राजकुमार राव : अर्थपूर्ण अभिनयाचा खळाळता झरा (पूर्वार्ध)
कला-संस्कृती - ‘किमयागार’ कलाकार
प्रा. कमलाकर सोनटक्के
  • राजकुमार राव
  • Sat , 13 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कलाक्षेत्रातले किमयागार कमलाकर सोनटक्के Kamlakar Sontakke राजकुमार राव Rajkumar Rao

मराठी-हिंदीतील लक्षणीय कामगिरी केलेल्या, करत असलेल्या कलाकारांचा धांडोळा घेणारं हे साप्ताहिक सदर... दर शनिवारी व रविवारी प्रकाशित होईल.

.............................................................................................................................................

राजकुमार राव हे नव्या पिढीच्या अत्यंत ऊर्जावान कलाकारांमधील खूपच वरचं नाव. त्यानं आपल्यातील अभिनय क्षमतेला खूप लवकर जोखलं आणि विविध प्रकारच्या, अगदी टोकाच्या भूमिकांमधून स्वतःला अभिव्यक्त केलं. हरियानातल्या गुरुगावमधल्या मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेल्या या कलावंतानं साऱ्या चित्रपटसृष्टीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

सुरुवातीच्या काळातील वेगवेगळ्या भूमिका

राजकुमारला शालेय जीवनापासूनच रंगभूमीचं वेड होतं. शाळेत असताना त्यानं नाटकांत आणि नृत्याच्या अनेक कार्यक्रमांत भाग घेतला. नंतर दिल्लीच्या श्रीराम सेंटरमध्ये दोन वर्षांच्या अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. भारती शर्मा यांच्या रेपट्री थिएटरमध्ये काम केलं. याच काळात आत्माराम कॉलेजमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अॅक्टिंग कोर्ससाठी फॉर्म भरला. सुदैवानं तिथं निवड झाली. तिथं त्यानं दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. २००८ मध्ये तो मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी आला. २००९ मध्ये दिवाकर बॅनर्जी यांच्याबरोबर ‘लव्ह, सेक्स और धोका’ हा सिनेमा केला. तो २०१० मध्ये रिलीज झाला. त्यानंतर त्याला एकापाठोपाठ सिनेमे मिळत गेले.

एकत्र परिवाराचे पोषक संस्कार

त्याच्या परिवारात नाटकं, सिनेमा या क्षेत्राशी कुणाचाही काही संबंध नव्हता. पण परिवारातले सारे लोक चित्रपट बघण्यात खूप रस दाखवायचे. सारे एकत्र बसून अंगणात व्हीसीआरवर एकाच वेळी दोन-दोन चित्रपट बघायचे. एकत्र परिवार असल्यानं हा एक आनंद सोहळाच असायचा. मनातल्या मनात राजकुमार स्वतःला त्या चित्रपटांतील भूमिकेत बघायचा. त्याच्या घरच्या लोकांनी त्याला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. ते प्रत्येक गोष्टीत त्याला प्रोत्साहन द्यायचे. त्यांनी कधीही अभ्यासासाठी त्याला आग्रह केला नाही. तो आपले मार्शल आर्टस्, स्पोर्टर्स, डान्स सारखे छंद जोपासत, जबाबदारीन, आपल्या अभ्यासातही प्रगती करतो, तो जबाबदार आहे, याचा त्यांना अभिमान असायचा. दांडगाई करतो, खोड्या करतो, पण अभ्यासही तेवढ्याच जबाबदारीनं करतो, याचं त्यांना समाधान होतं. त्यामुळे त्यांनी कधीही अभ्यासासाठी त्याच्यावर कधी कुठल्या अटी लादल्या नाही. राजकुमारचे वडील हरयाना शासनात पटवाऱ्याच्या हुद्द्यावर काम करत होते. नुकतेच ते रिटायर झाले. त्याची आई हाऊसवाईफ आहे.

पुण्याच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटनं त्याच्या चित्रपटविषयक जाणिवा खूप समृद्ध केल्या. चित्रपट चांगला, समृद्ध करण्यासाठी जागतिक सिनेमात लोक किती झोकून देऊन काम करतात, याची जाणीव त्याला व्हायला लागली. चांगला अभिनय काय असतो हे कळायला लागलं. अभिनयातले बारकावे कळायला लागले. त्यातले कोणते घटक कशा पद्धतीनं काम करतात, हे हळूहळू उलगडायला लागलं.

अभिनयाच्या क्षेत्रात कुठले भारतीय किंवा जागतिक कलावंत राजकुमारला आदर्शवत वाटतात, कुणापासून त्याला प्रेरणा मिळते, कुणासारखं व्हावं असं त्याला वाटायचं, वाटतंय यावर त्याचं अगदी साधं उत्तर आहे. वर्ल्ड सिनेमातले एक अभिनेते आहेत - डेनॉल्ड लुईस, ज्यांना तीन वेळा ऑस्कर पुरस्कार मिळाला - ते त्याला आदर्शवत वाटतात. त्यांचं डेडिकेशन, पॅशन त्याला खूप प्रभावित करतं. त्यांचा आपल्या पात्रापर्यंत पोचण्याचा विशिष्ट मार्ग आहे, एकाग्रता आहे, परिश्रम आहेत ते त्याला आदर्शवत वाटतात. असं वाटतं की त्यांच्या वाटेवर मार्गक्रमण करावं, पण ते तसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीत अमलात आणणं महाकठीण आहे. कारण त्यांच्यासारखा कलावंत तीन-चार वर्ष एकच फिल्म करत असतो. आपल्याकडे असा विचारसुद्धा विक्षिप्त वाटेल. तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. पण असं वाटतंय की, एक दिवस असाही येईल की, आपणही त्याच्या सारखंच काम करू शकू.

भारतीय चित्रपटसृष्टीत दिलीपकुमार यांच्या अभिनयानं राजकुमार खूप प्रभावित आहे. इरफान खान, आमीर खान, मनोज वाजपेयी हे कलावंतही त्याला खूप आवडतात, प्रभावी वाटतात.

प्रेक्षकांशी कनेक्टिव्हीटी मोठा प्रेरणास्रोत

अशी कुठली गोष्ट आहे, ज्यामुळे एवढ्या कमी कालावधीत राजकुमारला नॅशनल अॅवार्ड विनर अॅक्टर बनण्याचा बहुमान मिळाला? त्याच्या व्यक्तिमत्त्वात असं कोणतं विशेषण आहे, ज्यामुळे त्याच्या यशाचे मार्ग सुकर झाले? कुठली अशी गुणवत्ता आहे जिला खतपाणी घालायला, तिची भविष्यात वाढ करायला त्याला आवडेल?

यावर राजकुमार अगदी साधं उत्तर देतो. त्याच्या मते लोक/प्रेक्षक त्याच्याशी सहज कनेक्ट करू शकतात. प्रेक्षकांना तो विश्वसनीय वाटतो. त्यांना त्याचं प्रत्येक पात्र त्यांच्यातलंच, त्यांच्या परिसरातलं वाटतं. ते सामान्य जीवनातलं वाटतं. १० लोकांशी मारधाड करणारं, कुठली अचाट शक्ती असलेलं वगैरे ते वाटत नाही. तो हीरो बनून येत नाही. तो बिल्डिंगवरून उड्या मारत नाही. सामान्य असण्याची ही एक बाब आहे. जी लोकांना कनेक्ट करते. त्याचं सामान्यांसारखं असणं, सामान्यांसारख्या प्रतिक्रिया देणं, हे त्यांना जवळचं वाटतं.

लोक राजकुमारशी कनेक्ट करतात, म्हणजे नेमकं काय करतात? तो असं विशेष काय करतो? याचं उत्तर राजकुमार अगदी सोप्या शब्दांत देतो. त्या कथेतले त्याचं पात्र कुठल्या प्रांत प्रदेशातलं आहे, त्याच भाषा कशी असेल, त्याचं दिसणं, वागणं, अंगचलन कसं असेल याचा तपशीलात जाऊन तो विचार करतो. याशिवाय कॅमेऱ्याच्या समोर जे क्षण आपण जगतो आहोत ते क्षण खरे असावेत, त्यात कुठल्याही प्रकारची बेईमानी असता कामा नये याचा विचार तो करतो. केवळ आपण या अँगलमध्ये चांगले दिसतो म्हणून मुद्दाम त्या अँगलनं शॉट द्यावेत असले बाह्य आडाखे त्याच्या मनात कधीच नसतात. प्रत्येक क्षण खरा असावा यावर त्याचा भर असतो. आपल्या आजूबाजूला किती लोक आहेत, ते कसा प्रतिसाद देताहेत याची त्याला पर्वा नसते. एवढंच काय अगदी कॅमेरासुद्धा आहे किंवा नाही याचीदेखील पर्वा नसते. त्यावेळी तो ते पात्र इमानदारीनं जगत असतो. लोकांना हा खरेपणा, हा प्रामाणिकपणा दिसत असावा असं त्याला वाटतं.

रिकामा वेळ आणि काम शोधण्याची प्रक्रिया

जेव्हा शूटिंग, मिटिंग किंवा डबिंग नसतं तेव्हा राजकुमार आपला वेळ कसा घालवतो? तसा संपूर्ण रिकामा वेळ क्वचितच मिळतो. मिटिंग, नरेशन, भेटीगाठी हे निरंतर चालू असतं. थोडा गॅप असेल तर राजकुमार प्रवास करतो. युरोपात किंवा न्यूयार्कला जातो. आठ-दहा दिवस बाहेर जाऊन फ्रेश होऊन परततो.

प्रवासाव्यतिरिक्त चरित्र आणि आत्मचरित्र वाचायला राजकुमारला खूप आवडतात. लोकप्रिय, जागतिक स्तरावरील व्यक्तींची चरित्रं तो वाचतो. त्याचा असा विश्वास आहे की, जगातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट कॅरेक्टर दडलेलं असतं. प्रत्येकाच्या जीवनात काही गोष्टी असतात. या वाचनातून त्याला प्रेरणा मिळते.

काही कलावंत स्वतःला रुचेल, पटेल अशाच प्रोजेक्टमध्ये काम करतात. मग भलेही वर्षाला एक सिनेमा झाला तरी बहेतर. दुसऱ्या प्रकारचे कलावंत जे मिळेल ते काम करायला तयार असतात. अॅक्टिंग त्यांचा पेशा असतो आणि कुठल्याही कामाचा त्यांना विधिनिषेध नसतो. या दोन प्रकारच्या लोकांपैकी राजकुमार स्वतःला कुठल्या सेटअपमध्ये बघतो? राजकुमार उत्तम संहितेला प्रथम क्रमांक देतो. कारण त्या चित्रपटावर जीवनातले तीन-चार महिने आपण देतो. ते सार्थकी लागावेत असं त्याला वाटतं. जोपर्यंत त्याला त्या गोष्टीवर, त्या टीमवर विश्वास बसत नाही, तोपर्यंत तो ते प्रोजेक्ट स्वीकारत नाही. या देशातल्या सर्वोत्तम नटांपैकी एक असावं अशी त्याची महत्त्वाकांक्षा आहे. १०० वर्षांनंतर पाच नटांचा जेव्हा विचार केला जाईल, तेव्हा त्यात आपलंही नाव असावं अशी त्याची महत्वाकांक्षा आहे. पाच गर्भश्रीमंत नटांमध्ये आपलं नाव असावं असं त्याला कधीच वाटत नाही. तुम्ही चांगलं काम करता तेव्हा लोक तुमचा मानसन्मान करतातच आणि शिवाय ठीकठाक पैसाही मिळत असतोच.

बालपणातील स्वप्न आणि पुढील काळातील आव्हानं

राजकुमार रावनं गुरुगावात शाळेत असताना जी स्वप्न बघितली होती, ती खूपच वेगळी होती. त्याला त्यावेळी एकदम हिरो व्हायचं होतं. वलयांकित हिरो. त्या काळात जी काही लोकप्रिय सिनेमे बघायचा. आठवडाभर तरी त्या चित्रपटाच्या नायकाच्या अवतारातच तो वावरायचा. त्याची ही झिंग दुसरा लोकप्रिय सिनेमा बघेपर्यंत टिकायची. दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या नायकाचं भूत सवार व्हायचं. जेव्हा तो पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटला गेला तेव्हा अचानक सारंच बदललं. तिथल्या वास्तव्यात तुम्हाला जागतिक सिनेमाचं दर्शन होतं. डोळे दिपून जावेत अशा दर्जाचे सिनेमे बघायला मिळतात. ते समजून घेण्याचं, आत्मसात करण्याचं शास्त्र शिकवलं जातं. अभिनय करण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. अभिनय म्हणजे केवळ देखणेपणा किंवा सिक्स पॅक बॉडी किंवा बाह्य सौंदर्यदर्शन नाही. त्याच्या पलीकडचं, खूप गंभीर स्वरूपाचं काहीतरी आहे याची जाणीव समृद्ध केली जाते. अभिनयाचा कॅनव्हास एवढा विशाल आहे की, जीवनभर जरी तुम्ही शोध घेत राहिलात तरी तो पूर्णपणे हाती लागू शकणार नाही. प्रत्येक क्षण तुम्ही शोध घेत असता काहीतरी नवं शिकत असता. अनेक जागितक स्तरांवरच्या यशस्वी अभिनेत्यांच्या जीवनाविषयी, यशापयशाविषयी, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी शिकायला मिळतं. निरंतर वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या शैलीतले सिनेमे बघायला, अभ्यासायला मिळतात. फिल्म इन्स्टिट्यूटचं एक्सपोजर मिळालं नसतं तर कदाचित आपल्या व्यवसायिक जीवनात आणि व्यक्तिगत जीवनात ती परिपक्वता आली नसती असं त्याला वाटतं.

प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना धक्का देणारा कलावंत

राजकुमार आपल्या प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांना एक धक्का देऊन विस्मित करतो. याच्या मुळाशी त्याची नवं आव्हान स्वीकारण्याची आणि झोकून देऊन काम करण्याची जिद्द कारणीभूत आहे. एकसारखं सोयीस्कर काम करणं, सुरक्षित राहणं त्याला अतिशय एकसुरी आणि बोअरिंग वाटतं. कुठलीही भूमिका स्वीकारताना जे पूर्वी केलं नाही ते करण्याकडे त्याचा कल असतो. काहीतरी नवं शोधण्याची, नवं देण्याची त्याची वृत्ती आहे. ‘बहेन होगी तेरी’, ‘बरेली की बर्फी’ हे अतिशय फॅन्टॅस्टिक सिनेमे होते. नवं काही करण्याची त्यात शक्यता होती.

‘बहेन होगी तेरी’ हा नावातून एक कॉमेडी सिनेमा आहे याची कल्पना येते. या पूर्वी राजकुमारची गंभीर प्रवृत्तीचे सिनेमे करणारा कलाकार अशी प्रतिमा होती. मात्र हे आणि अशा प्रकारचे सिनेमे करून आपल्या पूर्वप्रतिमेला तोडण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. मात्र आजही त्याचं मन ‘शाहिदी’, ‘ट्रॅप्ड’ आणि ‘न्यूटन’सारख्या सिनेमांतही तेवढंच रमतं. गंभीर चित्रपटांना तिकिट खिडकीवर अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, हे दिसत असूनही राजकुमारला तसे सिनेमे करण्यात मजा येते. ‘शाहिदी’ आणि ‘ट्रॅप्ड’सारख्या सिनेमांची प्रक्रिया त्याला एवढी उत्तेजना देणारी, समाधान देणारी होते की, तो त्यातला प्रत्येक क्षण जगला. ते शूट करून आल्यावर काहीतरी जादूई घडल्याचं त्याला समाधान मिळालं. काहीतरी मिळाल्याचं, गवसल्याचं समाधान मिळालं. कलावंत म्हणून तो अशा क्षणाची वाट बघत असतो. सतत भुकेला असतो असे क्षण निर्माण होण्याची...

या लेखाच्या उत्तरार्धासाठी पहा - 

राजकुमार राव : अर्थपूर्ण अभिनयाचा खळाळता झरा (उत्तरार्ध)

.............................................................................................................................................

लेखक प्रा. कमलाकर सोनटक्के ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.

sontakkem@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख