कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या कवितासंग्रहाला यंदाचा महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ जाहीर झालाय. उद्या तो पुण्यात त्यांना समारंभपूर्वक दिला जाणार आहे. त्यानिमित्ताने साधना साप्ताहिकाच्या विशेषांकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या मुलाखतीचं पुनर्प्रकाशन.
.............................................................................................................................................
‘सिझर कर म्हणतेय माती’ या काव्यसंग्रहामुळे चर्चेत आलेलं कल्पना दुधाळ हे नाव आजमितीला ‘धग असतेच आसपास’ या संग्रहामुळे मराठी कवितेच्या प्रांतात बऱ्यापैकी स्थिरावलेले आहे. अवघ्या दहा वर्षांच्या लेखनाच्या कारकिर्दीत त्यांचे हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या दोन्हीही संग्रहांना चांगला प्रतिसाद वाचक, जाणकारांकडून मिळत आहे. शिक्षण-वाचन-लेखनाची कसलीही परंपरा नसलेल्या शेतकरी कुटुंबातून कल्पना दुधाळ आलेल्या आहेत. स्वाभाविकच आधी वाचन करून मग कवितालेखनाकडे वळण्याचा प्रकार त्यांच्या बाबतीत झालेला नाही. या अर्थाने त्यांचा पहिला संग्रह आला त्यावेळपर्यंत त्यांची पाटी कोरी होती. त्यामुळे ही कविता प्रत्यक्ष शेती करताना आलेल्या उत्कट अनुभवाच्या बळावर उगवून येते. त्या अर्थाने या कवितेवर विशिष्ट लेखकाचा वा विचारांचा प्रभाव नाही, असे म्हणता येते. ही कविता एका कष्टकरी स्त्रीच्या समृद्ध अनुभवाधिष्ठित पायावर उभारलेली असल्याने ती नवी आणि आशयदृष्ट्या निराळी ठरते. अनुभवाला श्रमण संस्कृती-परंपरेत खूप महत्त्व असते.
कारण ‘आधी केलं, मग सांगितलं’ असं ते ‘अनुभवाधिष्ठित’ असतं. महानुभाव कवयित्री महदंबा, संत मुक्ताबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत बहिणाबाई, जनाबाई, जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्रीबाई फुले, फातिमाबी, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे आणि बहिणाबाई चौधरी अशा या सशक्त कष्टकरी स्त्री श्रमणपरंपरेच्या पार्श्वभूमीवर दुधाळ यांच्या कवितेचा विचार केल्यास त्यांच्या कवितेचे महत्त्व लक्षात येते. ही परंपरा समजून न घेतल्याने मग ‘कल्पना दुधाळ यांना कविता लिहिता येत नाही’ किंवा ‘ही काय कविता आहे काय?’ अशी पाठांतरवादी संकुचित समीक्षा होत राहते.
दुधाळ यांची कविता ‘सापडले वर्म सोपे, न सुटे संसार पडतसे मिठी’ या संत निर्मळाबाईंच्या उक्तीप्रमाणे दैनंदिन प्रत्यक्ष घर आणि शेती यातील अनुभविक कष्टातून तावूनसुलाखून पुढे सरकत राहते. कारण आपल्या जगण्यावागण्याचं मर्म हे असं कुठे पुस्तकात-ग्रंथात सापडत नाही, तर नित्य जगण्याच्या धडपडीतून अनुभवाच्या रूपाने सापडत राहतं. अनुभव नेहमीच महागडा असतो. ही कवयित्री प्रत्यक्ष शेतात राबणारी आहे. ती शहरात वा केवळ घरात बसून, फावल्या वेळात रंजन म्हणून कविता करणारी नाही. त्यामुळे त्यांच्या कवितेतील शब्दाला एक प्रकारची ‘धग’ आहे, जी उसनी आणता येत नाही. ती उपजत आणि स्वाभाविकच यावी लागते. हे ‘स्वाभाविक येणं’ सोशिकतेवर आधारित असतं, जी ‘आमुचे सुख-दु:ख कोणा दुजा वारी’ असं संत सोयराबाईंनी म्हटल्याप्रमाणे जगण्याच्या अनिवार धडपडीतून येते. सोशिकता पचवूनच ही कविता सिद्ध होते. अशा या कवरित्री कल्पना दुधाळ यांच्याशी आपण संवाद साधू या.
प्रश्न - कोणत्याही लेखकाच्या लेखनाची मुळं त्याच्या जडणघडणीत सापडतात, असं म्हटलं जातं. तेव्हा तुमचे बालपण, शालेय-महाविद्यालयीन जीवना-विषयी जाणून घ्यायला आवडेल.
- टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) हे माझं मूळ गाव. म्हणजे माझं माहेर. टेंभुर्णीपासून चार किलोमीटर अंतरावर आमची शेती आहे. घर (वस्ती) शेतातच आहे. गावात माझं जाणं-येणं म्हणजे शाळा किंवा तत्सम कारणांसाठी व्हायचं. घरात आम्ही चौघे भावंडं, आजी-आजोबा, आई-वडील, चुलते अशी कर्ती माणसं होती. घरापासून माझी जिल्हा परिषदेची शाळा चार किलोमीटर लांब होती. उन्हाळा-हिवाळा-पावसाळा असो आम्ही चालत जायचो-यायचो. पावसाळ्यात आभाळ भरून यायचं, विजा चमकायच्या, सायंकाळची पाच-सहाची वेळ असायची, दिवस मावळू लागलेला असायचा, हे पाहून मग घरी जाताना खूप भीती वाटायची. रस्त्यात ओढा होता. त्या ओढ्याला पाणी यायचं. मग एकमेकींच्या हाताला धरून भीत भीतच आम्ही ओढा ओलांडत असू. घरची, शेतातली कामं निघाली की मग शाळेला सुट्टी. म्हणजे भुईमूगाच्या शेंगा काढायला आल्या की, शाळा सोडून शेतात काम करावं लागायचं. अशा परिस्थितीत कसंबसं शिक्षण चालू होतं. पण शिकण्याची खूप ओढ होती. त्यामुळे मी अभ्यासही खूप करायचे. दहावीला टेंभुर्णीच्या सेंटरमधून माझा पहिला नंबर आला होता. दहावी-बारावी झाली की मुलींचं लग्न करून टाकायचं, असं त्यावेळी होतं. माझ्या बहिणीचं दहावीत असताना लग्न झालं. आपलंही लग्न उरकून टाकू नये म्हणून ‘आपण जर चांगला अभ्यास केला, दरवर्षी पहिला नंबर आला, तर हुशारीकडे पाहून आपलं लग्न न करता, पुढे शिकायची परवानगी मिळेल’ असं वाटायचं. पहिल्या नंबराने पास होऊ लागल्यामुळे ‘ही हुशार आहे, हिला शिकू दिलं पाहिजे,’ असं घरच्यांना वाटू लागलं. बारावी पण झाली. मग चुलते म्हणायला लागले, ‘पुढच्या शिक्षणासाठी हिला पुण्याला नेतो.’ मग चुलत्यांनी पुण्यात एसएनडीटीला अॅडमिशन घेतलं. पुण्यात आले तेव्हा मी खूप बुजलेली होते. अवतार गावाकडच्या मुलीप्रमाणे होता. त्यामुळे कोणात मिसळणं, कोणाशी बोलणं वगैरे असं काही होत नव्हतं. मैत्रिणी झालेल्या नव्हत्या. त्यामुळे आपलं इथं कसं होईल, असं वाटायचं. लायब्ररी मिळाल्यावर मग करमायला लागलं. लेखक वगैरे या अशा गोष्टी तेव्हा काहीच कळायच्या नाहीत. ‘आता बास झालं हिचं शिक्षण’ असं म्हणून घरच्यांनी तिसऱ्या वर्षी माझं लग्न ठरवलं. लग्न झाल्यावर मी तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आणि मला डिस्टिंक्शन मिळालं. लग्नामुळे तुटलेल्या मैत्रिणी परीक्षेमुळे पुन्हा भेटल्या. त्या म्हणायच्या ‘मी इकडे एम.ए.ला अॅडमिशन घेतलं,’ कोणी म्हणायची ‘मी अमुक करत्येय’ वगैरे वगैरे. त्यांचं पुढचं शिक्षण चालूच होतं. माझं मात्र मध्येच लग्नामुळे शिक्षण सुटलं होतं. मैत्रिणींच्या अशा गोष्टी ऐकून मला राहावयाचं नाही. त्यामुळे मी त्यांच्याशी असलेला संपर्क जाणीवपूर्वक तोडून टाकला.
प्रश्न - आपण स्वत: कविता लिहावी असं पहिल्यांदा प्रकर्षानं कधी वाटलं?
- शाळेमध्ये असताना माझे निबंध वगैरे छान असायचे. पण कविता काही लिहिली नव्हती. एसएनडीटीला शिकताना मी घरापासून दूर गेले होते, घराची ओढ लागलेली असारची. तेव्हा कधी तरी मी कविता लिहिली. त्या कविता फार अर्थपूर्ण होत्या असं नव्हे. पण साधारणपणे जे लिहायला हवं किंवा जे लिहिलं जातं, अशी ती सामान्य कविता होती. खरी कविता मी लग्नानंतर शेती करायला लागले, तेव्हा लिहिली. लग्नानंतर घरातली सगळी कामंधामं उरकून रोजच शेतात जावं लागायचं. पण मी काही आनंदानं शेतात जात होते अशातला भाग नव्हता. कारण ग्रॅज्रुएशनपर्यंत माझं शिक्षण झालेलं होतं, त्यामुळे डोक्यात एक ‘हवा’ होती. आमच्या सबंध घरात ग्रॅज्रुएट झालेली मी पहिली मुलगी होते. इतकं शिकूनही रोजच घरात-शेतात राब राबावं लागत असेल तर आपल्या शिक्षणाचा काय उपरोग, असं वाटून खूप अस्वस्थ होत होते. आपण काही तरी केलं पाहिजे, असं सारखं सारखं वाटायचं. शेती करताना मला सतत जाणवायचं की, आपण शिकलो आहोत खरं, पण यातून आपण स्वत:ला शोधत गेलं पाहिजे. त्यावेळी आम्ही केळी लावली होती. शेतीचं जे काही काम असेल, ते आम्ही घरच्या घरी सगळे जण करायचो. म्हणजे अगदी रोपं करण्यापासून प्रत्येक गोष्ट असू दे, आम्ही घरचे सगळे लोक त्यातच गुंतलेलो असायचो. केळीला जेव्हा पहिला घड आला तेव्हा मी पहिल्यांदा शेतीमातीविषयीची ‘केळीच्या गाभ्यात, दाटली कमळ बाई’ ही कविता लिहिली. नंतर अशाच छोट्या छोट्या कविता लिहित गेले. या कविता मी माझ्या मुलांच्या जुन्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. कॉलेजमधली एक छोटी डायरी माझ्याकडे होती. तिच्यात कधी तरी सहज म्हणून वाङ्मयीन मासिकांचे पत्ते लिहून ठेवले होते. मग काही कविता पाकिटात घालून त्या काही मासिकांना पाठवून दिल्या. त्यानंतर मला पुरुषोत्तम पाटीलसरांचं पत्र आलं. ‘तुम्ही छान कविता लिहिली आहे’. त्यात त्यांनी ‘तुम्ही काय करता?’ वगैरे माझा परिचयही विचारला होता. माझी पहिली कविता त्यांनी ‘कवितारती’मध्ये छापली. तेव्हा आपण काय लिहितो, कसं लिहितो, ते किती चांगलं आहे अशा गोष्टी डोक्यात अजिबात नव्हत्या. नंतर शेतशिवारातील, वाड्यावस्त्यांवरील माणसांच्या जगण्याच्या अनुभवातून मला शब्द सापडत गेले. भूमीशी बांधलेलं आयुष्य कवितेमुळं इतकं समृद्ध होताना कोणाला आनंद होणार नाही?
प्रश्न - ‘आपण कविता लिहू शकतो’ असं वाटल्यावर या ‘वाटण्या’ला कोणी कोणी बळ दिलं?
- शकणं-वाचणं-लिहिणं ही परंपरा ज्या घरात नसेल, तिथं प्रोत्साहन कोण देणार? आमच्या घराण्यात तरी अशा पद्धतीनं कोणी कविताबिविता केलेल्या नव्हत्या. त्यामुळे कोणी मला बळ देण्याचा प्रश्नच नव्हता. आपण आपलंच लिहायचं आणि नियतकालिकांना पाठवून द्यायचं. सुरुवातीला घरातल्या मंडळींना कविता करणं म्हणजे फालतू वेळ घालवण्यासारखं वाटायचं. शेतीच्या कामापेक्षा त्यांच्या दृष्टीने दुसरं काही महत्त्वाचं नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडून बळ मिळण्याची अपेक्षा नव्हती. पण पुढे पुढे मात्र परिस्थिती बदलत गेली. पहिला संग्रह आल्यावर महाराष्ट्रभरातून कौतुक व्हायला लागलं. लेखनाच्या क्षेत्रातले लोक घरी येऊ-जाऊ लागले. तेव्हा घरातल्या मंडळींचाही दृष्टिकोन बदलत गेला. आता त्यांचा सबळ पाठिंबा आहे. मागच्या कित्येक पिढ्यांच्या काबाडकष्टातून, जगण्याच्या आदिम धडपडीतून मला उभं राहण्याचं बळ मिळालंय. हे नुसतं बळ नाही म्हणता येणार, तर सामान्य शेतकरी बाईला भोवतालाविषयी विचार करण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा मिळालेला आत्मविश्वास आहे, असं मला वाटतं.
प्रश्न - तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणारे घटक कोणते?
- भोवतीची माणसं, निसर्ग, गुरं-ढोरं, पशु-पक्षी, शेतीमाती, आजूबाजूचं वातावरण हे सगळेच घटक प्रभाव टाकणारे आहेत. या घटकांमुळेच आपण काही ना काही विचार करू शकतो, त्यांच्यामुळेच प्रेरणा मिळते, असं मला वाटतं.
प्रश्न - कथा-कादंबरी इतर वाङ्मयप्रकार असताना कवितेचीच निवड का केली?
- खरं तर त्यावेळी तसं काही ठरवलेलं नव्हतं. फक्त सुचेल ते लिहायचं इतकंच होतं. हे सुचणं उत्कटपणे कवितेतूनच आलं. स्वाभाविकपणे. खरं तर कविता म्हणजे सुचलेलं पटकन लिहून मोकळं होण्याची त्यावेळची माझी सोय होती. आपलं चार ओळी लिहून मोकळं झालं बास, असं वाटायचं. कथा-कादंबरी लिहायला जो वेळ लागतो, जी बैठक लागते ती माझ्याकडे नव्हती.
प्रश्न - ‘सिझर कर म्हणतेय माती हे शीर्षक कसं सुचलं?
- आताच्या काळात सहज आणि साध्या पद्धतीनं काहीच येत नाही. म्हणजे कोणतंही पीक घ्या, फळभाज्या घ्या, त्यासाठी आता रासायनिक खतं वापरावी लागतात, फवारणी लागते. आताच्या काळात या गोष्टी आपल्याला टाळताच येत नाहीत. आता पूर्वीसारखी घरोघरी जनावरं राहिलेली नाहीत. त्यामुळे शेणखतही मिळणं अवघड झालेय. सेंद्रिय खतं तर रासायनिक खतांपेक्षा खूपच महाग आहेत. ते चांगले असले तरी आर्थिक दृष्ट्या परवडत नाहीत. त्यामुळे मातीमधलं उगवतेपण आता पहिल्यासारखं ‘नैसर्गिक’ राहिलेलं नाही. त्यातूनच ‘सिझर कर म्हणतेय माती’सारखं सुचत गेलं. कारण आज माती म्हणतेय की ‘आता मला नैसर्गिकपणे नाही उगवणं होत.’ म्हणजे गरोदर बाई अडली की जसं सिझेरिन करतात, तशीच मातीही सर्जनासाठी अडलेली आहे.
प्रश्न - ‘सिझर कर म्हणतेय माती’ हा कवितासंग्रह आला तेव्हा त्यावेळची निर्मितीची प्रक्रिया, मनाचं घुसमटलेपण ही एकंदर काय अवस्था होती? कारण त्या अर्थाने ते सुरुवातीचे दिवस आहेत म्हणून.
- तेव्हा माझ्यासाठी ते सगळं खूपच उत्स्फूर्तपणे होतं. इतके दिवस जी अस्वस्थता मनात दाटलेली होती, जे घुसमटलेपण मी अनुभवत होते, दैनंदिन जीवनात मी जे पाहत होते, अनुभवत होते, ते सगळं कवितेतून व्यक्त होत होतं. त्यामुळे आपोआप त्या कविता सुचत गेल्या. शेतात काम करणाऱ्या बाया, जनावरं, पशुपक्षी, निसर्ग हे माझ्या भोवतीचं सगळं पर्यावरण माझ्या सोबतच आहे, आणि आपण त्यांचाच ‘शब्द’ लिहितोय, ही भावना खूप महत्त्वाची होती. ‘सिझर कर म्हणतेय माती’मुळं माझ्या स्वत:मध्ये खूप चांगला बदल झाला. तो असा की मी आवडीनं शेती करायला लागले. शेतीशी असलेलं नातं आणखीच घट्ट झालं. तोपर्यंत ‘शिक्षण घेऊनही आपल्या नशिबी हे काय वाढून ठेवलंय, शेतीत किती कष्ट करायचे,’ असंच वाटायचं. शेती म्हणजे ओझं वाटायचं. पण या संग्रहामुळे मी शेतीकडे नव्याने बघू लागले. कविता सोबत असल्याने बाकीचे सगळे श्रम, सगळ्या अडचणी मला सुसह्य वाटू लागलं. म्हणजे इतक्या दिवसांच्या कुत्तरओढीतून काही तरी चांगलं मिळतंय, असं वाटू लागलं. बाजरी, ज्वारी राखताना पाखरांसाठी ओरडून ओरडून घसा बसायचा. राखणीसाठी सकाळपासून उभं राहावं लागायचं. खरं तर ‘माझ्या रानातला कोवळा दुधाळ हुरडा टिपते मी पाखरू होऊन, तेव्हा मचाणावर उभी असते मीच हातात गोफण घेऊन’ ही ‘गोफण’ नावाची कविता मला तेव्हा सुचली. शेण काढण्यामुळे, त्या जनावरांमध्ये राहिल्यामुळे मला खूप काही सुचत गेलं. ‘एकाच नळीनं पाणी पिणाऱ्या पोरा पारींवर हसताना गावठी-अडाणी ठरतात बाया, पण उष्ट्या पाण्याला तोंड न लावणाऱ्या मुक्या जित्याबांचं कौतुक करतात बाया’ या ओळी मला इतर वेळी सुचल्या नसत्या.
प्रश्न - दिवसभराच्या कामातून मग वाचनलेखनाला सवड कशी मिळते? आणि त्याला लागूनच दुसरा प्रश्न असा की अलीकडच्या काळातली कोणती पुस्तकं महत्त्वाची वाटतात?
- खरं तर लेखन-वाचन ही गोष्ट कृषिसंस्कृती’मध्ये नव्हती. तिला आपल्याला बाहेरून तिथं रुजवाची आहे. त्यामुळे लेखन-वाचनासाठी सवड काढावी लागते. ती मिळतेच असं नाही. दैनंदिन कामंधामं उरकून मग ते करावं लागतं. वास्तविक लिहिणं-वाचणं आमच्या घरात नव्हतंच. घरात पुस्तकं नव्हती. टोमॅटो पॅक करण्यासाठी बॉक्समध्ये रद्दीतले पेपर टाकावे लागत. मग टोमॅटो पॅक करता करता मी पेपर वाचत बसायचे. कारण वाचनाची खूप ओढ यायची आतून. पण कामाचा इतका रेटा असायचा की, मी दहा मिनिटं पेपरही वाचू शकत नसे. शेतकऱ्याच्या घरात वाचनाला काय किंमत? कामंधामं सोडून वाचणं म्हणजे बकवास, वेळ घालवणं, किंवा वाचून कुठं चंद्रावर जायचं काय, असं बहुतेक शेतकऱ्यांना वाटतं. नंतर पेपर वाचणंही बंद केलं. त्यामुळे खरंच सांगायचं तर आतापर्यंत मी खूपच कमी वाचलंय. घरकाम, शेतीतील काम वगैरे व्यापताप खूप असल्यानं माझ्या वाचनाला खूपच मर्यादा आहेत, हे मी नेहमीच मान्य करत आलेय. पण आता मी वाचन वाढवायचं ठरवलंय. आतापर्यंत मी जे कवितालेखन केलं ते अनुभवाच्या बळावर. त्याला वाचनाचा काही आधार होता, असं म्हणता येत नाही. त्यामुळे हा लेखक चांगला, हा लेखक सुमार, असं अधिकारानं मला ठरवता येणार नाही. पण एक सांगेन की, मी दुर्गा भागवत यांची काही पुस्तके वाचली आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्या, जी.ए. कुलकर्णी, आसाराम लोमटे, किरण गुरव यांच्या कथा वाचल्या आहेत. राजन गवस यांची ‘ब, बळीचा’ मला आवडलेली आहे. एलकुंचवार, महावीर जोंधळे यांची पुस्तके वाचलेली आहेत. इतकंच माझं वाचन. शेतात जाताना, आमचा छोटा जोडधंदा आहे, तिथं जाताना एक पिशवी सोबत असते. ज्यात एखादं पुस्तक, वही असते. कामातून वेळ मिळेल तसं तेव्हा उघडते. कधी कधी उघडणंही होत नाही.
प्रश्न - शेतकरी कुटुंबातील शिकलेल्या मुलींचे प्रश्नही आता निर्माण होतायत. याबद्दल काय सांगाल?
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या, पण शिकलेल्या मुलींची तर आज प्रचंड गोची होतेय. ज्या मुली शिकलेल्या आहेत, त्यांना शेती करायची नाही. काहींना स्वबळावर त्यांचं स्वत:चं अवकाश निर्माण करायचंय. काहींना टीव्हीतल्यासारखं आपण आणि आपला नवरा असं स्वत:पुरतं छान राहायचंय, पण राहता येत नाही. या मुलींना शहरात जाऊन नोकरी करायचीय. मनासारखा नवरा हवाय. हे एकीकडे. तर दुसरीकडे आधीच्या जुन्या पिढीतल्या लोकांना मात्र शेतीत काम करणाऱ्या मुली ‘सुना’ म्हणून पाहिजेत. कारण सासूला आता काम होत नाही, मग सुनेनं खुरपायला गेलं पाहिजे, वैरणकाडी आणली पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. पण हल्लीच्या शिकलेल्या सुनांना हे जमत नाही, यातून मग वेगळं राहायचा मुद्दा येतो, कौटुंबिक ताणतणाव आणि भांडणं होत राहतात. नातेसंबंध दुरावतात. त्यामुळे हल्ली नातेसंबंध वेगाने बदलताना दिसत आहेत. हा बदल एकूणच समाजाच्या दृष्टीचे फार चांगला आहे, असं म्हणता येत नाही. म्हणजे जुनी आणि नवी पिढी असा हा संघर्ष आहे. मी भोवतीच्या माणसांचा विचार करते तेव्हा लक्षात येते की, अशा किती तरी बहिणीबाळा असतात की, त्यांच्या भोवतीचं अनुभवविश्व मोठं असतं. संवेदनशीलता, उत्कटता असते. पण लिहिण्यावाचण्याशी काडीमात्र संबंध नसतो. रोजच हातातोंडाचं भांडण असतं.
प्रश्न - कविता कशी असावी किंवा कविता महत्त्वाची का वाटते?
- माझ्यापुरतं मी असं म्हणेन की तुम्हाला जे म्हणायचं ना ते उत्स्फूर्तपणे एका क्षणात आलं पाहिजे. एकदम. त्यासाठी खूप आढेवेढे न घेता, फार ओढाताण न होता कविता सहज आली पाहिजे. माझ्यासाठी लेखन ही संसाराच्या वटारलेल्या डोळ्यात कवितेच्या ओळींचं काजळ फासण्याची गोष्ट आहे. जगण्याला जीव लावला की ओव्या उसन्या घ्याव्या लागत नाहीत. भोवतीच्या धगीलाच प्रेरणा समजून, ऊर्जा समजून मी कविता लिहिते. मला कवितेत समकालातलं वास्तव आणि वेदना दिसते. हा भोवताल जसा पाहिला, अनुभवला तसं लिहिण्याचा, त्याला शब्द देण्याचा प्रयत्न केला. आयुष्य समजून मुठीत माती घट्ट धरली, वरून पाण्याची धार सोडली, तर रिकाम्या मुठीतही भुईकमळ फुलल्याचा हा आडवळणी प्रवास आहे. कवितेनं माझ्या आयुष्याला समृद्धी दिली. माझं कविता लिहिणं हे एका थोर परंपरेतील लहानशी कृती आहे. गांभीर्य आणि निर्धारानं मी त्यात भर घालीन. ही माझी सामाजिक-सांस्कृतिक जबाबदारी आहे, याची मला जाणीव आहे. कवितेनं मला जगायला शिकवलं, माझ्या आयुष्यात समृद्धी भरली. कवितेनंच सांगितलं ‘धग आसपास असते’ आपण ती समजून घ्यावी. धगीतून मार्ग काढायचा आणि पुढे जायचं बस्स. तेव्हा कवितेकडून आणखी काय अपेक्षा करावी?
प्रश्न - साहित्य अकादमीच्या निमित्ताने तुम्ही जोधपूर, दिल्ली, भोपाळ आदी अनेक ठिकाणी गेलात. तो अनुभव कसा होता?
- माझ्यासाठी तो अनुभव खूप चांगला होता. मला स्वत:ला असं वाटतं की, आजवर जी ओढाताण झाली, जे कष्ट आपण उपसले त्याचं आता खऱ्या अर्थानं काही तरी चिज होतं. अशा पद्धतीचं अखिल भारतीय महिला संमेलनात माझ्यासारखी शेतकरी बाई एरव्ही कधी गेली असती बरं? शिवाय तिथं शेती-मातीतली कविता म्हणणारी मी एकटीच होते. लहानपणी आकाशातून उडणारे विमानं मी बघायची. पण कवितेमुळे मी विमानात बसले. भालचंद्र नेमाडे सरांमुळेच साहित्य अकादमीकडून ही संधी मला मिळाली होती. नाही तर एरवी मी तिथपर्यंत जाऊ शकले नसते. अशा मोठ्या कार्यक्रमात कविता वाचताना खूप छान वाटलं. कितीही त्रास होवो, आपण आपलं कविता लिहिणं सोडलं नाही पाहिजे, असं बळ मिळालं. आपल्यातली चांगली गोष्ट कळते, तशी वाईटही कळते.
प्रश्न - ‘सिझर कर म्हणते माती’च्या वेळच्या कल्पना दुधाळ आणि ‘धग असतेच आसपास’च्या कल्पना दुधाळ, या दोन्हींच्या व्यक्तिमत्त्वात-जाणिवांत फरक जाणवतो?
- हो निश्चितच जाणवतो. कारण ‘सिझर’च्या वेळी कविता नेमकी का असते, हे मला फार माहीत नव्हतं. परंतु ‘धग’च वेळी आपण कविता लिहितो, याची पुरेपूर जाणीव मला होती. टेंभुर्णीतल्या दगडाधोंड्यातल्या पायवाटांवरची चिकनमाती पुण्यातल्या रस्त्यांवर गळून पडली आणि पुन्हा बोरीभडकच्या चिकनमातीने चटके देत वास्तवाचे भान आणले. कवितेतला प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ याला काहीतरी अर्थ आहे. कविता लिहून पूर्ण झाली की माझी मीच प्रत्येक कवितेला तीन प्रश्न विचारू लागले. ते म्हणजे, या कवितेत नवीन का आहे? या कवितेत उत्कटता, संवेदनशीलता आहे का? आणि बाकीच्या कवितांपेक्षा ही कविता वेगळी आहे का? असं करावं की नाही मला माहीत नाही, पण ते झालं आपोआप. ‘धग’मधली कविता ‘सिझर’पेक्षा मला खूप त्रास देऊन गेली हे खरंच. ‘धग’मध्ये स्वत:विषयी किंवा शेतीविषयी फार येण्यापेक्षा भोवतीचं वातावरण, बदलते नातेसंबंध आदी गोष्टी जास्त आल्या आहेत.
प्रश्न - आता शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र फाऊंडेशन सन्मान मिळाला, काय भावना आहेत याबद्दल?
- आनंद तर आहेच. एक वेळ असे पुरस्कार म्हणजे फार लांबची गोष्ट वाटायची, ती आता इतक्याजवळ आली की विश्वासच बसत नाही. त्यामुळे खूप दडपण येतं मनावर आणि खूप जबाबदारी वाढलीय याची जाणीव होते.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4328
.............................................................................................................................................
लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.
hermesprakashan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 12 January 2018
हीनाताईंच्या प्रतिसादास अनुमोदन. 'कविता कशी असावी किंवा कविता महत्त्वाची का वाटते?' या प्रश्नास दिलेलं उत्तर खरंच मननीय आहे. मला फारसं काही कळंत नाही. शेतीतलंही नाही आणि कवितेतलं तर नाहीच नाही. तरीपण कथन प्रांजळ वाटतंय. शेती करताना कल्पना ताईंना सतत जाणवायचं की, आपण शिकलो आहोत खरं, पण यातून आपण स्वत:ला शोधत गेलं पाहिजे. हे जे वाटणं आहे ते जपून ठेवायला हवं. स्वत:ला शोध घ्यायला लावणारं शिक्षण कुठे मिळेल बरं! -गामा पैलवान
Heena khan
Fri , 12 January 2018
किती सरळ, साधं व्यक्तिमत्व. कल्पना ताई यांचे अभिनंदन ! सुशील धसकटे यांनीही लेखनात तो मातीतला बाज काय मस्त सांभाळलाय. सुशील यांचे ही कौतुक.