेनं मोबाईल सरसावून, हात उंचावून तिचं शूटिंग करत होते. आता चिता बऱ्यापैकी पेटली होती. ६ वाजून ५५ मिनिटं झाली होती. मी आणि प्रसाद गर्दीतून बाहेर पडलो आणि स्टेशनच्या दिशेनं चालायला लागलो. आमच्याप्रमाणे इतरही अनेक लोक स्टेशनच्या दिशेनं चालले होते. सेनाभवनासमोर आलो, तेव्हा तिथं परतणारी काही तरुण मुलं बाळासाहेबांच्या मोठमोठ्या होर्डिंग्जचं मोबाईलवर शूटिंग करताना दिसली. एक जण बाळासाहेबांच्या होर्डिंगवरच्या फोटोशेजारी उभा राहून मित्राकडून स्वतःचा फोटो काढून घेत होता. काही लोक शिवसेना-भवनच्या बंद दारातून आत डोकावून पाहत होते. आम्ही पुढे चालायला लागलो. उजवीकडच्या गणेश पेठ गल्लीत पोहे वाटणं चालू होतं. त्यासाठी रांग होती. प्रसाद म्हणाला, ''चल, आपण पोहे खाऊ.'' म्हणून आम्ही रांगेत उभं राहण्यासाठी चालायला लागलो. रांगेत कुणी मध्ये घुसू नये म्हणून काही तरुणांनी कडं तयार केलं होतं. रांग कुठे संपत होती, ते पाहत आम्ही मागेमागे जात राहिलो, तर ती गल्ली संपून पुढच्या गल्लीत रांग वाढतच चालली होती. मग आम्ही तो नाद सोडून नक्षत्र मॉलच्या दिशेनं चालायला लागलो. मघाचा महानगरपालिकेचा पाण्याचा टॅंकर आणि त्याची पायाच्या अंगठ्याएवढी पाण्याची धार अजूनही चालू होती. खूप माणसं स्टेशनच्या दिशेनं परतत होती.
आम्ही ट्रेन पकडून कुर्ल्याला आलो. 'आता शिवसेनेला काही भवितव्य नाही, मनोहर जोशींसारखे लोक फार काळ सेनेत राहणार नाहीत, उद्धव ठाकरेंना फारसं कुणी जुमानणार नाही', अशी चर्चा आम्ही करत होतो. आता राज ठाकरे आणि त्यांची मनसेच मोठी होणार यावर आम्हा दोघांचं एकमत झालं. प्रसाद म्हणाला, 'नेरुळला आता दुकानं उघडली असतील.' म्हणून आम्ही नेरुळला उतरलो, पण बहुतेक सर्व बंदच होतं. स्टेशनच्या पलीकडच्या बाजूला गेलो, तर तिकडेही बंद. जरा आतल्या बाजूला जेवणाचं एक हॉटेल चालू झालं होतं, पण तिथं बरीच गर्दी होती. प्रसाद म्हणाला, ''तू इथंच जेवून जा.'' पण बेलापूरला एखादं हॉटेल चालू असेल, असं वाटल्याने मी तिथं न जेवता प्रसादचा निरोप घेऊन बेलापूरला आलो. तर बेलापूरमध्येही सगळं बंदच होतं. चहा-सिगरेट मिळण्याचीही पंचाईत होती. आसरा हॉटेलच्या शेजारी एक भय्या पोरगा घाबरत-घाबरत चहा विकत होता. शेजारी सिगरेट पीत उभ्या असलेल्या एका आजोबाकडून सिगरेट घेतली. दोन चहा आणि एक सिगरेट पिऊन घराच्या दिशेनं चालायला लागलो. एक मेडिकल स्टोअर उघडं होतं. तिथून बिस्किटाचे २-३ पुडे विकत घेतले. मच्छी मार्केटमध्ये एक कळकटलेलं हॉटेल बाहेरचे पडदे लावून चालू झालं होतं. एव्हाना नऊ वाजले होते. तिथून ३० रुपयांना अंडा राईस घेतला. घरी येऊन तो खाल्ला आणि झोपलो.
बाळासाहेबांनी दुसऱ्या दिवशीही दुपारपर्यंत उपवास घडवला.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment