अजित केळकर : ‘कॉमन मॅन’चा रंगावतार (पूर्वार्ध)
कला-संस्कृती - ‘किमयागार’ कलाकार
प्रा. कमलाकर सोनटक्के
  • अजित केळकर
  • Sat , 20 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti किमयागार कलाकार कमलाकर सोनटक्के Kamlakar Sontakke अजित केळकर Ajit Kelkar

मराठी-हिंदीतील लक्षणीय कामगिरी केलेल्या, करत असलेल्या कलाकारांचा धांडोळा घेणारं हे साप्ताहिक सदर... दर शनिवारी व रविवारी प्रकाशित होईल.

.............................................................................................................................................

आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ इंग्रजी भाषेत प्रस्तुत करून नावारूपाला आलेले, तसेच या एकपात्री प्रयोगाचे भारतातील विविध शहरांत, अमेरिका आणि कॅनडात २५-३० प्रयोगांसह १५० प्रयोग करणारे हरहुन्नरी कलावंत, दिग्दर्शक, नाट्यनिर्माते अजित केळकर आजही नवीन काहीतरी करण्यासाठी सदैव तत्पर असतात. ‘गडकरी ते मतकरी’ हा विख्यात मराठी नाटकातील स्वगतांचा कार्यक्रम करून त्यांना जेवढं समाधान मिळालं, तेवढंच समाधान त्यांना ‘एज्युकेटिंग रीटा’ या इंग्रजी नाटकानंही मिळालं. हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या या अभिनेत्याची क्षमता विलक्षण आहे. चाकोरीबाहेरील प्रयोग करून वेळप्रसंगी आर्थिक नफ्या-तोट्याचा विचार न करता हा मनस्वी कलावंत स्वसमाधानासाठी, आशयघन, रसरशीत मनोरंजनाच्या माध्यमातून काहीतरी नवीन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.

वयाच्या सातव्या वर्षी आकाशवाणी बालकलाकार

अजित केळकर हा माझ्याकडे प्रत्यक्ष औपचारिक प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या फळीतला कलावंत. ज्या काळात विद्यापीठाच्या पातळीवरसुद्धा नाट्य प्रशिक्षणाची सोय नव्हती, एवढंच काय नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनाही जिथं नाट्यप्रशिक्षणाची कधी गरज वाटली नाही, त्या काळात औपचारिक नाट्य प्रशिक्षणासाठी अजित प्रवृत्त झाला. १९६७-६८ साली संगीत-नृत्याच्या क्षेत्यात प्रशिक्षणाचं स्थान आणि महत्त्व मान्यताप्राप्त होतं. पण नाटकाबद्दल मुळीच नव्हतं. हे नाट्य-प्रशिक्षण घ्यावं अशी परिपक्वता त्याच्या मनात रुजवण्यास नेमकी काय पार्श्वभूमी होती. नाट्य-प्रशिक्षणाकडे आकृष्ट करण्यासाठी नेमकं काय कारण होतं?

अजितला अगदी लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. घरात संगीताची आवड होती, पण नाटकाविषयी कुणालाही फारशी माहिती नव्हती. पण त्या काळात आकाशवाणीवर ‘ऑडिशन्स’ व्हायच्या. अजितनं अगदी वयाच्या सातव्या वर्षी रेडिओची ऑडिशन दिली. तो तिथं पास झाला आणि त्याला बालकलाकार म्हणून कामं मिळायला लागली. त्या काळी आकाशवाणी हे मनोरंजनाचं प्रभावी माध्यम असायचं. त्याच्या सुदैवानं नीलम प्रभू त्यावेळी मुलाचं कुठलंही काम असलं की, त्याच्या घरून घेऊन जायच्या आणि परत आणून सोडायच्या. त्याचा योग चांगला होता. त्यामुळे त्याला त्यावेळी खूप मोठ्या माणसांचा सहवास लाभला, त्यांचं प्रेम मिळालं. यात मायाताई चिटणीस, या मामा वरेरकरांच्या कन्या आकाशवाणीच्या निर्मात्या होत्या, तसेच पुण्याला भा. रा. भागवत होते.

पुढे बालनाट्यच नाही तर प्रौढांच्या नाटकांमधून गरज असेल तेव्हा त्याला बोलावलं जायचं. त्यावेळी प्रभाकरपंत जोशी, नीलमताई, बाळासाहेब कुडतरकर वगैरे मंडळी होती. अजित लहान असल्यानं त्याच्याशी सारेच खूप प्रेमानं वागायचे. त्याचे लाड करायचे. मग पुढे चालून लीलाताई भागवत यांच्यासोबत ‘वनिता मंडळ’सारख्या कार्यक्रमातही त्याला आवर्जून बोलावलं जायचं. त्या काळात त्यानं अनेक श्रुतिकांमधूनही भाग घेतला. नाटकाची तर त्याला आवड होतीच. त्याच्या काकू शारदा संगीत विद्यालय चालवायच्या. त्यांना मूलबाळ नसल्यानं अजित अर्थातच त्यांचा खूप लाडका होता. त्यांच्या विद्यालयाच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं होणाऱ्या नाटकात अजितला त्या अगत्यानं घ्यायचा.

१२व्या वर्षी अभिनयाचा पुरस्कार

१९६२च्या सुमारास अजितनं पार्श्वनाथ अळतेकर आणि कोल्हटकर या नाट्यस्पर्धांमधील आपल्या काकूच्या नाटकात भाग घेतला आणि तेव्हा वयाच्या १२व्या वर्षी अजितला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. या दोन्हीही पूर्ण नाटकांच्या स्पर्धांना त्या काळी राज्य नाट्यस्पर्धांच्या बरोबरीचं वलय होतं. या पुरस्कारामुळे त्याच्या अभिनयगुणाचं कौतुक झालं. घरच्यांचं अर्थातच त्याला प्रोत्साहन होतं. याबरोबरच शाळेत वक्तृत्व स्पर्धांमध्ये तो हिरीरीनं भाग घ्यायचा. केवळ मराठीच नाही तर हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेतदेखील वारंवार पुरस्कार मिळवणारा विद्यार्थी म्हणून शाळेनंही त्याला सतत प्रोत्साहन दिलं.

वडील उत्तम शिक्षक असल्यानं उत्तम वाचनाची गोडी अर्थात त्यांच्यामुळे होती. इंग्रजी, संस्कृत आणि मराठी भाषेचे ते उत्तम शिक्षक असले तरी त्यांच्याकडून अजितनं प्रत्यक्ष कुठले पाठ घेतले नाहीत. परंतु अप्रत्यक्ष संस्कार मात्र त्याच्यावर सतत होत होते. आईही उत्तम शिक्षिका असल्यानं तिचेही संस्कार होत होते. घरी येणारे-जाणारे उच्च मध्यमवर्गातील सुबुद्ध लोक यांच्यामुळे सुदृढ वाढ होण्यास मदत झाली. सख्खे भाऊ तर शिक्षित होतेच, परंतु शिवाजी पार्कचं त्यांचं घर हे वेगळ्या सुबुद्ध लोकवस्तीचं केंद्रस्थान. बालमोहन शाळेचे संस्कार, व्याख्यानं, चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रमांची सतत रेलचेल होती. स्पर्धात्मक परीक्षा मग त्या कुठल्याही असोत त्यात भाग घेण्याची त्याला सतत अहमहमिका असायची. पालक-शिक्षकही जाणीवपूर्वक त्याची तयारी करवून घ्यायचे.

‘अमृत नाट्य भारती’मधील नाट्य प्रशिक्षण

अजितची आकाशवाणी, शाळा आणि बाहेरची नाटकं चालू होती, त्याच सुमारास त्याच्या नजरेस मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘अमृत नाट्य भारती’ या विभागातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या दोन वर्षांच्या सायंकालीन नाट्य अभ्यासक्रमाची जाहिरात आली. एसएससी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या अजितनं आपल्या आर्किटेक्ट आणि इंजिनीअर भावांप्रमाणेच डॉक्टर होणं अपेक्षित होतं. त्याला शालेय शिष्यवृत्तीही मिळाली होती. वडीलांनी अजितला त्यावेळी सल्ला दिला की, भाषा विषयांमध्ये त्याला चांगली गती आहे, अभिव्यक्ती आहे, तेव्हा त्यानं विज्ञान शाखेपेक्षा कला शाखेला जाण्याचा विचार करावा.

असे समंजस पालक साऱ्यांच्याच वाट्याला येत नाहीत. तरीही अजितनं विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. कदाचित विज्ञान शाखेला भवितव्य चांगलं असेल हा विचार त्याच्या मनात त्या वेळी असावा. मात्र त्यावेळी रीतसर नाट्य प्रशिक्षणाच्या ओढीमुळे मुंबई मराठी साहित्य संघात जाऊन नाव नोंदवणारा अजित हा पहिला विद्यार्थी ठरला.

अजितच्या शिक्षणाची दिशा नाट्य प्रशिक्षणानं बदलली आणि त्याच्या अंगभूत ओढ्याला औपचारिक नाट्य प्रशिक्षणाची भक्कम जोड मिळाली. अमृत नाट्यभारती येथील प्रशिक्षणाबद्दल अजित खूपच भारावून बोलतो. नाटक बसवण्याची, समजण्याची ती पद्धतच खूप नवीन होती. नाटक म्हणजे संवाद पाठ करून ते समजून बोलणं असा पूर्वी समज होता. वाचिक अभिनयावरच पूर्वी सारा भर असायचा, पण प्रशिक्षण प्रक्रिया आणि पद्धती सर्वांगीण होती. सेटस्, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना यांचा नाटकाच्या निर्मितीत किती मोठा वाटा असतो याची दृष्टी इथं मिळाली. प्रत्येक विषय हा मुळापासून शिकवला जायचा. प्रत्येक विभागाचं नाट्यघटनेशी असलेलं नातं आणि त्यांच्या सांघिक योगदानातून होणारा प्रभाव याची पक्की समज समृद्ध झाली. ती केवळ सैद्धांतिकच नाही तर प्रात्यक्षिकांच्या स्वरूपातदेखील. प्रत्येक विषय प्रत्येक विद्यार्थ्यानं हाताळायलाच हवा यावर भर असायचा. साऱ्या गोष्टी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं शिकवल्या जायच्या. 

शिक्षण आणि परिस्थितीमुळे नाटकाचा अग्रक्रम हुकला

पुढे शिक्षण घेण्यासाठी अजितला पुण्याला जावं लागलं. त्यामुळे रंगभूमीचा प्रस्थापित संपर्क कमी झाला आणि त्याचं खूप नुकसान झालं, अशी अजितची भावना आहे. त्यामुळे बरोबरीचे लोक पुढे गेले. त्यांच्यापैकी काहींच्या नाटक, दूरदर्शन आदींमध्ये काम करण्याच्या दिशा सुनिश्चित झाल्या. मुंबईत राहिला असता तर निश्चित ठोस असं काहीतरी त्याच काळात त्यानं केलं असतं, याची हुरहूर अजितला वाटते.

पुण्याहून परत आल्यावर पुन्हा कलाशाखेत शिक्षणाला अजितनं सुरुवात केली. वडील क्लासेसमध्ये शिकवायचे. अजित त्यांनाही मदत करायला लागला. स्वतंत्रपणे शिकवायला लागला. भाषा विषयात त्याला अंगभूत गोडी होती आणि सरावही होता. नंतर महाविद्यालयात शिकवायला लागला. त्याचा नाटकाचा अग्रक्रम मागे पडला.

ज्या मध्यमवर्गीय विचारसरणीतून तो आला होता, त्यामुळे केवळ नाटक करून आपलं भागणार नाही असं त्याला वाटत होतं. त्यातील अपेक्षित मिळकत त्यावेळी अगदीच नगण्य होती आणि नाटकाशिवाय आजच्यासारखी दुसरी माध्यमंही त्यावेळी उपलब्ध नव्हती. शिवाय आपण नायक मटेरिअल नसल्यानं आणि विनोदी भूमिका करणाऱ्यांना त्या काळी १५ ते २० रुपये मानधन मिळत असल्यानं ते साहस त्यानं केलं नाही.

माधव वाटवे यांच्या आग्रहावरून एका व्यावसायिक नाटकात त्यानं भूमिका केली, त्याचे त्याला प्रयोगामागे १५ रुपये मिळायचे. त्यामुळे अजितच्या ध्यानात आलं की, हे काही आपल्या पोटापाण्याचं क्षेत्र होऊ शकणार नाही. यावेळी झेपेल ते आणि तेवढंच, स्वत:च्या आवडीचंच नाटक करण्याचं त्यानं ठरवलं.

व्यावसायिक नाटकातील अस्थिरतेला नकार

अजितनं याच वेळी निर्धार केला की, ज्या वेळी त्याला अन्य उत्पन्नातून स्थैर्य मिळेल, तेव्हाच तो या क्षेत्रात उडी घेईन. शिवाय व्यावसायिक रंगभूमीवरील एकंदरीतच जीवन, व्यवसायागत हेवेदावे, सवयी यांची माहिती मिळाल्यावर त्याचा निर्धार पक्का झाला. आपण स्वभावाला मुरड घालून या क्षेत्रात टिकू शकणार नाही. पूर्ण वेळ व्यावसायिक नाटकाकासाठी आपली घडण योग्य नाही याची जाणीव पक्की झाली. मग यशापयशासाठी इतरांना दुषणं देण्यापेक्षा हा मार्ग न निवडणंच बेहतर असा निर्धार त्यानं केला. शिवाय तिथं काम करणाऱ्या लोकांच्या आवडीनिवडी, त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या बऱ्या-वाईट सवयी यांचा आणि त्याच्या संस्कारांचा ताळमेळच बसणार नाही याची पोक्त समज अजितला होती. शिवाय त्याचा स्वभाव थोडा फटकळ असल्यानं आणि स्पष्टवक्तेपणाच्या सवयीमुळे त्यापासून दूर राहणंच त्याला उचित वाटलं. त्यामुळे त्याला आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवता आलं.

चाकोरीबाहेरच्या नाटकांविषयी आकर्षण

त्या काळच्या एकंदरीतच व्यावसायिक नाटकांच्या दर्जाविषयी, विजय तेंडुलकरांच्या त्या काळी वादग्रस्त ठरलेल्या नाटकांविषयी विशेषत: ‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’, ‘घाशीराम कोतवाल’विषयी अजितला खूप आस्था वाटली. त्याला ही दोन्हीही नाटकं विशेष आवडली. या नाटकांमध्ये व्यक्त झालेल्या धाडसी मतामुळे, प्रागतिक विचारांमुळे आणि त्या पाठच्या प्रत्येक पात्राच्या जीवनविषयक निष्ठेमुळे. ‘गिधाडे’मधील एकंदरीतच पात्ररचना, त्यातील नेपथ्य आणि डॉ. लागूंच्या विलक्षण प्रभावी अभिनयामुळे ही चाकोरीबाहेरची नाटकं त्याला भावली.

या काळात अमोल पालेकर, अशोक साठे यांच्या अशाच साहसी विषयांवरील ‘वासनाकांड’, ‘आवर्तन’, ‘छिन्न’ या नाटकांमधून त्याला मध्यवर्ती स्वरूपाच्या भूमिका करता आल्या नाहीत याची त्याला आजही खंत वाटते. पुढे मी ‘जसम ओढन’ हिंदीत बसवलं. त्यातली रंगला या मध्यवर्ती भूमिकेबद्दल अजित भरभरून बोलतो. हिंदी भाषेत भवाई या गुजराथी लोक नाट्यशैलीतील नाटकानं, त्यातील संगीत आणि नृत्यानं एक वेगळा सशक्त अनुभव मिळाल्याचं तो नमूद करतो. मात्र बऱ्याच वेळा त्याच्या संधी हुकत गेल्या, कारणं काहीही असोत. एका योगायोगाचं त्याला अप्रूप वाटतं की, त्याला न साकारता आलेल्या बहुतेक भूमिक दिलीप कोल्हटकर आणि मंगेश कुलकर्णी यांच्याकडे जायच्या. ते दोघेही अतिशय सक्षम अभिनेते असल्यानं त्या भूमिका उत्तम प्रकारे साकारायचे!

नाट्यसमीक्षा, दूरदर्शन आणि कला कार्यशाळा

पुण्याहून परतल्यानंतर ‘बहुरूपी’ या नाट्यसंस्थेत अजित दाखल झाला. या संस्थेत दिलीप कुलकर्णी, अच्युत देशिंगकर, कमलाकर नाडकर्णी अशी मंडळी होती. या संस्थेतर्फे मग वर्षाला एखादं प्रायोगिक स्वरूपाचं नाटक असं सुरू झालं. १९७५-८८ हा एवढा मोठा काळ, उमेदीचा काळ अजित व्यावसायिक नाटकापासून दूरच होता. या काळात नाटकाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबध ठेवण्याच्या ओढीमुळे तो मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रांमधून मराठी नाटकांची समीक्षणं लिहीत होता. डॉ. फोंडके यांच्या सोबत दूरदर्शनवर अजित ‘अमृतमंथन’मध्ये सहभागी असायचा. सुहासिनी मुळगावकर निर्मात्या होत्या. एकदा त्यांच्या एका भागाचं आगाऊ चित्रीकरण आणि संकलित कार्यक्रम तयार नव्हता. त्यांनी धाडस करून तो भाग लाईव्ह टेलिकास्ट केला. सुहासिनी मुळगावकर अगदी भारावून गेल्या.

एक मात्र खरं त्याच्यावर अवलंबून नसल्यानं या साऱ्या गोष्टी छंद म्हणून, आवड म्हणून तो करत होता. यानंतर डॉ. अशोक रानडे यांच्याकडे एनसीपीएला तीन महिन्यांची आवाजशास्त्रावरची कार्यशाळा अजितनं केली. या कार्यशाळेचा त्याला खूप लाभ झाला. ‘व्हाईस कल्चर’चं मर्म आणि त्यावरची उपाययोजना ही प्रत्येकाच्या आवाजाच्या धाटणीनुसार बदलण्याचं आपलं कसब आपणच निर्माण करायचं असतं. तसंच काम कुठलंही असो, ते कधीच लहान-मोठं नसतं, तुम्ही त्याला मोठं करू शकता याची जाणीव करून दिली. आळस झटकून कामाला भिडण्याची वृत्ती त्यानं अंगी बाणवली. विशेष म्हणजे रानड्यांनी निवडलेल्या २० लोकांनाच प्रशिक्षण दिलं. यात शबाना आजमी, भक्ती बर्वे, विजय मर्चंट, शिवकुमार सुब्रमण्यम आणि इंग्रजी, हिंदी थिएटरमधल्या मान्यवर नट-दिग्दर्शकांचा समावेश होता. अशोक रानड्यांची शिकवण्याची हातोटीही खूप मजेशीर असायची. ते दिसायचे आणि असायचेही खूप गंभीर, पण तेवढेच ते मिष्किल आणि खेळकरही वागायचे. त्यांच्याकडे शिकताना एवढा आत्मविेशास दुणावला की, त्या बळावर आपणही तरुण रंगकर्मींसाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा घ्याव्यात असं अजितला वाटलं, पण स्वभावातला आळस आणि भिडस्तपणा यामुळे तो पुढाकार घेऊ शकला नाही. कुणाकडे जाऊन आपण हे करूया असंही कधी त्याच्याकडून झालं नाही.

व्यावसायिक नाटकांमधील धडपड

अजितनं सई परांजपे यांच्या ‘सख्खे शेजारी’, ‘पुन्हा शेजारी’ या नाटकांची निर्मिती केली. हे घडण्यामागची प्रक्रियाही फार गंभीर स्वरूपाची नव्हती. कुणाकडे जाऊन नाटकात काम मागण्याची सवय नसल्यानं आणि नाटकात काम करण्याची तीव्र इच्छा असल्यानं एक दिवस त्यानं ठरवलं की, चला आपणच आपल्या पद्धतीनं नाटकाची निर्मिती करूया. या साऱ्या खटाटोपात अरुण होर्णेकर मात्र सतत त्याच्या सोबत असायचा. दोघांनी मिळून ६० प्रयोग केले, परंतु तोपर्यंत नाटक निर्माण करणं, ते चालवणं याची गणितं, त्यातल्या अडचणी, तडजोडी, त्याच्या लक्षात आल्या. आणि हा आपला प्रांत नाही म्हणून तो ‘व्यावसायिक नाटकांपासून’ चार हात पुन्हा दूर झाला. नाही म्हणायला त्यानं कमी व्याप असलेली, कमी बजेटमधली ‘पति गेले ग काठीयावाडी’सारख्या नाटकांची निर्मिती केली. या नाटकाचे ४५-५० प्रयोग केले. पण तेवढेच.

एक मात्र खरं व्यावसायिक नाटक चालवण्यासाठी लागणारी प्रसिद्धी, अर्थबळ, आडाखे आपल्याकडे नाहीत, ते आपल्या आवाक्यापलीकडचं आहे याची पुन्हा एकवार त्याला जाणीव झाली. हां, पण त्याला स्वत:ला आणि त्याच्या सहकलाकारांना त्यातून भरपूर समाधान मिळालं. अजितनं रत्नाकर मतकरी यांच्या ‘अजून यौवनात मी’ या नाटकातली वायकूळ नावाच्या दारूच्या नुसत्या वासानं दारू चढणाऱ्या अवलियाची भूमिका केली, प्रेक्षक समीक्षकांनी त्या भूमिकेचं भरपूर कौतुक केलं. अजितच्या पहिल्या एंट्रीनंतर प्रत्येक एंट्रीला टाळ्या पडायच्या. कुलदिप पवार, आशा साठे आणि सुप्रिया विनोद अशी जबरदस्त स्टारकास्ट त्या नाटकात होती. दुर्दैवानं निर्माता, मॅनेजर यांचा बेबनाव झाला आणि १२-१५ प्रयोगात ते नाटक बंद पडलं. अजितची एक मोठी संधी हिरावली गेली.

‘जुलूस’ या मुक्तनाट्याचा वेगळा अनुभव

‘जुलूस’ या मुक्त नाटकानंतर ३५०च्या वर प्रयोग संख्या असलेलं हे दुसरं नाटक ठरलं. ‘जुलूस’ हे तसं बादल सरकाराचं तीक्ष्ण राजकीय भाष्य असलेलं उघड-उघड आणीबाणीचा विरोध करणारं अतिशय प्रेक्षकप्रिय नाटक. कमानी रंगमंचाची त्याला गरज नसल्यानं मिळेल त्या ठिकाणी, हव्या त्यावेळी प्रयोग लागायचे. अमोल पालेकरांनी त्याला लय, ताल, गती, समूहांकन यांची जोड दिल्यानं रस्तानाट्यासारखं ते सरळ सरळ भिडायचं. स्विमिंग पूलाच्या बाजूला, व्यायामशाळेच्या मैदानात, गार्डन्समध्ये, गच्चीवर असे त्याचे ‘बहुरूपी’ संस्थेतर्फे कुठेही प्रयोग व्हायचे. ‘जुलूस’चा सगळ्यात मोठा प्रयोग झाला तो मुंबईच्या आयआयटीच्या मैदानात उघड्यावर ‘इंडिगो’ महोत्सवाचा भाग म्हणून. ५००० प्रेक्षकांच्या साक्षीनं हा प्रयोग झाला. कुठल्याही माईक किंवा स्पीकर्स शिवाय प्रयोग खूप रंगला. प्रेक्षक उत्तेजित झाले. विषयाच्या प्रखरतेमुळे आणि कलावंतांच्या ऊर्जेमुळे.

‘पुन्हा शेजारी’ची निर्मिती

याच्या उलट ‘सख्खे शेजारी’ हा चाळीतल्या जीवनाशी, एकत्र कुटुंब पद्धतीतल्या गमतीजमती, हेवेदावे, भांडणं-कटकटी आणि घट्ट मानवी संबंधाविषयी असल्यानं खूप रंगायचं. यात शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या उखाळ्यापाखाळ्या, एकमेकांवर कुरघोड्या करणं, या गमतीजमती होत्या. शेजारधर्माच्या जोडीलाच थोड्याशा जातीवाचक, वेगवेगळ्या संस्कारात वाढलेल्या लोकांच्या जीवन जगण्यातील तफावती, मतभेद हेही सईताईंनी मोठ्या नजाकतीनं या नाटकात आणलं होतं. दुबईचं त्यावेळी मध्यमवर्गात खूप वेड होतं. त्यावरही एक एपिसोड होता. वेषांतर, पळापळी, एकमेकांना हूल देणं, फसवाफसवी, उणीदुणी असा लोकप्रिय मसाला, शिवार उत्तम टीमवर्क, अनुरूप पात्रयोजना यामुळे ही सुखात्मिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती. पुढे चालून चाळीतलं जीवनच बघायला अनुभवायला मिळायचं नाही म्हणून हे नाटक २००२ साली बंद केलं गेलं. आजच्या काळात मात्र त्यावर बवाल होऊ शकला असता.

या नाटकाच्या ठाण्याच्या प्रयोगाच्या वेळी अजितच्या भावाला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात हलवलं हेतं. रात्री प्रयोग संपवून अजित घरी परतला तर वरूनच त्याला सांगितलं की, सारं काही आटोपलं आहे. दुसऱ्या दिवशी पुण्याला प्रयोग होता. बोहलेकरांनी प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रयोग रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. पण अजितनं समजूतदारपणे निर्णय घेतला, प्रयोग रद्द केल्यानं परिस्थितीत काही बदल होणार नव्हताच, तेव्हा १०.३० पर्यंत सारे विधी उरकून गाडी पकडावी असा निर्णय घेतला आणि ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायानं पुण्याचा प्रयोग केला. कारण कॉन्ट्रॅक्ट शो होता, तिकीटं विकलेली होती. प्रेक्षकांचा विरस होणं अजितच्या तत्त्वात बसणारं नव्हतं. मात्र त्याचा त्यानं कुठे फारसा गवगवाही केला नाही.

(या लेखाचा उत्तरार्ध उद्या प्रकाशित होईल.)

.............................................................................................................................................

लेखक प्रा. कमलाकर सोनटक्के ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.

sontakkem@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Bhanupadma L

Sun , 21 January 2018

हा काय केळकरांसाठी केलेला जाहिरात + पब्लिसिटी एक्सरसाइज होता काय ? प्राध्यापकसाहेबांनी PR agency वगैरे सुरू केली की काय मराठी अॅक्टर्ससाठी ?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......