'हॉस्टेल डेज' : तरुणाईचं मनोरंजन 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'हॉस्टेल डेज'चं पोस्टर
  • Sat , 13 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie हॉस्टेल डेज Hostel Days

असंख्य विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेण्यासाठी आपल्या गावाबाहेर जावं लागतं. त्या वेळी त्यांना राहण्यासाठी अनेक वेळा 'हॉस्टेल'शिवाय पर्याय नसतो. 'हॉस्टेल'मध्ये राहूनच ते आपलं शिक्षण पूर्ण करतात आणि नंतर नोकरी वा अन्य व्यवसायाला लागतात. 'हॉस्टेल'मधील चार-पाच वर्षांचा काळ हा तेथील प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्या काळातील आठवणी अनेकदा संस्मरणीय ठरू शकतात.

लेखक-दिग्दर्शक आणि संगीतकार अजय नाईक यांनी आपल्या 'हॉस्टेल डेज' या नवीन चित्रपटात अशाच एका हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा स्मरणीय काळ उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटासाठी आवश्यक असा हॉस्टेलमधील मुलांचा धांगडधिंगा, मुलामुलींची प्रेमप्रकरणं, त्यातून निर्माण झालेली एकमेकांविरुद्धची खुन्नस, गटबाजी आणि अन्यायाविरुद्ध मुलांनी दिलेला लढा, असा सर्व मालमसाला 'हॉस्टेल डेज'मध्ये पाहावयास मिळतो. तो काही प्रमाणात चांगली करमणूकही करतो, मात्र चित्रपटाची लांबी आणि त्यामुळे निर्माण झालेला अन्य फाफटपसारा जरा आवरता घेतला असता, तर हे 'हॉस्टेल डेज' खरोखरच स्मरणीय ठरले असते. 

या चित्रपटात अर्थातच हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या वेगवेगळ्या स्तरांतील विद्यार्थ्यांच्या कथा आणि व्यथा आहेत. शिवा (आरोह वेलणकर) हा मुलांच्या हॉस्टेलचा चिटणीस असतो, तर शिवानी (प्रार्थना बेहेरे) ही मुलींच्या हॉस्टेलची चिटणीस असते. अमिताभ बच्चनचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःला 'शहेनशहा' समजणारा आणि सतत त्याच्या आवाजाची नक्कल करत बोलणारा 'बुच्चन', रेक्टरच्या मुलीवर प्रेम करणारा 'फुगा', 'अण्णा', पुणेरी 'शेक्सपियर' अशी हॉस्टेलमधील अन्य काही विद्यार्थी पात्रं.

या हॉस्टेलमध्ये जय धर्माधिकारी (विराजस कुलकर्णी) आणि त्याचे काही मित्रही दाखल होतात. हा जय शिवानीचा बालमित्रही असतो. त्यामुळे जय, शिवानी आणि शिवा असा प्रेमाचा त्रिकोण तयार होतो. महाविद्यालयाचे सर्वेसर्वा बाबासाहेब बुचकुळे यांनी भरपूर देणगी घेऊन जय आणि त्यांच्या धनिक मित्रांना हॉस्टेलमध्ये प्रवेश दिलेला असतो. त्यामुळे जय आणि त्याच्या सर्व मित्रांना धनिक हॉस्टेलमध्ये कॉलेज व्यवस्थापनाकडून स्पेशल वागणूक दिली जाते. (त्यांच्या रुममध्ये एसी, कपडे धुवायला वॉशिंग मशिन्स वगैरे) त्यामुळे शिवाच्या नेतृत्वाखाली अन्य विद्यार्थी या गोष्टींना विरोध करतात. त्यातून संघर्ष निर्माण होतो आणि कॉलेज व्यवस्थापनाच्या काही गैरव्यवहाराच्या गोष्टी बाहेर येतात. मात्र त्या लपवण्यासाठी कॉलेज व्यवस्थापनाकडून शिवाची बदनामी केली जाते. अर्थात नंतर सर्वच विद्यार्थी शिवाच्या मागे एकजुटीनं उभं राहून कॉलेज व्यवस्थापनाशी यशस्वी मुकाबला करतात.

'हॉस्टेल डेज'च्या आठवणीत रमून गेल्यामुळे लेखक-दिग्दर्शकाला चित्रपटाच्या लांबीचं भान राहिलेलं नाही, हे प्रकर्षानं जाणवतं. शिवाय पटकथेची बांधणी पक्की असती तर कथेचं औत्सुक्य टिकून राहिलं असतं. महाविद्यालयाचे सर्वेसर्वा असलेले बुचकुळे आणि शिवा यांच्यात नेमका कोणत्या गोष्टीवरून संघर्ष सुरू होतो, त्यावर आणखी प्रकाश टाकायला हवा होता. फाईल चोरी प्रकरणही 'अंधारात' दाखवण्यात आल्यामुळे त्या फाईल प्रकरणाचा नेमका उलगडा होत नाही. (याबाबत शेवटी जयकडून केल्या जाणाऱ्या खुलाशाची वाट पाहावी लागते).

आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, 'हॉस्टेल'मध्ये रेक्टरची भूमिका सर्वांत जास्त महत्त्वाची असते. या चित्रपटात कुलकर्णी नावाचे प्राध्यापक 'रेक्टर' (संजय जाधव) हे खुशालचेंडू वृत्तीचे दाखवले आहेत. त्यांना अनेक गोष्टी एक तर माहीत नसतात किंवा नंतर केव्हा तरी कळतात. त्यामुळे केवळ 'विद्यार्थीप्रिय रेक्टर' यापलीकडे जाऊन त्यांना काही काम नाही, हे जाणवत राहतं.

संपूर्ण चित्रपट तरुणाईच्या वातावरणामुळे 'भारून' टाकण्यात मात्र दिग्दर्शकाला चांगलं यश मिळालं आहे. चित्रपटातले बहुतेक सर्व तरुण कलाकार 'फ्रेश' असल्यामुळे तरुणाईची वातावरणनिर्मिती सहज सोपी झाली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये गाण्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. 'फोन टीरिंग टीरिंग वाजला...' आणि अन्य गाण्यांचं टेकिंग छान जमलं आहे.

चित्रपटातील सर्वच तरुण कलाकारांनी आपापल्या भूमिका समजून-उमजून केल्या आहेत. जयच्या भूमिकेतील विराजस कुलकर्णी यानं आपल्या पदार्पणातच खलनायकी ढंगाची भूमिका प्रभावीपणे वठवली आहे. त्यामानानं शिवाची भूमिका ही जोमदार असली तरी ती तशी वठवण्यात आरोह वेलणकर थोडासा कमी पडल्याचं जाणवत राहतं. प्रार्थना बेहेरेंची शिवानीही चांगली लक्षात राहते. संजय जाधव यांनीही प्राध्यापक कम रेक्टर चांगला रंगवला आहे. अक्षय टांकसाळे यानं 'बुच्चन'च्या भूमिकेत धमाल आणली आहे. आतापर्यंतच्या त्याच्या भूमिकेला साजेशी अशीच त्याची ही भूमिका राहिली आहे. साईनाथ गुणवाड (फुगा), गणेश विरंगळ (अण्णा), चिन्मय पटवर्धन (पुणेरी शेक्सपीअर) तसेच सागरिका रुकारी आणि सोनिया पटवर्धन या नवकलाकारांची कामंही आश्वासक ठरली आहेत.

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख