रफिक शेख : राज्य पोलिसांचा झेंडा फडकवणारा, मराठवाड्यातील पहिला एव्हरेस्टवीर
सदर - रौशनख़याल तरुण
हिनाकौसर खान-पिंजार
  • रफिक शेख
  • Thu , 18 January 2018
  • रोशनख्याल तरुण रफिक शेख Rafiq Shaikh

मुस्लिम समाजात काही घडतंच नाही असं हल्ली सरळसोट बोललं जातं. दहशतवादी कारवाया, गुन्हेगारीत मुस्लिम समाज ठळक दिसतो, असाही समाजातील काहीजण आरोप करतात. शिवाय मुस्लिम बायकांचे बुरखा, तोंडी तलाक हेच एकमेव प्रश्न आहेत अशीही अनेकांची धारणा असते. ‘ते आणि आपण’ अशीही एक भावना सध्या जोर धरत आहे. त्याचं कारण सध्याच्या मुस्लिम समाजात काय घडतंय या माहितीचा अभाव. मात्र आज मुस्लिम समाजातील तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. हे तरुण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्नांसाठी उभे राहत आहेत. आपापल्या परीनं आपापल्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवत आहेत, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना हात घालत आहेत. त्याविषयी लिहीत आहेत, मांडत आहेत. मुस्लिम समाजात काहीच घडत नाही या भावनेला छेद देणारी ही बाब आहे. आपल्या बिकट परिस्थितीशी सामना करून, मुस्लिम समाजाचे म्हणून असणाऱ्या ठराविक साच्यातून बाहेर पडून, नवनव्या वाटा शोधणाऱ्या तरुण-तरुणींचं मानस समजून घेण्याचा प्रयत्न ‘रौशनख़याल’ या साप्ताहिक सदरातून केला जाईल. ‘रौशनख़याल’ म्हणजे सकारात्मक. मुस्लिम समाजातल्या तरुणांची सकारात्मक ऊर्जा समोर आणणं, हा या सदराचा हेतू आहे.

.............................................................................................................................................

उंची गाठण्याचं वेड माणसाला कायमच खुणावत आलं आहे. त्यात गिर्यारोहक असेल तर एव्हरेस्ट खुणावणार नाही असं होत नाही. दूरवर पसरलेला बर्फ, उणं तापमान, असह्य बोचरी थंडी, नैसर्गिक संकटं, घोंगावणारी वादळं अशा परिस्थितीत एव्हरेस्टवर चढाई करणं हे कोणा येरागबाळ्याचं काम नाही. प्रत्यक्ष मृत्यूलाही वेळोवेळी हुलकावण्या देत या ध्येयाकडे झेपावयाचं अवघड काम. त्यातच महाराष्ट्राच्या छोट्याशा खेड्यात राहून हे स्वप्न पाहणं आणि पूर्ण करणं दोन्हीही अवघडच. मात्र हे अवघड ध्येय साध्य करत, औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल असणाऱ्या रफिक शेखनं एक यशस्वी सफरनामा स्वत:च्या नावावर नोंदवला आहे. महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकवणारा रफिक हा आजवरचा पहिला गिर्यारोहक ठरला, शिवाय मराठवाड्यातील एव्हरेस्टवीर ठरणारा तो पहिला गिर्यारोहकही ठरला.

रफिक औरंगाबाद शहराजवळच्या हर्सूल-नारगावचा. त्याची आई करीमाबी आणि वडील ताहेर शेख हे शेती करून जगणारे. घरात पाच भावंडांत रफिक मधला. शाळेत असताना तो एनसीसीमध्ये सहभागी व्हायचा. एव्हरेस्ट शिखराचं बीज या एनसीसीच्या ट्रेकिंग कॅम्पमुळेच आकाराला आलं. रफिक सांगतो, “शाळेत केवळ भूगोलाच्या पुस्तकात एव्हरेस्टविषयी माहिती होती. पण या शिखरावर चढाईसुद्धा करतात याची कल्पनासुद्धा नव्हती. पण एनसीसीनं गिर्यारोहणाच्या छंदाचे दरवाजे खुले केले. मराठवाडा हा मुख्यत्वेकरून सपाट प्रदेश असला तरी काही भागात लहान-मोठे डोंगर आहेत. मी राहत असलेल्या नायगाव-हर्सुलचे डोंगर पालथे घालण्यास सुरुवात केली. सह्याद्रीच्या पर्वतरागांतूनही फिरलो.”

त्यानंतर २००३ मध्ये रफिक पहिल्यांदा हिमालयात उत्तर काशीला ट्रेकिंगसाठी गेला. तिथं त्याला गिर्यारोहणासाठी प्रशिक्षण देणाऱ्यां संस्थांविषयी माहिती झाली. तोपर्यंत त्याला ट्रेकिंगसाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असतात याची माहिती नव्हती. २००५ मध्ये मनाली बेस कँप इथं एका संस्थेद्वारे प्रशिक्षण घेऊन रफिकनं अवघ्या दोन दिवसांत पाच शिखरं सर केली, तेव्हा तो सतरा वर्षांचा होता.

दरम्यान २००६मध्ये वयाच्या १८व्या वर्षी पोलिसांत भरती झाला. पोलिसांच्या कामाच्या अवेळांमध्येही त्यानं आपला छंद मागे पडू दिला नाही. पोलिस खात्यातून त्याला यासाठी नेहमीच प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे तो अधिक जोमानं एव्हरेस्टच्या शिखरासाठी स्वत:ला सज्ज करू लागला. रफिक सांगतो, “२०१० पर्यंत गिर्यारोहकांच्या अनुभवाच्या आधारे माझं ट्रेकिंग सुरू होतं. मात्र २०१० मध्ये गिर्यारोहणाचा तांत्रिक कोर्स मनाली येथील ‘अटलबिहारी वाजपेयी माउंटेनिररिंग इन्स्टिट्यूट’मधून पूर्ण केला. त्यानंतर दार्जिलिंगच्या प्रसिद्ध ‘हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’मधून ‘अॅडव्हान्स्ड माउंटेनियरिंग कोर्स’ ‘ए’ ग्रेडनं पूर्ण केला. जम्मू-काश्मीर, दार्जिलिंग, मनाली, हिमाचल अशा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या संस्थांमधून एकूण चार वेळा हा २८ दिवसांचा अ‍ॅडव्हान्स कोर्स केला. जितकं शिकू तितका प्रत्यक्ष मोहिमेस फायदा होईल ही खात्री होती. प्रत्यक्षात त्याची प्रचितीही आली.”

प्रशिक्षणानंतर रफिकचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर त्यानं हिमाचल प्रदेशातील पाच हजार मीटरहून अधिक उंच असणारी ‘माउंट फ्रेंडशिप’, ‘क्षितिधार’, ‘सेव्हन सिस्टर’, सिक्कीममधील ‘माउंट काब्रुडोम’ ही शिखरं बऱ्याचदा सर केली. यापुढे जाऊन आणखी एक धाडसी प्रयत्न केला, तो म्हणजे उत्तराखंडमधील तांत्रिकदृष्ट्या चढाईला सर्वांत कठीण असलेल्या ‘कामेट’ शिखरालाही गवसणी घालण्याचा!

वेगवेगळी शिखरं पादाक्रांत केल्यानंतर व प्रशिक्षण, आत्मविश्वास मिळाल्यानंतर रफिकला अर्थातच ‘एव्हरेस्ट’ चढाईचे वेध लागले. वेगवेगळ्या चढाईतून त्यानं शाररिक व मानसिक तयारी केली होती. आता त्याला आर्थिक तजविजीची गरज होती. एव्हरेस्टची चढाई म्हणजे साधारण २५ लाख रुपयांचा खर्च. एवढी रक्कम उभी करणं त्याच्या एकट्यासाठी अशक्य होतं. घरची परिस्थितीही बेताचीच. मग त्यानं पोलिस सोसायटीतून पगारावर काही प्रमाणात कर्ज घेतलं आणि मग प्रायोजक आणि मित्रांची मदत घेऊन हळूहळू पैसा जमा केला. आर्थिक तयारी झाल्यानंतर एव्हरेस्ट चढाईसाठी निघतोय असं न सांगताच तो घरातून बाहेर पडला. कारण घरच्यांसाठी तोपर्यंत गिर्यारोहण म्हणजे नुसतं खूळ. डोंगरात पायपीट करून काय मिळणार, असाच सूर असायचा. त्यामुळे तो एका अवघड मिशनसाठी निघतोय हे न सांगताच निघाला. कुटुंबियांनाही वाटलं, नेहमीप्रमाणे कुठंतरी हिमाचल प्रदेशात भटकून येईल.’ पण याच्या मनानं एव्हरेस्टला साद घातलेली; पण निसर्गाच्या मनात वेगळंच होतं.

रफिक आपल्या मोहिमेविषयी सांगू लागतो, तेव्हा आजही त्याला सगळ्या गोष्टी ठळक आठवतात. “एव्हरेस्ट चढाईची सुरुवात बेस कॅम्पपासून होते. २०१४ मध्ये बेस कॅम्पला पोहचलो. इथून पुढे चढाईला सुरुवात होते न होते, तोच हिमस्खलन झालं. एकाच वेळी १६ शेर्पा मृत्यूमुखी पडले. एव्हरेस्ट मोहिमेच्या इतिहासातील ती पहिलीच सर्वांत मोठी मनुष्यहानी होती. साहजिकच नेपाळ सरकारनं वर्षभरातील सर्व मोहिमा रद्द केल्या.” निसर्गाच्या या रोषापुढं रफिक मात्र गलितगात्र झाला. त्यानं कर्ज काढून भरलेले पैसे क्षणार्धात गोठून गेले.

या पहिल्या अपयशानंतर रफिक थोडा खचला तरी ध्येयानं त्याला पछाडलेलं. त्याला पुन्हा पुन्हा एव्हरेस्ट खुणावत होतं. यासाठी त्याला पुन्हा मानसिक तयारीसोबतच आर्थिक जुळवाजुळव करायची होती. पुन्हा पहिले पाढे गिरवणं भाग होतं. त्याचं झपाटलेपण पाहून आणि निसर्गाचा घात लक्षात घेऊन प्रायोजकांनी त्याला मदतीचा हात देऊ केला. त्याची तयारी सुरू झाली, पण याहीवेळेला त्याच्या स्वप्नावर निसर्गानं घाला घातला.

२५ एप्रिल २०१५ ला काठमांडू इथं झालेल्या भूकंपामुळे सागरमाथा हादरला. नेपाळचा बहुतांश भाग उदध्वस्त झाला. हे वृत्त आपण टीव्ही चॅनेल्सवरून पाहतानाही हळहळत होतो, तिथं तर एव्हरेस्ट चढाईसाठी दुसऱ्यांदा पोहचलेला रफिक ते प्रत्यक्ष अनुभवत होता. सुन्न करणारी ही घटना होती. रफिक सांगतो, “दुसऱ्या वेळेसही आर्थिक-मानसिक जय्यत तयारी केली होती. आम्ही अंतिम ठिकाणाच्या अगदी जवळ पोहचलो होतो. मात्र निसर्गाचा कोप झाला. भूकंपामुळे शिखर हादरलं आणि एव्हरेस्टवर मोठा अॅव्हलाँच आला. पुमोरी शिखराकडून बर्फाचे कडे कोसळून कॅम्पच्या दिशेनं आले. आपण आता याखाली गाडले जाऊ असं वाटू लागलं. गुडघ्यापर्यंत बर्फ जमा झाला. एका मोठ्या दगडामागे लपल्यानं मी बचावलो. माझ्यासोबत चढाईसाठी आलेले माझे सहकारी वाचले. मात्र, या कोसळणाऱ्या बर्फांच्या कड्याखाली बरेच जण दगावले. बेस कॅम्पही उदध्वस्त झाल्यामुळे पुन्हा परतावे लागले. यानंतर मात्र खूप निराश झालो. दोनदा अयशस्वी ठरल्याची बोच वाटू लागली. गावी परल्यानंतर लोक काय म्हणतील ही गोष्ट दिवसरात्र मन पोखरू लागली.”

सलग दोन मोहिमा अर्धवट सोडाव्या लागल्यामुळे मोठा खर्च झाला होता. शारिरीक-मानसिक आणि आर्थिकरीत्या तो पूर्ण कोलमडला होता. पण काही केल्या जिद्दीला सुरूंग लागला नव्हता. ‘तिसऱ्या वर्षी पुन्हा आपण मोहिमेवर जायचेच’, असं त्यानं ठरवलं आणि तयारी सुरू केली. यावेळी घरातून, बाहेरून विरोध आणि खिशाचा खुळखुळा झालेला, पण हात-पाय मारणं सुरूच होतं. आधीच्या सगळ्या प्रायोजकांनाही भेटला. शारिरीक आणि मानसिक तयारी असूनही केवळ नैसर्गिक आपत्तीमुळे मोहिमा सोडाव्या लागल्याचं त्यानं सांगितलं. त्याच्या नम्र, प्रामाणिक आणि ऋजू स्वभावाशी परिचित असलेल्या सर्वांनी त्याला पाठिंबा दिला; अनेक उद्योजक, राजकारण्यांनी आर्थिक सहकार्य केलं. पोलिस विभागातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी मानसिक उभारी दिली. शक्य तिथं आर्थिक मदतही केली. ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम, आशा जोशी यांनी त्याला मानसिक ऊर्जा दिली आणि शेवटी रफिक १३ एप्रिल २०१६ला मोहिमेसाठी रवाना झाला.

काठमांडूला कागदपत्रं आणि परवान्यांची पूर्तता करण्यापुरता आठेक दिवसांचा वेळ लागला आणि नंतर रफिक बेस कॅम्पकडे रवाना झाला. आधी दोन वेळा गेलेला असल्यानं त्याला लुकला ते बेस कॅम्प हा प्रवास म्हणजे मळलेली वाट होती. बेस कॅम्पवर पुढची तरारी त्यानं सुरू केली. वॉर्मअप आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्यासाठी काही दिवस तिथं थांबून आसपासच्या टेकड्यांवर सराव, वैद्यकीय तपासण्या सुरू होत्या.

रफिक एव्हरेस्ट चढाईतील एक एक गोष्ट सांगू लागला, “१३ एप्रिल रोजी मी बेस कॅम्पला पोहचलो. त्यानंतर सलग एक महिना सराव. १५ मेला पहाटे तीन वाजता आम्ही साऊथ कोलच्या दिशेनं चढाई सुरू केली. त्यावेळी आम्ही ५४०० मीटर उंचीवर होतो. दुपारी ६४०० मीटरवर असणाऱ्या कॅम्प दोन टप्प्यांवर पोहचलो. जस जसं समुद्रसपाटीपासून अंतर वाढायला लागतं, तसतसा ऑक्सिजन विरळ झाल्यानं श्वासोच्छवासाचा त्रास सुरू होतो. वाटेत बर्फाच्या भिंती असतात आणि कोणत्याही क्षणी त्या कोसळतील असं वाटायला लागतं. काही वेळा सलग सात-आठ तास चालावं, तर काही वेळा रोप क्लायंबिंग करावं लागतं. १७ मेला ७,१६२ मीटरवर असलेल्या कॅम्प तीनवर पोहोचल्यानंतर काहीजणांना उलटी, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास सुरू झाला. हवेच्या दबावामुळे भूकही लागत नाही. केवळ एनर्जी ड्रिंक्स घ्यायचं. कॅम्प तीन नंतर प्रत्येकालाच ऑक्सिजन सिलेंडर लावावा लागतो. यानंतर जिनिव्हा स्पर येतो. एरव्ही एव्हरेस्टच्या मार्गावर फक्त बर्फ दिसतो, पण जिन्हीव्हा स्परला दगड आणि बर्फ यांचं मिश्रण असतं. त्यानंतर येलो बॅण्ड. या ठिकाणी बर्फ टणक, गुळगुळीत आणि पारदर्शक होतो. या भागात, पाय घसरून पडण्याचे प्रसंगही येतात. थकवा होताच; पण गेल्या मोहिमेत इथपर्यंत येता आलं नव्हतं. पुमोरीवरून तुटलेला कडा कॅम्प-२च्या दिशेनं आला, तेव्हाच वरचे सगळे कॅम्प उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे उत्सुकता होतीच. १८ मेला पहाटेच निघायचं असल्यानं सगळ्यांनी आराम करणं पसंत केलं. आता पुढचा टप्पा खरं तर कस लावणारा होता. संध्याकाळी कॅम्प-४ वर विश्रांतीला फारसा वेळ मिळणार नव्हता. शेर्पा आणि सगळ्या गिर्रारोहकांनी मिळून पुढचं नियोजन केलं. रात्रीतून चढाई सुरू ठेवायची, असा निर्णय झाला आणि लगेच संध्याकाळी साडेआठला निघालो.”

यानंतर प्रवासातील जोखीम सुरू झाली. रफिक सांगतो, “हेडलॅम्पच्या प्रकाशात दोन-चार पावलांपुढचं काही दिसायचं नाही. बर्फाची एक मोठी चढण पार करून सगळे एका सपाटीवर आलो, तेव्हा तापमान उणे ५० होतं. या ठिकाणाहून धोक्याचा प्रवास होता. थकवा जाणवू लागला होता. आता ऑक्सिजन मास्कशिवाय पुढे जाणंही शक्य नसल्यानं ओझं चांगलंच वाढलेलं होतं. इथली उंची आठ हजार मीटर. ऑक्सिजन मास्कच्या झडपांची फडफड, वाऱ्याचे झोत, आईस ऍक्स आणि गिर्यारोहकांच्या बुटाला लावलेल्या क्रैम्पोन्सचे बर्फ फोडणारे खटखट असे आवाज फक्त कानावर पडत होते. इथं डेथ झोन आहे. अयशस्वी झालेल्या कित्येक गिर्यारोहकांचे मृतदेह आसपास पडलेले असतात. इथंच चढणीवर जगप्रसिद्ध ‘ग्रीन बूट’ आहे. अतिउंचीवर वेडे साहस कशात रूपांतरित होतं, याचं प्रत्येक गिर्यारोहकाला ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घडत होतं.’ या सगळ्या निराशेनं भरलेल्या वातावरणात पहाट झाली आणि ८७०० मीटरवर रफिकनं सूर्यादय पाहिला. एक नवी ऊर्जा त्याच्यात सळसळली. शिखर नजरेच्या टप्प्यात आलं होतं. ध्येयापर्यंत पोहोचायला अवघ्या तासाचा अवधी होता. रफिकनं दुप्पट जोमानं, पण तरीही सांभाळत, सावकाशीनं पावलं टाकायला सुरुवात केली. आनंदाच्या भरात त्यानं शेर्पांनाही मागे टाकलं. एव्हरेस्टच्या समिटपर्यंत म्हणजे ८८४८ मीटरवर पोहचायला शेवटची दहा मिनिटं उरली होती, शिखर समोर दिसत होतं. त्याक्षणी मी खूप भावूक झालो. दोन वर्षांपासून हुलकावणी देणारं यश काही क्षणात प्राप्त होणार होतं आणि बरोबर नऊ वाजून दोन मिनिटांनी त्याचं पाऊल शिखरावर पडलं. भारताचा झेंडा फडकावला, महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकवला. त्या क्षणानं आजही रोमांचित होतो.” रफिक भावूक होऊन सांगत होता.

एव्हरेस्ट सर केल्याचा, पृथ्वीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्याचा आनंद शब्दातीत असतो. मात्र, यानंतर खरी कसोटी लागते. आनंदाच्या, उत्साहाच्या भरात लहानशीही चूक महागात पडू शकते. अतिशय समतोल बुद्धी ठेवून उतरण्याचं नियोजन करावं लागतं. रफिक ही सर्व काळजी घेत होता. हिलरी स्टेप उतरून कॅम्प-४ वर आला. रात्रभर आणि दिवसभर चालल्याचा थकवा होताच. ध्येय साध्य झाल्याचा आनंदही होता. आता इथं न थांबता कॅम्प-२ पर्यंत पोहोचायचं असं त्यानं ठरवलं. शिखराला गवसणी घालण्याच्या नादात इतका वेळ शरीराची जाणीव जणू बधिर झाली होती. ती आता जागी होऊ लागली आणि फ्रॉस्टबाइटचा फटका बसला.

कॅम्प-२ ला येत असताना रफिकला फ्रॉस्टबाइटनं ग्रासलं. पायाच्या बोटांना हिमदंशानं दुखापत झाली. त्यामुळे कॅम्प-२ वरून त्याला तातडीनं हेलिकॉप्टरनं हलवण्याची गरज होती. मात्र, त्याचा खर्च येणार होता तब्बल १६ हजार डॉलर्स. या मोहिमेवर बारकाईनं लक्ष ठेवून असलेले सुरेंद्र शेळके यांनी क्षणाचाही विलंब न लावता हेलिकॉप्टर रेस्क्रूचा निर्णय घेतला. त्याला आधी बेस कॅम्पवर आणि नंतर काठमांडूला आणण्यात आलं. मोहिमेचे सल्लागार हरीश जाखेटे यांनी ही बाब कळवताच औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सूत्रं हलवली. त्याच्या डाव्या पायाचा अंगठ्याचा तुकडा कापावा लागला. दहा दिवस तो तज्ज्ञांच्या देखरेखीखाली राहिला. शेवटी तिथून मुंबई आणि औरंगाबाद असा प्रवास करत घरी परतला. परतल्यानंतर औरंगाबाद इथं त्याचं जोरदार स्वागत झालं. पोलिस खातं, मित्र परिवार यांनी त्याचा मोठा नागरी सत्कार केला. या तीनही मोहिमांसाठी रफिकला तब्बल ६० लाख रुपये एवढा खर्च आला, मात्र त्याच्या या परक्रमाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या या तीनही मोहिमांचा खर्च राज्याच्या वतीनं परत देण्याचं आश्वासन दिलं.

रफिकची उंची गाठण्याची मनीषा काही कमी झालेली नाही, त्याचं पुढचं स्वप्न चीनच्या बाजूनं नॉर्थ फेसकडून एव्हरेस्ट चढायचं आहे. तांत्रिकदृष्ट्या ते जास्त कठीण आहे. “पृथ्वीच्या सातही खंडांतील सात सर्वोच्च शिखरं मला जिंकायची आहेत. केवळ स्वत:साठीच नव्हे तर  मराठवाड्यातील बच्च्यांसाठीही स्वप्न पाहत आहे. आमच्या मराठवाड्यात गिर्यारोहणाची आवड रुजवणं आणि तरुण-तरुणींना प्रशिक्षित करणं, हे माझं स्वप्न आहे. या मातीतून किमान १० एव्हरेस्टवीर जन्माला यावेत, यासाठी मी प्रयत्न करीन. साहसी खेळांचं एक चांगलं प्रशिक्षण केंद्र या भागात उभारावं, अशी माझी धडपड राहील,” असं तो निर्धारानं सांगतो.

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......