अजूनकाही
साधारणतः एक महिन्यापूर्वी अनुराग कश्यपच्या ‘मुक्काबाज’चा ट्रेलर आला होता. ट्रेलर काहीसा सामान्यच वाटला होता, पण अनुरागचा सिनेमा असल्यानं यात काहीतरी वेगळं असणार हे निश्चितच होतं. पण पुढील आठवड्यात युट्युबवर विनीत कुमार सिंहची 'स्पिरीट ऑफ मुक्काबाज' ही क्लिप आली. ज्यात त्यानं त्याच्या भूमिकेसाठी केलेली मेहनत दाखवण्यात आली होती. २०११ मध्ये विनीतचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला विनीत अगदीच सडपातळ होता, दोन वर्ष त्यानं चांगली शरीरयष्टी बनवण्यासाठी दिली. त्यानंतर पैशांसाठी आपलं सगळं सामान विकून विनीत बॉक्सिंगच्या ट्रेनिंगसाठी पंजाबला निघून गेला.
३५ वर्षाचे होईपर्यंत बहुतेक बॉक्सर्स निवृत्त होतात, पण विनीतनं ३६व्या वर्षी बॉक्सिंग सुरू केली. सकाळी पाच वाजता तो सगळ्या विद्यार्थ्यांच्या आधी ट्रेनिंगला येऊन पोचायचा आणि दिवसभरातही मिळेल त्याच्याकडून तो जमेल तसं शिकून घ्यायचा. सुरुवातीला सगळ्यांना वाटायचं की हा तर नट आहे, मुंबईहून आलाय, याला तर फंडिंग येत असेल, हा काय ट्रेनिंग करेल? म्हणून टीचर्सपासून बॉक्सर्सपर्यंत सगळे विनीतपासून लांब राहायचे. मग त्यांच्याशी जवळीक करण्यासाठी आणि बॉक्सिंगबद्दल आपण किती सिरियस आहोत, हे दाखवण्यासाठी विनीत सर्वांत आधी पोचून, जिमला झाडू मारायचा, पुसून काढायचा, बॉक्सर्सला टॉवेल, पाणी आणून द्यायचा. महिनाभर विनीतचा हा नित्यक्रम सुरू राहिला आणि त्यानं टीचर्स आणि बॉक्सर्सची मनं जिंकली. आपण नट असल्याचा तोरा त्यानं कधीच बाळगला नाही किंवा त्याच्याकडे ती लिबर्टीही नव्हती.
कारण विनीत काही फार मोठा नट नव्हता. त्यानं सगळ्या सिनेमात सहकलाकाराचीच भूमिका केली आहे. ज्यातील बहुतांश सिनेमे हे अनुराग कश्यपचेच होते. अनुरागनं सुरुवातीलाच विनीतला सांगितलं होतं की, “मी तुझ्यासोबत तेव्हाच हा सिनेमा करेन, जेव्हा तू बॉक्सर बनशील.” अनुरागच्या याच शब्दांना प्रमाण मानून घर-दार सोडून विनीत पंजाबमध्ये मुक्के खात होता. कधी ओठ फाटला, कधी जबडा-डोळा सुजला तर कधी चक्क बरगड्या तुटल्या. विनीत दिवसात शेकडो पंचेस खात होता, पण तो ध्येयानं इतका पिसाटला होता की इस्पितळात अॅडमिट असतानासुद्धा तो ट्रेनिंग करत होता. ७०० दिवसांपेक्षा जास्त ट्रेनिंग केल्यानंतर विनीत एक खराखुरा बॉक्सर बनून बाहेर आला. त्यानं त्याचं काम करून दाखवलं होतं, आता पाळी होती अनुरागची. विनीतचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चकित झालेल्या अनुरागनं सिनेमावर काम सुरू केलं आणि तो सिनेमा आज ‘मुक्काबाज’ बनून आपल्यासमोर आलाय.
बरेलीमध्ये स्थित श्रवण कुमारला (विनीत कुमार सिंह) बॉक्सर बनायचं आहे, पण तेथील लोकल नेता भगवान दास मिश्रा (जिमी शेरगिल) जे बॉक्सिंग फेडरेशनचं सगळं काम बघतात, श्रवणकडून घरची कामं - दळण, भाज्या आणणं - करवून घेत असतात. याच गोष्टीवरून श्रवण-भगवान दासमध्ये वाद होतो आणि भगवान दास कधीच श्रवणला बॉक्सर नाही बनू द्यायचं हे ठरवतात. श्रवणचं प्रेम असतं भगवान दासच्या पुतणी सुनैनावर (झोया हुसेन) जी की मूक आहे. श्रवण बॉक्सर बनतो का? त्याला सुनैना मिळते का? भगवान दास आणि श्रवणमध्ये कसा संघर्ष होतो, याची कथा म्हणजे ‘मुक्काबाज’.
हा सिनेमा पूर्वार्धात काहीसा लाईट टोन ठेवून चालतो. श्रवणची बॉक्सिंग, सुनैना सोबतची लव्हस्टोरी अतिशय साध्या आणि लाईट पद्धतीनं मांडण्यात आली आहे. दोन वर्षं उलटतात, भगवान दासनं श्रवणला जेलची शिक्षा करवून सोडून जरी दिलेलं असलं तरी तो त्याला विसरलेला नसतो. आजही त्याला कुठलाही सिलेक्टर निवडत नसतो आणि जोपर्यंत बॉक्सिंगचं पदक जिंकून रेल्वेत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत सुनैनाशी लग्न होणार नाही या कल्पनेनं श्रवणला भंडावून सोडलेलं असतं. तर दुसरीकडे भगवान दासला श्रवण-सुनैनामध्ये चालू असलेल्या प्रेमप्रकरणाची भनक लागलेली नसते. अशात श्रवण बनारसमधून फॉर्म भरतो आणि स्टेट लेव्हल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतो, जिथं संजय कुमार (रवी किशन) त्याला कोचिंग देण्याचं ठरवतात. संजय कुमार-श्रवण हे दोघेही खालच्या जातीचे असतात, तर भगवान दास यांना त्यांच्या ब्राह्मण असण्याचा खूप गर्व असतो. इथूनच हा संघर्ष अधिक कडवट होत जातो.
विनीत कुमार सिंह हा एक चांगला नट आहे, हे त्यानं याआधीही ‘गँग्स ऑफ वासेपुर’ (१ आणि २), ‘अगली’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’सारख्या सिनेमांतून दाखवून दिलं आहे. शिक्षणानं डॉक्टर असलेला विनीत गेली सतरा वर्षं तो सिनेइंडस्ट्रीत स्ट्रगल करतोय. त्याने महेश मांजरेकरांना असिस्ट केलंय, तसंच अनुरागचेही सिनेमेही असिस्ट केलेत. ‘अगली’मध्ये त्यानं एक गाणं लिहिलं होतं आणि इथंही ‘पैतरा’ हे गाणं त्यानंच लिहिलं आहे. तसंच ‘मुक्काबाज’ची कथाही त्यानंच लिहिली आहे.
अशा या हरफनमौला कलाकाराला गरज होती एका मोठ्या ब्रेकची, जो त्याला ‘मुक्काबाज’मधून मिळाला, पण तो स्वतःच्या दमावर सिनेमा खेचून नेऊ शकतो का? याबाबतीत बहुतेक लोक सांशकच होते. त्यातच पूर्वार्धात ‘मुश्किल है अपना मेल प्रिये’ या गाण्यातून येणाऱ्या नवाजुद्दीनच्या कॅमेओनंतर तर खरंच प्रश्न पडतो की, अनुरागची निवड फसलेली तर नाही? एका सहकलाकाराच्या हातात सगळा सिनेमा देऊन अनुरागनं चूक तर नाही केली? पण त्याच्या अभिनयातून विनीत त्याच्या टीकाकारांना जिंकून घेतो. त्याच्या शारीरिक ट्रान्सफॉर्मेशनचं जितकं कौतुक करायला हवं, तितकाच सुंदर त्याचा अभिनय आहे. शारीरिक ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक यासाठी की, जितकी मेहनत त्यानं घेतलीये तितकी क्वचितच एखाद्या इतर भारतीय नटानं त्याच्या पात्रावर घेतलेली असावी आणि तरीही त्याची फारशी चर्चा कुठे ऐकण्यात आलेली नाही. कारण जोपर्यंत आमिर खान करत नाही तोवर त्या मेहनतीला किंमत नसते.
अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर विनीतनं अक्षरशः श्रवणच्या पात्रात जीव ओतलाय. त्यानं श्रवण असा साकारलाय की, आपण विसरून जातो की, या व्यक्तीनं याआधीही दुसऱ्या काही भूमिका केल्यात. जेलच्या टॉयलेटमध्ये जेव्हा श्रवणवर दोन गुंड हल्ला करतात, तेव्हा त्यातल्या एकाला कोपऱ्यात दाबून त्यावर विजेच्या गतीनं जेव्हा श्रवण पंचेस चालवतो, तेव्हा कळतं की विनीतनं त्याच्या बॉक्सिंग स्किल्सवर किती मेहनत घेतली आहे. कारण एक ट्रेनिंग न घेतलेला नट त्या गतीनं पंचेस मारूच शकत नाही.
तर दुसरीकडे जेव्हा श्रवण एक कप जिंकून येतो आणि त्याचे वडील त्याला खरी-खोटी सुनावत असतात, तेव्हा ज्या प्रकारे श्रवण त्याच्या भावना व्यक्त करतो, तिथं त्याच्या अभिनयाचा सगळा कस दिसून येतो. विनीत कुमार सिंह एक स्टार असल्यासारखा वावरतो आणि त्याला पाहण्याची मजा ही मोठ्या पडद्यावरच येणार.
खलनायकाच्या भूमिकेत जिमी शेरगिलनं पूर्वार्धात त्याचा रोल इतका अंडरप्ले केलाय की, आपल्याला शंका वाटायला लागते की, हा काही करणार आहे की नाही? पण हे सगळं ठरवून करण्यात आलं होतं. कारण पूर्वार्धात श्रवण निर्विवादपणे सगळे राउंड जिंकतो, पण उत्तरार्धात भगवान दास इतका जबरदस्त पलटवार करतो की, सिनेमा नवीन उंचीवर जाऊन पोचतो. मध्यंतरानंतर आधी सिनेमाचा एक टोन सेट होतो आणि आपल्याला एक अंदाज येऊन जातो की, याचा एकूण ग्राफ कसा असणार, पण उत्तरार्धात हे सगळं मोडून काढत सिनेमा त्या लेव्हलला पोचतो, ज्याची आपण अपेक्षा सुद्धा केलेली नसते.
अतिशय गंभीर, लाचार आणि भयावह परिस्थिती निर्माण करण्यात अनुराग आणि जिमी शेरगिलच्या भगवान दासला यश मिळतं. इतका वेळ राग दाबून पात्राला अंडरप्ले करणाऱ्या जिमी शेरगिलनं मोठ्या खुबीनं उत्तरार्धात पडद्यावर क्रौर्य मांडलं आहे. हा खलनायक ‘गँग्ज ऑफ वासेपूर’च्या रामाधीर सिंह इतका आयकॉनिक नाही बनू शकणार, कारण रामाधीरच्या पात्रात एक मिश्किलपणा होता. जो इथं पूर्णपणे अनुपस्थित आहे. भगवान दास हा फक्त आणि फक्त नालायक आहे. यामुळे बऱ्याच जणांना रामाधीर सिंह हा भगवान दासपेक्षा उजवा वाटेल, पण ही दोन्ही पात्रं एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत, म्हणून त्यांची तुलनाच करायला नको.
श्रवण-भगवान दास नंतर रवी किशनच्या संजय कुमारचं पात्र चांगलं जमून आलंय. रवी किशनच्या चालढालीत, त्याच्या बोलण्यात अशी काही जादू आहे की, तो पडद्यावर येताच दुसऱ्या कोणाकडे लक्ष जात नाही, म्हणूनच त्यांच्या छोट्या भूमिकेतही तो लक्षात राहतो.
सुनैनाच्या भूमिकेत नवोदित अभिनेत्री झोया हुसेननं चांगलं काम केलं आहे. तिचा वावर सहज वाटतो आणि तिनं भाषेवर चांगली मेहनत घेतलीये. बाकी सर्व सहकलाकारांची कामंही चांगली झालीयेत. न्यूक्लेया आणि रचिता अरोराचं संगीत सिनेमाला साजेसं आहे आणि एक वेगळा फ्लेवर प्रदान करतं. सगळी गाणी छान आहेत, पण ‘पैतरा’ आणि ‘मुश्किल है अपना मेल’ ही खास लक्षात राहून जातात. चार D.O.Pनी मिळून केलेली सिनेमॅटोग्राफी सुंदर आहे आणि ‘गँग्ज ऑफ वासेपूर’प्रमाणेच तिथल्या भौगोलिक परिस्थितीला एक पात्र बनवून सिनेमात उतरवते. नेहमीप्रमाणे संवाद खुसखुशीत आहेत आणि एक प्रकारची मिश्किली जपतात.
प्रत्येक सिनेमात स्वतःला रि-डिफाईन करणाऱ्या अनुरागनं ‘मुक्काबाज’मधून परत एकदा हे सिद्ध केलंय की, त्यात खूप सारी व्हेरियेशन्स आहेत. बॉक्सिंगच्या बॅकड्रॉपवर लव्हस्टोरी बनवून, त्यात निजी दुष्मनीचा तडका लावून अनुरागनं एक कमालीचा कॉम्बो साधलाय. भारतीय स्पोर्ट्समध्ये केलं जाणारं राजकारण, फेडरेशनकडून खेळाडूंकडे केलं जाणार दुर्लक्ष, लव्ह स्टोरी, रिव्हेंज ड्रामा, बॉक्सिंग, जातीवाद असे बरेच मुद्दे कधी प्रत्यक्ष तरी अप्रत्यक्षपणे ‘मुक्काबाज’ टॅकल करतो. मध्यंतराच्या आधीच्या वीस मिनिटांतली दृश्यं सोडली तर (जी काहीशी लांबतात) ‘मुक्काबाज’मध्ये कुठलीही कमतरता नाही आणि हा अनुरागचा आजवरचा सगळ्यात व्यावसायिक सिनेमा आहे. पूर्वार्धातच सुपरहिट भासणारा हा सिनेमा उत्तरार्धात तर वेगळीच कमाल करून दाखवतो.
.............................................................................................................................................
लेखक पवन नंदकिशोर गंगावणे जिल्हा परिषद, बुलडाणा इथं इंजिनीयर म्हणून कार्यरत आहेत.
g.pavan018@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nandkishor Gangawane
Sat , 13 January 2018
Very good review. It is very interesting.