अजूनकाही
‘सिनेमा हा समाजाचा आरसा असतो,’ हे विधान इतक्या वेळा वापरलं गेलं आहे की, ते घासून गुळगुळीत झालं आहे. पण या विधानाची यथार्थता चिरंतन आहे. गुन्हेगारांच्या आयुष्यावर सिनेमे बनवून बॉलिवुड किंवा इतर प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीज त्यांचं ग्लोरिफिकेशन करत आहेत, असं वाटणारा एक वर्ग आहे. पण या गुन्हेगारांच्या आयुष्याबद्दल आकर्षण वाटून ते मोठ्या पडद्यावर बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांचाही एक मोठा वर्ग आपल्याच देशात आहे. आपल्या अजस्त्र देशात एखादं विधान जेव्हा खरं असतं, तेव्हा त्याचा व्यत्यासही तितकाच खरा असतो, असं जे विधान केलं जातं ते इथं लागू पडतं.
त्यामुळे आपल्याकडचे सगळेच नाही तरी काही गँगस्टरपट प्रेक्षकांना आवडले. प्रेक्षकांना आवडलेले काही गॅंगस्टरपट म्हणजे ‘दिवार’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘सत्या’, ‘कंपनी’ आणि अजूनही काही. खरं सांगायचं तर खलनायकी छटा असणारे अँटिहिरो आवडणं ही काही फक्त भारतीय प्रेक्षकांची मक्तेदारी नाही. जगभरचे प्रेक्षक गॅंगस्टरपट चवीनं बघतात. अगदी ‘गॉडफादर’पासून ‘अमेरिकन गँगस्टर’पर्यंतची उदाहरणं आहेत. सध्याचं उदाहरण बघायचं तर कोलंबियन ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबारवरच्या ‘नार्कोस’ या सीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांनी गिल्टी वाटून घेण्याचं कारण नाहीये. भारतीय प्रेक्षकांच्या बेहद पसंतीला पडलेला असाच एक चित्रपट म्हणजे अनुराग कश्यपचा ‘गँग्ज ऑफ वासेपूर’.
धनबाद येथील कोळशांच्या खाणींच्या कब्जावरून आणि एकूणच वर्चस्व कुणाचं असावं यावरून दोन घराण्यांमधल्या तीन पिढ्यांपर्यंत झिरपलेल्या रक्तरंजित संघर्षाची कहाणी म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’. या चित्रपटाची कल्पना ज्याच्या डोक्यातून पहिल्यांदा आली तो चित्रपटाचा लेखक झिशान कादरी स्वतः धनबादचा होता. त्यानं हा वर्चस्वाचा रक्तरंजित खेळ लहानपणापासून जवळून पाहिला होता. त्यामुळे त्यानं लिहिलेल्या कथानकातली पात्रं ही वास्तविक पाहिलेल्या माणसांमधून आली होती. अर्थातच पटकथेतली पात्रं डेव्हलप करताना अनुरागनं आणि झिशाननं बरीच सिनेमॅटिक लिबर्टी घेतली होती. फैसल खानचं पात्र हे फहीम खान या खऱ्या आयुष्यातल्या गॅंगस्टरवरून घेतलं आहे, तर रामधीर सिंगचं पात्र सुरज देव सिंग या राजकारणी आणि माफियावरून घेतलं आहे. फहीम खान सध्या जेलमध्ये आहे, तर सुरज देव सिंगची हत्या जेवणात विष घालून करण्यात आली. चित्रपटात या दोघांचा अंत वेगळ्या प्रकारे दाखवला आहे. चित्रपटातली इतर अतरंगी पात्रं वासेपूरमधल्याच इतर अतरंगी खऱ्या व्यक्तिमत्त्वांवरून घेतली होती.
पण अनुरागच्या आणि झिशानच्या सर्वच प्रेरणा धनबादमधल्या गँगस्टरमधून घेतलेल्या नाहीत. अनुरागचा जन्म उत्तर प्रदेशमधला. तिथल्या राजकारणाचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा सकल देशासमोरचाच प्रश्न असला तरी हिंदी भाषिक पट्ट्यात विशेषतः युपीमध्ये हा प्रश्न भयावह आहे. महाराष्ट्रातही अनेक गुन्हेगार राजकारणात आले असले तरी काही तुरळक अपवाद वगळता आपल्याकडचं राजकारण रक्तरंजित कधीच नव्हतं, नाही. माझे काही उत्तरेकडचे मित्र मला बोलतात, “तुम्ही मराठी लोक तुमच्या राजकारण्यांना नेहमी शिव्या का घालत असता? आमच्याकडचे राजकारणी बघाल तर तुमचे राजकारणी तुम्हाला संत वाटायला लागतील.” त्यांचं म्हणणं किती बरोबर आहे हे समजायला आयुष्यातली काही वर्षं जावी लागली.
गुन्हेगारांना राजाश्रय आणि लोकाश्रय देण्यात अख्खं युपीच बदनाम असलं तरी पूर्वांचल हा भाग जास्त बदनाम आहे. दोन टोळ्या आहेत. वासेपूरमध्ये सरदार खान/फैसल खान आणि रामाधीर सिंगच्या दोन टोळ्या असतात. पण इथं हिंदू आणि मुसलमानाच्या टोळ्या आहेत. पहिली टोळी मुख्तार अन्सारीची, तर दुसरी टोळी ब्रिजेश सिंगची. पण असं असलं तरी या वर्चस्वाच्या लढाईला धार्मिक परिमाणं नाहीत. ही विशुद्ध वर्चस्वाची लढाई आहे. 'वर्चस्व' ही राज्यशास्त्रातली महत्त्वाची संकल्पना आहे. अपरिमित ताकद जी कुणासोबतही वाटली जात नाही, ती म्हणजे 'वर्चस्व'. असं म्हटलं जातं की, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’च्या दोन सर्वाधिक महत्त्वाच्या पात्रांवर या दोघांचा ठसा आहे.
यातला ब्रजेश सिंह हा भूतकाळात एक सर्वसाधारण मुलगा होता. शाळा-कॉलेजमध्ये हुशार मुलगा म्हणून सगळ्यांना माहीत होता, पण स्थानिक राजकारण आणि जमिनीच्या वादातून दिवसाढवळ्या ब्रिजेशच्या वडिलांची हत्या झाली आणि ब्रिजेशचं माथं फिरलं. अशा राजकीय हत्या युपीला नव्या नसल्या तरी एका हुशार मुलाला अपराधाच्या काटेरी आणि न संपणाऱ्या मार्गावर न्यायला, ही हत्या पुरेशी होती. ज्यांनी ही हत्या घडवली असा आरोप होता ते हरिहर सिंह आणि पांचू सिंहही त्या भागातले कुख्यात आणि ‘वर’पर्यंत हात पोचलेले डॉन होते. वडिलांची चिता जळत असतानाच ब्रिजेशनं त्यांच्या हत्येचा क्रूर सूड घेण्याची शपथ खाल्ली होती. सुडाची आग ब्रिजेशला भेडसावू लागली आणि एकेकाळच्या या हुशार पोरानं शिक्षण सोडलं. पोलीस आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना हातही लावत नाहीत, हे बघून त्यानं स्वतःच कायदा हातात घेण्याचं ठरवलं.
ब्रिजेशसिंहनं हा बदला खूपच फिल्मी पद्धतीनं घेतला. तो हरिहर सिंहच्या घरी गेला. नम्रपणे त्याच्या पाया पडला. त्याच्या अंगावर शाल चढवली. आणि तुम्ही माझ्या वडिलांची हत्या का केली, असा सवाल करून त्याच्या शरीराची चाळणी केली. नंतर आळीपाळीनं त्यानं वडिलांची हत्या करण्याच्या कटात सामील असणाऱ्या सगळ्या लोकांना अतिशय क्रूरपणे मारलं. एका क्रूरकर्मा गॅंगस्टरचा जन्म झाला होता. युपीमधल्या बहुतेक राजकारण्यांच्या आणि गुंडांचा अड्डा म्हणजे रेल्वेचे ठेके. ब्रिजेश त्यातही घुसला. त्यानं जवळपास साठ ते सत्तर हत्या घडवून आणल्या आहेत. पण अनेक वर्षं पोलिसांकडे त्याला शोधण्यासाठी त्याचा फोटोही नव्हता. आहे की नाही कमाल!
मुख्तार अन्सारी. त्याच नाव ऐकलं तरी भले भले गुंड आणि राजकारणी कानाच्या पाळीला हात लावतात. मुख्तार अन्सारी म्हणजे धाडधिप्पाड माणूस. त्याच्या आलिशान गाड्यांचा ताफा निघतो, तेव्हा अख्ख मऊ शहर रस्ता रिकामं करतं त्या ताफ्यासाठी. त्या आलिशान ताफ्यातल्या प्रत्येक गाडीचा नंबर ७८६ नंबरनं संपतो. अन्सारीचे आजोबा एकेकाळी स्थानिक काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर वडील चार वेळा कम्युनिस्ट पार्टीकडून आमदार होते. मुख्तारला जेव्हा एखादा सिनेमा बघायचा असतो, तेव्हा तो पाहिजे ते थिएटर ‘खाली’ करून घेऊन निवांत सिनेमा एन्जॉय करतो. काम खुंखार करत असला तरी मुख्तार सार्वजनिक आयुष्यात तरी मृदुभाषी आहे. पत्रकार मुलाखतीसाठी घरी गेले की, मुख्तार खिशातल्या अत्याधुनिक गन्स काढून त्यांच्यासमोर गन्सशी खेळायला लागतो. मुख्तार स्वतःला गरिबांचा मसीहा मानतो.
ब्रिजेशप्रमाणेच मुख्तारही अपहरण, खंडणी, रेल्वेचे ठेके यात अग्रेसर होता. स्वतः मुख्तार चार वेळा आमदार राहिलाय. दोनदा बसपाकडून, तर दोनदा अपक्ष म्हणून. पूर्वांचलमध्ये मुख्तार अन्सारी दहशतीचं दुसरं नाव होता. भाजप आमदार कृष्णकांत राय यांची त्यांच्या सात समर्थकांसोबत दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली. राय यांचा दोष इतकाच की, त्यांनी २००२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्तारचा पराभव केला होता आणि त्यांना ब्रजेश सिंहचा पाठिंबा होता. या हल्ल्याचे साक्षीदार जे न्यायालयात महागात पडले असते, त्यांनाही त्यानं पद्धतशीरपणे संपवलं.
ब्रिजेश आणि अन्सारी एकेकाळचे जिवलग यार. मात्र एका जमिनीच्या तुकड्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि प्रचंड मोठ्या गॅंगवॉरनं पेट घेतला. यात दोन्हीबाजूचे अनेक मोहरे धारातीर्थी पडले. दस्तुरखुद्द मुख्तार एका हल्ल्यात बालंबाल बचावला. एका हल्ल्यात जखमी झालेला ब्रिजेश युपी सोडून पळाला आणि त्यानं भुवनेश्वरमध्ये तळ ठोकला. तिथून तो आपल्या गँगची सूत्रं हलवायला लागला. मुख्तार मात्र आपल्या बालेकिल्ल्यातच होता. नंतर २००९ ला त्यानं चक्क बनारसमधून मुरली मनोहर जोशी यांच्याविरुद्ध लढवली. या निवडणुकीची सगळी सूत्रं त्यानं जेलमधून हलवली हा कळस होता. २०१४ ला मोदींविरुद्ध उभं राहण्यासाठीही त्यानं दंड थोपटले होते, पण नंतर माघार घेतली. मुख्तारची जेलमधली जीवनशैली आलिशान होती.
पोलिसांनी अनेक हिकमती लढवून ब्रिजेश सिंहला ओरिसातून अटक करून युपीमध्ये वापस आणलं. सध्या मुख्तार आणि ब्रिजेश शेकडो निरपराध लोकांचे जीव घेऊन जेलमध्ये सुरक्षित आणि आरामात आहेत. पूर्वांचलमध्ये सध्या शांतता आहे. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे. युपीचं दुर्दैव कशात आहे हे माहितीये? हे दोन्ही महाभाग सध्या आमदार आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर ब्रिजेश विधान परिषदेवर आहे आणि बसपाच्या तिकिटावर मुख्तार विधानसभेवर निवडून आला आहे. दोघंही जेलमधून बाहेर यायला तयार नाहीत. आपण बाहेर आलो की, समोरचा आपल्याला उडवणार हे दोघांनाही पक्कं माहीत आहे. या दोघांच्या रक्तरंजित स्पर्धेवर ‘दि लल्लनटॉप’ या हिंदी वेब पोर्टलनं काही अभ्यासू आणि रोचक रिपोर्ताज केले आहेत. (या लेखामधले काही संदर्भ तिथून घेतले आहेत.)
अजून एका युपीमधल्या गॅंगस्टरचा इथं उल्लेख करायला हवा. श्रीपक्ष शुक्ला. त्यानं अवघ्या विशीत अख्ख्या उत्तर प्रदेशला धारेवर धरलं होतं. डीपी यादवसारखे जुने डॉनही त्याच्या नावानं थरथर कापायचे. असं म्हणतात की, शुक्लानं तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांची हत्या करण्यासाठी सहा करोडची सुपारी घेतली होती. जेव्हा त्याचा एन्काउंटर झाला, तेव्हा तो अवघ्या चोवीस वर्षांचा होता. शुक्लाही रेल्वे ठेक्यातून पसरलेल्या गुन्हेगारीचं अपत्य. याच्या आणि युपी पोलिसांच्या जुगलबंदीवर ‘सेहर’ हा अप्रतिम सिनेमा आला होता. श्रीपक्ष शुक्ला यांची कथा पडद्यावर आणताना दिग्दर्शक कबीर कौशिकनं बरीच सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे. शेवट तर एकदमच वेगळा घेतला आहे.
‘सेहर’ आणि ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मध्ये ठराविक अंतरानं सतत मृत्यूचा अक्राळविक्राळ चेहरा सतत दिसत राहतो. आत्महत्या, हत्या, निर्घृण मृत्यू असे मृत्यूचे वेगवेगळे चेहरे सतत दिसत राहतात. दिग्दर्शक कबीरला आणि अनुरागला मृत्यूवर सतत काहीतरी भाष्य करायचं आहे असं जाणवत राहतं. शेवटी मृत्यू हेच त्रिकालाबाधित सत्य आहे, हेच सतत चित्रपटात अधोरेखित होत राहतं. हे सतत होणारे मृत्यू हेच आजच्या उत्तर प्रदेशचं राजकीय आणि सामाजिक वास्तव आहे.
गड्या आपला महाराष्ट्र बरा, हेच खरं!
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Anil Bhosale
Mon , 22 January 2018
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती UP इतकी रक्तरंजीत आणि सूडाची नाही इतकंच. बाकी इथे ही गुंड प्रव्रुत्ती आहेतच
Ganu P
Sat , 20 January 2018
ह्या विकृत लोकांनी आता महाराष्ट्रात शिरकाव करायला सुरूवात केली आहे. राजसाहेब केव्हापासून मराठी माणसाला या विकृत लोकांपासून सावध रहायला सांगत आहेत. पण मराठी माणूस सावध व्हायचा सोडून आपापसातच दलित, सवर्ण, आदिवासी अशी भांडणे करत बसलाय....खरचं राजसाहेब महाराष्ट्राला तुमच्या सारखाचमुख्यमंत्री हवा