थोड्याफार अडचणी वगैरे आल्या, तरीही 'पिफ' बराच चांगल्या रीतीनं पार पडला
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अक्षय शेलार
  • ‘पिफ' उर्फ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चं पोस्टर
  • Thu , 18 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र पिफ PIFF पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल Pune International Film Festival

गेल्या आठवड्यात (११ जानेवारी) सुरू झालेला १६वा पिफ अर्थात पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची आज (१८ जानेवारी) सांगता होतेय. या महोत्सवाच्या निमित्तानं पुणेकरांना अनेक चांगले, अभारतीय चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. त्यावर टाकलेली एक नजर. 

संक्षिप्त

दिग्दर्शक रमेश सिप्पी, अभिनेते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. याच वेळी रमेश सिप्पी यांना पिफचा विशेष पुरस्कार तर एस. पी. बालसुब्रमण्यम यांना संगीत क्षेत्रातील योगदानसाठी एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी 'आरके फिल्म्स'च्या २३ चित्रपटांच्या निगेटिव्हज जतन करण्यासाठी 'एनएफएआय' या संस्थेकडे सुपूर्द केल्या. 

या वर्षी हा महोत्सव पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही आयोजित केला होता. ज्यात सुमारे ९० देशांतील दोनशेहून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. शिवाय विद्यार्थी विभागांतर्गत लाइव्ह अॅक्शन आणि अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म्सच्या स्क्रिनिंग्सदेखील करण्यात आल्या. ज्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. 

आपल्याकडे महोत्सवांमध्ये आणि पुरस्कार सोहळ्यांत निवड झालेल्या किंवा पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या निवडीवरून त्या सोहळ्यावर टीका होणं काही नवीन नाही. अगदी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही ही टीका वेळोवेळी होत राहते. त्यामुळे पिफमध्येही हा वाद झाला नसता तर नवल. आणि तसंच झालं. अगदी सुरुवातीपासूनच खासकरून मराठी चित्रपटांच्या यादीवरून पिफवर तोंडसुख घेतलं जात होतं. पण इतकं होऊनही यातील जवळपास सर्वच चित्रपटांना गर्दी झाली. अगदी 'फास्टर फेणे' आणि 'मुरांबा'लादेखील. त्यामळे आता त्यावरून आणखी बोलणं योग्य नाही आणि महोत्सव संपल्यानं त्याचा फारसा उपयोगही होणार नाही. अर्थात अजूनही निवड समितीवरून आणि ती बदलण्यावरून चर्चा होणार असेल ते चुकीचं ठरेल. 

चित्रपट

यावर्षी 'पिफ'ची थीम 'युथ' अशी होती. ज्याअंतर्गत बरेचसे चित्रपट पाहण्यात आले. अर्थात यातही पुन्हा 'प्रेम' या शब्दाभोवती फिरणारा प्लॉट असलेले चित्रपट बरेच असल्यानं युथ याअंतर्गत फक्त याचाच समावेश होतो का, हा प्रश्न पडतो. 

वर्ल्ड कॉम्पेटिशन आणि ग्लोबल सिनेमा या दोन विभागांतील बहुतांशी चित्रपटांची स्क्रिनिंग दोनदा, तीही वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यानं या विभागातील चित्रपटांना झालेली गर्दी बऱ्यापैकी विभागली गेली आणि बहुतांशी प्रत्येकालाच यातील चित्रपट पाहण्याची संधी मिळाली ही त्यातल्या त्यात चांगली बाब वाटते. 'ओपनिंग फिल्म' असलेल्या 'मेन डोन्ट क्राय' आणि इतरही बऱ्याच चित्रपटांच्या स्क्रिनिंग दोन्ही वेळा हाऊसफुल ठरल्या. 

महोत्सवात अनेक देशांतील आणि भाषांतील चित्रपट असले तरी एकूणच फ्रेंच, हंगेरियन आणि टर्किश चित्रपटांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. फ्रेंचमधील ‘जाम’ (Djam), ‘ब्लडी मिल्क’, ‘रिक्विम फॉर मिसेस जे’ तर हंगेरियनमधील ‘किल्स ऑन व्हिल्स’, ‘ऑन बॉडी अँड सोल’ आणि टर्किशमधील ‘आय एम नोबडी’, ‘दहा’ (Daha) वगैरे चित्रपटांची बरीच चर्चा होती. आणि यातील जवळपास प्रत्येकाचे दोन्ही शोमध्ये अनेकदा पायऱ्यांवर बसण्यापासून ते थेट प्रवेश न मिळण्याइतपत प्रेक्षकसंख्या होती. 

शिवाय रेट्रोस्पेक्टिव्ह विभागांतर्गत दाखवण्यात आलेल्या इंगमार बर्गमन आणि राज कपूर दिग्दर्शित चित्रपटांनाही बरेच, अगदी काही वेळा तर हाऊसफुल होण्याइतपत प्रेक्षक पाहून बरं वाटलं. 

पिफमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे अगदी मास्टर क्लास नसेल, पण बऱ्याच मुलाखती आणि नामवंत कलाकारांची विशिष्ट आणि विविध विषयांवर चर्चा होतात. यावेळीही रमेश सिप्पी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर भाष्य केलं. तर मुलाखतींमध्ये आणि चर्चासत्रात आदित्य सरपोतदार, नितीन वैद्य वगैरे लोकांशी संवाद साधला गेला. अर्थात या चर्चांना किती लोक स्क्रिनिंगला जायचं टाळून उपस्थित राहतात हा प्रश्न राहतो. शिवाय या चर्चांचं स्वरूप बरंच फॉर्मल असल्यानं एखाद-दुसरी कॉन्फरन्स वगळता प्रेक्षकांचा त्यात फारसा सहभाग नसतो, जे खरं तर महत्त्वाचं असतं. 

परदेशात अशा महोत्सवांमध्ये चर्चा बऱ्याच इन्फॉर्मल स्वरूपाच्या असतात. ज्यातून तिथं उपस्थित लोक थेट त्या कलाकारांशी संवाद साधू शकतात. त्याची आपल्याकडे उणीव असते. त्यामुळे संयोजकांनी यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. 

नियोजनात वारंवार दिसून येणाऱ्या उणीवा

इतक्या मोठ्या थाटात पार पडणाऱ्या महोत्सवात उणीवा नक्कीच असणार. मात्र या उणीवा बऱ्याचदा शुल्लक आणि टाळता येण्याजोग्या होत्या. ज्यात अगदी प्रोजेक्शन करताना रिसॉल्युशन योग्य नसणं आणि त्यामुळे ते ठीक होईपर्यंत सबटायटल्स न दिसणं आणि ठीक झाल्यावरही तो सीन पुन्हा न दाखवणं, यामुळे तो सीन कळालाच नसल्यानं पूर्णतः निरर्थक ठरण्यापर्यंत गोष्टी घडत होत्या. 

इंगमार बर्गमनच्या 'सॉडस्ट अँड टिन्सेल'लादेखील सबटायटल्स ग्रे शेडचे आणि चित्रपट ब्लॅक अँड व्हाइट असल्यानं सबटायटल्स दिसणं अशक्य होतं. आणि या गोष्टी लक्षात येण्याजोग्या आणि टाळता येतील अशा होत्या. 

याखेरीज काही वेळा एखाद्या बाबीची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणारी संयोजक मंडळी पाहायला मिळाली. विद्यार्थी विभागातील अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म्सच्या स्क्रिनिंगच्या दरम्यान सुरुवातीला आवाजच येत नव्हता. विशेष म्हणजे याची तक्रार करूनही स्क्रिनिंग तशीच सुरू ठेवण्यात आली. आणि जवळपास दोन शॉर्ट फिल्म संपल्यावर ती अडचण दूर केल्यावर पुन्हा त्या शॉर्ट फिल्म्स दाखवल्या. पण आधीच जर ती अडचण दूर केली असती तर कदाचित बराचसा वेळ वाचला असता. अर्थात या चुका जितक्या दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत तितक्याच समोर आणाव्या इतक्या महत्त्वाच्याही आहेत. 

वेगळी वाट निवडणारे चित्रपट

यात अशा प्रकारचे बरेच चित्रपट पाहण्यात आले तरी 'सिक्रेट इंग्रिडिएंट' हा चित्रपट हा त्यातल्या त्यात बराच वेगळा आणि साधीसोपी गोष्ट सुंदररीत्या उलगडणारा चित्रपट पाहण्यात आला. 

नेहमी पैशांची चणचण भासणाऱ्या या ट्रेन मेकॅनिककडे त्याच्या वडिलांना झालेल्या लंग कॅन्सरची ट्रीटमेंट करण्याचेही पैसे नसतात. ज्यावर उपाय म्हणून मग तो त्यानं चोरलेल्या मॅरिजुआना या ड्रगचा केक त्यांना खाऊ घालतो. आणि विशेष म्हणजे त्याचा हा उपाय काम करून जातो. पण आता त्याच्यामागे त्या ड्रगच्या पॅकेटचे खरे मालक असलेले गुंड लागतात. त्याची गोष्ट म्हणजे 'सिक्रेट इंग्रिडिएंट'.

पण केवळ यातील धरपकड आणि सोबत असलेला क्राइम प्रकारातील उपकथानक याहून जास्त बरंच काही यात आहे. ज्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे बाप आणि मुलगा यांतील आजवर पडद्यावर पाहिलेल्या काही उत्तम नात्यांपैकी एक नातं यात दिसलं. त्यामुळे हा चित्रपट फक्त क्राइम जॉनर किंवा फक्त विनोदी चित्रपट म्हणून उभा राहत नाही. तर या सर्वांचं एकत्रितरीत्या तितकंच उत्तम असलेली एक गुंतवून ठेवणारी आणि अजिबात चुकवू नये अशी गोष्ट आपल्यासमोर उभी करतो. 

काही जुने क्लासिक चित्रपट, 'वाइल्ड टेल्स'सारखे मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा निर्माण करणारे चित्रपट पाहूनही बरं वाटलं. एकूणच थोड्याफार अडचणी वगैरे समोर आल्या तरीही 'पिफ' बराच चांगल्या रीतीनं पार पडला. किमान आठ दिवस आपण रोज जात असल्याची आणि प्रत्येक दिवसाच्या शेवटी हाती काहीतरी नक्की लागत आहे, ही भावना सुखावणारी होती. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख