अजूनकाही
गेले चार-पाच दिवस महाराष्ट्र होरपळत आहे. सोशल मीडियापासून ग्राउंड लेव्हलपर्यंत तीच परिस्थिती आहे. अशी परिस्थिती इतक्या जवळून बघण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. या सगळ्या विविध वादात मला एक गोष्ट अगदी ठळकपणे दिसली. ती म्हणजे या सगळ्या घटनांमध्ये असणारा ‘युवकांचा लक्षणीय सहभाग’. कोणत्याही घटनेत युवकांनाच सहभाग असणं, ही तशी चांगली गोष्ट आहे. युवक हे देशाचं भविष्य आणि वर्तमान घडवत असतात.
पण या वेळेस मला एक गोष्ट खूप निराश करून गेली. ती म्हणजं ‘युवकांचं फुटसोल्जर होणं’. आजच्या युवकाला लढाई लढायला खूप मज्जा येते, मग ती फेसबुकवर असो किंवा ग्राउंड लेव्हलवर. हातात दगड, काठी घेऊन तोडफोड करायला, हिंसा करायला खूप चेव येतो. त्याचं सळसळतं रक्त असतं त्यामुळे.
कोरेगाव भीमाचे, महाराष्ट्र बंदचे, तसंच राजकीय पक्षांच्या आंदोलनांचे विविध व्हिडियो मी पाहिले. त्यांत काही युवक अगदी आक्रमक होत, शिवीगाळ करत, कायदा हातात घेत, नकळतपणे गुन्हे करताना दिसले. आंदोलने, मोर्चे हे काही काळासाठीच असतात. पोलीस नंतर यात जे सामील होतात, त्यांना अटक करतात आणि विविध कलमं त्यांच्यावर लावतात. मग सुरू होते तारीख पे तारीख. या नादात युवकांच्या करिअरची वाट लागते आणि आयुष्याचं अजून मातेरं होतं.
हे युवक फूटसोल्जर होतात, याची मुख्य कारणं - १. कमी शिक्षण, २. बेरोजगारी, ३. गरिबी, ४. अस्मिता (जातीय, धर्मीय, पक्षीय. अजूनही असतील)
राज्यापुरतं बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात दोन महापुरुषांच्या नावावर कोणताही युवक आकर्षित होतो. इतकं मोठं काम त्या महापुरुषांचं आहे. त्यातलं एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मला व्यक्तिश: हे दोन्ही महापुरुष मनापासून आवडतात. (काही लोकांना शिवराय हे पराक्रमी, मुस्लिमविरोधी वाटतात, पण मला ते ‘मॅनेजमेंट मास्टर’ वाटतात, अगदी तसंच बाबासाहेबांचं आहे.) या दोन व्यक्तींच्या नावाखाली युवकांना फूट सोल्जर म्हणून वापरलं जातं. जास्त करून शिवाजी महाराजांच्या नावाखाली वापरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून जर तुम्ही फिरलात तर समजेल की, बसस्टॉप, विविध चौक यांसारख्या ठिकाणी मोठे मोठे फ्लेक्स लागलेले असतात.
यांच्यानंतर येतात ते ‘राजकीय लोक’. आजकाल काही लोकांकडे मजबूत पैसा आला आहे. त्यामुळे त्यांना समाजाचे नेते बनायची आस लागते. त्यासाठी मागे-पुढे करणारी पोरं लागतात. आता पोरं हवी आहेत, तर त्यांच्या खाण्याचं-पिण्याचं बघावं लागतं. ते पैसेवाले नेते बघतात आणि एकदा ते झालं की, ही पोरं त्यांची मिंधी होतात. मग आंदोलनं, मोर्चे यांत सामील होतात. (याचा एक किस्सा आहे, मी माझ्या डोळ्यादेखत पाहिलेला. काही दिवसांपूर्वी एका महानगरपालिकेत गेलो होतो. तिथं एका अधिकाऱ्याबरोबर एक मिटिंग होती. ती झाल्यावर असंच अनौपचारिक गप्पा मारत होतो. त्यावेळेस एक स्थानिक नगरसेवक एका तरुण मुलाला घेऊन आला आणि त्या अधिकाऱ्याला म्हणाला, ‘याला काहीतरी जॉब दे. कामाला ठेव’. आणि निघून गेला. मग माझ्यासमोरच त्या पोराची मुलाखत झाली. त्याला विचारलं- ‘टायपिंग येतं का?’ तर त्याला येत नव्हतं. मग विचारलं- ‘तू काय काम करायचा अगोदर?’ त्यानं सांगितलं की, ‘मी सगळं मॅनेज करायचो. जसं कि फ्लेक्स बनवणं, निवडणुकीचा प्रचाराला पोरं बोलावणं वगैरे वगैरे’. मग त्या अधिकाऱ्यानं त्याला खूप भोसडलं आणि त्याला एखादा कोर्स करायला सांगितलं. त्या नगरसेवकाला कॉल करून सांगितलं की, असली बिनकामाची पोरं नका पाठवू. तर नगरसेवक म्हणाला- ‘माझं काम झालं आता’. आणि त्यानं त्या पोराला वाऱ्यावर सोडलं.) राजकीय नेत्यांना त्यांचा जनाधार वाढवायचा असतो. त्यासाठी ही तरुण पोरंच कामी येतात. बऱ्याचदा पोलीस यांच्यावर गुन्हे नोंदवतात. एकदा गुन्हा नोंदला गेला की, मग स्पर्धा परीक्षा किंवा खाजगी क्षेत्रातील चांगले जॉब मिळण्याच्या संधी कमी होतात.
या युवकांचा मी जो थोडासा अभ्यास केला आहे, त्यात मला असं आढळून आलं आहे कि, साधारणतः ही मुलं मध्यमवर्गीय, खालच्या थरातील असतात. ज्यांना लवकर मोठं होण्याची इच्छा असते. दुसरं असं की, त्यांचं शिक्षण दहावी-बारावीपर्यंतच झालेलं असतं. एखादाच पदवीपर्यंत गेलेला असतो. तसंच बहुतांश युवकांचे आई-वडील कामगारवर्गात मोडतात. एखाद्याचेच जमीनदार, बागायती शेती असणारे असतात. या युवकांना आर्थिक पाठबळ अजिबात नसतं. न्यायालयाच्या वाऱ्या करायला पैसे नसतात.
जात, धर्म, मित्र,पक्ष, कार्यकर्ता धर्म या फॅक्टर्स वर लोक किती दिवस आणि किती जणांना मदत करणार, हाही प्रश्न आहेच. या युवकांबद्दल वाईट यासाठी वाटतं की, यांच्या जीवावर मोठे होणारे लोक नंतर त्यांना विसरून जातात. त्यांची मुलं कधीच मैदानात उतरत नाहीत आणि ज्यावेळेस उतरतात त्यावेळेस सरळ त्यांना ‘युवक अध्यक्ष’ वगैरे पद दिलं जातं. पश्चिम महाराष्ट्रात अशी कितीतरी उदाहरणं समोर येतात. काही युवक हे कायम ‘सतरंजी’ उचलण्यातच आयुष्य घालवतात.
एक लक्षात घेतलं पाहिजे, राजकारण आता तेवढं सोपं राहिलेलं नाही. पैशाशिवाय काहीच होत नाही. अरविंद केजरीवालांनासुद्धा ‘डिनर विथ अरविंद’ असे कार्यक्रम हातात घेऊन पैसा उभारावा लागतो.
काम झालं की, या युवकांना वाऱ्यावर सोडलं जातं. तेव्हा वेळ बराच निघून गेलेला असतो. मग घरातली जाण येते, नोकरी शोधायला गेलं तर अल्पशिक्षणामुळे चांगली नोकरी मिळत नाही. एमआयडीसी, हॉटेल्स, गाडीवर ड्रायवर अशा नोकऱ्या मिळतात. जी मुलं शिकलेली असतात, ती पुण्या-मुंबईला येतात. शहरात आलं की, आपली लायकी समजते. गावाकडे जो नावापुढे ‘सरकार’ लावत असतो, “मैं बडा तो सरकार से बडा” असले नकली डायलॉग मारून हिरो बनत असतो, त्याला मुलाखतीमध्ये साधं ‘अबाउट मी’ सांगता येत नाही. तीन-चार ठिकाणी रिजेक्ट केलं की, मग जॉब लागतो. महत्त्वाचं म्हणजे असे मुलाखती घेणारे तेच परप्रांतीय असतात, ज्यांचा विरोधात कधीतरी यांनी आंदोलन केलेलं असतं.
आता प्रश्न येतो तो अशा युवकांना फूट सोल्जर होण्यापासून रोखायचं कसं? याचा सर्वांत सोपा उपाय आहे- तो म्हणजे ‘शिक्षण’. डॉ. बाबासाहेबांनी, कर्मवीर पाटलांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं. शिक्षण हेच परिस्थिती बदलण्याचं सर्वांत मोठं शस्त्र आहे हे सांगितलं होतं. युवकांनी त्या मार्गावर गेलं पाहिजे. शिक्षण तेही इंग्लिशमधून निदान पदवीपर्यंत झालं पाहिजे. विविध व्यवसायाभिमुख कोर्सेस असतात. ते करावेत. या कोर्सेससाठी पैसे कसेतरी उभे करता येतातच. जर शिक्षणाची समस्या असेल तर स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. विविध व्यवसायाभिमुख कोर्से असतात. अगदी अंडा-पावची गाडी सुरू केली तरी खूप आहे. हळूहळू परिस्थिती सुधारते. आणि यात लाज वाटायचं काहीच कारण नाही. आणि असा न्यूनगंड बाळगणं तर एकदम चुकीचं आहे की, ‘मी काय भैय्या आहे का पाणीपुरी विकायला?’
बऱ्याच मोठ्या लोकांनी शून्यातून सुरुवात केली. ते पुढे गेले आहेत. पैसे उभा करणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही. फेसबुकवर रोज सकाळी ‘कडक निळा जयभीम’, ‘शिवसूर्यजाळवाली शिवसकाळ’, ‘जय लहुजी’, ‘जयतुहिंदूराष्ट्रम’ अशा पोस्ट टाकण्याऐवजी धंदा उभा करण्यासाठी मदत मागितली तरी लोक ‘फुल ना फुलाची पाखळी’प्रमाणे मदत करतील. आणि हो, अशा पोस्टसमध्ये हवं तितक्यांना टॅग करू शकता.
शेवटी एकच सांगायचं आहे. जात, धर्म, पक्ष यांच्यावर आधारित ‘पोकळ अस्मिता’ तुमचं घर चालवू शकत नाही. तुम्ही अमुक जातीचे आहात म्हणून तुम्हाला अन्न काही फुकट मिळत नाही. ते तुमचं तुम्हालाच कमवावं लागतं.
जागतिकीकरण खूप वेगात सुरू आहे. या वेगात बाकीची दुनिया ही ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’च्या पायरीवर गेली आहे. आणि आपण कुठे आहोत याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. सध्या जगभरात शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका अहवालानुसार २०५० पर्यंत जगातील ९० टक्के लोकसंख्या शहरी असेल. त्या शहरीकरणात आपलं स्थान कुठे असणार आहे, याची या युवकांना काहीच कल्पना नाहीये. यासंदर्भात महशर बदायुनी यांची एक रचना आहे. ती अशी-
"अब हवाएँ ही करेंगी रौशनी का फ़ैसला, जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा".
सध्याच्या जागतिक हवेचा रोख वेळीच ओळखा आणि त्यासाठी तयार राहा.
निर्णय तुमचा आहे- फुटसोल्जर होऊन विझून जायचं आहे की, मेहनत करून ‘तेजोमय’ जीवन जगायचं आहे.
.............................................................................................................................................
लेखक मिलिंद कांबळे स्मार्ट सिटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रोजेक्ट कॉऑर्डिनेटर आहेत.
milind.k@dcfadvisory.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ananda Kamble
Fri , 12 January 2018
अगदी छान लेख लेखकांचंअभिनदन
vishal pawar
Tue , 09 January 2018
सत्य परस्थिती....
rohit bhosale
Mon , 08 January 2018
अभ्यासपुर्ण.. अगदी बरोबर मिलींद