अजूनकाही
'व्होडका डायरीज' या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला 'बीबीसी शेरलॉक'ची आठवण यायला लागते. अनेक सीक्वेन्स तर त्याच्यासारखेच उभे केले आहेत. (आणि के. के. मेननचा ओव्हरकोटदेखील शेरलॉकसारखाच दिसतो.) आणि एक-दोनदा तर त्याचे संदर्भही चित्रपटात येतात. आणि हीच गोष्ट चित्रपटाला जास्त घातक ठरते. ज्या काही थोड्याफार अपेक्षा यानिमित्ताने निर्माण होतात, त्यांच्या ओझ्याखाली आणि अपेक्षित कथेमुळे चित्रपट आवश्यक तो परिणाम साधण्यात अयशस्वी ठरतो.
अश्विनी दीक्षित (के. के. मेनन) हा पोलिस अधिकारी खरं तर पत्नी शिखासोबत (मंदिरा बेदी) सुट्टीवर आलेला असतो. पण इथंही त्याला नाइलाजानं एका केसवर लक्ष केंद्रित करावं लागतं. वरवर साधीसोपी दिसणारी खुनाची केस नंतर त्यातील एका घटकाशीच साम्य दर्शवणाऱ्या इतर काही खुनांमुळे अधिक क्लिष्ट बनत जाते.
'व्होडका डायरीज' हा 'स्टोरी विदिन अ स्टोरी' म्हणजेच कथेमध्ये घडणारी आणखी एक कथा अशा प्रकारचा चित्रपट आहे. ज्याची मूळ कल्पना जरी चांगली असली तरीही हा प्रकार यापूर्वी इतर बऱ्याचशा चित्रपटांमध्ये हाताळला गेला आहे. आणि निव्वळ हाताळला गेला नाही तर समर्थपणे हाताळला गेला आहे. त्यामुळे अनेक उणीवा असलेला आणि बराच ताणला गेलेला हा 'सायकॉलॉजिकल थ्रिलर' प्रकारातील चित्रपट (किंवा तसं करण्याचा प्रयत्न) तितकासा प्रभावी वाटत नाही.
चित्रपट सुरुवातीला बराच प्रॉमिसिंग वाटतो. तो जे काही वातावरण निर्माण करतो, त्यावरून काहीतरी चांगलं पहायला मिळेल असं वाटू लागतं, पण अगदी पस्तीसेक मिनिटांवर येताच तो दर फ्रेमनंतर आणखी संथ आणि रटाळवाणा वाटायला सुरुवात होते. पावतास संपेपर्यंत एक नवीन खुलासा म्हणा किंवा समस्या म्हणा नायकासमोर (आणि पर्यायानं आपल्यासमोर) उभी राहते. पण तोपर्यंत चित्रपट इतका ताणला गेलेला वाटतो की, आपल्याला त्याच्याशीही काही इतिकर्तव्य उरत नाही.
याचीच पुनरावृत्ती पुढील दीडेक तासांत वारंवार होत जाते. समोरची परिस्थिती नायकासमोर आणखी क्लिष्ट, पण आपल्यासमोर अपेक्षित बनत जाते. आणि एखाद्या सायकॉलॉजिकल थ्रिलर किंवा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात आवश्यक असलेला सस्पेन्सच समोर दिसत नसल्यानं आणि अपवादानं आढळला तरी त्यात प्रेक्षकाला रसच उरत नसल्यानं समोर चाललेला 'वॅना बी शेरलॉक' आपण फक्त पाहायचा म्हणून पाहत राहतो.
सामान्य प्रेक्षकाला जरी यातील कॅमेरा वर्क (आणि अगदी कथाही) वगैरे कमाल वाटण्याची शक्यता असली तरीही बीबीसी शेरलॉकच्या चाहत्यांना किंवा प्रेक्षकांना मात्र हा मालिकेतील सीन्सचा रिप ऑफ आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. अश्विनीचा ड्रीम सीक्वेन्स आणि त्यानंतरचं ट्रान्जिशन सीन्सदेखील चांगल्या पद्धतीनं शूट झाले असले तरीही तेदेखील शेरलॉकमधील आणखी प्रभावीपणे समोर मांडलेल्या दृश्यांची आठवण करून दिल्यानं प्रभावी वाटत नाहीत. अर्थात इथं तुलना करण्याचा हेतू नसला तरी तशी संधी स्वतः चित्रपटानंच एका दृश्यात 'केके'च्या 'अश्विनी दीक्षित'ला शेरलॉक असं संबोधून उपलब्ध करून दिली असल्यानं त्याला इलाज नाही.
चित्रपटात बऱ्याच ठिकाणी नायकाचा पाठलाग करण्याचे लाँग शॉट्स वापरले आहेत. पण बहुतांशी वेळा ते गरजेचे वाटत नाहीत, आणि नेमके जेव्हा ते असायला हवेत असं वाटतं, तेव्हा ते एडिटिंगमध्ये कापले असावेत असं वाटतं. चित्रपटाचं पार्श्वसंगीत सुरुवातीला समोर घडणाऱ्या दृश्यांना पूरक वातावरण तयार करत असलं तरी नंतर ते जवळपास प्रत्येक दृश्यात लाउड वाटू लागतं. त्यामुळे बऱ्याचदा तर चित्रपट आणि समोरचं प्रमाणापेक्षा अधिक असणारं पार्श्वसंगीत असह्य ठरतं.
चित्रपटातील बरीचशी दृश्यं नको तितकी ताणली गेली आहेत. शिवाय त्यांत इतकी नाट्यमयता आहे की, बऱ्याचदा ही दृश्यं कमालीची नाटकी भासतात. त्यामुळे अनेकदा आवश्यक असलेला परिणाम साधला जात नाही. अगदी के. के. मेननदेखील दीक्षितच्या रूपानं तितकासा प्रभाव पाडू शकत नाही. आणि मंदिरा बेदीच्या वाट्याला तशीही मोजकीच दृश्यं आल्यानं तीही फारशी छाप पाडत नाही.
चित्रपटाचा शेवट तर खूप क्लिशे (एखाद्या प्रकाराच्या अतिवापरानं त्यातील नावीन्य हरवलेलं असणं) आहे. म्हणजे कुठल्याही 'स्टोरी विदिन अ स्टोरी' असलेल्या चित्रपटात तो यापूर्वी आपण अनेकदा पाहिला असल्यानं तोही आपल्याला अपेक्षित असतो. त्यामुळे इतका सगळा (जवळपास अडीच तासांचा) खटाटोप यासाठीच केला का, असा प्रश्न आपल्याला पडतो (जो खरं तर दिग्दर्शकाला पडायला हवा.).
हा चित्रपट तो जिथं संपतो तिथंच संपतो. पण खरं तर अशा प्रकारच्या चित्रपटानं शेवटानंतर प्रेक्षकाला जे काही पाहिलं त्याचा पुन्हा विचार करायला भाग पाडायला हवं. जे 'द युजअल सस्पेक्ट्स' किंवा तत्सम चित्रपटानंतर घडतं. हाही चित्रपट सुरुवातीच्या काही दृश्यांतून अशाच अपेक्षा निर्माण करतो, पण शेवटी (किंवा मध्यांतरानंतर) आपल्या हाती काही लागत नाही, ही भावना प्रबळ होत जाते. इतक्या सर्व उणिवांमुळे एकूणच चित्रपट फक्त इतर अनेक चित्रपट, कथा वगैरेंचा सुमार रिप ऑफ म्हणूनच आपल्यासमोर उभा राहतो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment