ना.ग. आचार्य व दा. कृ. मराठे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (चेंबूर)च्या वतीनं स्व. श्री शरदभाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यंदाचं या दोन दिवशीय व्याख्यानमालेचं सातवं वर्ष होतं. या व्याख्यानमालेत १२ जानेवारी २०१७ रोजी ‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप यांनी ‘तंत्रज्ञान आणि समकालीन संस्कृती’ या विषयावर दिलेलं व्याख्यान...
.............................................................................................................................................
‘तंत्रज्ञान आणि समकालीन संस्कृती’ हा विषय स्वभावत:च खूप व्यापक आहे. तासाभराच्या व्याख्यानात त्यातल्या फक्त काहीच मुद्द्यांना स्पर्श करता येईल. आधी आपण ‘तंत्रज्ञान’ आणि ‘समकालीन संस्कृती’ हे शब्द समजावून घेऊ.
तंत्रज्ञान
‘तंत्रज्ञान’ हा ‘Technology’ या मूळ इंग्रजी शब्दाला मराठी पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो. ‘कला’, ‘कौशल्य’ हे ‘तंत्रज्ञान’ या शब्दाला इतर पर्यायी मराठी शब्द आहेत. त्यातून मूळ ‘Technology’ या शब्दातला गर्भितार्थ पुरेसा सूचित होतो की नाही, ही चर्चा आपण सध्या बाजूला ठेवू. तर ‘तंत्रज्ञान’ वा ‘Technology’ म्हणजे काय? तर वैज्ञानिक व इतर सुसंघटित माहिती-ज्ञानाचं प्रत्यक्ष मानवी जीवन सुसह्य, सोपं आणि कार्यप्रवण करण्यासाठीचं ‘साधन’. तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार झालेली वेगवेगळी साधनं, यंत्रं वापरून आपण आपलं काम, करमणूक आणि दैनंदिन जीवन सहजपणे, सोप्या पद्धतीनं आणि कमी श्रमात करतो.
‘तंत्रज्ञान’ हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. उदा. Agricultural technology, Biotechnology, Educational technology, Environmental technology, Energy technology, Film and video technology, Food technology, Nanotechnology, Sound technology, Information and communications technology. यातल्या ‘Information and communications technology’चा सर्वाधिक बोलबाला आहे. ‘आजचं आधुनिक तंत्रज्ञान’, ‘आजकाल जग फार वेगानं बदलत आहे’, ‘आजची दुनिया तंत्रज्ञानाची आहे’ असे वाक्प्रचार हे बहुतांश वेळा ‘Information and communications technology’ला उद्देशून केलेले असतात किंवा त्याबद्दल सांगण्यासाठीच केलेले असतात.
समकालीन संस्कृती
शब्दांचे नेमके अर्थ आणि नेमक्या अर्थानं शब्दांचा वापर याबाबत बऱ्याचदा गल्लत होते. ती जाणूनबुजून होते वा केली जाते असं नाही. पण काटेकोर वा गंभीरपणे विचार न केल्यामुळे होते. ‘संस्कृती’ या शब्दाचंही काहीसं तसंच आहे. आपल्या प्रथा-परंपरा, भौगोलिक वैशिष्ट्यं, बदल, स्थित्यतरं, आचार-विचार यांतून जी मूल्य तयार होतात, त्याला ‘संस्कृती’ म्हणतात. पण जेव्हा ‘कार्यसंस्कृती’, ‘समकालीन संस्कृती’ असे शब्द आपण वापरतो, तेव्हा त्यांचा अर्थ वेगळा असतो. ‘कार्य-संस्कृती’ हा ‘Work Culture’ या मूळ इंग्रजी शब्दाचं मराठी भाषांतर आहे. यालाच इंग्रजीमध्ये ‘Work Ethic’ असाही प्रतिशब्द आहे. म्हणजे ‘Culture’ आणि ‘Ethic’ हे दोन्ही शब्द समानार्थानं वापरले जातात. ‘कार्यसंस्कृती’ आणि कार्याची वा ‘कामाची मूल्यं’ असं त्यांचं भाषांतर करता येईल. ‘Culture’ आणि ‘Ethic’ या शब्दांतून काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तर ‘कामाचं शास्त्र’ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता कुठलंही शास्त्र हे तत्त्वप्रधान असतं. ती तत्त्वं माणूस जेव्हा आचरणात आणतो, तेव्हा त्यातून जे तयार होतं, त्याला ‘संस्कृती’ म्हणतात. त्यामुळे ‘समकालीन संस्कृती’ या शब्दाचा अर्थ असा घेता येईल की, समकालीन समाज जी तत्त्वं आचरत आहे, त्यातून जे तयार होत आहे, त्याला ‘समकालीन संस्कृती’ म्हणता येईल.
कुठलंही शास्त्र हे विचारनिष्ठ म्हणजे विचारांवर उभं असतं, तर संस्कृती ही आचारनिष्ठ म्हणजे आचारावर उभी असते. समाजाची मूल्यं, श्रद्धा, आचार-विचार आणि प्रत्यक्ष वर्तन यात जेव्हा एकवाक्यता असते, तेव्हाच संस्कृती तयार होते. लक्षात घ्या, केवळ एक व्यक्ती वा एक संघटना किंवा काही व्यक्ती वा काही संघटना यांची मूल्यं, श्रद्धा, आचार-विचार आणि प्रत्यक्ष वर्तन एकसारखं असल्यानं किंवा झाल्यानं ‘संस्कृती’ तयार होत नाही. सगळ्या समाजाचीच या सर्व बाबतीत जेव्हा एकवाक्यता असेल तेव्हाच ‘संस्कृती’ तयार होते.
यातून तुमच्या लक्षात येईल की, ‘संस्कृती’ हा फार मोठा शब्द आहे. त्यामुळे माझ्या व्याख्यानात यापुढे मी ‘समकालीन संस्कृती’ असा शब्द न वापरता, ‘समकालीन समाज’ असा शब्द वापरायचं ठरवलं आहे.
पॉवर फिनॉमेनन
तंत्रज्ञानामुळे समाजबदलाला सुरुवात झाली ती विसाव्या शतकात. विशेषत: विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकानंतर. सध्या आपण एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आहोत. म्हणजे गेल्या शंभर वर्षांत तंत्रज्ञानाधिष्ठित समाज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. एकविसाव्या शतकात तर तंत्रज्ञानाच्या बदलाची गती आपली मती भोवंडून टाकणारी आहे. तंत्रज्ञानाच्या बदलाचा झपाटा आणि आवाका इतका जबरदस्त आहे की, त्याचा समग्रपणे कुणा एकाला वेध घेणं ही केवळ आणि निव्वळ अशक्यप्राय गोष्ट आहे.
विसाव्या शतकात तंत्रज्ञानानं केलेल्या बदलांचा समाजजीवनावर परिणाम झाला. अणुबॉम्बच्या निर्मितीनं तर संबंध जगाला मृत्यूच्या दाराशी नेऊन ठेवलं. पण विसाव्या शतकातले सगळेच बदल काही विनाशकारीच ठरले असं अजिबात नाही. पण त्यातल्या अणुबॉम्बनं मात्र सबंध जगाला मोठा हादरा दिला. मात्र हेही तितकंच खरं आहे की, तेव्हापासून अणुबॉम्बचा वापर जगाचा किंवा कुठल्या एका भूभागाचा विनाश करणाऱ्यासाठी झालेला नाही, होऊ शकलेला नाही.
विसाव्या शतकातल्या समाजानं विज्ञानातले, तंत्रातले आणि यंत्रातले बदल अनुभवले. त्या बदलांची गती आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या बदलांइतकी प्रचंड नव्हती. त्यामुळे तो समाज काही या बदलांनी भोवंडून गेला नाही. आपलं तसं नाही. आज आपण ज्या एकविसाव्या शतकात जगतो, वावरतो आहोत, त्यात माहिती-तंत्रज्ञानानं जो काही धुमाकूळ घातला आहे, त्यातून आपल्याला आपलं जगणं सावरणं दुष्कर होत चाललं आहे. याचं कारण आहे की, एकाच वेळी अनेक तंत्रबदल आपल्यासमोर येऊन आदळत आहेत. रोजच्या रोज आदळत आहेत. मोबाईल फोनपासून इंटरनेट मीडियापर्यंतच्या बदलांविषयी मी काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही.
अल्विन टॉफलर या अमेरिकन विचारवंतानं ‘फ्युचर शॉक’, ‘थर्ड वेव्ह’ आणि ‘पॉवर शिफ्ट’ या तीन पुस्तकांतून मानवी जगातील बदलांचा उत्तम प्रकारे आढावा घेतला आहे. त्यानं भटक्या जमातींचा कालखंड, शेतीप्रधान समाजाचा कालखंड, औद्योगिक क्रांतीनंतरचा समाज आणि आजचा माहिती-तंत्रज्ञानाधिष्ठित समाज असे समाजाच्या उत्क्रांतीचे चार ठळक कालखंड केले. पहिल्या भटक्या जमातीच्या कालखंडात इतरांपासून, विशेषत: हिंस्र प्राण्यांपासून स्वत:चं संरक्षण करणं, ही माणसासाठी सर्वाधिक महत्त्वाची, अत्यावश्यक बाब होती. शेतीप्रधान कालखंडात अवजारं ही सर्वाधिक महत्त्वाची, अत्यावश्यक बाब होती. औद्योगिक क्रांतीनंतर संपत्ती ही सर्वाधिक महत्त्वाची, अत्यावश्यक बाब होती. मात्र आज माहिती-तंत्रज्ञान ही सर्वाधिक महत्त्वाची, अत्यावश्यक बाब झाली आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर तुम्ही संपत्ती कमवू शकता, इतरांपासून स्वत:चं संरक्षण करू शकता आणि जगातल्या सर्व सुख-सोयींचाही लाभ घेऊ शकता. माहिती-तंत्रज्ञानावर आजच्या समाजाचं स्वास्थ्य आणि समृद्धी अवलंबून आहे.
म्हणजे माहिती-तंत्रज्ञान हे आज ‘पॉवर फिनॉमेनन’ झालं आहे. समकालीन समाजाचं हत्यार, संपत्ती, श्रेयस-प्रेयस, ईप्सित, ध्येय, महत्त्वाकांक्षा, करिअर, भांडवल, गुंतवणूक, व्याज, परतावा, घसारा, सर्व काही ‘माहिती-तंत्रज्ञान’ झालं आहे.
‘ऑईल’ मौल्यवान होतं, आता त्याच्या जागी ‘डाटा’
तुम्ही ‘इकॉनॉमिस्ट’ या इंग्रजी साप्ताहिकाचं नाव ऐकून असाल. ‘ब्रुटली फेअर’ असं त्याचं वर्णन केलं जातं. जागतिक राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि संस्कृती यांतील महत्त्वाच्या घडामोडींविषयीच्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखांसाठी हे साप्ताहिक ओळखलं जातं. या साप्ताहिकाच्या ६ मे २०१७च्या अंकात ‘The world’s most valuable resource is no longer oil, but data’ या लांबलचक शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला आहे. तो तुम्हा-आम्हाला चकित करून टाकणारा आहे.
या लेखाचं शीर्षकच सांगतं की, कालपर्यंत जगात सोनं, हिरे-मोती यांच्यापेक्षाही ऑईल हे मौल्यवान होतं. पण आता त्याची जागा ‘डाटा’नं घेतली आहे. आणि हे केवळ युरोप-अमेरिकेतच नाही, किंवा भारत-चीममध्येच नाही, तर दक्षिण आफ्रिकेतल्या गरीब देशांपासून भारतातल्या दुर्गम म्हणाव्या अशा खेड्यांपर्यंत सर्वत्र ‘डाटा’ दिवसेंदिवस अधिकाधिक मौल्यवान, अधिकाधिक जीवनावश्यक होतो आहे. आपल्या ‘आटा’चे, म्हणजे रोजीरोटीचे प्रश्न सुटलेले असोत वा नसोत, ‘डाटा’ हा आपल्यासाठी गरजेचा आहे, असं आपण मानू लागलो आहोत. तसं मानायला कुणीतरी आपल्याला भाग पाडलं आहे.
गुगलचं सर्च इंजिन, फेसबुकवरून कळणाऱ्या बातम्या, व्हॉटसअॅपवरून फॉरवर्ड होणाऱ्या पोस्टस, ट्विटरवरील सेलिब्रेटी नट-नट्यांचे वा राजकीय नेत्यांचे ट्विटस आणि अमॅझॉन-फ्लिपकार्ट यांच्यावरून घरपोच येणाऱ्या वस्तू यांच्याशिवाय जीवन जगायची इच्छा असलेले किती लोक असतील आपल्या आसपास? या सभागृहात? या शहरात? या देशात? या जगात? फारच थोडे!
स्मार्टफोन, इंटरनेट यांच्या माध्यमातून माहितीची विपुल साठा आपल्या पुढ्यात ओतला जातो आहे. मिनिटा, सेकंदागणिक. त्यात आपण कधी इच्छेनं, कधी अनिच्छेनं खेचले जातो आहोत. हा डाटा इतका सुलभ आहे की, तुम्ही घरात असा की ऑफिसात, रस्त्यावरच्या प्रवासात असा की, विमानात वा आगबोटीत. तो कुठेही तुमच्यापर्यंत सहजपणे पोहचू शकतो. तो तसा कुठेही तुमच्यापर्यंत पोहचू शकतो, म्हणून तुम्हाला हवा असतो. तुम्हाला हवा असतो म्हणून तुम्ही कनेक्टेड राहता. तुम्ही कनेक्टेड राहता म्हणून कुणाला तरी तुम्ही काय करता यावर नजर ठेवता येते. त्यातून संबंधित संस्था वा यंत्रणेकडे तुमच्याविषयीचा ‘डाटा’ जमा होत राहतो. जगातली जेवढी उत्पादनं, जेवढे सेवा उद्योग, जेवढी प्रसारमाध्यमं, जेवढे पक्ष, जेवढ्या संघटना इंटरनेटशी जोडल्या जाताहेत, तसतशी या ‘डाटा’मध्ये भरच पडत चालली आहे. जेवढे लोक सोशल मीडियावर येत आहेत, तसतसा त्यांच्याविषयीचा ‘डाटा’ तयार होतो आहे.
एखादं माध्यम लोकप्रिय झालं की, त्याच्याशी संबंधित नसणाऱ्यांचंही त्याकडे लक्ष वेधलं जातं. मग तेही त्याचा वापर करायला लागतात. त्यांच्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना त्याची माहिती होते. मग त्यातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या संपर्कातील व्यक्तीपर्यंत त्या माध्यमाविषयीची माहिती पोहचवते. अशा गतीनं हे वर्तुळ मोठं मोठं होत जातं, अधिकाधिक विस्तारत राहतं. फेसबुक, व्हॉटसअॅप या माध्यमांच्या लोकप्रियतेचं हेच गमक आहे की, ते तुम्हाला सतत इतरांशी (मित्र, नातेवाईक, सहकारी, समविचारी, सहाध्यायी आणि अपरिचितांशी) जोडत राहतं. त्यामुळे ‘डाटा’ वाढतच राहतो.
या इतक्या डाटाची आपल्या खरंच गरज आहे का? डाटापेक्षा आटा जास्त महत्त्वाचा आहे, असतो. पण आपल्या आट्याचा प्रश्न कसातरी किंवा अनेक जण कसाबसा सोडवून डाट्याचा प्रश्न मात्र व्यवस्थितपणे सोडवताना दिसतात.
माहिती-तंत्रज्ञान वाईट नाही, लोक स्वत:च्या मतलबासाठी त्याचा वापर करत आहेत
यामुळे काय होतं आहे? समकालीन समाज घडतो आहे की बिघडतो आहे? पुन्हा एकदा ‘इकॉनॉमिस्ट’चंच उदाहरण देतो. या साप्ताहिकाच्या ४ नोव्हेंबर २०१७च्या अंकात ‘Do social media threaten democracy?’ या नावाचा एक लेख प्रकाशित झाला आहे. चुकीची, दिशाभूल करणारी, सातत्यानं कुणाला तरी दोषी ठरवणारी वा कुणाविषयी तर गरळ ओकणारी माहिती ही तुमच्यातील सौजन्य, सामंजस्य आणि तारतम्य नष्ट करण्याचं काम करत असते. सोशल मीडियावर लोक इतक्या आक्रमकपणे का व्यक्त होतात, आपले पूर्वग्रह, आग्रह जोरकसपणे, प्रसंगी इतरांचा उद्धार करत का मांडत असतात, याचं मूळ त्यांच्यावर सातत्यानं थोपवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमध्ये आहे. सोशल मीडियामुळे अचूक माहिती आणि विनासायास संवाद होतच नाही, असं नाही. नक्की होतो, पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. ज्या संस्था-संघटना वा व्यक्ती हे काम करतात त्यांची यंत्रणा याबाबतीत फारच तोकडी आहे. याउलट चुकीची, दिशाभूल करणारी आणि कुणाला तरी सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या माहितीचे ठेकेदार मात्र आर्थिकदृष्ट्या, मनुष्यबळाबाबतीत अतिशय सक्षम, स्मार्ट असतात. माहितीचा अधिकार हे अचूक माहिती मिळवण्याचं आणि राईट टू इन्मर्फेशनचं संरक्षण करणारं अतिशय प्रभावी हत्यार होतं, आहे. पण त्याची किती प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आपल्या देशात? ज्या व्यक्ती, संस्था या अधिकाराचा वापर करतात, त्यांची मुस्कटदाबी करण्यापासून त्यांना धडा शिकवण्यापर्यंतची यंत्रणा अधिक सक्षम झालेली आहे. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात धर्मांधता, भ्रष्टाचार, वेगवेगळ्या अस्मिता यांना पायबंद बसतो आहे. पण त्या उलट या गोष्टींना बढावा देणाऱ्या यंत्रणा अधिक ताकदवान आहेत. याचा अर्थ माहिती-तंत्रज्ञान वाईट नाही, ते वापरणारे लोक वाईट पद्धतीनं, स्वत:च्या मतलबासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.
नुकतीच काही महिन्यांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्गनं आपल्या फेसबुक वापरकर्त्यांची माफी मागितली आहे. का? तर दोन वर्षांपूर्वीच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे जानेवारी २०१५ पासून ते ऑगस्ट २०१६पर्यंत १४ कोटी साठ लाख अमेरिकन लोकांनी रशियानं पेरलेली चुकीची माहिती वाचली होती. गुगलच्या यूट्युबनं मान्य केलं की, याच काळात रशियाशी संबंधित ११०८ व्हिडिओ अपलोड झाले आणि ट्विटरनं मान्य केलं की, या काळात रशियाशी संबंधित ३६७४६ खाती उघडली गेली. डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड होण्यात रशियाचा हात होता, हे आता काही गुपित राहिलेलं नाही. थोडक्यात फेसबुक, ट्युटब, ट्विटर सारखी माध्यमे काय करू शकतात, याचा अंदाज यावरून यायला हरकत नाही.
आपल्या नकळत सत्ता गाजवणारी सत्ता
प्रश्न लोकांच्या मानसिकतेचा आहे, माहिती-तंत्रज्ञानाच्या मुबलकतेचा नाही. जोवर सातच ग्रहांचा शोध लागलेला होता, तोवरचं ज्योतिषशास्त्र सात ग्रहांचा हवाला देत आपलं म्हणणं रेटत होतं. उर्वरित दोन ग्रहांचा शोध लागून ती संख्या नऊवर गेल्यावर ज्योतिषशास्त्रानं नऊ ग्रहांचा हवाला देत आपलं म्हणणं रेटलं. तसे दाखले, पुरावे, सिद्धान्त तयार केले. स्वार्ती, मतलबी, लबाड आणि धूर्त लोक प्रत्येक गोष्टीचा आपल्याला हवा तसा वापर करत असतात. मग ते ज्योतिषशास्त्र असो की, माहिती-तंत्रज्ञान.
जगभरात उग्रवादी, अतिउजव्या विचारांच्या लोकांचा उन्माद वाढतो आहे, याचं प्रमुख कारण हे लोक माहिती-तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वत:चा अजेंडा रेटण्यासाठी वापर करत आहेत. दुसरं कारण केवळ आर्थिकदृष्ट्या सुबत्तेत येत असलेला मध्यमवर्ग जगभर मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. आणि याच वर्गाला माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून मॅनेज करणं शक्य होत आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाचं पुन्हा जातीय गटांमध्ये, पक्षीय कोंडाळ्यांत, नेत्यांच्या वर्गवारीत विभाजन केलं जातं आहे. त्यांच्या जातीय, धर्मीय, वर्गीय, पक्षीय अस्मितांना खतपाणी घातलं जात आहे. त्यामुळे समकालीन समाजामध्ये केवळ दरीच निर्माण होते आहे असं नाही, तर ती रुंदावत कशी राहील हेही पाहिलं जात आहे.
फोटो, व्हिडिओ, पोस्टस, बातम्या, जाहिराती यांचा मारा तुमच्यावर करून कुणीतरी पैसा कमावतात. तुम्हाला तुमचा खिसा खाली करायला लावतात. तुम्ही तो किती प्रमाणात खाली करता याच्यावर नजर ठेवली जाते. त्यानुसार तुमच्या मनात राग, लोभ, चीड, त्वेष, तिरस्कार, द्वेष, शत्रुत्व यांची पेरणी केली जाते. सातत्यानं तुमचं लक्ष वेधून घेऊन, तुम्हाला स्कोल करायला लावून, फॉरवर्ड करायला लावून, क्लिकचं बटन दाबतं ठेवून किंवा त्याचे कष्ट न देता तुम्हाला सतत त्यांना हव्या त्या गोष्टींमध्ये एंगेज ठेवलं जातं.
आपण सांगतो आहोत तेच कसं खरं आहे हे सांगण्यासाठी आपला विरोधक कसा नालायक, खोटारडा, कुचाळखोर आहे, हे दामटून सांगितलं जातं. सातत्यानं गल्लत, गफलत, गहजब करत राहिल्यानं लोक त्यातच गुंतून पडतात आणि त्यांना काय चांगलं, काय वाईट याचा विचार करायला सवडच होत नाही. किंबहुना ती होऊ नये असंच पाहिलं जातं. परिणामी माणसं समाजहित, देशहित यांचा विचार करेनाशी होतात. हा धोका लोकशाहीवादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. कारण लोकशाही ही शासनप्रणाली नसून जीवनप्रणाली आहे. ती प्रत्यक्ष जीवनात झिरपू दिली जात नसेल तर कटकारस्थानं, अपप्रचार, द्वेष, कुणाला तरी सतत टार्गेट करत राहणं, या गोष्टींना उत येतो.
१) फेसबुकचा वापर सर्वाधिक प्रमाणात चुकीची, दिशाभूल करणारी, चारित्र्यहनन वा बदनामी करणारी माहिती पसरवण्यासाठी केला जातो.
२) व्हॉटसअॅपचा वापर सर्वाधिक प्रमाणात अफवा पसरवण्यासाठी केला जातो.
३) ट्विटरचा वापर सर्वाधिक प्रमाणात ट्रोलिंग करण्यासाठी केला जातो.
४) इन्स्टाग्रामचा वापर सर्वाधिक प्रमाणात चित्रपटांतील नटनट्यांची छायाचित्रं पाहण्यासाठी केला जातो.
जिथं सर्वाधिक प्रमाणात लोक असतात, तिथं तुम्ही हवा तो मजकूर, फोटो, व्हिडिओ टाकू शकता. त्यातून तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करता येतं.
ही एक नव्या प्रकारची सत्ता आहे, जी तुमच्यावर तुमच्या नकळत सत्ता गाजवते.
थोडंसं सकारात्मक, बरंचंसं नकारात्मक
तंत्रज्ञानाचा म्हटलं तर हा सर्वांत मोठा फायदाही आहे आणि तोटाही आहे. आजच्या जगात तुम्ही तंत्रज्ञानाच्या जोरावर हजारो-लाखो लोकांवर सत्ता गाजवू शकता, त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करू शकता किंवा त्यांना गिनिपिग म्हणून वापरू शकता किंवा त्यांची मतं तुमच्या सोयीनुसार घडवू शकता किंवा त्यांची मतं पूर्वग्रहदूषितही करू शकता.
हे असं वर्चस्व का निर्माण होतं? याचं साधं कारण असं आहे की, बहुतांश माणसांना स्वत:ची काही मतं नसतात. मग ती निरक्षर असतो किंवा साक्षर. सर्वच साक्षर लोक सुशिक्षित असतात, आणि सर्वच सुशिक्षित लोकांना स्वत:ची मतं असतात, असा आपला समज असतो. पण वस्तुस्थिती तशी नसते. बहुतांश सुशिक्षितांनाही स्वत:ची मतं नसतात. कुठलंही यंत्र त्याला दिलेल्या ऑर्डरप्रमाणे चालायचं असेल तर त्यात ऑईल घालावं लागतं, तशी कुठलंच मत नसलेल्या बहुतांश माणसांमध्ये इतरांकडून मतं पंप केली जातात. पूर्वी ही मतं धामिक स्थळं, मंदिरं, गुप्त बैठका, ज्ञातीय संघटना, सभा-संमेलनं, मोर्चे-आंदोलनं या माध्यमांतून पंप केली जात. आजकाल ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पंप केली जातात. महाराष्ट्रातील मराठा मोर्चे हे याचं अलीकडच्या काळातील सर्वोत्तम उदाहरण आहे.
यावर उपाय काय? याची माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या, त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना याची माहिती नाही का? जरूर आहे. या क्षेत्रातले तज्ज्ञ, अभ्यासक, हिंतचिंतक आणि प्रसारमाध्यमं यांबाबत आपापल्या परीनं समाजाला सजग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे काही चांगले परिणामही घडून येत आहेत.
शहरी भागातली सजगता, बदल याच्याशी तुम्हा परिचित असाल. वर्तमानपत्रं, टीव्ही यांच्यापेक्षाही अधिक वेगानं जगाच्या कानाकोपऱ्यातली कुठलीही बातमी अवघ्या काही मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहचू शकते. तुम्ही जगातल्या कुणाशीही संपर्क साधू शकता. माहिती-तंत्रज्ञानातल्या कौशल्याच्या जोरावर तुम्हाला कुठेही काम करण्याची संधी मिळते. घरबसल्या वा तुमच्या शहरातही चांगला रोजगार मिळतो. इत्यादी अनेक गोष्टी सांगता येतील. ग्रामीण भागात माहिती-तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार, लुबाडणूक याला बऱ्याच प्रमाणात आळा बसला. माहिती-तंत्रज्ञानामुळे दळणवळण वाढलं. त्यामुळे संपर्कसाधनं वाढली. परिणामी मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलं. माहिती-संपर्क सहजशक्य झाल्यामुळे आरोग्य-शिक्षण यांबाबतची सजगता वाढली.
पण या सकारात्मक उदाहरणांपेक्षा नकारात्मक प्रयोगाच्या प्रयोगशाळा जास्त जोरावर आहेत. त्याला खिंडारं पाडण्याचं काम धिम्या गतीनं का होईना होते आहे हेही सांगायला हवं. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून कळणाऱ्या बातम्यांवर फक्त ३७ टक्के अमेरिकन लोकच विश्वास ठेवतात. तर ५० टक्के लोक छापील वृत्तपत्रं आणि मासिकांवर विश्वास ठेवतात.
पण आपण काही अमेरिकेत राहत नाही. आपण भारत नावाच्या अशा देशात राहतो आहोत, जिथं अडाण्यांच्या निरक्षरतेपेक्षाही सुशिक्षितांची निरक्षरता मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे सोशल मीडियांतून कळणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवणाऱ्यांचं प्रमाण आपल्याकडे ७० टक्क्यांहूनही अधिक आहे. वर्तमानपत्रं आपल्याकडे लोक अजूनही वाचतात. पण हल्ली वर्तमानपत्रातला बराचसा मजकूर सोशल मीडियावर आणि गुगलवरूनच थेट उचललेला असतो. मासिकांची परंपरा निदान मराठीमध्ये तरी जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहे. आमचा सारा वेळ स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसून बसण्यात किंवा टीव्हीवर डोळे रोखून धरण्यात जातो. आम्ही कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही, याची आम्हीच आम्हाला सोय ठेवलेली नाही. त्यासाठी इतरांना फारसं दोषी धरता येणार नाही.
पुढे काय?
फेसबुकवर घटनांची शहानिशा करण्याची सोय आहे. पण ती सुविधा आपल्यापैकी बहुजेक जण वापरत नाही. तुमच्यापैकी कितीजण वापरतात?
www.altnews.in ही फेक न्यूजचा भांडाफोड करणारी वेबसाईट तुमच्यापैकी कितीजणांना माहीत आहे. या वेबसाईटनं भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू केलं आहे. वेबसाईटचा एक संस्थापक प्रतीक सिन्हा हा काही पत्रकार नाही. तो आयटी तज्ज्ञ आहे. पण सोशल मीडियावर फिरवली जाणारी चुकीची छायाचित्रं, व्हिडिओ आणि माहिती यांचं प्रमाण पाहून त्यानं या गोष्टींचा भांडाफोड करणारी हे वेबसाईट सुरू केली. त्यासाठी तसं सॉफ्टवेअर तयार केलं.
द स्क्रोल, द वायर ही संकेतस्थळं ऑनलाईन पत्रकारितेच्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करत आहेत. प्रस्थापित वर्तमानपत्रं, टीव्ही वाहिन्या यांच्यामध्ये ज्या घटना, जे विषय दुर्लक्षिले जातात, त्या घटना, विषयांची उत्तम माहिती या साईटसवर दिली जाते. त्यांचं अभ्यासूपणे विश्लेषण केलं जातं. आणि त्यांचे संभाव्य परिणामही ठोसपणे सांगितले जातात. मराठीमध्ये असाच प्रयत्न ‘अक्षरनामा’, ‘बिगुल’, ‘राइट अँगल्स’ या वेबसाईटस करत आहेत.
तंत्रज्ञानाच्या रेट्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपण हा चक्रव्यूह समजून घेतला पाहिजे. तो समजून घेतला तर त्याला भेदायचं कसं याचा आपल्याला नीट विचार करता येईल. तो आपण गांभीर्यानं केला पाहिजे. कारण प्रश्न केवळ आपल्यापैकी प्रत्येकाचा एकेकट्याचा नाही. आपल्या सगळ्यांचा एकत्रितपणे आहे. आपण ज्या समाज नावाच्या कुटुंबात राहतो आहोत, त्या समकालीन समाजाचा आहे, आपण ज्या लोकशाही नावाच्या देशात राहतो आहोत, त्या भारत नावाच्या देशाचा आहे.
ब्लॉग लेखक महेश जाधव यांनी क्रिएटिव्ह माणसाची २१ गुण वैशिष्ट्यं सांगितली आहेत. ती फक्त क्रिएटिव्ह माणसाचीच लक्षणं नाहीत, तर चांगल्या, सुबुद्ध, खऱ्या अर्थानं सुशिक्षित आणि तारतम्यपूर्ण विचार करणाऱ्या कुठल्याही माणसाची लक्षणं आहेत. ती २१ लक्षणं अशी - १) एकट्यानं मार्गक्रमण करण्याची इच्छाशक्ती, २) प्रश्न सखोलपणे जाणून घेणं, ३) सत्य परिस्थितीची जाणीव, ४) दुसऱ्याकडून शिकण्याची तयारी, ५) स्वतःच्या कामावर विश्वास असणं, ६) वर्तमान परिस्थिती व असमाधानी असणं, ७) ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा, ८) ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील, ९) स्वतःतून प्रेरणा घेणं, १०) साधनसामग्री व सुविधेच्या अभावी न खचणं, ११) दुसऱ्यांच्या प्रश्नांबाबत विचार करणं, १२) वैचारिक समतोल, १३) आत्मसात करण्याची तयारी, १४) मानसिक दृष्टीनं समजूतदार, १५) ध्येयवेडेपणा, १६) प्रश्नावर सर्व बाजूनं अभ्यास करणं, १७) टीकेमुळे विचलित न होणं, १८) रिस्क घेण्यास तयार, १९) जो जाणून घेतो, २०) जो पूर्ण माहीत घेतो, २१) जो अँक्शन घेतो /कृती करतो.
त्यामुळे माणसानं विवेकशील, जबाबदार आणि क्रिएटिव्ह असणं जितकं गरजेचं आहे, तितकंच त्यानं मूल्याधिष्ठित असणंही गरजेचं आहे. मूल्य म्हणजे काय? तर ज्या गोष्टींमुळे आपला आंतरिक विकास होतो, आपल्या मनाला उच्च प्रतीचं समाधान मिळतं आणि समाजाचं हित होतं, अशा गोष्टींना मूल्य म्हणतात.
तुम्हाला आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या जगात टिकून राहायचं असेल तर तुम्हाला विवेकशील, जबाबदार आणि क्रिएटिव्ह असणं आवश्यक आहे आणि आजच्या जगात सुखनैव जगायचं असेल तर तुम्हाला मूल्यांचा अंगिकार, स्वीकार आणि अवलंबन करावं लागेल. त्याशिवाय तुमचा या जगात टिकाव लागणार नाही. हा आजच्या, म्हणजे माहिती-तंत्रज्ञानाच्या युगाचा सांगावा आहे, इशारा आहे आणि या युगाची गरजही आहे. समकालीन समाजाचा एक उत्तरदायी भाग म्हणून त्याला प्रतिसाद द्यायचा की नाही याचा निर्णय तुमचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा.
धन्यवाद!
.............................................................................................................................................
राम जगताप यांनी संपादित केलेल्या ‘मराठा समाज - वास्तव आणि अपेक्षा’, ‘मध्यमवर्ग - उभा, आडवा, तिरपा’, ‘नोटबंदी - अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक’ या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment