'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' आणि रग्गड पदव्या असलेला मालक
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
बाळासाहेब राजे
  • वसंत लामतुरे अहमदपूरच्या बसस्थानकासमोरच्या 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर'मध्ये 
  • Tue , 16 January 2018
  • पडघम कोमविप वसंत लामतुरे Vasant Lamture ग्रॅज्युएट खिचडी सेंटर Graduate Khichadi Centre पीएच.डी. Ph.D.

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या बसस्थानकासमोर असलेलं 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' नावाचं टपरीवजा हॉटेल नावातील वेगळेपणामुळं लक्ष वेधून घेतं. त्याहूनही चकित करणारी बाब म्हणजे ते चालवणाऱ्या वसंत लामतुरे या तरुणाच्या रग्गड पदव्या! एम. ए., बी. एड, सेट, पेट या पदव्या असूनही हा तरुण हे हॉटेल चालवतो म्हणून त्याचं कौतुक करावं की, उच्चशिक्षित असूनही वशिलेबाजी व पैसा नसल्यामुळे त्याच्यावर ही पाळी आली आहे, म्हणून सामाजिक व शैक्षणिक व्यवस्थेच्या नावानं बोटं मोडावीत हा प्रश्न पडतो. पेट ही पीएच. डी.ची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन वसंत आता स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात 'हिंदी - मराठी दलित आत्मकथाओं का तुलनात्मक अध्ययन' या विषयावर पीएच. डी. करत आहे. त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा जिद्दीचा असून हे सारं त्यानं स्वतःच्या बळावर केलंय हे विशेष.

अठरावविश्वे दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. वसंत हे अकरावं अपत्य असून शेंडेफळ आहे. अकरापैकी चार बालकं दगावली. उरलेल्या सातपैकी चार भाऊ, तर तीन बहिणी. वडील हिरामण लामतुरे हे लाकडं फोडायचे, तर आई गयाबाई निंदण, खुरपण, गवत कापणं यासारखी शेतमजुरीची कामं करायची. कळत्या वयात शाळेत जाणारा वसंत केसाला लावायला खोबरेल तेल हवं म्हणून हट्ट करी, तेव्हा "तू मोठा झालास की आपण खोबरेल तेल आणू" म्हणून आई त्याची समजूत घालत असे.

बालवयातल्या गरिबीच्या चटक्यांनी वसंतला अकाली प्रौढत्व आलं. पैसा कमावल्याशिवाय कुटुंबाचा गाडा ओढणं अशक्य आहे, हे ओळखून त्यानं आयटीआयचा कोर्स पूर्ण करताच पुणं गाठलं. पुण्यातल्या एका कंपनीत तुटपुंज्या पगारावर फिटरचं काम करत असताना त्याच्यासमोर झालेल्या अपघातात एका बंगाली कामगाराला आपला जीव गमवावा लागला. दुर्दैवानं आपलाही असाच अपघात झाला तर आपल्या आई-वडिलांवर कोणती आपत्ती कोसळेल, म्हणून त्यानं पुणं सोडलं आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

सकाळी सहा वाजल्यापासून घरोघर जाऊन वर्तमानपत्रं टाकायची, सव्वाआठ ते दोन वाजेपर्यंत कॉलेज करायचं, कॉलेजहून आल्यावर पाच वाजेपर्यंत रिक्षा चालवायची, पाच ते आठ वाजेपर्यंत पिग्मी एजंट म्हणून काम करायचं आणि रात्री डोळ्याला डोळा लागेपर्यंत अभ्यास करायचा, पुढची आठ वर्षं हीच त्याची दिनचर्या झाली. खेळकर वृत्तीचा वसंत घरोघर जाऊन वर्तमानपत्रं टाकण्याच्याकामाला 'Morning Walk With Earning' असं म्हणतो. वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यावर तो अभ्यासाचे पॉइंट लिहिलेला कागद डकवत असे नि ते पॉइंट घोकत घोकत सायकलला पायंडल मारत असे.

वसंत कॉलेजला शिकत होता तेव्हाचा एक प्रसंग आहे. बऱ्याचदा पुस्तकं, वह्या घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसत. त्यावेळी अहमदपूरच्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर असलेला इसम डॉक्टरचे कपडे इस्त्रीसाठी घेऊन येत असे. त्यावेळी एका ड्रेसच्या इस्त्रीला पाच रुपये दर होता. वसंतने त्या इसमाला पटवलं. एका ड्रेसमागे एक रुपया कमिशन देऊन वसंत स्वतःच इस्त्री करू लागला आणि त्यानं पैशाचा प्रश्न काही अंशी का होईना सोडवला.

एके दिवशी वसंतच्या मनात विचार आला, रिक्षाचा नंबर यायला दोन तास वाट पहावी लागते आणि एका फेरीत कमाई होते फक्त वीस-तीस रुपये. याऐवजी आपण छोटंसं हॉटेल सुरू केलं तर? त्यानं आपला मनोदय आईला सांगितला. त्याची आई म्हणाली, "वसंता, इमानदार माणसाच्या हातातल्या मातीला सोन्याचं मोल असतंय. तू इमानाला जाग. तुला काई कमी पडणार न्हाई." पदवीचं शिक्षण घेताना दहा-बारा विद्यार्थ्यांना स्वतः स्वयंपाक करून डबा पुरवण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी होताच. त्याचा उपयोग या व्यवसायात खूप झाला. बी.ए., राज्यशास्त्र व हिंदीत एम. ए., बी. एड अशा चढत्या क्रमानं तो शिकत राहिला.

अहमदपूरपासून जवळच असलेल्या माळेगावला मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाची मोठी यात्रा भरते. नेमकं या यात्रेच्या वेळी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत रस्त्याकडेची अनेक छोटी छोटी दुकानं, टपरीवजा हॉटेलं उठवली गेली. आता काय करायचं हा प्रश्न आ वासून त्याच्यापुढे होता. त्यानं आपलं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेतलं आणि माळेगाव गाठलं आणि यात्रेत खिचडी भज्याचं हॉटेल थाटलं. यात्रेत बऱ्यापैकी गिऱ्हाईक होतं. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खपल्यावर चार पैसेही गाठीशी उरत. याच वेळी एम. ए.चं सेमिस्टर चालू होतं. कसाबसा एक पेपर देऊन त्यानं परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. यात्रेच्या धावपळीत त्याचा अभ्यासही झाला नव्हता आणि काम नाही केलं तर घर कसं चालणार? चौथ्या सेमिस्टरला तो सर्व पेपरमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. काही दिवसानंतर पुन्हा अहमदपूरमध्ये त्याचं टपरीवजा हॉटेल सुरू झालं. पुढे तो हिंदी विषयाची सेट परीक्षाही उत्तीर्ण झाला. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळते. सेट परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण नगण्य असतं.

चार पुस्तकं शिकली, एक दोन पदव्या मिळवल्या की, नोकरी मिळेल याची खात्री हल्ली कुणी देऊ शकत नाही. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसारखी आठ-दहा शहरं सोडली तर इतर ठिकाणी रोजगाराच्या नावानं बोंबच आहे. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत शिकून धड शिक्षणात अव्वल नाही आणि कष्टाची कामं करायला लाज वाटणारी पिढी वर्षानुवर्षं तयार होतेय. कदाचित तत्कालीन इंग्रज सरकारनं लागू केलेली कारकून निर्माण करणारी शिक्षण पद्धती अंधपणे राबवत असल्याचा हा परिणाम असावा. सुशिक्षित बेरोजगार नावाचं न दिसणारं लेबल लावून हे तरुण आपल्या आसपास फिरताना आढळतात. यातले बरेच व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर पडिक राहून आपली हुशारी वाया घालवत असल्याचं चित्र सामान्य आहे.

वसंतच्या गाड्यावरचं 'नोकरी लागत नाही म्हणून काय झालं? काम करताना लाजायचं नसतं,' हे वाक्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांना खूप काही सांगतं. वसंतच्या 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर’वर दररोज सत्तर ते ऐंशी किलो तांदळाची खिचडी शिजवली जाते. गरमागरम भजी आणि वडापावचा हिशोब वेगळाच. एका ग्रॅज्युएट तरुणाच्या खिचडी सेंटरमुळे दहा-बारा लोकांना नियमित रोजगार मिळाला आहे.

दोन-तीन ठिकाणी प्राध्यापक पदाच्या मुलाखती दिल्यावर वसंतला चांगलाच अनुभव आला. दोन ठिकाणी हा माणूस खालच्या जातीतला आहे, अध्येमध्ये काही भानगड झाली तर उगाच अॅट्रोसिटीचं लफडं नको म्हणून त्याच्या पात्रतेला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आणखी एका शिक्षण संस्थेत असलेला डोनेशनचा आकडा पाहून सेट उत्तीर्ण असण्याला काडीचीही किंमत नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याचं वसंत सांगतो.

राजकारण हे मानवी जगण्याचं अविभाज्य अंग आहे. त्यापासून कुणीही अलिप्त राहू शकत नाही. वसंतही राजकारणाच्या धामधूमीपासून स्वतःला दूर ठेवू शकला नाही. अहमदपूर नगरपालिकेच्या मागील दोन निवडणुका वसंतानं लढवल्या. मात्र शिक्षणातली गुणवत्ता त्याला विजय मिळवून देऊ शकली नाही. राजकारणात निव्वळ गुणवत्ता असून चालत नाही, खिसाही गरम असावा लागतो, याचं भान आता त्याला आलं आहे.

वसंतची आई गयाबाई निरक्षर आहे, काबाडकष्ट करून तिनं त्याला शिक्षण दिलं, कळत्या वयाचा झाल्यापासून वसंत स्वतः कमवून शिक्षण घेतोय. बिकट परिस्थितीत एखाद्याचं शिक्षण पूर्ण झालं नसतं, धडपड करून शिक्षण घेतल्यावरही एखाद्यानं डोनेशनचा आकडा पाहून नोकरीचा नाद सोडला असता. पण वसंतचा निर्धार पक्का आहे. कितीही अडचणी आल्या तरी हसत हसत त्या अडचणींचा डोंगर पार करून तो आता पीएच.डी. करतोय. त्याला प्राध्यापक व्हायचंय. निरोप घेताना वसंतची आई पाणावलेल्या डोळ्यानं म्हणाली, "माजा वसंत खरंच मास्तर व्हईल का?"

.............................................................................................................................................

लेखक बाळासाहेब राजे ग्रामीण भवतालाची स्पंदनं टिपणारे मुक्त लेखक आहेत.

spraje27@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Namdev PANCHAL

Sun , 25 October 2020

Very nice writing, and more inspiration story of Vasant lamture.


vishal pawar

Sun , 21 January 2018

त्रिवार सलाम....


Prashant

Tue , 16 January 2018

good


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......