मुस्लिम समाजात काही घडतंच नाही असं हल्ली सरळसोट बोललं जातं. दहशतवादी कारवाया, गुन्हेगारीत मुस्लिम समाज ठळक दिसतो, असाही समाजातील काहीजण आरोप करतात. शिवाय मुस्लिम बायकांचे बुरखा, तोंडी तलाक हेच एकमेव प्रश्न आहेत अशीही अनेकांची धारणा असते. ‘ते आणि आपण’ अशीही एक भावना सध्या जोर धरत आहे. त्याचं कारण सध्याच्या मुस्लिम समाजात काय घडतंय या माहितीचा अभाव. मात्र आज मुस्लिम समाजातील तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. हे तरुण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्नांसाठी उभे राहत आहेत. आपापल्या परीनं आपापल्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवत आहेत, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना हात घालत आहेत. त्याविषयी लिहीत आहेत, मांडत आहेत. मुस्लिम समाजात काहीच घडत नाही या भावनेला छेद देणारी ही बाब आहे. आपल्या बिकट परिस्थितीशी सामना करून, मुस्लिम समाजाचे म्हणून असणाऱ्या ठराविक साच्यातून बाहेर पडून, नवनव्या वाटा शोधणाऱ्या तरुण-तरुणींचं मानस समजून घेण्याचा प्रयत्न ‘रौशनख़याल’ या साप्ताहिक सदरातून केला जाईल. ‘रौशनख़याल’ म्हणजे सकारात्मक. मुस्लिम समाजातल्या तरुणांची सकारात्मक ऊर्जा समोर आणणं, हा या सदराचा हेतू आहे.
.............................................................................................................................................
“ ‘ये बाजारू औरतें हैं. दुसरों के घर बर्बाद करने आती है. इनको इस्लाम की बातें क्या समझेगी. इन्हे क्या पता तलाक कैसे दिया जाता है और शरियत के लॉ में तब्दिली लायेंगे तो क्या तुफान आयेगा. इन्हे तो बस अपनी पडी है. अपना नहीं संभाल पायी, तो दुसरे औरतों के घरों को उजाडती रहती है.’ असे शब्द ऐकण्याचीही सवय झालीये. उलट अशा शब्दांत गौरव ऐकला की, कामाचा उत्साहच वाढतो,” असं रूबीना पटेल एकीकडं सांगत होत्या आणि दुसरीकडं तलाकपीडित महिलेची फाईल चाळत होत्या.
त्या बोलत होत्या, “माझ्या माहितीत आजच्या घडीला नागपुरात तीन शरियत न्यायालयं सुरू झाली आहेत. तिथलं कामकाज मौलवींसारखंच. पुरुषानं येऊन सांगितलं की, बायकोचं चारित्र्य चांगलं नाहीये, ती आमचं ऐकत नाही, ती वेडी आहे या कारणांमुळे आम्ही तिला तलाक दिलाय तर त्याचा तलाकनामा हवाय. न्यायालयातले साहेब कुठल्याही प्रकारची शहानिशा करत नाहीत. त्यांना त्याची जरुरीच वाटत नाही. ते सरळ तलाकनामा लिहून देतात. त्यांना एकदाही समोरच्या व्यक्तीच्या बायकोला बोलावून ती खरंच वेडी आहे का, चारित्र्यहीन आहे का हे विचारावंसं-तपासावंसं वाटत नाही. अशा महनीय लोकांना आपण काही समजवायला गेलो की, ते आपलाच उद्धार करणार. त्यामुळे लक्ष द्यायचं नाही. काम करत रहायचं.”
नागपूरात ‘रूबी सोशल वेल्फेअर’ या संस्थेच्या माध्यमातून रूबीना पटेल या मुस्लिम स्त्रियांसाठी काम करत आहेत. त्या तलाकपीडित मुली-महिलांना कायदेशीर सल्ला, समुपदेशन व मार्गदर्शन करतात. शिवाय या महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठीही त्यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. अठरा वर्षांच्या आतच आई आणि तलाकशुदा झालेल्या अनेकींना त्यांच्या संस्थेनं बळ दिलं आहे आणि त्यांच्या जगण्याला स्वप्नांचे पंखही दिलेत. हे सगळं करताना अनेकदा त्यांना अपमानाच्या प्रसंगांनाही सामोरं जावं लागतं, अगदी ज्या मुलीचं भलं करायचं आहे तिच्या पालकाकडूनही अवहेलना होते, पण त्यानं खचून न जाता त्या काम करत आहेत. मुलींचं आरोग्य, लिंगसमभाव, लघुउद्योगांसाठी मुलींना उद्युक्त करणं अशा विविध गोष्टी करत आहेत. उत्तराखंड येथील शायरा बानो यांनी तोंडी तीन तलाक, हलाला, बहुपत्नीत्व या गोष्टी रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रूबीना यांनी या याचिकेला पाठिंबा देणारी एक जनहित याचिका बेबाक कमिटीमार्फत दाखल केली आहे.
रूबीना आज कोणाचीही भीडभाड न ठेवता आपल्या समाजापुढेच उभ्या राहू शकतात; मुस्लिम मोहल्ला, वस्तीतून बेखौफ फिरू शकतात; कणखरपणे कोणाच्याही ‘बाजारू’ शब्दालाही न जुमानण्याची वृत्ती ठेवू शकतात; त्याचं कारण त्या जे खडतर आयुष्य जगल्या त्यात आहे. लहानपणापासूनच त्या सोसत-भोगत वाढल्या आणि सासरीही त्यांच्या नशिबी यातनाच आल्या. माहेर-सासर म्हणजे आगीतून फुफाटा. पण त्या चिवटपणे आपल्या आयुष्यातील सगळ्या परिस्थितीशी दोन हात करत उभ्या राहिल्या आणि आज इतरांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.
रूबीना यांचा जन्म उमरेड तालुक्यात झाला. कुटुंबात सुबत्ता होती, मात्र वडिलांच्या दारूड्या स्वभावामुळे त्यांच्या व त्यांच्या आईच्या वाट्याला सतत मारहाण, अवहेलना आली. अनेकदा ते रात्री उशीरा घरात येत व कुठल्याशा रागाच्या भरात घरातील संपूर्ण स्वयंपाक फेकून देत. त्यामुळे अनेक रात्री भूकेचा गोळा पोटात दाबतच त्या वाढल्या. अशा बिकट परिस्थितीतही त्यांना जगण्याची उर्मी शिक्षणातून मिळत होती. शिक्षणाची आवड असल्यानं घरच्या परिस्थितीकडं दुर्लक्ष करण्यासाठी अभ्यासाची त्या मदत घेऊ लागल्या. अभ्यासावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करून बाकी सगळ्या हाल-अपेष्टा सहन करत राहिल्या. १२वी झाल्यानंतर त्यांना पुढे शिकायचं होतं, मात्र घरची एकंदर परिस्थिती पाहता त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. पती शिक्षक होता. माहेरी नाहीतर सासरी आनंदी जीवन असेल, पतीबरोबर आता चांगलं जीवन जगू असा विचार करत त्या भंडारा जिल्ह्यातील पतीच्या गावी, घरी आल्या. पती शिक्षक असल्यानं आपल्याला शिक्षणाची दारं खुली होतील असं त्यांना वाटत होतं. मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला.
रूबीना सांगतात, “माझं सासर पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनं जगणारं होतं. मी घर सांभाळावं, बुरखा घालावा आणि नवऱ्याच्या कह्यात रहावं अशी त्यांची अपेक्षा होती. मला मात्र हे मान्य नव्हतं. त्यामुळे इथं पुन्हा छळाचा दुसरा भाग सुरू झाला. वडिलांचं छळून झालं होतं, आता नवऱ्यानं मानसिक, शारीरिक, लैंगिक छळाला सुरुवात केली. शिक्षक नवऱ्याला न शोभणाऱ्या अशा अनेक गोष्टी तो करत असे. त्याच्या दृष्टीनं पत्नी म्हणजे त्याची संपत्ती, म्हणून उपभोगायची वस्तू. ” मारहाण, छळासह सुरू असणाऱ्या संसाराच्या पाच वर्षात त्यांना एक मुलगा व एक मुलगी ही झाली. संसार म्हणून त्या निमूट सहन करत राहिल्या.
संसार, मारहाण, मुलबाळ असं सुरूच असतानाही त्यांची शिक्षणाची ओढ काही कमी होत नव्हती. मग त्यांनी हट्टानं बी.ए.च्या शिक्षणाला सुरुवात केली. नवऱ्याला सांगूनही उपयोग नाही होत तेव्हा त्यांनी परस्परच प्रवेश घेतला. याचा राग त्याच्या मनात होता. त्यामुळे तो त्यांची पुस्तकं फाडून, फेकून देत असे. एका वर्षी तर परीक्षेलाही जाऊ दिलं नाही. पण त्यांनी काहीही करून आपलं शिक्षण सोडलं नाही. पुन्हा पुढच्या वर्षी परीक्षा देऊन त्या बी. ए. झाल्या. रूबीनाताईंची आता अजून शिकण्याची इच्छा बळावली.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296
.............................................................................................................................................
रूबीनाताई सांगतात, “माझ्या इच्छा, आकांक्षा आणखी वाढायला लागल्या. मला उंच आकाशात उडायचं होतं. आपलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मुलगा ११ महिन्यांचा असताना एक दिवस सासरी भांडण झालं. नवऱ्यानं इतकं मारलं की, त्यानंतर मला जागचं हलताही येत नव्हतं. घरातील इतर लोक यात बोलू शकत नव्हते, कारण तो एकमेव घरात शिकलेला होता. शरीरावर अनेक व्रण उमटले. मी त्या संपूर्ण रात्री एक शब्द न बोलता डोळ्यांची पापणी न हलवता अचेत अवस्थेमध्ये निष्प्राण असल्यासारखी बसून राहिले. माझी अवस्था बघून तो थोडा घाबरला होता. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गावी म्हणजे ज्या ठिकाणी नोकरी होती तिथं आलो. त्याला वाटलं सर्व ठीक आहे, परंतु माझ्या डोक्यात एकच विचार सुरू होता. पुढचं आयुष्य मला आता हिंसा सहन करत जगता येणार नाही. मी निर्धार केला, आता आणखी सहन करणार नाही.”
रूबीनाताईंनी आपल्या बाळाला घेतलं आणि घर सोडण्यासाठी निघाल्या. त्यांच्याकडे माहेर नव्हतं, नातेवाईक, समाज हितचिंतक नव्हता आणि मुख्य म्हणजे त्यांना आत्महत्या करायची नव्हती. मग त्यांनी ठरवलं बाबा आमटेंकडे जायचं. १९९४ ची ही गोष्ट. बाबा आमटे त्यावेळेस बडवानीजवळ कसरावदला होते. मजल-दरमजल करत त्या दोन दिवसांनी बाबा आमटेंकडे पोहचल्या. बाबा-साधनाताईंनी त्यांना सांत्वना दिली, पण टेलिग्राम पाठवून त्यांनी त्यांच्या नवऱ्याला बोलावून घेतलं. तेव्हा त्यांच्या नवऱ्यानं रूबीनाताईची असहायता ओळखली. या प्रसंगाविषयी रूबीनाताई सांगतात, “त्यावेळेस माझ्या नवऱ्याला बोलावून घेतलं नसतं तर मी खूप लवकर मोकळी झाले असते आणि समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं असतं. माझं काम हे अगदी अलिकडे १०-१२ वर्षांपासूनचं. बाबा-साधनाताईंना वाटलं असेल की, मुलीचा संसार का मोडावा. नवऱ्याला दम दिला तर कदाचित त्यातही सुधारणा होईल आणि मी अगदी घर सोडू शकते याची जाणीवही होईल पण घडलं भलतंच. बाबांनी रागावल्यानंतर त्यानं त्यांच्यापुढं असं वागणार नाही याची कबुली दिली. घरी परतले. या गोष्टीनं मात्र त्याला खात्री झाली की हिला माझ्याशिवाय कोणी नाही. त्यामुळे अत्याचाराचा पाढा वाढला. काहीही केलं तरी मी कुठं जाणार किंवा परत तिथंच येणार.”
तरी रूबीनाताईंनी आपल्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. नवऱ्यानं अनेक वेळा पुस्तकं फेकली, जाळली. एकदा तर रूबीनाताईंनी लिहून ठेवलेलं बरंच दस्त जाळून टाकलं. ते खूप मोठं नुकसान होतं असं रूबीनाताईंना आजही वाटतं. मग मुलगी जन्मल्यानंतर त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं ठरवलं. भांडण, शिव्याशाप सहन करत त्यांनी कर्ज काढून स्टुडिओ टाकला. पुढे त्यांना एम.एस. डब्ल्यू करायचं होतं. यावरून पुन्हा भांडणं सुरू झाली.
एकूण इतकी विरोधातील परिस्थिती असताना रूबीनाताई या जिद्द कुठून आणत होत्या हेच कळत नव्हतं. तुमच्याकडे इतकी जिगर आली कुठून? पाण्यात राहून मोठ्या माशाशी हे वैर कसं निभावलं? असं विचारल्यावर त्या किंचित हसत म्हणाल्या, “बंदमुक्त जगण्याच्या आशेनं हे घडून आलं. सतत वाढणाऱ्या घुसमटीनं अस्वस्थ व्हायचे. सुरुवातीला सगळं अवघड वाटत होतं. पण नंतर लक्षात आलं की, तो किमान लोकलाज बाळगतो. घरात त्याला माझं हे शिक्षणाचं खूळ नको वाटायचं, पण बाहेर माझ्या शिकण्याचं क्रेडिट तोच लाटायचा. लोकांना वाटायचं किती पुरोगामी नवरा! यामुळे त्यानं कितीही आदळाआपट केली तरी मी शिक्षणाचा हात सुटू दिला नाही. एका मर्यादेपलिकडं त्याचा नाईलाज होऊ लागला. त्याचं दुटप्पी वागणं त्यालाच भोवत होतं म्हणून तर हे वैर पत्करता आलं. अर्थात त्यानं त्याच्या अल्पबुद्धीनं त्याचा सूड उगवायचा प्रयत्न केलाच, तलाक देऊन.”
रूबीनाताई या स्वत: तलाकपीडित आहेत. त्या माहेरी आईकडे होत्या, तेव्हा एक दिवस त्यांच्या पतीनं स्थानिक मुफ्तीकडून ‘फतवा’ बनवून रूबीना यांना तलाक दिला. तोपर्यंत त्यांच्या संसाराला बारा वर्षं पूर्ण झाली होती. नवऱ्याला तेव्हा दुसऱ्या लग्नाचे वेध लागले होते. तलाकसोबत मुलांचीही वाटणी करून टाकली. मुलगा स्वत:कडे ठेवून घेतला, तर मुलगी दिली. म्हणजे यातही राजकारण. जबाबदारी वाटणारी मुलगी नकोशी वाटली म्हणून तिला पाठवून दिलं. या सगळ्या प्रसंगाविषयी त्या सांगतात, “माझ्या हाती तर तलकानामासुद्धा दिलेला नव्हता. नुसतंच सांगून पाठवलं होतं. माझ्या मेहेरची रक्कम दिली नव्हती, स्त्रीधन नाही, पोटगी नाही, खर्च करून उभारलेल्या स्टुडिओचं सामान फेकून दिलं होतं. नवरा दुसऱ्या लग्नालाही तयार झाला. हे लग्न रोखायला गेले, तेव्हा पोलिसांकडून कसलीच दाद मिळाली नाही. पोलिसांना सांगितलं, मी कायदेशीर बायको आहे, लग्न थांबवा. पोलिस मात्र हलले नाहीत. पूर्ण दिवस रडण्यात, पोलिसांशी भांडण्यात गेला. मी मुस्लीम होते म्हणून माझ्यासोबत भेदभाव करण्यात आला? संविधानानं सर्वांना समान अधिकार व समान कायदे दिले आहेत. मला द्विभार्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत का संरक्षण मिळालं नाही? उलट तुमच्यावर गुन्हा दाखल करू, अशी पोलिसांना धमकी दिली. शेवटी लग्न झालंच. कित्येक महिने पुढे मला मुलाची भेट घेऊ दिली नाही. एक दिवस मुलाला भेटायला गेले तर गावकऱ्यांसमोर खूप मारहण केली. विहिरीत ढकलून दिलं. वर पोलिसांकडे जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार केली. नशीब बलवत्तर होतं म्हणून नुसतं पायावर निभावलं. पायाला जबरी मार लागला. पाय दुखावला तो कायमचाच.”
दुखापतीनंतर सहा महिने रूबीनाताई अंथरूणावरच होत्या. हळूहळू बऱ्या झाल्या. आई व मुलीसह नागपूर येथे राहू लागल्या. त्यांच्याविरुद्ध आत्महत्येची केस सुरू झाली होती. पण त्यांनी पाठपुरावा करून स्वत:ला सिद्ध केलं. न्यायालयानं त्यांना त्यातून निर्दोष मुक्त केलं. पण नवऱ्याविरुद्धची तलाकची केस तशीच राहिली. वकिलाच्या अज्ञानामुळे ४९८ ची केस त्यांना हरावी लागली. शेवटी त्यांनी न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला. मुलाच्या कस्टडीसाठी केस दाखल केली. स्वत:हूनच कायद्याचा व स्वत:च्या केसचा अभ्यास करू लागल्या. पण पोटाची खळगी कशी भरणार? त्यासाठी हालचाल करणं आवश्यक होतं. यासाठी सर्वप्रथम त्यांनी बुरख्यासारखी बंधनं झुगारून टाकली. तो त्यांच्या संघर्षाचा काळ सुरू होता. त्यांनी मुलीसाठी जगणं अपरिहार्य आहे, हे समजून घेत बी. एड. करून शाळेत शिकवण्यास सुरुवात केली. एम. एस. डब्ल्यू आणि एम. ए.च्या शिक्षणाला सुरुवात केली. महिला विकास आणि समुपदेशन या विषयात त्यांनी एम. एस. डब्ल्यूचा अभ्यास केला. शिक्षणाची कास धरत त्या दु:खातून बाहेर निघत चांगल्या आयुष्याकडे वाटचाल करू लागल्या.
या सगळ्या अनुभवातून जाताना आपल्यातही काय बदल झाल्याचं जाणवलं असं त्यांना विचारलं तर त्या पटकन म्हणाल्या, “मी बंडखोर झाले. सगळी बंधंन झुगारून लावली. सुरुवातीला मला वाटायचं की, मी इतकी दर्ग्यात जाऊन मन्नत करते तरीही माझ्याच वाट्याला हे दु:ख का? मग नंतर असा विचार करणंच सोडून दिलं. शिक्षण-कामात स्वत:ला व्यग्र केलं. सुरुवातीला मला बस, ऑटोनं फिरायचं कसं हेही माहीत नव्हतं. भलतीकडून रस्ता ओलांडताना, ‘ए मर रही है क्या?’ अशा शिव्या खाव्या लागत. घाबरट, आत्मविश्वास गमावलेली, रडणारी, अशी माझी अवस्था हळूहळू बदलत गेली. अनेक बरेवाईट अनुभव आले. न्यायालयाच्या सगळ्या भानगडी संपवल्या. मी नातेवाईकांकडे जाणं सोडलं. टीकाटिप्पणी करणाऱ्यांचा विचार सोडला. विरोध पत्करून आता खरं जगायला सुरुवात केली. मला जे समाजकार्य करायचं होतं ते मी बिनधास्तपणे, कुठलंही बंधन न जुमानता करायला लागले...”
एम. एस. डब्ल्यू सुरू असतानाच रूबीनाताई गरजू महिलांचं समुपदेशन करू लागल्या. मग २००५ मध्ये एका भाड्याच्या खोलीत ‘रूबी सोशल वेल्फेअर सोसायटी’ची स्थापना केली. आज संस्थेत त्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कामात गुंतलेल्यांशी संपर्क वाढवला. लिंग समभाव आणि महिलांविषयक कार्यशाळांना उपस्थित राहू लागल्या. मुक्तपणे समाजकार्यात स्वत:ला गुंतवण्याची धडपड वाढीस लागली. त्यांच्या कामाला गती आली. खेड्यापाड्यातल्या महिलांचं समुपदेशन करू लागल्या. महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेऊ लागल्या. जागोजागी स्वत:च्या अनुभवातून महिलांना मार्गदर्शन करू लागल्या. उदबोधन करून महिलांना शहाण्या होण्यास उद्युक्त करू लागल्या. यासाठी २०११ मध्ये रूबीना यांनी ‘रूबी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ सुरू केली. गरीब, गरजू मुस्लिम महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. रूबीना म्हणतात, “धार्मिक पगड्यामुळे महिलांना त्यांचं कौशल्यही दाखवता येत नाही. काही जणींकडे कौशल्य नसतं, पण संकट आल्यानंतर एकाएकी त्या एकट्या, निराधार होतात. यासाठी प्रशिक्षण केंद्रातून त्यांना विविध रोजगारक्षम अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्याचा विचार आहे.”
सध्या या केंद्राला शासनमान्यता मिळाली आहे. त्यामुळे शासनमान्य व्होकेशनल कोर्स- ज्यात ब्युटी पार्लर, मोंटेसरी आणि संगणकाचे अर्धवेळ अभ्यासक्रम आहेत, तर फॅशन डिझायनिंगचा पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही या ठिकाणी त्यांनी आणखी एक समुपदेशन केंद्र सुरू केलं आहे. दारूबंदीसाठी त्यांनी महिला मोर्चाही काढला होता. नागपूर व कुही या दोन्ही ठिकाणी मिळून सहा जणांचा स्टाफ काम करत आहे. याशिवाय रूबीना यांचं ‘मुस्लिम महिला मंच’ हे समुपदेशन केंद्रही चालतं. त्यांनी स्वत: आतापर्यंत ८००-९०० केसेस हाताळल्या आहेत. अनेकींना मोफत कायदेशीर मदतही केली आहे. मागील दहा वर्षापासून त्या महिला हिंसाचाराविरुद्ध लढत आहेत. महिलांवर येणारी ही वेळ लक्षात घेऊन त्या मुलींसाठी गटबांधणी करत आहेत. १०० मुलींचा गट करून, दर आठवड्याला लहानवयातील लग्न, पर्दापद्धत, धर्म, पुरुषसत्ताक मानसिकता, लैंगिकता आणि लिंगभाव या विषयांवर चर्चासत्रांचं आयोजन करतात.
त्यांच्या संघर्षाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारही देण्यात आले. हमीद दलवाई पुरस्कार, बाबुराव सामंत संघर्ष पुरस्कार (२०१४), अग्निशिखा, क्रांतीज्योती, डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार, नारीरत्न पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र सर्वांत मोठा पुरस्कार मिळाला, तो त्यांच्या मुलाचे त्यांच्याकडे परतण्यानं. वडिलांचं घर सोडून मुलगा त्यांच्याकडे आला, इतकंच नव्हे तर त्यानं वडिलांच्या नावाचा त्याग करत आईचं नाव लावलं. आज त्यांच्या दोन्ही मुलांनी विशी ओलांडली असून रूबीना यांना त्यांच्या समाजकार्यात पूर्णपणे पाठिंबा देत आहेत.
.............................................................................................................................................
लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.
greenheena@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment