अजूनकाही
दिल्लीत तरुण-विद्यार्थी नेत्यांच्या रॅलीला ‘हुंकार’ हे नाव ज्यांनी सुचवलं असेल ती व्यक्ती भलतीच सर्जनशील म्हणावी लागेल. ‘हुंकार’ हा हिंदी शब्द. त्याचा अर्थ लढाईसाठी ललकारणं. भीम लढाईसाठी कौरवांना ललकारी तेव्हा त्यांची घबराट उडे असा महाभारतात संदर्भ आहे. सिंह हा प्राणी शिकारीसाठी निघताना हुंकार देतो असं म्हणतात.
हिंदीतले प्रसिद्ध कवी रामधारीसिंह दिनकर यांचा ‘हुंकार’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यात ‘हुंकार’ नावाची कविता आहे ती अशी-
सिंह ही हुंकार हे हुंकार निर्भय वीर नर की
सिंह जब वन में गरजता है
जन्तूओं के शीश फट जाते
प्राण लेख भीत कुंजर भागता है
योगियो मे, पर, अभय आन्नद भर जाता
सिंह जब उनके हृदय में नाद करता है
तर मुद्दा असा की, ‘हुंकार’ हा चांगला, समर्पक शब्द तरुण नेत्यांनी त्यांच्या रॅलीला निवडला. या तरुण नेत्यांची भूमिका त्यातून स्पष्ट होते. या नेत्यांनी केंद्रातल्या भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात हुंकार दिला आहे.
सत्ता ही मोठी अजब व्यवस्था असते. ती एका बाजूला लाभार्थी निर्माण करते आणि दुसऱ्या बाजूला बंडखोरांना जन्माला घालते. सत्ताधारी लोकांपासून तुटायला लागले की, त्यांना बंडखोर का तयार होतात ही प्रक्रिया कळेनाशी होते. मग आणखी गडबडी सुरू होतात. या गडबडीत सत्ताधारी अहंकारी बनत जातात. ते सत्तेचा वापर लोकांना जास्त दाबण्यासाठी करतात. या दाबादाबीत आपल्या चेल्याचपाट्यांच्या, समर्थकांच्या, पाठीराख्यांच्या सत्ता भरमसाठ लाभ पदरात फेकते. पाठीराख्यांना लाभ आणि जनतेला लाथ हा मग सत्तेचा स्वभाव बनत जातो आणि त्यातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लोकांतून आव्हान संघटित होत जाते. लोकांमधून नवे नेते येतात.
सध्या कन्हैयाकुमार, शहला रशीद, जिग्नेश मेवानी, रिचा सिंग, प्रदीप नरवाल या विद्यार्थी तरुण नेत्यांची नावं बघितली तरी हे सत्ताधाऱ्यांच्या करणीतून पुढे आलेले नेते आहेत हे स्पष्ट होतं. जेएनयूमध्ये दडपशाही झाली. तिथं कन्हैया जन्मला. गुजरातमधल्या उनामध्ये दलितांवर अत्याचार झाले. त्यातून जिग्नेश जन्मला. इतर नेतेही याच पद्धतीनं जिथं दडपशाही झाली तिथून उभे राहिले, पुढे आले.
सत्ता दडपशाही दाखवते तेव्हा बंड घडतं, नवे नेते जन्माला येतात. सत्ताधाऱ्यांना ललकारणारा हुंकार निनादतो. १९४२च्या चले जाव आंदोलनाची गेल्या वर्षी आपण पंचाहत्तारी साजरी केली. काय झालं त्या आंदोलनात? ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबईत गांधी, नेहरू, पटेल, आझाद या मोठ्या काँग्रेस नेत्यांना इंग्रजांनी कपटानं अटक केली. हे नेते तुरुंगात टाकले की, लोक चळवळ थांबेल असं इंग्रज सत्ताधाऱ्यांना वाटलं. पण त्या दडपशाही विरोधात रातोरात अरुणा असफअली, जयप्रकाश नारायण, युसुफ मेहरअली, डॉ. राममनोहर लोहिया, एस.एम.जोशी, क्रांतिसिंह नाना पाटील असे नवे नेते विविध स्तरांतून जन्माला आले. ऑगस्ट क्रांतीची चळवळ या नव्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी चालवली. त्यातून स्वातंत्र्यलढा गावागावात गेला. आणि इंग्रजांच्या तख्याला शेवटचा हादरा बसून पुढे स्वातंत्र्य मिळालं.
हाच इतिहास १९७७च्या आणीबाणीत पुन्हा घडला. इंदिरा गांधींचा अहंकार वाढला. त्यांनी देशावर आणीबाणी लादली. इंदिरा समर्थक ‘इंदिरा इज इंडिया’ म्हणायला लागले, तेव्हा लोक खवळले. इथं संबित पात्रा या भाजपच्या गमतीशीर प्रवक्त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पात्रा एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात म्हणाले की, ‘मोदी देशाचे बाप आहेत’. इंदिरा समर्थक आणि मोदी समर्थक किती सारखा विचार करतात नाही? पण लोकांना तो महान विचार आणीबाणीत खटकला.
इतिहासाची कमाल बघा. इंदिराजींना गुजरातच्या तरुणांनी १९७७ साली पहिल्यांदा हुंकार दिला. ललकारलं की दडपशाही नाही चालणार. त्या ललकारण्यातून नवनिर्माण आंदोलनाचा जन्म झाला. गुजरात काय भारी प्रदेश आहे नाही? तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या विरोधात विद्यार्थी-तरुण उभे राहिले आणि नवनिर्माण आंदोलन पाहता पाहता देशव्यापी बनलं. पुढे बिहारमध्ये पसरलं. दिल्लीला जाऊन भिडलं.
गुजरातचे मेवानी हुंकार रॅलीत दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना आता ललकारत आहेत.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशानं बंड केलं. इंदिरा गांधींना आणि ‘इंदिरा इज इंडिया’ म्हणणाऱ्या त्यांच्या समर्थकांना हार पत्करावी लागली.
या नवनिर्माण आंदोलनातून किती नेते पुढे आले बघा. अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर हे आताचे मंत्री तेव्हा बंडखोर तरुण होते. रामविलास पासवान, शरद यादव, नीतिशकुमार, लालुप्रसाद यादव आणि इतर अनेक नवनिर्माण आंदोलनातून पुढे आलेले नेते पुढे देशात विविध पक्षांत मध्यवर्ती भूमिका घेऊन राजकारण करू लागले. २०११ साली अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आम आदमी पक्ष पुढे आला. अरविंद केजरीवाल आणि त्यांचे दिल्लीतल्या मंत्रीमंडळातले सहकारी त्या आंदोलनातून नेते बनले.
सत्ता लोकांपासून लांब जात चालली, दडपशाही करती झाली की, लोकांतून नवे नेते येतात. हे नवे नेते सत्ताधारी झाले की, पुन्हा सत्ता त्यांना रंग दाखवते. सत्ता त्यांना स्वत:मध्ये सामावून घेते. मग अनेकदा जनतेचा भ्रमनिरास होत जातो. सत्ता ही आहेच अशी मायावी चीज.
तरीही सत्तेला ललकारण्याचा पायंडा लोक सोडत नाहीत. सध्याचे तरुण-विद्यार्थी नेते देशभर सत्तेला ललकारत आहेत. त्यामागे हेच सूत्र आहे. दिल्लीच्या रॅलीत या नेत्यांनी सरकारला हुंकार देण्याचं कारण स्पष्ट केलंय. देशात शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. देशभर विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या मिळत नाहीत. अनेक शिष्यवृत्त्यांना कात्री लावलीय. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला दडपण्याचे प्रयोग सुरू आहेत. या दडपशाहीतून हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमूलाची हत्या झाली होती. जेएनयूमध्ये विद्यार्थी भडकले त्याला कारण सरकारनं या विद्यापीठात शिष्यवृत्त्या, इतर अनुदानं बंद केली हे एक मोठं कारण होतं. बनारस हिंदू विद्यापीठात तर मुलींवर दडपशाही केली. मुंबई विद्यापीठात परीक्षांचा निकाल लांबून मुलांचं वर्षं वाया गेलं.
देशात दोन कोटी रोजगार निर्माण करणार असं मोदीजींनी वचन दिलं होतं. प्रत्यक्षात रोजगाराच्या, नोकऱ्यांच्या नावानं बोंब आहे. गुजरातच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल यांनी पाटीदार मुलांच्या रोजगाराचा प्रश्न मुख्य मुद्दा बनवला होता. महाराष्ट्रात वढू, भीमा कोरेगाव इथं जो हिंसाचर उसळला त्यात तरुणांचा सहभाग आहे. हे तरुण नोकऱ्या, रोजगाराच्या प्रश्नांशी संघर्ष करतात. त्यातून आलेल्या निराशेतून ते हिंसक होतात हे आता लपून राहिलेलं नाही. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण या मागण्या आर्थिक प्रश्न विकोपाला गेले म्हणून पुढे आल्यात. तेव्हा विकासाची दिशा चुकतेय की, काय हे या सरकारला तपासून पाहावं लागेल. अन्यथा अहंकारी बनून जनतेपासून तुटून सरकार वागेल, दडपशाही करेल तर या विद्यार्थी-तरुण नेत्यांच्या पाठीमागे लोक उभे राहतील आणि हुंकार आंदोलन देशाची लढाई बनेल हे स्पष्ट आहे. गुजरात ही सध्या बंडभूमी आहे. पण लवकरच देशभर अशी बंडाची बेटं तयार होतील. मोदीजी चतुर सत्ताधारी आहेत. त्यांना या हुंकाराचा अर्थ चांगलाच समजत असणार.
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Amol Gore
Fri , 19 January 2018
या लेखात सर्व गोष्टी प्रत्येक जागी योग्य बसल्या आहेत मात्र शेवट त्यांनी मोदी नावांची गुगली फिरवली आहे कारण ते खुपचं चतुर राजकारणी आहेत हे देशातील त्यांचे विरोधक ही मान्य करतील. अशा तरुण नेत्यांना काही विशिष्ट कालावधीत खूप प्रसिद्ध मिळते मात्र याचा अहंकार परत सत्तेच्या नशेत जनतेसमोर येतो,आणि जनता त्यांना योग्य जागा दाखवते मग ते आधीचे सत्ताधारी असो किंवा नवं हुंकार नेते असो,जनतेला सर्व समान असतात. कारण आता नवं भारतीय मतदार त्यांच्या हक्कांबाबत पहिल्यापेक्षा जास्त जागरूक नक्कीच झाला आहे.
Zenil P
Thu , 18 January 2018
'हुंकार' चळवळ फक्त सत्तेत येण्यासाठी आहे. आणि सत्ता यांना पैसे कमावण्यासाठी हवी आहे, गरिबांना मदत करण्यासाठी नाही
Zenil P
Thu , 18 January 2018
शरद यादव, लालू यादव, नितिश कुमार, पासवान हे नेते १९७७ च्या चळवळीतून पुढे आले, पण त्यामुळे देशाचा काही फायदा झाला का ? हे नेते करोडपती झाले , पण जनता गरीबच राहिली ना ?. त्यामुळे, जनतेने या प्रकरणातून चांगला धडा घेतला आहे. त्यामुळे जनता आता शहला रशिद, उमर खालिद, जिग्नेश, कन्हैय्या कुमार यांच्या नादाला नक्कीच लागणार नाही. कारण जनतेला माहीत आहे की हुंकार रॅलीतून भाषणे ठोकक्णारे हेच ढोंगी युवा नेते पुढे करोडपती होतील पण आपण मात्र गरीबच राहू.