अजूनकाही
१. स्वित्झर्लंडची लष्करी ताकद भारताच्या दहा टक्केही नाही; त्यामुळे, भारत सरकार तिथून भारतीयांनी दडवलेला काळा पैसा आणल्याशिवाय राहणार नाही : बाबा रामदेव
पतंजलीची गोमूत्रमिश्रित भांगही आलीये काय बाजारात? भारत कुठे, स्वित्झर्लंड कुठे? लष्करी ताकदीचा संबंध काय? बाबा थंड घ्या जरा… हवं तर तेही पतंजलीने बनवलेलं (म्हणजे कुणाच्या तरी बाटलीतून काढून आपल्या बाटलीत भरलेलं) घेतलंत तरी चालेल!!!
....................
२. गोरगरिबांचा बँकेत जमा झालेला पैसा मोदी मोजक्या उद्योजकांना देणार. गेल्या वर्षभरात सरकारने १५ उद्योगपतींची मिळून १ लाख १० हजार कोटींची कर्जे माफ केली आहेत. ही तूट भरून काढण्यासाठी सामान्यांच्या खिशातून बँकेत आलेल्या पैशांचा वापर केला जाईल : राहुल गांधी
आरोप गंभीर आहे, विचारात पाडणाराही आहे, त्यामुळे तो तुम्ही केलाय यावर चटकन् विश्वास बसत नाही चटकन, 'रागा'वू नका हं पटकन्. शिवाय, हे सगळे उद्योगपती तुमच्या सत्ताकाळात समाजवादी साथी बनून एकसुरात देशोन्नतीचा राग आळवतानाही दिसले नव्हते. त्यांना तुम्हीच पोसून, तुस्त करून ठेवलेले आहेत, त्याचं काय?
....................
३. हरियाणातील कर्नालमध्ये एका लग्नसमारंभात हिंदू महासभेच्या स्वघोषित साध्वीने आणि तिच्या अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक ठार, तीन जखमी
हिंदू धर्माची अद्भुत व्यापकता दाखवणाराच हा प्रकार आहे. स्वत:ला साध्वी म्हणवून घेण्यासाठी जिने सर्वसंगपरित्याग केलेला असला पाहिजे, ती लग्नसमारंभात आनंदित होऊन नाचते; जिच्या मनातून किडेमुंगींबद्दलचीही हिंसेची भावना निपटून गेली पाहिजे, ती बंदुका झाडण्यासारख्या हिंस्त्र प्रकारांनी आनंद साजरा करते, यातून काय दिसतं. या बयेने हिंदूंना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं होतं, एक देशसेवेला, एक गोसेवेला, एक हिंदु महासभेला आणि एक मातापित्यांच्या सेवेला (नशीब!) अर्पण करावा, असं तिचं म्हणणं होतं. आता आणखी दोनचार मुलं प्रत्येकानेच जन्माला घालायला हवीत, हिला आनंदाचं भरतं येऊन गोळ्या झाडाव्याशा वाटल्या तर त्या खाऊन मरायला नकोत का कोणी?
....................
४. कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री तन्वीर सेत हे जाहीर कार्यक्रमात पॉर्न पाहताना सापडले होते; ते पॉर्न पाहात नव्हते, तर अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलोनिया हिचे फोटो पाहात होते, असा बचाव पुढे आला आहे.
मेलोनिया ही पूर्वाश्रमीची मॉडेल आहे आणि तिचे काही फोटो पाहणं हे पॉर्न पाहण्यापेक्षा वेगळं नाही, हे आम पब्लिकला माहिती नसेल का सेत काका? आता सगळ्यांच्या हातात मोबाइल आहे, इंटरनेट आहे, डेटा पॅक आहे आणि ट्रम्पची चर्चा सुरू झाल्यापासून सगळे मोबाइलवर फोटो पाहतायत ते कोणाचे? डोनाल्ड ट्रम्पचे?
....................
५. कठीण समयीच ‘देशभक्ती’ची कसोटी लागते, अन्यथा इतर वेळी आरामखुर्चीवर बसून प्रत्येकजण देशभक्त बनलेला असतो : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव
सांगा पाहू राम माधव यांनी हे विधान कुठून केलं?
अ. सियाचेनमधून, ब. कारगिल-द्रासमधून, क. नोटा बदलून घेण्यासाठी लावलेल्या रांगेतून आणि ड. आरामखुर्चीत बसून
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment