अजूनकाही
महाराष्ट्रात आणि एकूणच भारतात 'मामी'नंतर (मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज) साधारण 'पिफ'चं (पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल) नाव घेतलं जातं. दरवर्षी 'मामी'नंतर पार पडणाऱ्या काही महत्त्वाच्या फिल्म फेस्टिव्हल्सपैकी एक म्हणजे 'पिफ'. याही वर्षी आज, ११ जानेवारीपासून पुण्यात आणि सोबतच पिंपरी चिंचवडमध्ये हा फेस्टिव्हल सुरू झाला. त्यानिमित्तानं पुणेकरांना दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी काही निवडक नवे-जुने चित्रपट पहायला मिळत आहेत. अठरा जानेवारीपपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यातील महत्त्वाचे चित्रपट आणि घडामोडी ‘अक्षरनामा’च्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमानं हा १६वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल उर्फ पिफ महोत्सव सुरू झाला. २००२ पासून दरवर्षी भरणाऱ्या या महोत्सवात या वर्षी 'युथ' या थीमसह एकंदर दोनशेहून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत.
सिटी प्राइड कोथरूड हे महोत्सवाचं मुख्य ठिकाण असलं तरी सिटी प्राइड सातारा रोड, नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया, मंगला मल्टिप्लेक्स आणि कार्निवल सिनेमाजमध्येही या महोत्सवातील चित्रपट पाहता येत आहेत. शिवाय या वर्षी पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयोजनानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आणि इथंही जवळपास चाळीसेक चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यामुळे जगभरातील निवडक चित्रपटही तेथील प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत.
गेल्या वर्षीचे 'मामी' आणि 'इफ्फी' हे दोन्ही फिल्म फेस्टिव्हल काही ना काही कारणानं वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आणि परिणामी अनेक चित्रपटप्रेमींनी त्या दोन्हींवर टीका केली होती. पिफबाबत तसं होण्याची शक्यता सध्या जरी दिसत नसली तरी मराठी चित्रपटांच्या स्पर्धेत 'रेडू' (रेडिओ) चित्रपटाला स्थान दिलं गेलेलं नाही. पण त्याऐवजी हा चित्रपट स्पर्धेव्यतिरिक्त असलेल्या इतर चित्रपटांसोबत दाखवण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.
याबद्दल पिफच्या संयोजकांनी 'मराठी विभागाच्या स्पर्धेतील हा एकमेव चित्रपट आहे जो कायरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल इंटरनॅशनल फिल्म स्पर्धेच्या विभागात दाखवला गेला होता, म्हणूनच तर फक्त स्पर्धेतून बाहेर ठेवतोय' अशा अर्थाचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावरून अगदी वाद नसला तरी दिग्दर्शक सागर वंजारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “हा चित्रपट कोलकाता आणि 'इफ्फी'मध्येही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या 'स्पर्धेत' सहभागी झाला होता, पण फक्त 'पिफ'लाच यात अडचण का वाटली, हे कळालं नाही”, अशा या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या भावना आहेत.
त्यामुळे बाकी काही होवो न होवो पण पिफला हजेरी लावणारे लोक एका चांगल्या चित्रपटाला मुकतील असं वाटतंय. याव्यतिरिक्त मराठी चित्रपटांबाबत बोलायचं झाल्यास ‘फास्टर फेणे’, ‘मुरांबा’ आणि ‘कच्चा लिंबू’ हे प्रदर्शित आणि ‘व्हिडिओ पार्लर’, ‘पिंपळ’, ‘म्होरक्या’, ‘झिपऱ्या’, ‘नशीबवान’, ‘बबन’ असे इतर सहा अप्रदर्शित चित्रपट पाहायला मिळणार आहेत.
या वर्षी रेट्रोस्पेक्टिव्ह फिल्म्स या श्रेणी अंतर्गत इंगमार बर्गमन या प्रख्यात चित्रपट दिग्दर्शकाचे 'सॉडस्ट अँड टिन्सेल' (Sawdust and tinsel), 'समर विद मोनिका' (Summer with Monika), 'द सायलन्स' (The Silence), 'थ्रू अ ग्लास डार्कली' (Through a glass darkly) आणि 'ऑटन सोनाटा' (Autumn sonata) असे काही नावाजलेले चित्रपट पहायला मिळतील. शिवाय याच श्रेणी अंतर्गत राज कपूर यांचे 'आग', 'बॉबी', 'मेरा नाम जोकर' आणि 'संगम' हे चार चित्रपट दाखवण्यात येतील. आणि विशेष म्हणजे चिंचवडमधील महोत्सवाचं उद्घाटनही रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्या हस्ते करण्यात आलं.
इतके सगळे प्लस पॉइंट्स असले तरी 'पिफ'मध्ये पहिल्याच दिवशी नियोजनाचा अभाव दिसून आला. साडेसात वाजता सुरू होणं अपेक्षित असलेली 'मेन डोन्ट क्राय' ही Alen Drljević दिग्दर्शित बोस्नियन-स्लोवेनियन ओपनिंग फिल्मच आठच्या सुमारास सुरू झाली. शिवाय ही फिल्म एकाच स्क्रीनला दाखवली गेल्यानं बराच गोंधळ आणि जागेचा प्रश्नही निर्माण झाला. पण ते एकवेळ ठीक आहे. आता पुढील सर्व दिवस तरी किमान स्क्रीनिंग टाइम पाळला जावा, अशी अपेक्षा आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment